All SportsMount Everest seriesOther sports

Mount Everest series 5 : मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)

मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी (उत्तरार्ध)


Sleeping Beauty-2 | फ्रॅन्सिसला शेवटचं पाहणारी कॅथी ओडाउड हिने काय पाहिलं… याची उत्सुकता लागली असेल… पण तिने जे पाहिलं ते धक्कादायक आहे. तिने पाहिलेला तो प्रसंग तिच्याच शब्दांत…. Mount Everest series 5|


Mount Everest series |

संपूर्ण शरीर धडधडताना मी पाहिलं. शरीराचा कंप होत होता. पहिल्या टप्प्यावर असताना तिथं काहीशी सावली होती. प्रकाशही हलकासाच होता. त्या व्यक्तीचं शरीर मी जेथे उभी होते, तिथून सुमारे दहा मीटरवर पहुडलेलं होतं. अचानक तिने झटका दिला, जणू एखाद्या कठपुतळीला कसं दोरीने खेचतात, तसा होता.

मी चपापले. मी काही तरी पाहिलं होतं…

तसे आम्ही सगळे उत्तम पद्धतीने एव्हरेस्ट शिखराकडे कूच करीत होतो. आम्ही केवळ आमचीच काळजी करण्यात मश्गुल होतो. मात्र, ही कोण अनोळखी व्यक्ती, जी रस्त्यात क्षीण अवस्थेत पहुडलेली आहे? हलकेच कण्हण्याचा आवाज येत होता.

तेवढ्यात मागून आवाज आला, “थांबू नका, पुढे चला. पुढच्या व्यक्तीच्या मागे चालत राहा.” मी मात्र झटका देणाऱ्या त्या शांत पडलेल्या देहाकडे सारखी मागे वळून पाहत होते.

प्रत्येक संघाचं किंवा वैयक्तिक मोहिमेला निघालेल्या गिर्यारोहकाचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे विचलित न होता आत्मनिर्भर होऊन शिखराकडे जाणं. यात तुम्ही अन्न, कपडे, तंबू उधार घेऊ शकतात, त्यासाठी पैसेही मोजू शकतात; पण एका ठराविक अंतरानंतर तुम्ही जेव्हा निष्प्रभ होतात, तेव्हा तुम्ही टीमकडून केवळ मदतीची अपेक्षाच करू शकतात.

ते तुम्हाला विकत मिळत नाही. तेही तुम्हाला मिळेलच, याचीही खात्री नाही. कारण कुणालाही वाचवायचं असेल तर ते सहजपणे शक्य नाही. कारण तिथं ना आपत्कालीन नंबर असतो, ज्यावर तुम्ही कॉल केला, की तातडीने मदत मिळू शकेल.

कोणतंही बचाव पथकही तैनात नसतं, जे तातडीने तुमच्या मदतीला येऊ शकेल. एव्हरेस्टसारख्या शिखरावर जर तुम्ही गतिहीन, निश्चल झाला तर हमखास समजावे, की तुम्ही आता मरणार आहात!

एव्हरेस्टवर हेलिकॉप्टरला शोधून त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा आधी त्या मरणासन्न अवस्थेतील व्यक्तीला बेस कॅम्पवर आणणं आवश्यक असतं. जर अशा व्यक्तीला बेस कॅम्पवर घेऊन जायचं असेल तर अनेक टीम, डझनावर लोकं तर लागतीलच, शिवाय तब्बल तीन दिवसांची चढाईही करावी लागेल.

माझ्यासमोर अशी व्यक्ती होती, जी पूर्णपणे गलितगात्र झालेली होती. खाली येण्याऐवजी त्या व्यक्तीने पर्वतावरच रात्र काढलेली असावी. जोपर्यंत शरीर चालत राहतं, तोपर्यंत शरीरात ऊर्जा निर्माण होत असते.

