‘डगआउट’ चंदना, ‘मास्टरमाइंड’ रणतुंगा
श्रीलंकेने 1996 मध्ये वन डे विश्व कप जिंकला नि क्रिकेटविश्वाच्या भुवया उंचावल्या. मात्र, या स्पर्धेत ‘डगआउट’ उपुल चंदना ठरला, तर विश्व कप स्पर्धेचा ‘मास्टरमांइड’ ठरला अर्जुन रणतुंगा. उपुल चंदना ‘डगआउट’ यासाठी, की तो 1996 च्या विश्व कप विजेत्या श्रीलंका संघात असूनही संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळू शकला नाही. श्रीलंकेने विजेतेपद मिळवून इतिहास रचलाच, पण चंदना यानेही ‘डगआउट’ होऊन हा इतिहास पाहत राहिला. अर्थात, एका मुलाखतीत लेख स्पिनर असलेल्या चंदनाला याचा ना खेद ना खंत.
चंदना श्रीलंकेकडून 147 वनडे आणि 16 कसोटी सामने खेळला आहे. मात्र, 1996 च्या विश्व कप स्पर्धेच्या आठवणींना उजाळा देताना चंदना मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला याचं फारसं वैषम्य वाटत नाही.
तो एकजुटीचा विजय होता
चंदनाने पीटीआयला 13 सप्टेंबर 2023 रोजी एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने 1996 च्या विश्व कप स्पर्धेच्या आठवणी सांगितल्या. तो म्हणतो, “मी माझ्या देशाचा विश्व कप विजेता खेळाडू आहे. मात्र, हे महत्त्वाचं नाही, की मी अंतिम अकरामध्ये होतो किंवा नाही. हा एकजुटीचा विजय होता.”
श्रीलंका संघ 1996 च्या विश्व कप स्पर्धेतला छुपारुस्तमच म्हणायला हवा. या स्पर्धेचे यजमान तीन देश होते- भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका. आत्मविश्वासाने भरलेला आमचा संघ होता. कारण कर्णधार अर्जुन रणतुंगा याने आम्हा सर्वांना प्रोत्साहन दिलं होतं. अर्जुन रणतुंगा ‘मास्टरमाइंड’ का होता, याचं गुपित ‘डगआउट’ ठरलेल्या उपुल चंदना याने उलगडलं.
विश्व कप स्पर्धेपूर्वी अर्जुन रणतुंगा याने एक गोष्ट सुनिश्चित केली होती. ती म्हणजे संघातील सर्व सदस्यांचा चांगला ‘मूड’ राहील. आम्ही सगळे जण कोलंबोमध्ये जमलो. त्याने आम्हा सर्व खेळाडूंना प्रशिक्षण आणि राहण्याची व्यवस्था मिळावी म्हणून पुरेपूर प्रयत्न केले. उपुल चंदना याने विश्व कप स्पर्धेपूर्वीचा माहोल उलगडला.
चंदना म्हणाला, “आम्ही स्पर्धेत एका मोठ्या कुटुंबासारखा अनुभव घेत होतो. हे वातावरण बिघडणार नाही याचीही काळजी अर्जुन रणतुंगा याने घेतली. त्याच्या नेतृत्वामुळेच आम्ही पहिला विश्व कप जिंकू शकलो.”
रणतुंगा मास्टरमाइंड
चंदना आता पूर्ण वेळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. अर्जुन रणतुंगा अतिशय हुशार रणनीतीकार असल्याचे तो मानतो. चंदनाने सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुवितरणाच्या स्फोटक फलंदाजीमागचंही रहस्य स्पष्ट केलं. तो म्हणाला, “सनथ (जयसूर्या) आणि कालू (रोमेश कालुवितरणा) यांना सलामीला पाठविण्याची योजना अर्जुनचीच होती. हा ‘मास्टरस्ट्रोक’ होता. कारण इतर संघ पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची स्फोटक फलंदाजी करण्यासाठी अजिबात तयार नव्हत्या.”
