All SportsBoxingTokyo Olympic 2020

ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग प्रवास कसा आहे?

ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंगचा प्रवास कसा आहे?

स्टार मुष्टियोद्धा विजेंदरसिंग याने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत भारतीय बॉक्सिंगला नवी दिशा दिली. पुढे हा प्रवास एम. सी. मेरी कोमने पुढे नेला. या वेळी टोकियो ऑलिम्पिकला नऊ जणांचं पथक जाणार आहे. त्यामुळे यंदा पदकांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये भारताच्या नावावर केवळ दोन कांस्यपदके आहेत. विजेंदरसिंगने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मिडलवेट 75 किलो वजनगटात देशाला पहिले पदक मिळवून देत इतिहास रचला. त्यानंतर सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम हिने 2012 च्या लंडन ऑलिम्पिमकमध्ये कांस्यपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला मुष्टियोद्धा ठरली.

कोव्हिड-19 महामारीमुळे पात्रता स्पर्धा रद्द झाल्यानंतरही भारताच्या नऊ मुष्टियोद्ध्यांनी टोकियोचे तिकीट मिळवले आहे. भारताच्या बॉक्सिंग इतिहासात ऑलिम्पिकमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय मुष्टियोद्धे सहभागी होत आहेत. भारतीय बॉक्सिंग पथकात अमित पंघाल (52 किलो), मनीष कौशिक (63 किलो), विकास कृष्ण (69 किलो), आशीष कुमार (75 किलो) आणि सतीश कुमार (91 किलो), मेरी कोम (51 किलो), सिमरनजीत कौर (60 किलो), लवलीना बोरगोहेन Lovlina Borgohain | (69 किलो) आणि पूजा रानी (75 किलो) यांचा समावेश आहे. यात विकास कृष्ण आणि मेरी कोम यांनाच ऑलिम्पिक खेळण्याचा अनुभव आहे. इतर मुष्टियोद्धे प्रथमच ऑलिम्पिकच्या महायुद्धात भाग घेणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासात प्रथमच चार महिलांचा सहभाग नोंदवला आहे. भारतातर्फे 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणारी मेरी कोम ही पहिलीच भारतीय महिला मुष्टियोद्धा होती.

अनुभवी मेरी कोम

मेरी कोम (वय 38) भारताची सर्वांत अनुभवी मुष्टियोद्धा आहे. गेल्या 20 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत तिने जागतिक स्पर्धेत आठ पदके (सहा सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य) जिंकली आहेत. मणिपूरची ही स्टार मुष्टियोद्धा आपल्या पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करील. मेरी कोम 2016 च्या रियो ऑलिम्पिकची पात्रता गाठू शकली नव्हती.  ‘मॅग्नीफिसेंट मेरी’ या नावाने लोकप्रिय असलेल्या मेरी कोमने मार्च 2020 मध्ये जॉर्डनमध्ये आशियाई पात्रता स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवले. याच वर्षी मे 2021 मध्ये तिने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. आशियाई स्पर्धेत सर्वाधिक पाच पदके जिंकण्याचा विक्रम मेरीच्याच नावावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत विजेती असलेली मेरी आशियाई स्पर्धेतही भारताला दोन सुवर्णपदके जिंकून दिली आहेत.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग…. अमित पंघाल कडवा प्रतिस्पर्धी

अमित पंघाल 58 किलो वजनगटात अद्याप अव्वल मुष्टियोद्धा आहे. त्याचा फायदा त्याला ऑलिम्पिक ड्रॉ मध्ये निश्चितच मिळेल. आशियाई स्पर्धेतील विजेता असलेल्या अमित पंघालने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुष्टियोद्ध्यांना कडवी टक्कर दिली आहे. त्याच्या अनेक लढती अटीतटीच्या झाल्या आहेत. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम फेरी त्याचं उत्तम उदाहरण आहे. अंतिम फेरीत तो उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या शाखोबिदिन जोइरोव याच्याविरुद्ध तो खूपच कमी अंतराने मागे पडला होता.

विकास कृष्णचा परदेशात सराव

विकास कृष्णने दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये विकास 69 किलो वजनगटात सहभागी होत आहे. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 64 किलो वजनगटात त्याचं आव्हान प्री क्वार्टरमध्येच संपुष्टात आलं होतं. 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये मात्र तो ७५ किलो वजनगटात खेळला. यात तो उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या विकासने या वेळी कसून तयारी केली आहे. सरकार आणि प्रायोजकांच्या मदतीने त्याने परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.

