गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या खेळाडूंसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. अद्याप कोविड-19 महामारी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता या कोरोनासह जगण्याची मानसिकता सर्वांनीच केली आहे आणि त्याशिवाय गत्यंतरही नाही. 2022 मध्ये अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम जाहीर झाला आहे.
कोरोनासह जगण्याचा आणि त्याच्याविरुद्ध लढण्याचा निश्चय या क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमांवरून स्पष्ट होतो. पाहूया कोणकोणत्या क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये होणार आहेत? ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आणि बॅडमिंटन स्पर्धाव्यतिरिक्त अशा कोणत्या क्रीडा स्पर्धा आहेत, जेथे खेळाडूंचा कस लागणार आहे?
क्रिकेट
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा (26 डिसेंबर ते 23 जानेवारी)
भारत कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत असून, उत्कंठावर्धक या मालिकेत भारताने पहिला कसोटी सामना जिंकला आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेनंतर तीन दिवसांचीच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहे. यात लोकेश राहुल याला प्रथमच भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा याच्या पायाच्या मांसपेशींना दुखापत झाल्याने तो या मालिकेबाहेर राहणार आहे. त्यामुळे राहुलला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
वेस्ट इंडीज : 19 वर्षांखालील आयसीसी वन-डे विश्व कप (15 जानेवारी ते पाच फेब्रुवारी)
दिल्लीचा फलंदाज यश धूल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. आतापर्यंत भारताने 19 वर्षांखालील गटात चार विश्वविजेतीपदे मिळवली आहेत.
आता पाचवं जेतेपद मिळविण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया ही स्पर्धा खेळेल यात शंका नाही. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार असून, एकूण 48 सामने खेळले जातील.
न्यूझीलंड : आयसीसी महिला एकदिवसीय विश्व कप (चार मार्च ते तीन एप्रिल)
भारतीय महिला संघाची कामगिरी पाहता यंदाच्या जेतेपदासाठी भारत कडवा दावेदार मानला जात आहे. ही स्पर्धा गेल्या वर्षीच 2021 मध्ये होणार होती.
मात्र, कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा एक वर्षासाठी स्थगित करण्यात आली होती.
संघाची कमान39 वर्षीय मिताली राज हिच्याकडे असेल. या स्पर्धेनंतर मिताली राज निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया : आयसीसी पुरुष टी-20 विश्वकप (16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर)
गेल्या वर्षीय 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया प्रथमच टी-20 मध्ये विश्वविजेता ठरला. वर्षभरातच आता हा संघ घरच्या मैदानावर पुन्हा विश्वविजेतेपदासाठी सज्ज असेल.
भारतीय संघ गेल्या वर्षी पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडला होता. यंदा ही निराशा दूर करण्याची संधी भारतीय संघाला असेल.
बहुविध स्पर्धा
चीन : शीतकालीन बीजिंग ऑलिम्पिक (चार ते 20 फेब्रुवारी)
मानवाधिकारामुळे प्रतिमा मलिन झालेला चीन राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामुळेच शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धेवर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी यापूर्वीच राजकीय बहिष्कार टाकला आहे. खेळाडूंना मात्र या राजकीय वादाऐवजी खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
भारताने शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये अद्याप एकही पदक जिंकलेले नाही.
स्कीइंग खेळाडू आरिफ खानवर भारताचं लक्ष असेल. आरिफ खानने स्लेलोम आणि जॉइंट स्लेलोम या प्रकारांत स्थान मिळवले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
बर्मिंघम (इंग्लंड) : राष्ट्रकुल स्पर्धा (28 जुलै ते आठ ऑगस्ट)
भारतीय खेळाडूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धा सर्वांत यशस्वी ठरलेली आहे. मात्र, यंदा या स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नाही.
यापूर्वी या खेळातच भारताने अनेक पदकांची लयलूट केली आहे. त्यामुळे भारताची पदकसंख्या घटण्याची शक्यता आहे.