या स्पर्धेच्या दरम्यान ‘सेंट्रल बँक’मध्ये आत्मघाती हल्ले झाले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या दोन्ही संघांनी श्रीलंकेचा दौरा केला नाही. त्यामुळे श्रीलंकेला ‘वॉकओव्हर’मुळे विजेता घोषित करण्यात आले. गटसाखळीत श्रीलंकेचा सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी भारत होता. भारताने फिरोजशाह कोटला मैदानावर सहा विकेट राखून विजय मिळवला होता.
चंदना म्हणाला, “त्यांनी (ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज) श्रीलंका दौरा करण्यास नकार दिल्याने काहीसा संताप व्यक्त होत होता. मात्र, आम्ही नवी दिल्लीत जेव्हा भारताला पराभूत केले, तेव्हा आम्हाला जाणवलं, की आम्ही इतर संघांनाही पराभूत करू शकतो. लोकांनीही आम्हाला आता अधिक गांभीर्याने पाहायला सुरू केलं.”
मी माझ्या देशाचा विश्व कप विजेता खेळाडू आहे. मात्र, हे महत्त्वाचं नाही, की मी अंतिम अकरामध्ये होतो किंवा नाही. हा एकजुटीचा विजय होता.
– उपुल चंदना
भारताविरुद्धचा तो उपांत्य सामना
गटसाखळीत शानदार प्रदर्शन केल्यानंतर श्रीलंकेने नॉकआउट फेरीत प्रवेश केला. मात्र, लंकेची खरी परीक्षा कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीची होती.
या सामन्यादरम्यान प्रेक्षकांच्या उग्र वर्तनाच्या भीतिदायक अनुभवाला सामोरे जावे लागल्याचेही चंदना सांगतो. तो म्हणाला, “हा आमच्यासाठी मोठी सामना होता. कारण स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत प्रबळ दावेदार होता. कारण तो आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. मात्र, भारताने जेव्हा विकेट गमवायला सुरुवात केली, तेव्हा भारतीय प्रेक्षक संतप्त झाले. त्यांनी मैदानावर वस्तू फेकणे सुरू केले.”
चंदना म्हणाला, “रोशन महानामाच्या मांसपेशी ताणल्या गेल्या होत्या. मी बारावा खेळाडू होतो. मी अर्जुनजवळ गेलो आणि म्हणालो, की मला बाउंड्रीजवळ क्षेत्ररक्षण करू दे. कारण अरविंद (डिसिल्वा) तिथे उभा होता. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू होता आणि त्याची कामगिरीही उत्तम होती. मला नव्हतं वाटत, की त्याला काही होवो.”
चंदनाने आठवणी ताज्या करताना सांगितले, की त्या सामन्यानंतर कडेकोट सुरक्षेत आम्हाला हॉटेलमध्ये रवाना केले होते.
चंदनाला अंतिम अकरामध्ये समाविष्ट होण्याची संधी आली होती. संघाचा विचार होता, की फैसलाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निवडावे. मात्र, त्यांना वाटत नव्हतं, की विजयाच्या लयीत आलेल्या संघात काही बदल करावे.
About Sports Story...
चंदना डगआउटचा शिक्का पुसू शकला असता
चंदना म्हणाला, “त्यांना आणखी एक फिरकी गोलंदाज हवा होता. रोशनला (महानामा) विश्रांती देण्यात आली होती. मात्र, तो चांगला खेळत होता. संघाच्या बैठकीत मी अर्जुनला सांगितलं, की माझी निवड करू नका. त्याला ते आवडलं नाही. त्याने मला विचारलं, का, तू खेळायला घाबरतोय का?”
त्यावर चंदना म्हणाला, की विजयी संघात काहीही बदल करू नकोस. त्याच्याशी आणि संघव्यवस्थापकाशी (दलीप मेंडीस) थोडी चर्चा झाल्यानंतर अखेर त्यांनी अंतिम अकरा जणांच्या संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. मला या निर्णयावर कोणताही पश्चात्तापही नाही.”
चंदनाने सांगितले, की श्रीलंका जेव्हा विजेतेपदाच्या थाटात मायदेशी परतली तेव्हा संघाचं भव्यदिव्य स्वागत झालं. लाहोरवरून ज्या चार्टर्ड फ्लाइटने खेळाडू मायदेशी पोहोचले होते, त्या फ्लाइटचा पायलट श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सुनील वेटीमुनी होते.