आयसीसीच्या सीईओंना पाठवले सुटीवर! ही आहेत कारणे…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनू साहनी (Manu Sawhney) यांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. प्राइसवाटरहाउसकूपर्स (PriceWaterHouseCoopers) या ऑडिट फर्मच्या अंतर्गत चौकशीच्या फेऱ्यात ते सापडले आहेत. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
२०२२ पर्यंत सीईओपदाचा कार्यकाळ
२०१९ च्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेनंतर डेव रिचर्डसन यांच्या जागेवर साहनी (Sawhney) यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती 2022 पर्यंत आहे. हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच साहनींच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी ते इतके सोपे नाही. त्याचीही एक मोठी प्रक्रिया आहे. मात्र, साहनींनी राजीनामा दिल्यास निदेशक मंडळाचा सुंठेवाचून खोकला जाईल. तूर्तास सध्या तरी हे सगळे चर्चेच्या पातळीवरील आडाखे आहेत.
साहनींना सुटीवर का पाठवले?
साहनींना सुटीवर पाठवण्यात आले आहे. त्याचे नेमके कारण स्पष्ट नाही. मात्र, असे समजते, की काही धोरणात्मक निर्णय घेताना त्यांचे क्रिकेट मंडळांशी फारसे चांगले संबंध नव्हते. सहकारी कर्मचाऱ्यांशी कठोरपणे वागत होते. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली आहे.
आयसीसी मंडळाच्या एका जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना साहनींशी संबंधित काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. ते म्हणाले, की ‘‘ते कर्मचाऱ्यांशी कठोरपणे वागायचे. हे वर्तन कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारे होते. आयसीसीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी काही पुरावेही सादर केले आहेत.’’
साहनी काही दिवसांपासून कार्यालयातही येत नाहीत. साहनी ५६ वर्षांचे असून, मंगळवारपासून (९ मार्च) त्यांना सुट्टीवर जाण्यास सांगितले आहे.
सन्मानाने पद सोडण्याचा एकमेव मार्ग
निदेशक मंडळ आता या प्रकरणी समजुतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे साहनींना राजीनामाही घेता येईल आणि त्यांना सन्मानाने या पदावरून जाता येईल.’’ गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणूकप्रक्रिया सुरू झाल्यानंतर साहनी दबावाखाली होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये ग्रेग बार्क्ले यांची अध्यक्षपदी निवड झाली.
ख्वाजांना समर्थन दिल्यानेही साहनींवर रोष
साहनींवर अनेक आरोप आहेत. साहनींपूर्वी रिचर्डसन सीईओ होते. मात्र, त्यांची कार्यशैली कर्मचाऱ्यांबाबत अतिशय चांगली होती. याउलट साहनींची कार्यशैली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचं वर्तन अजिबात रुचलेलं नाही. हे तर कारण आहेच, पण गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी इम्रान ख्वाजा यांचं समर्थन केलं होतं. ते काही क्रिकेट मंडळांना अजिबात खपलेलं नाही.
आयसीसीत जे काही सुरू आहे, त्यावर बीसीसीआयचंही बारीक लक्ष आहे. आयसीसीवर तसाही बीसीसीआयचा वरचष्मा आहेच. हे उघड सत्य आहे. याच बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयसीसीमधील काही गोष्टी समोर आणल्या आहेत.
साहनींवर हे दोन महत्त्वाचे आरोप
पहिले कारण
बीसीआयचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत साहनींची कार्यपद्धती अनेक क्रिकेट मंडळांना रुचलेली नाही. यापूर्वी आयसीसीच्या (ICC) अध्यक्षपदावर शशांक मनोहर होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना मुदतवाढही देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर निवडणूकप्रक्रिया राबवण्यात आली. अध्यक्षपदासाठी न्यूझीलंडचे ग्रेग बार्क्ले आणि सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांनी दावा केला होता. त्या वेळी साहनींची अप्रत्यक्ष लुडबूड मंडळांना रुचली नाही.’’
दुसरे कारण
आयसीसीने स्पर्धांचा जो कार्यक्रम आखला आहे, त्यातील मंडळांच्या यजमानपदाचा मुद्दा होता. आयसीसीच्या स्पर्धांच्या यजमानपदासाठी बोली लावणे आणि त्यासाठीचे शुल्क मंडळांनी भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे मोठी क्रिकेट मंडळे या निर्णयावर प्रचंड नाराज होते.
साहनींच्या निर्णयावर नाराज असलेल्या मोठ्या क्रिकेट मंडळांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), इंग्लंड एवं वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) यांचा समावेश आहे. क्रिकेटविश्वातली ही बिग थ्री मंडळे मानली जातात. या निर्णयाविरुद्ध ही तिन्ही मंडळे होती आणि त्यांनी अनेक बैठकींमध्ये आपली नाराजी स्पष्ट केली होती.
साहनींवरील नाराजीचं हेही एक कारण
आयसीसीने एक प्रस्ताव आणला होता. 2023 से 2031 या आठ वर्षांच्या कालावधीत प्रतिवर्ष कमीत कमी एक आयसीसीची स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावाचे साहनींनी समर्थन केले होते. मात्र, त्याला बीसीसीआय (BCCI), ईसीबी (ECB), सीए (CA) या ‘बिग थ्रीं’नी विरोध केला होता.
जर साहनींनी राजीनामा दिला नाही तर…?
जर साहनी यांनी राजीनामा दिला नाही तर निदेशक मंडळ त्यांना हटविण्यासाठी दीर्घ प्रक्रिया सुरू करू शकतो.
साहनी यांना मंडळांतर्गत समर्थन समर्थन आहे. हे समर्थन ९ विरुद्ध आठ अशा दोन गटांत विभागलेले आहे. त्यामुळे साहनींना हटविण्यासाठी १७ पैकी १२ मते मिळवणे आवश्यक आहे. ही मते निदेशक मंडळाच्या दोनतृतीयांश आहे. कारण साहनींची नियुक्तीच बोर्डातील बहुमतावरून झाली होती.
आता खरी मजा पुढे आहे. बिग थ्रीमध्ये असलेल्या गटाला साहनींना हटवायचे असेल तर १७ पैकी १२ मते मिळवावे लागतील. ती मिळतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Follow us :