मात्र, या गलितगात्र गिर्यारोहकाला वाचवण्यासाठी आमच्याकडे काही पर्याय आहेत, याबाबत मलाच शंका होती. कारण पैसा, वेळ, हजारो फुटांची उंची आणि शारीरिक आणि मानसिक श्रम यांच्यावर आमची संपूर्ण एव्हरेस्ट मोहीम अवलंबून होती.

हे सगळं प्रायोजकांमुळेच शक्य झालं, ज्यांनी आम्हाला शिखर सर करण्यासाठी पाठवलं होतं. आम्हा सगळ्यांची एकच महत्त्वाकांक्षा होती आणि त्या महत्त्वाकांक्षेसाठी आम्ही सर्व बांधिल होतो. आम्ही शिखरापासून अवघे २४० मीटर लांब होतो. म्हणजे शिखर के‌वळ चार-पाच तासांच्या अंतरावर आमची वाट पाहत होतं.

नियोजनाप्रमाणे शिखर आमच्या समीप होतं. शिखर सोडून आम्ही या गलितगात्र व्यक्तीच्या बचावासाठी वेळ का दवडावा? तो देह इंग्रजी ‘व्ही’ अवस्थेत पडलेला होता. असं वाटत होतं, जणू त्या गिर्यारोहकाच्या पाठीचा कणा मोडला आहे.

जर मी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, तर कदाचित माणूस म्हणून आपण पात्र नाही. मग वेळ का दवडायचा? ती व्यक्ती थंड होईल तेव्हा प्रयत्न करण्यात काय हशील? का नाही त्या व्यक्तीजवळ जावे आणि मग नंतर चढाई करावी?

माझ्या डोक्यात अनेक विचारांचं आंदोलन सुरू होतं. पण छे! सगळे मुद्दे, वाद, तार्किक विश्लेषणं कुचकामी होती. पण मला हे मान्य नव्हतं, की मानवी जीवनापेक्षा शिखर महत्त्वाचं आहे? जर शिखर सर केलेच तर त्या साहसाला काय अर्थ आहे, जेथे मी कुणाला तरी मरताना पाहिले…

मरणासन्न अवस्थेतील त्या देहाची अवस्था चिंताजनक असली तरी मला आशा सोडून चालणार नव्हते. मी इयान वूडॉलकडे गेले. तो जांगबू, ल्हाक्पा यांच्यासोबत चढाई करीत होता.

त्याला म्हणाले, “ती व्यक्ती जिवंत आहे. मी आता तिला पाहायला जाणार आहे.”

माझं बोलणं त्याला कदाचित कळलं नसावं.

“मी तिला सोडून जाऊ शकत नाही.” मी लगेच पुढचं वाक्य बोलले.

त्यानेही मला प्रतिसाद दिला. मी पायवाटेने चालत त्या निस्तेज देहापर्यंत पोहोचले, जे तुकड्या तुकड्यांनी विखुरलेल्या दगडांवर निस्तेज पडलेले होते.

मला वाटलं, ती एखाद्या रशियन टीमची सदस्य असेल. दोरखंड तुटल्याने ती कोसळली असावी. कारण तिच्या अंगावर दोर पडलेला होता… थंडीने गारठल्याने डोकं आणि पाय जवळ घेतलेल्या ‘व्ही’ आकारात पडलेली होती. मी खाली वाकून पाहिले, तर ती व्यक्ती एक महिला होती.

मी जवळ गेले तर अचानक कातर आवाज आला…. “मला सोडू नकोस.”

तिचं संपूर्ण शरीर दुधासारखं पांढरंशुभ्र पडलेलं होतं आणि त्वचा अतिशय मऊ होती. हे गंभीर शीतदंशाचं Frostbite | लक्षण होतं आणि तिने आपलं शरीर चिनी मातीच्या बाहुलीसारखं बनवलं होतं. ती एकटक माझ्याकडे पाहत होती. तिचे डोळे गडद निळे होते.