मनीष कौशिकचं धडाक्यात पुनरागमन

पुरुष गटात तरुण मुष्टियोद्धा मनीष कौशिक (वय 25) याचीही कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक विजेता असलेल्या या मुष्टियोद्ध्याने दुखापतीनंतर बॉक्सिंग रिंगमध्ये यशस्वी पुनरागमन केलं. पुनरागमनानंतर त्याने मार्च 2021 मध्ये आपल्या पहिल्याच टूर्नामेंट बॉक्साम आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सव्वीस वर्षीय आशीष कुमार आणि तीस वर्षीय सतीश कुमार यांचीही ही पहिलीच ऑलिम्पिक आहे. त्यामुळे धक्कादायक निकाल नोंदविण्यासाठी तेही आपलं कौशल्य पणास लावतील.

सिमरनजीत कौरचं आव्हान

महिला गटात सिमरनजीत कौरकडून भारताला पदकाची नक्कीच आशा आहे. 2018 च्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले आहे. जागतिक क्रमवारी चौथ्या स्थानावर असलेली सिमरनजीत कौर ऑलिम्पिकमध्ये आपली क्षमता सिद्ध करील. तिने आशियाई बॉक्सिंग पात्रता फेरीत रौप्यपदक जिंकत मार्च 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं.

धक्कादायक निकाल नोंदविणारी पूजा राणी

सध्याची आशियाई विजेती आणि अनुभवी मुष्टियोद्धा पूजा राणीकडे धक्कादायक निकाल नोंदविण्याची क्षमता आहे. बॉक्साम स्पर्धेत तिने विश्वविजेत्या एथेयना बाइलोन हिला पराभूत करीत सर्वांना चकित केले होते. अंतिम फेरीत जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अमेरिकेच्या नाओमी ग्राहमकडून तिला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आसामची पहिली मुष्टियोद्धा : लवलीना

आसामची 23 वर्षीय लवलीना बोरगोहेन Lovlina Borgohain | हिच्यााकडूनही भारताला आशा असेल. ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणारी ती आसामची पहिलीच मुष्टियोद्धा आहे. तिने मे 2021 मध्ये झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होतो. त्यानंतर लवलीनाने 2018 आणि 2019 च्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत दोन कांस्यपदके जिंकली आहेत.

भारतीय पथकाचा इटलीत सराव

भारतीय मुष्टियोद्ध्यांनी यंदा उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. याच वर्षी मे 2021 मध्ये दुबईत झालेल्या एएसबीसी आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारताने 15 पदके जिंकली. यात दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि आठ कांस्यपदकांचा समावेश आहे. डिसेंबर 2020 मध्ये विश्वकप बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकली. भारतीय बॉक्सिंग पथक सध्या इटलीत सराव करीत आहे. इटलीतून हे पथक टोकियोला रवाना होईल.

ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंगची कामगिरी

भारतीय मुष्टियोद्ध्यांनी पहिल्यांदा 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. यात भारताने सात वजनगटात मुष्टियोद्धे बॉक्सिंग रिंगमध्ये उतरवले होते. यात रॉबिन भाटिया, बाबू लाल आणि जॉन नटाल यांनी प्री क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती. 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्येही भारतीय मुष्टियोद्ध्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर भारतीय मुष्टियोद्ध्यांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्यासाठी तब्बल २० वर्षे लागली.  म्हणजे 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने 20 वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर ऑलिम्पिक बॉक्सिंगमध्ये पाऊल ठेवले. त्या वेळी चंदर नारायणन (51 किलोपेक्षा कमी वजनगट) हा एकमेव मुष्टियोद्धा सहभागी होऊ शकला. मात्र, तो दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही.

विजेंदर आणि मेरी कोमची ऐतिहासिक कामगिरी

2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये गुरचरणसिंग लाइट हेविवेट गटात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर 2008 मध्ये भारतीय बॉक्सिंगने कामगिरी उंचावली. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदरसिंगने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. याशिवाय अखिल कुमार आणि जितेंदर कुमार यांनीही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमने फ्लायवेट गटात कांस्यपदक जिंकले. मात्र, पुरुष गटात विजेंदर आणि देवेंद्रो सिंह सुरुवातीच्या दोन लढती जिंकत उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारू शकले. रियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या तीन मुष्टियोद्ध्यांनी भाग घेतला. यात विकासने अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. अशा प्रकारे 1948 ते 2016 पर्यंत भारताच्या एकूण 47 मुष्टियोद्ध्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे. यात 46 पुरुष आणि एका महिला मुष्टियोद्ध्याचा समावेश आहे.

Follow us

ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”95″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!