ऑलिम्पिक स्पर्धेमधील हे शुभंकर तुम्हाला माहीत आहेत का? दर चार वर्षांनी ऑलिम्पिक पर्वणी पाहायला मिळते. या क्रीडाकुंभाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, ऑलिम्पिकचा शुभंकर. यजमान देश ऑलिम्पिकचा शुभंकर कसा असावा, यावर विशेष मेहनत घेतात. हा शुभंकर अर्थपूर्ण असावा याकडे विशेष कटाक्ष असतो. पाहूया आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक शुभंकरांविषयी…
बीजिंग 2022 | BEIJING 2022
बिंग ड्वेन ड्वेन (BING DWEN DWEN)

हे माहीत आहे का?
बीजिंग 2022 च्या शीतकालीन ऑलिम्पिक आयोजन समितीकडे चीनसह जगभरातील 35 देशांतून तब्बल 5,800 शुभंकरचे डिझाइन आले होते. शुभंकरसाठी ही जागतिक स्तरावरील स्पर्धा होती. या सर्व डिझाइनची पडताळणी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून करण्यात आली. अंतिम बिंग ड्वेन ड्वेन या शुभंकरची निवड मात्र फाइन आर्टसच्या ग्वांगझू अकादमीने व कला शाखेतील जिलिन विद्यापीठाने केली.
टोकियो 2020 | TOKYO 2020
मिराइतोवा MIRAITOWA

हे माहीत आहे का?
या शुभंकरचा निर्माता आहे रियो तानिगुची (Ryo Taniguchi). त्याचा शुभंकर निवडण्यामागील प्रक्रिया विशेष आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजन समितीने शुभंकरसाठी ऑगस्ट 2017 मध्ये स्पर्धा घेतली होती. ही स्पर्धा फक्त जपानमधील नागरिकांसाठीच होती. 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या स्पर्धेत सहभागी होता येणार होतं.
समितीला 2,042 शुभंकरच्या डिझाइन प्राप्त झाल्या. वेगवेगळ्या टप्प्यातून यातील निवडक तीन शुभंकर निवडण्यात आले. आता यातून एकमेव शुभंकर कोणता निवडायचा? मग त्यासाठी जपानने डिसेंबर 2017 मध्ये नामी शक्कल निवडली.
निवडक तीन शुभंकर जपानच्या सर्व प्राथमिक शाळांतील प्रत्येक वर्गासमोर ठेवले. एका वर्गाला एकच मत देण्याचा अधिकार होता. 11 डिसेंबर 2017 ते 22 फेब्रुवारी 2018 या कालावधीत मतदान घेण्यात आले. त्यात 16 हजार 769 शाळांमधील 2 लाख 5 हजार 755 वर्ग सहभागी झाले होते. रियो तानिगुची (Ryo Taniguchi) या कलाकाराच्या शुभंकरला सर्वाधिक एक लाख 9 हजार 41 मते मिळाली.
पिओंगचांग ऑलिम्पिक 2018 | Pyeongchang 2018
सूहोरांग (SOOHORANG)

रिओ ऑलिम्पिक 2016 | RIO 2016
व्हिनिसिअस (VINICIUS)

हे माहीत आहे का?
हा शुभंकर बर्डो नावाच्या स्टुडिओने तयार केला आहे. रिओ 2016 च्या शीतकालीन ऑलिम्पिकसाठी ब्राझीलमधील अॅनिमेशन, इलस्ट्रेशन आणि डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिक आणि कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्यानंतर नोव्हेंबर 2012 मध्ये शुभंकर निश्चित करण्यात आले होते. ब्राझीलमधील मोठमोठ्या कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या डिझाइनची छाननी केल्यानंतर ऑगस्ट 2013 मध्ये अंतिम शुभंकर निश्चित करण्यात आले. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकचे वेगवेगळे शुभंकर एकाच दिवशी 23 नोव्हेंबर 2014 मध्ये सार्वजनिक करण्यात आले. आता या शुभंकरांची नावं निश्चित करायची तर ती लोकांमधूनच. म्हणून ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या दोन्ही क्रीडाकुंभांच्या शुभंकरांसाठी लोकांसमोर तीन नावांचे पर्याय ठेवण्यात आले. ते असे : 1. ओबा आणि इबा (Oba and Eba), 2. टिबा टक आणि एस्क्विंडम आणि टॉम (Tiba Tuque and Esquindim), 3. व्हिनिसिअस आणि टॉम (Vinicius and Tom). ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक या क्रमाने ही शुभंकरांची नावे होती. एकूण 323,327 मते नोंदविण्यात आली. त्यात व्हिनिसिअस आणि टॉम या नावांना सर्वाधिक 44 टक्के मते मिळाली आणि हीच नावे या शुभंकरांना देण्यात आली.
सोची ऑलिम्पिक 2014 | Sochi 2014
ससा, ध्रुवीय अस्वल आणि बिबट्या (THE HARE, THE POLAR BEAR & THE LEOPARD)

