महिलांवरील टिप्पणी पडली महागात!
टोकियो, 11 फेब्रुवारी
टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी Yoshiro Mori olympics | यांना महिलांवरील टिप्पणी चांगलीच महागात पडली आहे. महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी योशिरो मोरी यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. Offensive comment on women will be expensive |
जपानची क्योदो समाचार एजन्सी आणि अन्य वृत्तांमध्ये गुरुवारी या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार, मोरी यांना शुक्रवारी आपल्या पदावरून हटविण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यात त्यांनी महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर जपानमध्ये लिंगसमानतेवरून सार्वजनिक वादही चर्चेत आले होते.
ऑलिम्पिक आता केवळ पाच महिन्यांवर येऊन ठेपले आहे. अशा स्थितीत त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे.
आयोजन समितीच्या शुक्रवारच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काय म्हणाले होते मोरी?
जपानी ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत 83 वर्षीय मोरी यांनी महिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते, की महिला खूप जास्त बोलतात. कारण त्यांच्यात एकमेकींशी प्रतिस्पर्धा करण्याची भावना असते.
माजी पंतप्रधान मोरी यांच्या या टिप्पणीनंतर जपानमध्ये प्रचंड टीका झाली होती. या टिप्पणीनंतर त्यांनी माफीही मागितली होती. मात्र, राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला होता.