नेमबाजी नसतानाही भारत या स्पर्धेत कशी कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. भारत पहिल्यांदा 1966 मध्ये खेळला.
तेव्हापासून आतापर्यंत भारताच्या खात्यात 63 सुवर्ण पदकांसह एकूण 135 पदके जिंकली आहेत.
हांगझू (चीन) : आशियाई स्पर्धा (10 ते 25 सप्टेंबर)
भारताने 2018 च्या आशियाई स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऑलिम्पिकमध्येही भारताची कामगिरी सुरेख राहिली आहे. त्यामुळे यंदाही उत्तम कामगिरी होईल अशी आशा भारतीय क्रीडाप्रेमींना असेल.
फुटबॉल
भारत : एएफसी आशियाई महिला कप (20 जानेवारी ते सहा फेब्रुवारी)
एएफसी आशियाई फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारतीय महिला फुटबॉलसाठी सर्वांत महत्त्वाचे पाऊल म्हंटले जाते. कारण 1979 नंतर प्रथमच ही स्पर्धा भारतात होत आहे. या स्पर्धेत भारत 1979 आणि 1983 मध्ये उपविजेता राहिला आहे. या कामगिरीतून प्रेरणा भारत घेईल, अशी आशा आहे.
भारत : 17 वर्षांखालील महिला विश्वकप (11 ते 30 ऑक्टोबर)
ही आणखी एक प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा भारतात होत आहे. ही स्पर्धा 2021 मध्ये झाली असती. मात्र, कोविड-19 मुळे ती स्थगित करावी लागली. स्पेन गतविजेता आहे. भारताचं लक्ष या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याकडे असेल.
कतार : फीफा पुरुष विश्व कप (21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर)
अरब देशांमध्ये होणारा पहिला विश्व कप कतारमध्ये होत आहे. कतारमध्ये असह्य तापमान अंगाची लाही लाही करतं. त्यामुळे ही स्पर्धा थंडीच्या मोसमात होणार आहे. उन्हाळ्यातील जून-जुलैमध्ये स्पर्धा आयोजित करणे अशक्य आहे.
यजमानपदासाठी लागलेली बोली आणि कामगारांच्या पायाभूत सुविधांमधील भ्रष्टाचाराचा सामना या स्पर्धेला करावा लागला आहे.
अॅथलेटिक्स
युगेन (अमेरिका) : आयएएएफ विश्व चॅम्पियनशिप (15 ते 24 जुलै)
प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेली आयएएफ स्पर्धा महामारीमुळे स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्ज हिने 2003 मध्ये लांब उडीत कांस्य पदक जिंकले होते.
अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.
भारताला आशा आहे, की यंदाच्या स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भालाफेक खेळाडू नीरज चोपड़ा आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करेल.
हॉकी
स्पेन आणि नेदरलँडमध्ये एफआयएच महिला विश्व कप हॉकी
भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवत सर्वांनाच प्रभावित केले होते.
राणी रामपाल हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ही सकारात्मक कामगिरी पुढे नेण्याचा प्रयत्न करील.
विश्व कप स्पर्धेतील भारताची सर्वोत्तम कामगिरी 1974 होती. त्या वेळी संघाने चौथे स्थान मिळवले होते. इंग्लंडमध्ये मागील स्पर्धेत संघाने आठवे स्थान मिळवले होते.
जलतरण
फुकुओका (जापान) : फिना विश्व अॅक्वाटिक्स चॅम्पियनशिप (एक ते 29 मे)
जलतरण, सूर मारणे, ओपन वॉटर जलतरण, कलात्मक जलतरण आणि वॉटर पोलो यांची दर दोन वर्षांनी होणारी ही अव्वल स्पर्धा आहे.
या स्पर्धेत भारताचा पदकाचा दावा फारसा मजबूत नाही. मात्र, भारतीय खेळाडू कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न नक्कीच करतील.
Follow on Twitter @kheliyad
Sports quiz | क्रीडा विषयावरील सामान्यज्ञान