हे माहीत आहे काय?
या तिन्ही शुभंकरांचे निर्माते तीन वेगवेगळे कलाकार आहेत. सशाचं प्रतीक उभं केलंय सिल्व्हिया पेत्रोवा (Silviya Petrova) या महिला कलाकाराने, तर ध्रुवीय अस्वलाती प्रतीमा साकारलीय ओलेग सेरेडेश्नीय (Oleg Seredechniy) यांनी. तिसरी बिबट्याचं (Vadim Pak) प्रतीक साकारलंय वादिम पाक या कलाकाराने. शुभंकरांची निवडप्रक्रिया प्रथम रशियात, नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. सुमारे 24,048 चित्रे कलाकारांनी पाठवली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा शुभंकर निवडण्यात आले. व्यावसायिक कलाकारांनी या शुभंकरांवर थोडेसे काम करीत अंतिम हात फिरवला. या शुभंकरांची अंतिम निवड रशियन नागरिकांवर सोपवली. “तलिस्मानिया सोची 2014- दि फायनल” (Talismaniya Sochi 2014 - The Final) या नावाने 26 फेब्रुवारी 2011 रोजी टीव्हीवरील एका कार्यक्रमाद्वारे रशियन नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिलेल्या शुभंकरांची निवड करण्यात आली.
लंडन ऑलिम्पिक 2012 | London 2012
वेनलॉक (WENLOCK)

हे माहीत आहे का?
आयरिश डिझाइन एजन्सीने या शुभंकराची निर्मिती केली होती. लंडनमधील रस्ते, पार्क आणि भूमिगत स्थानकांच्या प्रवेशद्वारावर वेनलॉक (Wenlock) शुभंकराचे 84 पुतळे उभारण्यात आले होते. पॅरालिम्पिकचा शुभकर मँडेविलेसोबत (Mandeville ) हे पुतळे उभारण्यात आले होते. हे पुतळे 2.30 मीटर उंच आणि प्रत्येकाचं वजन एक टन होते. हे पुतळे उभारण्यामागचा हेतू हा होता, की पर्यटकांना स्पर्धेदरम्यान मार्गदर्शन मिळू शकेल. या पुतळ्यांना 22 कलाकारांनी विविध वेशभूषांनी सजविले होते. हा शुभंकर निवडण्यासाठी 2008 मध्ये स्पर्धा घेतली होती. यात शंभरपेक्षा अधिक कलाकारांनी भाग घेतला होता. त्यात आर्टिस्ट, एजन्सीजचा समावेश होता. वेनलॉक आणि मँडविले हे दोन शुभंकर एका डिझाइनच्या मालिकेतून निवडण्यात आले होते. या मालिकेत मानवनिर्मित कबूतर, एक अॅनिमेटेड चहाकप आणि बिग बेनची आयुधे आणि पायांची वैशिष्ट्ये यांचा समावेश होता.
व्हँकुवर ऑलिम्पिक 2010 | Vancouver 2010
क्वाची आणि मिगा (QUATCHI AND MIGA)

हे माहीत आहे काय?
हे शुभंकर मिओमी डिझाइन (Meomi design) संस्थेने तायर केले आहेत. ऑलिम्पिक आयोजन समितीने इलस्ट्रेशन संस्था आणि व्यावसायिकांकडून शुभंकर रचनेसाठी निविदा मागवल्या होत्या. एकूण 177 रचना समितीला प्राप्त झाल्या. त्यापैकी पाच रचना निवडण्यात आल्या. या पाच रचनांचा सखोल अभ्यास केल्यानंतर मिओमी डिझाइनची रचना निवडण्यात आली. क्वातची आणि मिगा हे दोन्ही मित्र दर्शविले आहेत. त्यांना मकमक (Mukmuk) असं म्हणतात.हे शुभंकर नंतर खूप लोकप्रिय झाले. मकमक हा शब्द व्हँकुवरच्या बेटावरील अतिशय दुर्मिळ अशा खारीच्या प्रजातीतील प्राण्यावरून प्रेरित आहे. मकमक (Mukmuk) हा शब्द मकामक (muckamuck) या शब्दावरून घेतला आहे. मकामकचा अर्थ आहे चिनूक (Chinook) आदिवासींचा पदार्थ. अर्थात, हा पदार्थ केवळ चर्चेतच होता. वस्तुरूपात नव्हता. नंतर या पदार्थाची अनेक उत्पादने सुरू झाली.
बीजिंग ऑलिम्पिक 2008 | BEIJING 2008
बीबी, जिंगजिंग, हुआनहुआन, यिंगयिंग, निनी (BEIBEI, JINGJING, HUANHUAN, YINGYING, NINI)