पुन्हा ते निस्तेज शरीर कळवळलं…. “मला सोडू नकोस!” Don’t leave me |

मला थिजल्यासारखं झालं. तिचे ते लांब, गडद केस अगदी  माझ्यासारखे दिसत होते. काही सेकंद तर मला धक्कादायक विचारांनी ग्रासलं, की मी माझ्या भविष्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

पुन्हा तिच्या हालचालींनी माझं लक्ष वेधलं. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं. मी एकटी तिला पुरेशी अजिबातच नव्हते. माझ्यासमोर दोनच गोष्टी होत्या- एक तर तिला वाचवण्याचा प्रयत्न करणे किंवा तिला तसंच सोडून जाणे.

मी दुसरा पर्याय निवडला.

मी त्या महिला गिर्यारोहकाला म्हणाले, “मला माझ्या टीमला इथे घेऊन येणं आवश्यक आहे. आम्ही आणखी काही जण आहोत. आम्ही तुला वाचविण्याचे पूर्णपणे प्रयत्न करू. निश्चिंत राहा, मी परत येईन!”

“तू माझ्यासाठी का मदत करीत आहेस?”

मला तिच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यात वेळ दवडायचा नव्हता.

त्याच वेळी इयान आणि जांग्बू दोघेही माझ्या जवळ आले. ल्हाक्पा, पेम्बा, सी लुओ हेही आमच्या दिशेने येताना दिसले. सुदैवाने त्या महिलेला कोणत्याही गंभीर इजा झालेल्या नव्हत्या. मात्र, स्नायू आखडलेले होते.

चिंध्या चिंध्यांच्या बाहुलीसारखी ती असहाय पडलेली होती. कदाचित उतारावरून ती कलंडू नये म्हणून कुणी तरी तिच्या हाताच्या क्लिपमध्ये दोरखंड अडकवून निघून गेले होते. हेतू हाच, की तोपर्यंत कुणी तरी तिच्या मदतीला येऊ शकेल.

तिच्या जवळच केशरी रंगाची एक ऑक्सिजनची बाटली आणि रशियन बनावटीचा एक मास्क पडलेला होता. ऑक्सिजनची बाटली मात्र रिकामी होती. इयान आणि जांग्बू या दोघांनी तिला सरळ ओढलं आणि मी बाजूला पडलेले तिचे ग्लव्हज गोळा केले.

तिचे जॅकेट तिच्या खांद्यावर होते, पण हात बाह्यांमध्ये नव्हते. तिला गंभीर हायपोथर्मिया severe hypothermia | झाला होता. संवेदना जवळजवळ राहिल्याच नव्हत्या. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा व्यक्ती आपले कपडे काढून फेकतो.

तिच्या एकूण स्थितीवरून जाणवत होतं, की तिने तसं केलं असावं. काही जणांनी तिचे कपडे बदलण्याचा प्रयत्न केला असावा. तिचे हात सुजलेले होते. तिच्यावर तिचं कोणतंही नियंत्रण राहिलं नव्हतं.

इयानने तिचे हात बाह्यांमध्ये घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. जांग्बूने त्याच्या थर्मासमधील गरम रस तिला देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने तिचा हात पकडत तिला बसवण्याचा प्रयत्न केला.

तिचं शरीर मृत वजनासारखं झालं होतं. दोन बलदंड माणसांनी तिला बसविण्याचा बराच प्रयत्न केला आणि नंतर त्या दोघांनाही प्रचंड धाप लागली. आमचे सगळे प्रयत्न निरर्थक ठरत होते. वास्तविकपणे तिला कुठेही घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरी काय साध्य होणार होतं?

आमच्याकडील ऑक्सिजन तिला देण्यास सक्षम नव्हते. कारण आमच्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या बाटल्यांना तिचा मास्क व्यवस्थित बसत नव्हता. इथे आम्हाला आमच्या उणिवा जाणवल्या.

