EnvironmentalGreen SoldierRaanwata

अजित बर्जे यांची जीवनशैली… आनंदी जीवनाची ‘कारवेल’

अजित बर्जे जीवनशैली

हानपणी एका गोष्टीने कमालीचं कुतूहल निर्माण केलं होतं. ती म्हणजे अल्लादिनचा जादूई दिवा. हा दिवा घासला, की एक जिन बाहेर पडतो आणि तो तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतो… आज या काल्पनिक कहाणीतला अल्लादिनचा जादूई दिवा तर कुणाकडेही नाही. असता तर तो जिन वैतागला असता. कारण त्याच्यापेक्षाही मानवाच्या ‘गरजांचा राक्षस’ अधिक भयानक आहे. आपल्या गरजाच इतक्या अमर्यादित आहेत, की त्या संपता संपत नाहीत. 

आता हेच बघा ना…

कपडे जुने झाले, चला जाऊया मॉलमध्ये, आज की नाही स्वयंपाकाचा कंटाळा आला, चला छानशा हॉटेलमध्ये… खरेदीसाठी किती कारणं आपल्या पुढ्यात येत असतील? अशी ऐहिक सुखात यथेच्छ डुंबणारी कुटुंबे आपल्या इर्दगिर्द नेहमीच पाहायला मिळतात; पण काही कुटुंबे अशीही आहेत ज्यांना कशाचीही आसक्ती नाही. त्यांचा सुखाचा मार्ग वेगळा आहे. तो म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैलीचा. पर्यावरणपूरक जीवनशैली अगदी निसर्गासारखी, म्हणजे आहे त्यात समाधान मानणं. ना कुणाविषयी तक्रार, ना कुणाविषयी असूया. महात्मा गांधींच्या स्वच्छ विचारांनी प्रेरित झालेला असाच एक माणूस आहे, ज्याने आपल्या गरजा कमीत कमी ठेवल्या आहेत… हा माणूस म्हणजे अजित बर्जे Ajit Barje |.

विश्वास बसणार नाही, पण या माणसाने ही जीवनशैली स्वीकारताना आपल्या घसघशीत पगाराच्या नोकरीवरही पाणी सोडलं आणि जगण्यासाठी काय थाटलं, तर ग्रंथालय! संपूर्ण बर्जे कुटुंबानेच ऐहिक सुखाचा त्याग केला आहे. ‘आम्हां घरीं धन शब्दाचींच रत्‍नें..’ ही उक्ती या कुटुंबाला तंतोतंत लागू पडते. अजित बर्जे यांची जीवनशैली कारवेलसारखी फुललेली होती… ते पाहून जगण्याच्या सगळ्या भौतिक सुखाचा फुलोरा गळून पडतो. अशा या बर्जे कुटुंबाची कहाणी खरंच वाचण्यासारखी आहे…  

ही कहाणी सुरू होते अजित बर्जे यांच्या जीवनशैलीपासून. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांचं तसं छान चाललं होतं. प्रिंटिंग इंजिनीअरिंग झालेले बर्जे आधी मुंबईला सहा-सात वर्षे होते. ते जेथे काम करीत होते, ते प्रमोद मदानेंचं परिस ऑफसेट नावाचं युनिट होतं. या ‘परिस’चे तीन युनिट होते. एक जळगाव, दुसरे मुंबई आणि नंतर शेवटी तिसरं युनिट नाशिकमध्ये सुरू झालं. बर्जे दाम्पत्य दोघंही मुंबईत एकाच ठिकाणी काम करीत होते. बर्जे मार्केटिंगचं काम करायचे आणि सौ. बर्जे अकौंट पाहायच्या. लग्नानंतर हे दाम्पत्य नाशिकमध्ये आलं. कारण हे सगळं आधीच निश्चित केलं होतं, की लग्नानंतर नाशिकमध्येच जायचं. मदानेंचा बर्जेंवर विश्वास असल्याने त्यांनी त्यांच्यावर नाशिकची जबाबदारी सोपवली. नाशिकच्या प्लँटचं पूर्ण काम बर्जेंनीच पाहिलं. म्हणजे माळेगावात एमआयडीसीची जागा घेण्यापासून युनिट सुरू करेपर्यंत सगळं काम बर्जेंनीच पाहिलं. १७-१८ वर्षे प्रिंटिंग क्षेत्रातच होते. या युनिटचं संपूर्ण काम कॉर्पोरेट सेक्टरमधलंच होतं. थोडक्यात म्हणजे इंडस्ट्रीयल पब्लिसिटीचं.