हे माहीत आहे काय?
ही पाच शुभंकराची भन्नाट संकल्पना हान मिलिन (Han Meilin) यांची आहे. ऑलिम्पिक समितीने जगभरातील ग्राफिक डिझायनर्स आणि कम्युनिकेशन संस्थांकडून शुभंकरांबाबत सूचना मागवल्या होत्या. एकूण तीन हजार संस्थांनी शुभंकरांबाबतची संकल्पना सुचवली होती.
ट्युरिन ऑलिम्पिक 2006 | TURIN 2006
नीवे आणि ग्लिझ (NEVE AND GLIZ)

हे माहीत आहे काय?
या शुभंकरांचा निर्माता आहे पेड्रो अल्बुकरक्यू (Pedro Albuquerque). शुभंकरांच्या निर्मितीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या तीन वर्षे आधीच ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. ही स्पर्धा कलाकार, अॅडव्हर्टायझिंग अँड ग्राफिक डिझाइन संस्थांसाठी खुली होती. एकूण 237 शुभंकर आयोजन समितीला प्राप्त झाले. त्यापैकी अंतिम पाच शुभंकर निवडण्यात आले. या पाचपैकी आयोजन समितीने एक डिझाइन निवडले. हे डिझाइन होते पेड्रो अल्बुकरक्यू या पोर्तुगीज कलाकाराने काढलेल्या शुभंकरांचे. 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकचा शुभंकर तयार करणारा जेव्हिअर मारिस्कल (Javier Mariscal) हा कलाकार निवड समितीत होता.
अथेन्स ऑलिम्पिक 2004 | ATHENS 2004
फिवोस आणि अथेना (PHEVOS AND ATHENA)

साल्ट लेक सिटी ऑलिम्पिक 2002 | SALT LAKE CITY 2002
पावडर, कोळसा आणि तांबे (POWDER, COAL AND COPPER)

हे माहीत आहे काय?
शुभंकरांचे पहिले रेखाटन तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये (साल्ट लेक सिटी, फिनिक्स आणि मिलवॉकी) फोकस गटांना सादर करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील सुमारे 80 टक्के सहभागींनी ससा, कोल्हा आणि काळा अस्वल निवडले.
सिडनी ऑलिम्पिक 2000 | SYDNEY 2000
सिड, ऑली आणि मिली (SYD, OLLY AND MILLIE)

हे माहीत आहे काय?
ऑस्ट्रेलियाने सिडनी ऑलिम्पिकसाठी स्पर्धा घेतली नाही; पण शुभंकर निवडीसाठी शोध जरूर घेतला. हा शोध ऑस्ट्रेलियासह अन्य देशांत करण्यात आला. त्या वेळी त्यांना मॅथ्यू हॅटन यांची काही रेखाटने मिळाली आणि तीच त्यांनी शुभंकरांसाठी निवडली. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कांगारू आणि देशात आढळणारा कोलासची चित्रे तर भरपूर होती. मात्र हे दोन प्राणी सोडून इतर प्राणी जे फारसे ज्ञात नाहीत, त्यांचा शुभंकर म्हणून प्राधान्याने विचार करण्यात आला. मॅथ्यू हॅटनच्या रेखाटनांमध्ये त्यांना असे प्राणी दिसले. यापूर्वीच्या काही ऑलिम्पिकसाठी दोन किंवा चार शुभंकर होते. मात्र, ऑलिम्पिकच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ होती, की तीन शुभंकर अधिकृतपणे निवडण्यात आले.
नागानो ऑलिम्पिक 1998 | NAGANO 1998
सुक्की, नोक्की, लेक्की आणि सक्की (SUKKI, NOKKI, LEKKI AND TSUKKI)

