All SportsCricket

बिशनसिंग बेदी- स्पिन ऑफ सरदार

बिशनसिंग बेदी- स्पिन ऑफ सरदार

जगभरातील फलंदाजांची आपल्या फिरकीने भंबेरी उडविणारे बिशनसिंग बेदी भारतीय संघातील एक न उलगणारं कोडं होतं. आपल्या बेधडक वक्तव्यांनी आणि निर्णयांनी ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानीही राहिले. दीर्घ आजारामुळे 23 ऑक्टोबर 2023 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. क्रिकेटविश्वाने अशा ताऱ्याला निरोप दिला, ज्याने अनेक दशके भारतीय क्रिकेटमध्ये अनमोल योगदान दिलं होतं. भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने फिरकीचा सरदार (स्पिन ऑफ सरदार) असं त्यांचं वर्णन केलं होतं. फिरकीचा जादूगार म्हणण्यापेक्षा ही उपमा त्यांच्यासाठी अतिशय चपखल होती.

बिशनसिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्या वेळी भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचा वेगळा दबदबा होता. इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन या फिरकी गोलंदाजांमध्ये एक नाव बिशनसिंग बेदी यांचंही होते. भारतीय फिरकीची चौकडी त्या वेळी कमालीची लोकप्रिय होती.

बिशनसिंग बेदी यांनी सुमारे बारा वर्षे भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली. हा डावखुरा फिरकी गोलंदाज आपल्या पिढीतील फलंदाजांसाठी न उलगडणारं कोडं होता. उंचावरून चेंडू टाकतानाही त्यावर त्यांचं नियंत्रण कमालीचं होतं. म्हणूनच त्यांना स्पिन ऑफ सरदार ही उपमा चपखल आहे.

बिशनसिंग बेदी यांनी 31 डिसेंबर 1966 मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध कोलकात्याच्या इडन गार्डनवर कसोटी पदार्पण केलं. ते 1966 पर्यंत भारतीय संघात होते. या दरम्यान त्यांनी 67 कसोटी सामने खेळले. त्यांनी 28.71 च्या सरासरीने 266 विकेट मिळवल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तर त्यांच्या नावावर 1,560 विकेट आहेत.

बेदींनी भारतीय संघाच्या कर्णधारपदाचीही धुरा सांभाळली आहे. ते 22 सामन्यांत भारताचे कर्णधार होते त्या पैकी भारताने सहा सामन्यांत विजय मिळवले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि निवड समितीतही होते. एवढेच नाही, तर 1990 मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे व्यवस्थापकही होते. मनिंदरसिंग आणि मुरली कार्तिक यांच्यासारख्या प्रतिभावान फिरकी गोलंदाजांचे गुरूही होते.

डावखुरे बिशनसिंग बेदी फिरकीची प्रत्येक कला जाणून होते. मग ते वेगाने बदल करणे असो वा नावीन्य देणे असो. चेंडूला दिलेली उंची, आर्म बॉल आणि अचानक वेगाने चेंडू टाकताना गोलंदाज अनेकदा बुचकळ्यात पडायचे.

क्रिकेटविश्वात जेव्हा आर्म बॉलचा विषय चर्चेला येईल, तेव्हा पहिलं नाव बिशनसिंग बेदी यांचंच येईल. त्यांनी डाव्या हाताच्या फिरकीपटूंच्या गुगली म्हटल्या जाणाऱ्या चेंडूला नवे जीवन दिले. त्यांनी आपल्या आर्मरने जगभरातील अनेक दिग्गज फलंदाजांची दांडी गूल केली आहे. एक गोलंदाज कोणत्या चेंडूवर सर्वाधिक विकेट घेतो याची जर नोंद ठेवली गेली असती तर मला खात्री आहे, की आर्म बॉलवर बेंदींनीच बाजी मारली असती. जेव्हा एखादा फलंदाज त्यांच्यावर वर्चस्व मिळवू पाहत असेल तर बेदी आर्म बॉलचं अस्त्र बाहेर काढायचे. 