आम्ही मूर्खासारखे बाटल्याच वाहत होतो, पण पुरेसे मास्क का नाही घेऊ शकलो? ऑक्सिजनचा कोणताही परिणाम जाणवू नये म्हणून तिला उच्च प्रवाहावर ठेवावे लागणार होते आणि अनेक तास तिथे थांबावे लागणार होते.

तोंडाची वाफ घालवून काहीही उपयोग होणार नव्हता. आमच्यापैकी कोणाला तरी तिला मास्क द्यावा लागणार होता. मात्र, तसे केल्याने आमच्याकडची एक अतिरिक्त सुविधा कमीही होणार होती. पण तिला वाचवण्याचा हाच एकमेव उपाय होता आणि ही जोखीम उचलणे हेच या क्षणी उत्तम होते.

बाहेरच्या जगाशी संपर्क साधण्यासाठी आमच्याकडे कोणतेही साधन नव्हते. पेम्बाने बेस कॅम्पशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा सेट बंद होता.

“मी अमेरिकन आहे. मी अमेरिकन आहे…” तिच्या तोंडातून अचानक शब्द फुटले.

मी एकदम चपापले. अमेरिकन? पण अमेरिकी टीम तर आमच्या एक दिवस मागे होती.. त्याच क्षणी माझं मन एक दिवस मागे गेलं जे मी त्या वेळी पाहिलं होतं. दोन लहानशा आकृत्या, एक स्थिर, तर दुसरी चारही बाजूने फिरत होती.

मी उडालेच… का हीच फ्रॅन आहे, हीच का ती चुलबुली अमेरिकी महिला, जी आपल्या एबीसी किचन टेंटमध्ये रात्री अनेक तास बसली होती? ही तीच आहे का, जी आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहत होती? कोण तो… हां सर्गेई? अचानक तो सगळा पट आठवला.

ती आणि सर्गेई दोघांनीही सोबतच चढाई केली होती. त्यांच्यासोबत ना शेर्पा होता, ना ऑक्सिजन. ते एकमेकांशी रेडिओ संपर्कातही नसावेत. मात्र, एक स्पष्ट होत नव्हतं, की तिच्याजवळ ऑक्सिजनची बाटली कशी आली? हेही समजू शकलं नाही, की तो तिचा पती गेला कुठे?

त्याचवेळी तिथे तीन उझबेकी गिर्यारोहक येताना दिसले.

मी त्यांना विचारलं, “तुम्ही आम्हाला मदत कराल? ही महिला मरणासन्न अवस्थेत आहे. आम्ही तिला खाली घेऊन जाऊ शकतो, जर तुम्ही आम्हाला मदत केली तर?”

तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अनिच्छेनेच माझ्याकडे पाहिलं. नंतर म्हणाले, “आम्ही काल तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. तिच्यासाठी आम्ही ऑक्सिजनची बाटलीही सोडली होती. आता ती मदतीच्या पलीकडे गेली आहे.”

त्यांनी आपल्या रेडिओवरून संपर्क साधला. कदाचित ते त्यांच्या बेस कॅम्पशी बोलत असावेत. त्यांनी इयान आणि जांग्बूकडे पाहून तेथे थांबण्याचा निर्णय घेतला.

इयानने दोन्ही खांद्यावर त्या अमेरिकी महिलेला पकडले होते आणि तो तिच्याशी बोलत होता. त्याचं तोंड तिच्यापासून इंचभरच दूर होतं. तो तिला म्हणायचा, “तुम्हाला आमची मदत करावी लागेल.

तुम्ही मदत केली तर आम्ही तुम्हाला खाली आणू शकतो. जर तुम्ही मदत केली नाही, तर तुम्ही इथंच गतप्राण व्हाल.” तो तिच्या चेहरा वाचण्याचा प्रयत्न करीत होता. पण तो चेहरा निर्विकार भासत होता.

तिला एवढंच कळत होतं, की आम्ही तिच्यासोबत आहोत, पण ती मानसिकदृष्ट्या खंगलेली नव्हती. तिच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे, हेच कळत नव्हतं.