हे माहीत आहे काय?
या चार शुभंकरांची निर्मिती केली आहे लँडर असोसिएट्सने (Landor Associates). मुळात नागानो ऑलिम्पिकच्या शुभंकराचा मान स्नोपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्ह्याला (weasel) मिळणार होता. जगभरात घुबडांची पूजा केली जाते. ग्रीक पौराणिक कथांमध्ये घुबड ही ज्ञानाची अर्थात अथेना देवतेशी संबंधित आहे. या चारही शुभंकरांची नावं सुचविण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. तब्बल 47,484 सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातून ही काव्यात्मक चार नावं निवडण्यात आली.
अटलांटा 1996 | ATLANTA 1996
इझ्झी (IZZY)

हे माहीत आहे काय?
डिझाइनएफएक्स कंपनीच्या जॉन रायन (John Ryan, DESIGNefx) यांनी हा शुभंकर तयार केला आहे. या शुभंकराचं वैशिष्ट्य म्हणजे तो ना प्राणी आहे, ना मानवी आकार, ना एखाद्या वस्तूचा आकार आहे. कार्टून नेटवर्क चॅनलवर 1995 मध्ये ३० मिनिटांचे शैक्षणिक व्यंगचित्र काढून ते सादर करण्यात आले. इझ्झी या शुभंकराला पाच ऑलिम्पिक रिंग जिंकण्याची गरज होती. ‘ऑलिम्पिक रिंगसाठी इझ्झीचा शोध’ या व्हिडीओचा नायकही इझ्झी होता.
लिल्लेहॅमर ऑलिम्पिक 1994 | LILLEHAMMER 1994
हाकोन आणि क्रिस्टिन (HAAKON AND KRISTIN)

हे माहीत आहे काय?
ही शुभंकर नॉर्वेतील मुलांच्या जिवंत जोड्यांमधून निवडण्यात आली आहेत. दहा ते ११ वयोगटातील दहा हजार मुलांच्या जोड्या त्यात सहभागी झाल्या होत्या. यापैकी आठ जोड्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. शुभंकरांच्या निर्मितीमागे ऐतिहासिक घटना आहे. नॉर्वेचा एक कालखंड कठीण परिस्थितीतून गेला आहे. बिर्केबिनर आणि बॅग्लर्स या दोन कुळांमध्ये सत्तेसाठी घमासान युद्ध झाले. यात बिर्केबिनर कुळातला हाकोन हाकोनसन हा लहान मुलगा होता. त्याला आपल्या समर्थकांसह लिल्लेहॅमर डोंगरावरून पळून जावे लागले. या दोन कुळांमध्ये शांती नांदावी म्हणून बिर्केबिनरची राजकुमारी क्रिस्टिन स्वेरिसडोट्टिर हिने बॅग्लर्सचा प्रमुख फिलिप्पस सिमोनसन याच्याशी विवाह केला.
अल्बर्टविले ऑलिम्पिक 1992 | ALBERTVILLE 1992
मॅजिक (MAGIQUE)

हे माहीत आहे काय?
मुळात हा शुभंकर मायकेल पायरस (Michel Pirus) यांनी पर्वतीय शेळीपासून तयार केला होता. ऑलिम्पिकला दोनच वर्षे राहिली असताना या कल्पनेला ताऱ्यासारखा आकार देण्यात आला. हा शुभंकर शैक्षणिक भूमिकेतून साकारण्यात आला आहे. ऑलिम्पिकमधील ७,९२४ स्वयंसेवकांना सूचित करण्यासाठी कम्प्युटरच्या मदतीने शैक्षणिक कार्यक्रम समितीने निवडला. हा मॅजिक शुभंकर शिक्षण उपक्रम आणि अनेक गेममध्येही सादर करण्यात आला होता.
बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 | BARCELONA 1992
कोबी (COBI)

हे माहीत आहे काय?
शुभंकरासाठी आयोजन समितीने एक स्पर्धा घेतली होती. त्यात सहा डिझायनरने शुभंकर निवडला. तज्ज्ञांनी मारिस्कलच्या शुभंकरची अंतिम निवड केली. मारिस्कलचा सहभाग केवळ कोबी या शुभंकरापुरता मर्यादित अजिबात नव्हता. त्याने ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात स्पॅनिश पेंटिंग आणि संस्कृती, तसेच पहिल्या आठ स्पर्धांसाठी त्याने पुरस्कारांसाठी खास फाँटचीही रचना केली होती. या शुभंकराची २६ भागांची दि कोबी ट्रूप (The Cobi Troupe) ही एक कार्टून मालिकाही सादर करण्यात आली होती. उद्देश हाच, की पाच ते बारा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोबी लोकप्रिय व्हावा आणि बार्सिलोना ऑलिम्पिकचे अधिकाधिक प्रमोशन व्हावे. या मालिकेचे अधिकार २४ टीव्ही वाहिन्यांनी खरेदी केले होते.
कॅलगरी 1988 | CALGARY 1988
हायडी आणि हाऊडी (HIDY AND HOWDY)