असं अजिबात नव्हतं, की आर्म बॉलवर त्यांना हमखास यश मिळायचंच. मात्र, या चेंडूवर त्यांनी अनेकदा विकेट घेतल्या आहेत हेही तितकंच खरं आहे. 

रणजी पदार्पण

बिशनसिंग बेदी यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1961-62 मध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. त्या वेळी उत्तर पंजाबकडून ते खेळत होते. नंतर त्यांनी दिल्लीकडून खेळू लागले. विकेट मिळवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच त्यांचा नेम कधी चुकला नाही. कौंटी स्पर्धेत नॉर्दम्प्टनशायर संघाकडून खेळताना त्यांनी आपल्या फिरकीवर कमालीचे यश मिळवलं होतं.

वादाच्या भोवऱ्यात…

बिशनसिंग बेदी आणि वाद हे तसं जुनंच नातं. आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. 1976-77 मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जॉन लिव्हर याने चेंडूला व्हॅसलिनचा उपयोग केल्याने बेदींनी आक्षेप घेतला होता. वेस्ट इंडीजच्या भेदक गोलंदाजीमुळे किंग्स्टनमध्ये भारताचा दुसरा डाव घोषित करण्यामुळे ते चर्चेत आले होते. 

बेदी जगातले पहिलेच कर्णधार असतील, ज्यांनी संघ विजयाच्या समीप असतानाही चुकीच्या अंपायरिंगचा विरोध केल्याने संघाला सामना गमवावा लागला. ही नोव्हेंबर 1978 मधील घटना आहे. भारत त्या वेळी पाकिस्तान दौऱ्यावर होता. साहिवालमध्ये खेळताना वनडे सामन्यात 14 चेंडूंवर भारताला 23 धावांची गरज होती आणि आठ विकेट हातात होत्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सरफराज नवाज याने त्या वेळी सलग चार बाउन्सर टाकले. मात्र, अंपायरने एकही चेंडू वाइड दिला नाही. त्याचा विरोध करताना बेदी यांनी संपूर्ण संघच माघारी बोलावला होता.भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) आणि दिल्ली अर्थात जिल्हा क्रिकेट संघानेही (डीडीसीए) बेदींच्या या कृतीवर टीका केली होती. दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम करण्यावरही बेदींनी कडाडून टीका केली होती. स्टेडियमवरील माझ्या नावाचं स्टंड काढून टाकावं इथपर्यंत त्यांनी या स्टेडियमच्या नामांतराचा विरोध केला होता. 

वाडेकर कास्टिंग वोटवर कर्णधार…

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=PuTnlY_Pz1U” column_width=”4″]

अजित वाडेकर एक दुर्घटना होती. कास्टिंग वोटवर त्याला कर्णधार बनवलं होतं. टायगर पतौडीला हटवल्यानंतर त्याला कर्णधार केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन मालिका जिंकलो. मात्र, वाडेकरला मी उत्तम कर्णधार किंवा मॅनेजर मी तेव्हाच मानेन, जेव्हा तो मुंबई संघाला रणजी करंडक जिंकून देईल. बिशनसिंग बेदी यांनी एका मुलाखतीत हे बेधडक वक्तव्य केलं होतं. नवाब पतौडी पहिले कर्णधार होते, ज्यांनी संघातील प्रत्येकाला जाणीव करून दिली, की तुम्ही पंजाब, महाराष्ट्र, बंगालसाठी खेळत नाही, तर टीम इंडियासाठी खेळणार आहात. पतौडींविषयीची ही आठवण बिशनसिंग बेदी यांनी बऱ्याच मुलाखतींत आवर्जून काढली आहे. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. या भारतीय संघाची निवड बिशनसिंग बेदी यांनी केली होती. म्हणजे ते निवड समितीत होते.

