भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणखी मालामाल होणार आहे. कारण आयपीएलमध्ये आणखी दोन संघ सहभागी होणार असून, या संघांचा सोमवारी लिलाव होणार आहे. यातून प्रत्येक फ्रँचायजींकडून 7,000 कोटी ते 10,000 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थात, अद्याप हे स्पष्ट झालेले नाही, की बीसीसीआय याबाबत काही घोषणा करेल किंवा नाही. कारण या लिलावात किती बोली लागली, याचा आकडा जाहीर करण्याबाबत साशंकता आहे. या लिलावप्रक्रियेसाठी 22 कंपन्यांनी दस्तावेज जमा केले आहेत. या कंपन्यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयांची निविदा (टेंडर) भरली आहे. नव्या संघांसाठी 2000 कोटींचे आधारमूल्य आहे. त्यामुळे केवळ पाच-सहा कंपन्या या लिलावप्रक्रियेत तग धरू शकतील. बीसीसीआय फ्रँचायजीसाठी बोली लावण्याकरिता तीन कंपन्या किंवा व्यक्तींच्या कॉन्सॉर्टियमला (समूह) परवानगी देणार आहे.
अदानी समूह घेणार फ्रँचायजी?
या लिलावात बोली लावणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीची वार्षिक उलाढाल कमीत कमी 3,000 कोटी रुपये होणे आवश्यक आहे. कॉन्सॉर्टियमबाबत तिन्ही संस्थेतल्या प्रत्येकाची वार्षिक उलाढाल 2,500 कोटी रुपये होणे आवश्यक आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत कंपन्यांपैकी अदानी समूह आहे. गौतम अदानी आणि त्यांचा अदानी समूह अहमदाबादच्या फ्रँचायजीसाठी बोली लावण्याची शक्यता आहे. जर अदानी समूह बोली लावू शकला तर तो नव्या फ्रँचायजीचा मालक होण्याची शक्यता अधिक आहे. अरबपती संजीव गोयंका यांचा आरपीएसजी समूहही बोली लावण्याची शक्यता आहे. मात्र, तो वैयक्तिक स्वरूपात बोली लावणार की कॉन्सॉर्टियमच्या रूपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एक मात्र स्पष्ट आहे, की आयपीएलमध्ये आणखी दोन संघ अस्तित्वात येतील.
गोपनीयतेच्या अटीखाली बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, ‘‘गौतम अदानी आणि संजीव गोयंका भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वांत मोठी नावे आहेत. ते गंभीरपणे बोली लावणारे असतील. संभाव्य बोली लावणाऱ्यांकडून 3,500 कोटींची कमीत कमी बोली लावण्याची शक्यता आहे. आयपीएल प्रसारण हक्काचे सुमारे पाच बिलियन डॉलर (36,000 कोटी रुपये) मिळण्याचीही शक्यता आहे. आयपीएलच्या टीव्ही प्रसारण हक्काचा सर्व फ्रँचायजींना समान हिस्सा मिळतो.’’ गोयंका दोन वर्षांसाठी पुणे फ्रँचायजी रायझिंग पुणे सुपरजायंट्सचे (आरपीएस) मालक राहिलेले आहेत. आयएसएल (इंडियन सुपरलीग) फ्रँचायजी एटीके मोहन बागानचेही ते मालक आहेत.
मँचेस्टर युनायटेडचे मालक अवराम ग्लेजरची मालकी असलेल्या लान्सर समूहानेही बोली लावण्याचे दस्तावेज घेतले आहेत.या शर्यतीत कोटक समूह, फार्मास्युटिकल (औषधनिर्माती कंपनी) प्रमुख अरबिंदो फार्मा आणि टोरेंट समूहही या बोली प्रक्रियेत सामील आहेत. शहरांचा विचार केला तर अहमदाबाद आणि लखनौचा दावा मजबूत वाटतो. अहमदाबादजवळ मोटेरातील नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता एक लाखपेक्षा अधिक आहे. त्याचबरोबर लखनौतील इकाना स्टेडियमची प्रेक्षकक्षमता सुमारे 70,000 आहे. या शर्यतीत इंदूर, गुवाहाटी, कटक, धर्मशाला आणि पुण्यासारखे उत्तम क्रिकेट स्टेडियमवाली शहरेही सहभागी आहेत.
माजी क्रिकेटपटूही लावणार बोली?
या बोलीत भारताचा एक माजी क्रिकेटपटूही कॉन्सॉर्टियममध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा क्रिकेटपटू नव्या फ्रँचायजीसाठी गंभीरपणे बोली लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी या शक्यतेला दुजोरा देत सांगितले, ‘‘होय, भारताचा एक माजी सलामी फलंदाज सुमारे 300 कोटी रुपये खर्च करण्यास आणि कॉन्सॉर्टियममध्ये छोटीशी भागीदारी खरेदी करण्यास तयार आहे. तो एक व्यावसायिक कुटुंबातला आहे. क्रिकेट संघात गुंतवणूक करण्यास तो इच्छुक आहे.’’ बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले, ‘‘तो एक प्रतिष्ठित खेळाडू आहे. फ्रँचायजी कशी काम करते याची त्याला पूर्ण कल्पना आहे.’’
बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडीची चर्चा
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर ही बॉलिवूडची जोडी कॉन्सॉर्टियमचा हिस्सा होण्याची अटकळे आहेत. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, ते एखाद्या नव्या फ्रँचायजीचे अल्प भागीदार किंवा ब्रांड दूत होऊ शकतात.