All SportsCricketsports news

अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय खेळाडू हंगरगेकर याची वयचोरी?

इंग्लंडला पराभूत करीत भारतीय क्रिकेट संघाने अंडर 19 वर्ल्डकप पाचव्यांदा जिंकला. या कामगिरीने खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असला तरी याला आता गालबोट लागले आहे. कारण अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाच्या एका खेळाडूवर वयचोरीचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा आरोप केला आहे महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बखोरिया यांनी. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) त्यांनी पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी बीसीसीआयच्या सदस्यांना पत्र लिहिले आहे. ज्या भारतीय खेळाडूवर वयचोरी केल्याचा आरोप आहे, तो वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर (rajvardhan hangargekar) असल्याचे समोर आले आहे.

बखोरिया यांनी 8 फेब्रुवारी रोजी हे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना पत्र लिहिले आहे. पत्रात नमूद केले आहे, की वेगवान गोलंदाज हंगरगेकर याने त्याचे वय 10 जानेवारी 2001 असताना 10 नोव्हेंबर 2002 असा बदल केला आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अंडर-19 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेसाठी जास्त वय असूनही तो पात्र ठरला.

काय आहे बखोरिया यांच्या पत्रात?

“राजवर्धन हंगरगेकर याचे वर्तन क्रीडा अखंडतेच्या आणि नैतिकतेच्या विरोधात आहे. त्यामुळे अंडर 19 वर्ल्डकप निष्पक्षपणे झाला नाही. त्याने वयचोरी केल्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी, ही विनंती.” बखोरिया यांनी हे पत्र महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाझ बागबान यांनाही पाठवले आहे. बखोरिया यांनी पत्रात असेही नमूद केले आहे, की तपास प्रक्रिया आणि अहवालातून असे समोर आले आहे, की राजवर्धन हंगरगेकर याचे शिक्षण उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कूलमध्ये झाले आहे. ही शाळा महाराष्ट्र सरकारच्या शाळा संहितेअंतर्गत नियंत्रित केली जाते.

हंगरगेकर किती वयाचा आहे?

बखोरिया यांनी हंगरगेकर याच्या जन्मतारखेचा स्पष्टपणे खुलासा केला आहे. त्यांनी पत्रात असेही लिहिले आहे, की राजवर्धन हंगरगेकर याची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 आहे. उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पहिलीच्या प्रवेशावेळी ही जन्मतारीख स्पष्टपणे नमूद केलेली आहे. म्हणजे राजवर्धन हंगरगेकर याच्या या जन्मतारखेनुसार त्याचे वय 21 वर्षे आहे. हंगरगेकर याच्या जन्मतारखेत शाळेनेच बदल केल्याचा आरोप क्रीडा आयुक्त बखोरिया यांनी केला आहे. त्यामुळे हंगरगेकर याने वयचोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. “उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कूलच्या सर्वसाधारण नोंदणीनुसार, त्याची जन्मतारीख 10 जानेवारी 2001 होती. हंगरगेकर याच्या जन्मतारखेत मुख्याध्यापकानेच अनधिकृत बदल केल्याचा आरोप असून, त्यात हंगरगेकर याची जन्मतारीख आठवीच्या वर्गात 10 नोव्हेंबर 2002 अशी बदलण्यात आली.

जन्मतारखेत बदल कसा ठरतो अनधिकृत?

विद्यार्थ्याच्या जन्मतारखेत बदल करायचा असेल तर त्यासाठी काही नियम, निकष आहेत. मात्र, हंगरगेकर याची जन्मतारीख बदलताना मुख्याध्यापकांनी या निकषांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केल्याचे बखोरिया यांनी बोट ठेवले आहे. बखोरिया यांनी पत्रात नमूद केले आहे, की मुख्याध्यापकांना जन्मतारीख बदलण्याची गरज वाटल्यास त्यांनी संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता घ्यायला हवी होती. मात्र, राजवर्धन हंगरगेकर याच्या जन्मतारखेत बदल करताना अशी कोणतीही मान्यता घेण्यात आली नाही. असे बदल करणे अनधिकृत ठरते. ही फसवणूक आहे.

आयपीएल लिलावात हंगरगेकरला मिळाले दीड कोटी

गेल्या आठवड्यात आयपीएल लिलावात हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्जने दीड कोटी रुपयांना खरेदी केले होते. वयचोरीबाबत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव बागबान आणि हंगरगेकर या दोघांनी अधिकृतपणे कोणताही खुलासा अद्याप तरी केलेला नाही. मात्र, या प्रकारामुळे भारताच्या निर्भेश यशाला गालबोट लागले आहे, हे नक्की.

यापूर्वी कालरा, बावणे यांनी केली होती वयचोरी

हंगरगेकर याच्यावरील वयचोरी आरोपाने खळबळ उडाली असली तरी यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. यापूर्वी 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने विजेतेपद मिळवले होते. या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मनज्योत कालरा हादेखील असाच चर्चेत आला होता. मात्र, शतक झळकाल्याने नाही, तर वयचोरीमुळे भारताच्या विजयाला गालबोट लागले होते. वयचोरी प्रकरणात तो दोषी आढळल्याने कालरा याच्यावर दोन वर्षांसाठी दिल्लीकडून खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर असेच प्रकरण 2011 मध्येही उघडकीस आले होते. महाराष्ट्राच्या अंकित बावणे याने वयचोरी केल्याने सप्टेंबर 2011 मध्ये त्याला भारताच्या अंडर-19 संघातून वगळण्यात आले होते. त्याने पासपोर्टवरील जन्मतारीख आणि त्याचा जन्मदाखला यात तफावत होती. बीसीसीआयच्या नोंदीतही जन्मतारखेत तफावत आढळली.

वयचोरी रोखणारी TW3 चाचणी किती विश्वासार्ह?

Follow on Facebook Page kheliyad

[jnews_block_39 first_title=”Follow on Twitter” url=”https://twitter.com/kheliyad” include_category=”87″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!