गावस्कर टीममध्ये राहिलेच कसे…

सुनील गावस्कर यांच्यावरही बिशनसिंग बेदी यांनी टीका केली आहे. 1975 मध्ये भारत लॉर्ड्स मैदानावर पहिला वर्ल्ड कप खेळला, तेव्हा वनडे सामना 60 षटकांचा होता. संपूर्ण मैदान खचाखच भरलेले होते. सुमारे 30 हजार लोक उपस्थित होते. इंग्लंडने 334 धावा केल्या होत्या. सुनील गावस्कर मैदानात उतरले आणि संपूर्ण 60 षटके खेळले. त्यात त्यांनी फक्त 36 धावा केल्या. असं असतानाही त्यांच्यावर बीसीसीआयची कृपादृष्टी राहिली. बिशनसिंग बेदी एका मुलाखतीत म्हणाले, की जर सुनील गावस्कर मुंबईचे नसते, ते मुंबईचे प्रतिनिधित्व करीत नसते तर ते पुन्हा क्रिकेट खेळू शकले नसते. इतके वाईट खेळले होते. क्रिकेटमध्ये राजकारण आहे यात माझं अजिबात दुमत नाही. जर असं कुणी दुसरा खेळाडू खेळला असता तर तो पुन्हा वर्ल्डकप तर सोडाच, पण क्रिकेटही पुन्हा खेळू शकला असता का, यात मला शंका आहे. मात्र, गावस्कर पुढचे तब्बल चार वर्ल्डकप खेळले. लॉर्डसवर जेव्हा गावस्करची संथ फलंदाजी पाहून युगांडाचा एक प्रेक्षक मैदानात घुसला आणि गावस्करांना म्हणाला, विकेट फेक आणि दुसऱ्याला खेळू दे.

आयपीएलच्या विरुद्ध मताचे बेदी

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=33i85AKaq_c” column_width=”4″]

आयपीएलमध्ये 14-15 कोटी देऊन खरेदी केलेला एक खेळाडू आणि त्याच टीममध्ये 25-30 लाख रुपयांत खरेदी केलेला खेळाडू, या दोघांमधला फरक कोणी लक्षात घेत नाही. तो 25-30 लाखांचा खेळाडू 14 कोटीवाल्याशी बरोबरी करू शकत नाही. हा भेद कशासाठी आणि का? तुम्ही सर्वांना समान का मानत नाही?

तुम्ही सरकारी नोकरी करीत आहात आणि बीसीसीआयचेही खेळाडू आहात. दोन्ही ठिकाणी तुम्ही पैसे कसे काय मिळवू शकता, याचं उत्तर कोणी देईल काय?

मात्र आज असं होतंय. कारवाई अजिबात नाही.आयपीएल एक बिझिनेस आहे. बिझिनेसचा मूलमंत्र काय आहे, पैसा कमावणे हाच तर आहे. बाकी काही नाही, अशा शब्दांत ते आपली भूमिका कुणाचीही भिडभाड न बाळगता मांडतात. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी स्वानुभव सांगितला.

ते म्हणाले, मी स्टेट बँक ऑफ इंडियात होतो. मला कौंटी क्रिकेट खेळायला जावं लागायचं. त्या वेळी मला कौंटी खेळण्यासाठी विदाउट पे जावं लागायचं. मला दोन वेगवेगळ्या ठिकाणी पैसे मिळत नव्हते. आताच्या खेळाडूंना तर कोणताही अटकाव नाही. त्यांचा आयपीएलचा वेगळा करार आहे, बीसीसीआयचा वेगळा करार आहे आणि सरकारी सेवेतला वेगळा आहे. तिन्ही मीटर सुरू आहेत. बिशनसिंग बेदी यांचा 70-80 च्या दशकातला काळ वेगळा होता. त्या वेळी आताच्या सारखी व्यावसायिकात कुठे होती. 90 च्या दशकापूर्वी व्यावसायिकता अजिबातच नव्हती. ही व्यावसायिकता 90 नंतर आली. मात्र, बेदी यांचा खेळाकडे पाहण्याचा डोळसपणा आताच्या एकाही क्रिकेटपटूमध्ये नाही.