माझ्या लक्षात आलं, की तिच्या शूजचे क्रॅम्पॉन आमच्यापासून काही फूट अंतरावर होते. ते परत मिळविण्यासाठी उतारावर पाऊल टाकणार, तोच डोक्यात वेगळा विचार आला. कारण हा उतार अनेक सैलसर कातळाच्या बारीक दगडांनी व्यापलेला होता.

जणू काही दशलक्ष डिनर प्लेटाच चिपकवल्या आहेत. हे तुकडे माझ्या पायापासून खाली रोंगबक ग्लेशिअरपर्यंत ४३०० मीटर खोल होते. त्यावर पाय ठेवणे म्हणजे बॉल-बेअरिंग्सवर पाय ठेवण्यासारखे होते. कोणीही गिर्यारोहक त्यावरून स्वतःला रोखूच शकणार नाही. तो घसरून थेट खालीच कोसळेल. सर्गेईबाबत असंच काही घडलं तर नसेल?

इयान आणि जांग्बूने सरळ बसून तिला खेचण्याचा प्रयत्न केला. इयानला वाटले, जर तिचे वजन ती किमान तिच्या पायावर पेलू शकली, मग भलेही ती चालू शकली नाही तरी तिला प्रत्येक जण आपल्या खांद्यावर घेऊन एक डोंगर तरी खाली घेऊन जाऊ शकेल. पण ही कल्पना चुकीची ठरली.

आम्ही जवळपास तासभर फ्रॅनसोबत सुमारे उणे ३० डिग्री सेल्सिअस तापमानात उभे होतो.

आम्ही अशा ठिकाणी होतो, जो धोकादायक अस्थिर उतार होता. थंडीमुळे पाय थंड पडले होते. त्याला ऊब देण्याचंही धाडस होत नव्हतं. मी तर थंडीने प्रचंड कुडकुडले होते. हाताची बोटे पूर्णपणे सुन्न पडली होती. शरीर थंडीने थडथडत होतं, तर मास्कच्या आत माझे दात एकमेकांवर आपटून वाजत होते.

अखेर सर्वांचे मत झाले, की फ्रॅनला तिथंच सोडून जावं. उझबेकी गिर्यारोहक आणि ल्हाक्पा यांनी बराच वेळ चर्चा केल्यानंतर अखेर तिला सोडून जाण्याचे जवळजवळ निश्चित केले होते. त्यांचं असहकार्य आणि तिच्या शारीरिक अक्षमतेमुळे आमच्या आशा तशाही मावळल्याच होत्या.

आता इयान आणि जांग्बू सरळ मागे फिरले. तिचं बोलणंही आता थांबलं होतं आणि ती बेशुद्धावस्थेत गेली होती. तिला सोडून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता आणि तो निवडणेही मला असह्य होतं. शिखरावर पोहोचण्याची इच्छा मी कधीच गमावली होती.

भावनिकदृष्ट्या मी विखुरले होते. यापूर्वी माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधीही आला नव्हता. मी अनेक मृतदेह पार केलेले होते. काही मोहिमांमध्ये माझ्यासोबतचे मित्र शिखरावरून कधीच परत येऊ शकले नव्हते हेही मी अनुभवले होते; पण हा असा प्रसंग होता, ज्यात मी पहिल्यांदा कोणाला तरी मरताना पाहत होते. मी तिला सोडून जाण्याचा निर्णय अजिबात घेतला नव्हता.

Mount Everest series part 5
Mount Everest series part 5 | फ्रॅन्सिससोबत पती सर्गेई अर्सेंटिएव आणि मुलगा पॉल

पण तिला तेथेच सोडून जाण्याशिवाय गत्यंतरही नव्हते. माझ्यासाठी हा निर्णय खूप कठीण होता. कारण मी एक महिला होते. असं नाही, की महिला जोखीम घेत नाहीत, पण ते एक पुरुषप्रधान वातावरण होतं. मीच एकमेव महिला होते.