या परिस ऑफसेटबाबत थोडक्यात सांगायचं, तर त्याचं काम सुरुवातीला मुंबईत सुरू होतं. नंतर भवरलाल जैन यांच्या जैन इरिगेशनसोबत मदाने यांनी जळगावातील शिवाजीनगर भागात पहिलं युनिट सुरू केलं. जळगावात उत्तर महाराष्ट्रातलं ते पहिलं युनिट होतं. बर्जे नाशिकचेच असल्याने त्यांनी प्रिंटिंग युनिटच्या विस्ताराच्या हेतूने नाशिकमध्ये काम पाहिलं. बर्जे यांच्या पत्नी मनीषा या प्रमोद मदाने यांची भाची. एकूणच या युनिटशी तसं भावनिक नातंही होतं. नाशिकमध्ये प्रिंटिंग युनिटचं काम पाहत असतानाच बर्जे यांना जाणवलं, की आता कुठे तरी थांबायला हवं. कारण दहा वर्षे नाशिकमधलं काम पाहिलं होतं. दुर्दैवाने प्रमोद मदानेंची तब्येतही खालावल्याने २००० मध्ये त्यांनी अंथरुण धरलं. सहा-सात वर्षे ते आजारीच होते. त्यामुळे जे प्रिंटिंग युनिट उभं राहिलं ते बर्जे यांना अचानक सोडताही येत नव्हतं. कारण हे सगळं सांभाळणारं मदानेंकडे कुणीच नव्हतं. त्यांचीही मुलं लहानच होती. त्यामुळे अजित बर्जेंनी त्यांना शब्द दिला, की जोपर्यंत तुमची मुलं मोठी होऊन हे काम सांभाळत नाहीत, तोपर्यंत मी हे काम पाहतो. त्याप्रमाणे त्यांनी प्रिंटिंग युनिटचं काम पाहिलं.

अजित बर्जे यांची जीवनशैली
बर्जे कुटुंबाकडून आदिवासी भागातील मुलांना मोफत पुस्तके भेट दिली जातात.

बर्जे यांना निसर्ग, पर्यावरणाची प्रचंड आवड होती. योगायोगाने २००३ मध्ये नांदूरमध्यमेश्वर विषयावर एक ब्रोशर बनविण्याचं काम आलं. या ब्रोशरसाठी माहिती होतीच, पण छायाचित्रे पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा यांच्याकडून घ्यावी लागणार होती. त्या निमित्ताने बर्जे यांचा परिचय राहा यांच्याशी आला. या परिचयातून बर्जे यांनी राहा यांच्यासोबत बरीच भटकंती केली. राहा यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत बर्जे यांना त्यांचा सहवास लाभला. राहा यांच्या सहवासाने बर्जे निसर्गाच्या आणखी जवळ गेले.

पुढे बर्जे यांनी प्रिंटिंग क्षेत्राची जबाबदारी २००७ पर्यंत सांभाळली. दीर्घ आजारामुळे २००७ मध्ये मदानेंचं निधन झालं. त्याच वर्षी डिसेंबर २००७ मध्ये बर्जे यांनीही प्रिंटिग क्षेत्राला कायमचा रामराम ठोकला. कारण मदानेंची मुलंही सक्षम झाली होती. खरं तर या भौतिक सुखातून विरक्ती घेण्याचा निर्णय त्यांनी 2003 मध्येच घेतला होता. पुढे आपण काय करायचं, यावर बर्जे दाम्पत्याने बराच विचार केला होता. मात्र, ठोस निष्कर्षापर्यंत येत नव्हते. एक मात्र नक्की होतं, ते म्हणजे चंगळवादी भौतिक जगापासून लांब राहायचं. कोणतीही आसक्ती ठेवायची नाही. वैवाहिक आयुष्यात त्यांनी स्वीकारलेला हा मार्ग तसा धाडसीच म्हणायला हवा; पण त्यांची पत्नी मनीषा यांनी त्यांच्या विचारांना बळ दिलं.