गरम पाण्याची लढाई

1983 चा किस्सा आहे. बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये हिवाळ्यात क्रिकेट खेळायला आले होते. त्या वेळी थंडी बरीच होती. गरम पाण्याची सोय फक्त कर्णधाराच्या खोलीत होती. बाकीच्या खेळाडूंना थंड पाण्याने अंघोळ करावी लागायची. बेदींनी त्या वेळी राज्याच्या सचिवाला सांगितलं. त्याचं नाव केळकर होतं. बेदी म्हणाले, तीस-चाळीस हजार लोक जे इथे येणार आहेत, ते तुम्हाला पाहायला येणार नाहीत; आम्हा मुलांना पाहायला येणार आहेत. त्या वेळी आमची सोय आमदार निवासात करण्यात आली होती.

तो केळकर भडकला. म्हणाला, तू असशील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार. मी इथला सचिव आहे.

बेदी म्हणाले, मी कर्णधार आहे संघाचा. आम्ही इथे खेळायला आलो आहे. आमचं खेळासाठी योगदान आहे. सचिव म्हणून तुमचं काय योगदान आहे?

त्याने बेदींची क्रिकेट बोर्डाकडे तक्रार केली. बोर्डाने चौकशी समिती नियुक्त केली. त्या वेळी संघ व्यवस्थापक होते भरतचंद खन्ना. ते भले गृहस्थ होते.

चौकशी समितीने सांगितलं, की तुम्ही एक शब्द लिहा या सरदारविरुद्ध. आम्ही कारवाई करू.

भरतचंद खन्ना चांगले शिकलेले होते. ते म्हणाले, मी याच्याविरुद्ध काय लिहू. याने स्वतःसाठी काही मागितलंच नाही.

मुंबईत ही एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. तिथे सर्व कुरापतखोर बीसीसीआयची माणसं बसलेली होती.

त्या वेळी भरतचंद खन्ना बेदींना म्हणाले, काय कथा रचली या लोकांनी. तिथं साधं गरम पाणी देऊ शकले नाहीत आणि इथं फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये चौकशी समिती बसवलीय.

त्या वेळी गुलाम साब बोर्डाचे सचिव होते. ते बेदींना म्हणाले, बिशन, चूप बस. समितीसमोर अजिबात बोलू नकोस.

बेदी बाणेदारपणे म्हणाले, गुलामसाहेब, तुम्ही मला घाबरवताय का? ते मला प्रश्न विचारतील आणि मी गप्प बसून राहू?

झालं. बरेच प्रश्न विचारण्यात आले. एनकेपी साळवे, चिदंबरम अशी त्या वेळची मोठी मंडळी होती. पी. एम. रुंगटाही तेथे होते, जे बेदींची कबर खोदण्यासाठी आसुसलेलेच होते. सगळे मुद्दे तिथे स्पष्ट झाले.

साळवे म्हणाले, बिशन हे सगळं टाळता आलं असतं का?

बेदी म्हणाले, हो, टाळता आलं असतं. पण नागपूरमधील राहण्याची व्यवस्था चांगली नव्हती हे मान्य करायला हवं.

संघासाठी लढणारे असे होते बिशनसिंग बेदी. गरम पाणी सर्व खेळाडूंना मिळावं, ही मागणी तशी छोटी होती. मात्र, त्यासाठीही बिशनसिंग बेदी संपूर्ण क्रिकेट बोर्डाशी भिडले. ते नेहमी म्हणतात, तुम्ही प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना कुणाचीही तमा बाळगायची नाही. नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे.