मला एकटीला तिची मदत करणे शक्य नव्हते. चढाई करणे, चढाईचा आनंद घेणे, शिखराला गवसणी घालणे ही वाक्ये नेहमीच कानावर आदळतात. मला मात्र यातला कोणताही आनंद शिल्लक राहिलेला नव्हता. मला फक्त खाली जायचे होते.

पर्वताच्या खाली, जिथे सपाट जमीन आहे तिथे मला पाय ठेवायचे होते. माझ्यासाठी त्या शिखराचं कोणतंही कौतुक राहिलेलं नव्हतं.

कॅथी ओडाउडने सांगितलेली स्लीपिंग ब्यूटीची ही कहाणी मनाचा थरकाप उडविणारी आहे. ‘जस्ट फॉर दि लव्ह ऑफ इट’ या पुस्तकात तिने हा अनुभव व्यक्त केला आहे. कॅथी ओडाऊड शिखर सर न करताच माघारी परतली.

अखेर १९९९ मध्ये दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मार्गाने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला होण्याचा मान याच कॅथी ओडाउडने मिळवला. कॅथी ओडाउडच्या टीमने तिला तिथेच सोडल्यानंतर फ्रॅन्सिस (फ्रॅन) अर्सेंटिएवने अखेर प्राण सोडले.

ऑक्सिजनशिवाय सर्वांत उंचीवर पोहोचलेली फ्रॅन्सिस ही पहिली अमेरिकी महिला असल्याचं नंतर समोर आलं. तिचे पती सर्गेई याचा पर्वतावरच मृत्यू झाला.

नऊ वर्षांनी मृतदेह खाली


स्लीपिंग ब्यूटी म्हणून ओळखली जाणारी फ्रॅन्सिस आणि ग्रीन बूट्स म्हणून ओळखला जाणारा सेवांग पलजोर या दोघांचे मृतदेह खाली आणण्यासाठी पुढे वूडॉलने ‘दि ताओ ऑफ एव्हरेस्ट’ नावाची एक मोहीम आखली. एव्हरेस्ट शिखराकडे जाताना हे दोन्ही मृतदेह स्पष्टपणे दिसतात.

फ्रॅन्सिसचा मृतदेह गिर्यारोहकांना २४ मे १९९८ पासून २३ मे २००७ पर्यंत तब्बल नऊ वर्षे सातत्याने पाहायला मिळत होता. वूडॉलने फ्रॅन्सिसचा मृतदेह २००७ मध्ये खाली आणला; पण सेवांग पलजोरचा मृतदेह २०१४ ते २०१७ दरम्यान कुणालाही आढळला नाही.

कदाचित तो कुणी तरी काढला असावा किंवा पुरला तरी असावा, असा कयास आहे. मात्र, २०१७ मध्ये तो एका तंबूच्या बाजूला डेब्रिसमध्ये लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला. कुणी तरी हा मृतदेह हलवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे.

काहीही असो, पण पलजोरचा मृतदेह पुन्हा कधीच दिसला नाही. मात्र, स्लीपिंग ब्यूटी आणि ग्रीन बूटने गिर्यारोहकांच्या मनात नेहमीच घर केले. फ्रॅन्सिस आजही अनेक गिर्यारोहकांची प्रेरणास्थान बनली आहे, जिने ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला.

असे साहस करणारी ती पहिली अमेरिकी महिला होती. ज्या वेळी तिचे पार्थिव खाली आणले, त्या वेळी तिचा चिमुकला पॉल 20 वर्षांचा झाला होता. वयाच्या 12 व्या वर्षी वडिलांच्या मृत्यूनंतर तो सावरलाही असेल, पण वयाच्या 20 व्या वर्षी आईचा मृतदेह पाहिल्यानंतर पॉलच्या मनावर किती आघात झाले असतील, कल्पनाच करवत नाही…

[jnews_block_8 first_title=”Read more at :” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”76″]

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!