सगुणाबागेतले ते दिवस…

या विचाराला पुष्टी देणारी आणखी एक घटना घडली. कर्जतजवळील सगुणाबागेविषयी त्यांनी खूप ऐकलं होतं. भारतातील पहिलं कृषी पर्यटन म्हणून ‘सगुणाबागे’चा लौकिक आहे. या सगुणाबागेला २००८ मध्ये बर्जे यांनी भेट दिली. सुमारे ५५ एकरच्या क्षेत्रात शेखर भडसावळे यांनी तिथं प्रयोगशील शेती विकसित केली आहे. बर्जे यांनी भडसावळे यांच्याशी संवाद साधला. भडसावळे यांचं शेतीमातीतलं काम पाहून ते एकदम प्रभावित झाले. अजित बर्जे यांचा जीवनशैली बदलण्याचा इरादा इथेच पक्का झाला. ऐहिक सुखापासून आपण थांबायला हवं हा विचार आणखी घट्ट होत गेला. त्यांना शेतीविषयी आकर्षण निर्माण झालं. त्या वेळी शेखर भडसावळे म्हणाले, “तुला जर यात काही करायचं असेल तर तू आमच्यासोबत इथं काम कर.” २००८ मध्ये बर्जे वर्षभर त्यांच्यासोबत राहिले. जवळजवळ त्यांनी ठरवलं होतं, की आपण आता इथंच कायमचं स्थायिक व्हायचं आणि शेतीवरच काम करायचं. तसं पाहिलं तर बर्जेंची शेतीची कोणतीही पार्श्वभूमी नाही. आता प्रश्न होता, संपूर्ण कुटुंब इकडं कसं शिफ्ट करायचं? पत्नी, मुलाचा प्रश्न नव्हता. पण वडिलांना हे मान्य नव्हतं. कारण बर्जे यांचे वडील पेशाने डॉक्टर. उपनगर परिसरात डॉ. शरद बर्जे या नावाने ते लोकप्रिय होते. गरिबांचे उपचार ते कधी कधी मोफत करायचे. शुल्कही घेतले तर अगदीच नाममात्र. त्यामुळे गांधीनगर परिसरात तर त्यांना देव मानायचे. हे सगळं सोडून वडील त्यांच्यासोबत येण्यास राजी झाले नाहीत. ते म्हणाले, “मी हे सगळं सोडून तुमच्यासोबत कुठंही येणार नाही.” वडिलांच्या या निर्णयामुळे बर्जे यांना पत्नी मनीषा आणि मुलगा वेदान्त याला नाशिकमध्येच ठेवावं लागलं. कारण वडिलांची काळजी घेणारं दुसरं कुणी नव्हतं. अखेर बर्जे एकटेच सगुणाबागेत जाऊन राहिले; पण ही तारेवरची कसरतच होती. कुटुंब नाशिकला आणि अजित बर्जे सगुणाबागेत. याच सुमारास भडसावळे यांनी भातशेती लागवडीचं नवं तंत्र विकसित केलं होतं. ते म्हणजे एसआरटी Saguna Rice Technic | भारतातलं हे नवं तंत्र खूपच परिणामकारक होतं. या तंत्रामुळे पारंपरिक भात लागवडीला उत्तम पर्याय निर्माण झाला होता. या तंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे नांगरणी नाही, कुठलीही रासायनिक खतं वापरायची नाहीत. यात बर्जे यांची भूमिका थोडीशी वेगळी होती. कृषी पर्यटनाचा सगळा डेटा गोळा करायचा, त्याचं विश्लेषण करायचं, एवढीच जबाबदारी त्यांच्यावर होती. एकूणच कृषी पर्यटनाशी संबंधितच काम होतं. अर्थात, वर्षभर तिथं रमल्यानंतर बर्जे पुन्हा नाशिकमध्ये परतले. कारण कुटुंब इकडं शिफ्ट होणारच नव्हतं. नाशिकला परतल्यानंतर त्यांनी आपली पुढची दिशा ठरवली, की पुस्तकांशी संबंधित पर्यावरण अशी सांगड घालून काम करायचं.

अजित बर्जे यांची जीवनशैली
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनीषा बर्जे.