हे माहीत आहे काय?
कॅलगरीमधील डिपार्टमेंट स्टोअरच्या प्रतिनिधींच्या एका अभ्यास गटाने शुभंकरांच्या निवडीवर काम केले. साधारणपणे खेळण्यांमध्ये तपकिरी रंगाचा अस्वल लोकप्रिय आहे. पण यापूर्वी 1990 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अशा प्रकारचा अस्वलाचा शुभंकर वापरण्यात आला होता. अखेर ध्रुवीय अस्वलाच्या शुभंकराने बाजी मारली. हा शुभंकर थंड मोसमासाठी तयार करण्यात आला होता. हा अस्वल निष्क्रिय नव्हे, तर कृतिशील वाटतो. हाऊडी आणि त्याची बहीण हायडी ही ऑलिम्पिकमधील पहिलीच शुभंकर भावंडांची जोडी होती.
सेऊल ऑलिम्पिक 1988 | SEOUL 1988
होडोरी (HODORI)

हे माहीत आहे काय?
ऑलिम्पिक आयोजन समितीने शुभंकर निर्मितीसाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी 4,344 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातून अंतिम चार प्रस्ताव निवडण्यात आले होते. त्यात ससा, खार, बदकांची जोडी आणि वाघ या चार संभाव्य अंतिम शुभंकरांमध्ये समावेश होता. अखेर किम ह्यून यांनी तयार केलेल्या ‘होडोरी’ नावाचा शुभंकर निवडण्यात आला. किम ह्यून यांनी 1986 च्या आशियाई स्पर्धेसाठीही शुभंकर केला होता.
लॉस एंजिल्स 1984 | LOS ANGELES 1984
सॅम (SAM)

हे माहीत आहे काय?
सॅम हा गरुडाच्या छबीचा शुभंकर आहे. गरुडाची छबी निवडण्यापूर्वी लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचा शुभंकर अस्वल होता. नंतर ही कल्पना बेदखल करण्यात आली. कारण यापूर्वीच मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अस्वलाची प्रतिमा वापरण्यात आली होती. नंतर अमेरिकेतल्या प्रसिद्ध पक्ष्याचा विचार करण्यात आला. अर्थात, गरुडाशिवाय दुसऱ्या पक्ष्याचा विचार कसा होणार?
साराजेव्हो ऑलिम्पिक 1984 | SARAJEVO 1984
व्हुको (Vučko)

हे माहीत आहे काय?
या शुभंकरासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात 836 स्पर्धकांनी आपल्या रचना पाठवल्या होत्या. त्यातून अंतिम सहा प्रतिमा निवडण्यात आल्या. यातील अंतिम प्रतिमा निवडण्यासाठी वृत्तपत्रे आणि मासिकांतील वाचकांची मते मागवण्यात आली. या सहा प्रतिमांमध्ये स्नोबॉल, पर्वतीय शेळी, मुंगसासारखा दिसणारा प्राणी, मेंढी, काटेरी जंगली उंदीर यांचा समावेश होता. युगोस्लाव्हियन अनेक कथांमध्ये लांडग्याचं प्रमुख पात्र रंगवलेलं आढळतं. हे पात्र साहस आणि ताकदीचं, तसेच हिवाळ्याचं प्रतीक आहे.
मॉस्को ऑलिम्पिक 1980 | MOSCOW 1980
मिशा (MISHA)

हे माहिती आहे का?
क्रीडाविषयक वृत्तपत्राच्या वाचकांमधून केलेल्या सर्वेक्षणातून अस्वलाची शुभंकर म्हणून निवड करण्यात आली आहे. रशियातून सुमारे 45,000 पत्रे आली होती. एका कलाकारांच्या गटाने ६० ग्राफिक पाठवले होते. अखेर यातून लोकप्रिय इलस्ट्रेटर कलाकार व्हिक्टर चिझिकोवने (Victor Chizhikov) काढलेली अस्वलाची रचना निवडण्यात आली.
लेक प्लेसिड 1980 | LAKE PLACID 1980
रोनी (RONI)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला माहीत नसलेल्या चार गोष्टी
Follow on Facebook Page kheliyad
Comments 3