मला वाटतं, आज असे कर्णधार, असे लीडर शोधून सापडणार नाहीत. ते बिशनसिंग बेदीच होते.

मी सीमेपलीकडचा जवळचा मित्र गमावला

बिशनसिंग बेदी
इंतिखाब आलम आणि बिशनसिंग बेदी यांचे कर्तारपूरमधील छायाचित्र

मी सीमेपलीकडचा अतिशय जवळचा मित्र गमावला… बिशनसिंग बेदी यांच्या निधनानंतर पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम सुन्न झाले होते. 

इंतिखाब आलम आणि बिशनसिंग बेदी यांची मैत्री जवळपास पाच दशकांची. बेदी यांनी भारतीय संघासोबत 1971 मध्ये इंग्लंड दौरा केला होता. त्या वेळी इंतिखाब आलम यांनी सरेकडून खेळताना बेदींच्या गोलंदाजीचा सामना केला होता. याच वर्षात आलम आणि बेदी हे दोघांचाही विश्व एकादश संघात समावेश झाला. त्या वेळी विश्व एकादशने ऑस्ट्रेलियाचा पाच महिन्यांचा दौरा केला होता. इथेच त्यांच्या दोस्तीची बीजे रोवली गेली. ही दोस्ती काळानुरूप अधिक घट्ट होत गेली. अगदी ऑक्टोबर 2022 मध्ये बेदी कर्तारपूर साहिबला आले असताना इंतिखाब आलम त्यांना भेटण्यासाठी तिथे आले होते. 

‘‘तो महान व्यक्ती होता. एक दयाळू माणूस आणि विनोदीही. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ असतात तेव्हा एकही क्षण नीरस जात नाही.’’ इंतिखाब आलम बेदींचे पैलू नकळतपणे उलगडतात. 

इंतिखाब आलम दिल्लीत आले तर त्यांचा मुक्काम बेदींच्या घरीच असायचा. हेच बेदींच्याही बाबतीत होतं. बेदीही लाहोरमध्ये आले तर आलम यांच्या घरी हमखास मुक्काम करणार.

‘‘ज्या वेळी 2021 मध्ये बेदी कर्तारपूर साहिबला आले होते, त्या वेळी ती माझी त्यांच्याशी अखेरची मुलाखत ठरली. जुने दिवस आठवत आम्ही इतके भावूक झालो, की दोघांच्याही डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहत होत्या. त्यानंतर त्यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्याशी फोनवर बोलणे होऊ शकले नाही. मात्र, माझी पत्नी बिशनच्या पत्नीच्या नियमात संपर्कात होती. आमच्या दोस्तीमुळे त्या दोघींचीही चांगली मैत्री झाली.‘‘ इंतिखाब आलम आठवणींचे एकेक पदर उलगडत होते.

लंडनच्या ओव्हल मैदानावर सरेकडून खेळताना मी बेदीविरुद्ध प्रथमच खेळत होतो. मी त्याला काही षटकार खेचले. त्या वेळी तो माझ्याजवळ आला नि म्हणाला, ‘संघात इतरही लोक आहेत. तू माझ्याच मागे का लागलास.’ बस, त्याच वेळी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो.

‘‘साशू… अतिशय उत्साहाने ते मला या नावाने हाक मारायचे आणि असे तेच करायचे. बिशनसिंग बेदी यांच्यासाठी मी केवळ क्रिकेटपटू नाही, तर त्यांच्या मुलासारखा आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी इंग्लंडविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. न्यूझीलंड दौऱ्यावर रात्रीच्या भोजनावेळी त्यांची प्रत्येक गोष्ट, ज्ञान मी आत्मसात करीत होतो. जिथे त्यांचा आवाज घुमत होता, आज तिथे चिरशांती पसरली आहे. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.’’ 

– सचिन तेंडुलकर

Arun Jaitley cricket Stadium | अरुण जेटली स्टेडियम

[jnews_block_9 first_title=”read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!