दिलीप कुलकर्णींमुळे जीवनशैली सुस्पष्ट

 नंतर बर्जे काही निमित्ताने कुडावळ्याचे दिलीप कुलकर्णी यांच्या संपर्कात आले. कुलकर्णी यांचा जीवनशैली या विषयावर गाढा अभ्यास होता. ते मूळचे पुण्याचे. कुलकर्णी यांचं कामही भन्नाट आहे. ते पंचवीस वर्षे टेल्कोत नोकरीला होते. मात्र, नोकरी सोडून ते जाखोलीजवळचं कुडावळे गावात राहू लागले. बर्जे त्यांना एकदा पुण्यात जाऊन भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अजित बर्जे यांना त्यांची जीवनशैली विषयावरील संकल्पना पटत गेली. कुलकर्णी यांच्या कामाने प्रभावित झालेले बर्जे पुढे आणखी एका संस्थेच्या संपर्कात आले. ती म्हणजे डोंबिवलीची अण्णासाहेब भुसकुटे विचारमंच संस्था. ते तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम घ्यायचे. या संस्थेने पुढे या उपक्रमात थोडे बदल केले. कारण त्यांच्या लक्षात आलं, की फक्त व्याख्याने घेऊन उपयोग नाही. कारण ज्या तरुणाईसाठी ते जे उपक्रम घेत होते, त्यात तरुण कमी आणि वयस्कर लोकंच वेळ घालविण्यासाठी येऊ लागले. ते विचार ऐकतात आणि निघून जातात. ज्या उद्देशाने हे काम सुरू केलं तोच सफल होत नसल्याचं विचारमंचाला जाणवलं. म्हणून त्यांनी २००७ मध्ये आरोहण नावाचा उपक्रम हाती घेतला. बर्जेंच्या पत्नी डोंबिवलीच्याच असल्याने त्यांना या उपक्रमाविषयी माहिती मिळाली. ‘आरोहण’ हा एक अभ्यास दौरा आहे. महाराष्ट्रभर हा अभ्यास दौरा होणार होता. बर्जे दाम्पत्यानं हा अभ्यास दौरा करण्याचं ठरवलं; पण एक अडचण होती. ती म्हणजे हा दौरा फक्त महाविद्यालयीन तरुणांसाठी होता. आता बर्जे दाम्पत्याला कळून चुकलं, की आपल्याला यात काही प्रवेश मिळणं शक्य नाही. तेव्हा मनीषा त्यांना म्हणाल्या, की तू आधी प्रयत्न कर. कारण बर्जे यांचा मुलगाही लहानच होता. त्याच्या शाळेकडे पाहायला दुसरं कुणी नव्हतं. म्हणून अजित बर्जे यांनीच या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आता प्रश्न होता, की या दौऱ्यात त्यांना सहभागी करून घेण्यात येईल की नाही हा. या अभ्यास दौऱ्यात सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, औद्योगिक, सांस्कृतिक असे सगळेच विषय होते. देवरूखपासून नागपूरपर्यंत असा चार हजार किलोमीटरचा अभ्यास दौरा होता. त्यात १०८ तरुणांचा सहभाग होता. बर्जे यांनी या दौऱ्यासाठी संस्थेला खूपच विनंती केली. अखेर त्यांना या दौऱ्यासाठी परवानगी मिळाली. हा दौरा बर्जेंसाठी फायदेशीर ठरला. कारण यात बाबा आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग, अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी, पोपटराव पवारांचे हिवरेबाजार अशा अनेक ठिकाणी भेट देऊन त्यांचं कार्य समजून घेण्यात आलं. आठ-आठ जणांचे ग्रुप करून त्यांना वेगवेगळे विषय दिले जायचे. बर्जेंना एक तर बस प्रवासाचा खूप त्रास होतो. मात्र, या चार हजार किलोमीटरच्या प्रवासात त्यांना एकदाही त्रास झाला नाही. कदाचित या दौऱ्यात त्यांना विचारांचं ‘व्हिटॅमिन’ खूपच मिळाल्याने हा प्रवास कसा संपला, त्यांना कळलंच नाही. एकूणच हा विचार बर्जेंच्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला. कारण शहरी वातावरणातून बाहेर पडून अजित बर्जे यांना ग्रामीण जीवनशैली जवळून अनुभवता आली.
अजित बर्जे यांची जीवनशैली
कामात गर्क असलेला वेदान्त बर्जे.

अशी रोवली कारवीची बीजे

अनेकांना भेटून बर्जे यांच्या लक्षात आलं, की आपल्याला आता काही तरी काम करावं लागणार आहे. अजित बर्जे यांच्या डोक्यात जीवनशैली पक्की झाली होती. अर्थात, ऐहिक सुखाचा त्याग केला तरी घर तर चालवावं लागणार होतंच. म्हणून त्यांनी पुस्तकाशी संबंधितच काही तरी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचं स्वरूप कसं असेल यावर विचार झालेला नव्हता. नंतर वेगवेगळ्या लोकांचं  पर्यावरण क्षेत्रातलं काम पाहून त्यांनी निर्णय घेतला, की पुस्तकांतूनच पर्यावरणाचं काम करायचं. त्यासाठी त्यांनी पुण्यापासून बेंगलुरूपर्यंत वेगवेगळी ग्रंथालये पाहिली. मध्यंतरी काही कार्यशाळाही केल्या. त्यातून त्यांनी निश्चित केलं, की पर्यावरणाला वाहिलेली अशीच उत्तम खासगी लायब्ररी सुरू करायची. हा निर्णयही धाडसीच होता. कुणी कपड्यांचं दुकान सुरू करतं, कुणी हॉटेल तर कुणी आणखी काही. पण ग्रंथालयावर कुणी अर्थार्जनाचा विचार कसा करू शकेल? कारण ग्रंथालये म्हंटली, की ती सार्वजनिकच असतात. मग ती कुणाच्या तरी अनुदानावर सुरू राहते किंवा लोकवर्गणीतून तरी. खासगी ग्रंथालये म्हणजे घरघालू धंदा. पण बर्जे यांनी त्याच्या पुढे जाऊन विचार केला. कारण फक्त पर्यावरणावर पुस्तकं ठेवून ती कुणी घ्यायला येणार नाहीत. त्यातून चरितार्थ चालणार नाही. म्हणून मग त्याला जोडून बाकीचीही पुस्तकं देण्याचा विचार केला. हे करताना त्यांनी काही मापदंड आखले. म्हणजे शृंगारिक कथा, डिटेक्टिव कथा अजिबात ठेवल्या नाहीत. हे टाळून त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनपर पुस्तकांना आपल्या ग्रंथालयात प्राधान्याने स्थान दिलं. यातूनच उभं राहिलं ‘कारवी’ ग्रंथालय. या ग्रंथालयात पुस्तकाची रचनाही त्यांनी अभ्यासांती केली आहे. लहान मुलांसाठी वेगळा विभाग केला आहे. त्यात मनोरंजनपर पुस्तकं आहेत. या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी पुस्तकांच्या विषयानुरूप कोणतेही विभाग केलेले नाहीत. म्हणजे कथा विभाग वेगळा, विज्ञान विभाग वेगळा वगैरे वगैरे… असं न करता त्यांनी सगळी पुस्तकं एकत्रितच ठेवली आहेत. म्हणजे प्रवासवर्णनपर पुस्तकाजवळच तुम्हाला कथा, कादंबऱ्याही दिसतील. कारण लोकं जेव्हा कथापुस्तकं पाहतात, तेव्हा त्याला इतर विषयांचीही पुस्तके पाहायला मिळतात. वाचक जेव्हा पुस्तकं न्याहाळतात, तेव्हा आवडीच्या विषयांव्यतिरिक्तची पुस्तकंही त्याला वाचावीशी वाटू शकतात. हाच या पुस्तकमांडणीमागचा हेतू. मग आता प्रश्न पडतो, की नेमके पुस्तक हवं असेल तर ते कसं शोधायचं? त्यासाठी त्यांनी संगणकावर पुस्तकांचं वर्गीकरण केलेलं आहे. जर अमुक पुस्तक हवं असेल तर ते संगणकावर त्या पुस्तकाचा नंबर पाहतात. आणि काही क्षणात त्या पुस्तकांच्या जंजाजाळातून त्या क्रमांकाचं पुस्तक सहजपणे शोधतात. ही कल्पना मनीषा बर्जेंची. मुलांसाठीची पुस्तकंही वाचनीय आहेत. पहिली ते चौथीच्या मुलांसाठी वेगळी, पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी वेगळी अशी पुस्तकांची रचना आहे.

कारवी ग्रंथालयाने बर्जे दाम्पत्याला आत्मिक स्थिरत्व आलं. मात्र अजित बर्जे यांनी निवडलेली साधी जीवनशैली अनेकांच्या कुतूहलाचा विषय वाटायची. अनेकांना तर त्यांच्या या निर्णयाचंच आश्चर्य वाटतं. त्यांना कोणीही नवीन माणूस भेटला, की पहिला प्रश्न हाच विचारला जातो, तुमचं या लायब्ररीत भागतं का? तुमचा चरितार्थ कसा चालतो की हा साइड बिझनेस आहे? हे प्रश्न बर्जे दाम्पत्याला नवे नाहीत. त्यावर बर्जे दाम्पत्याचं साधं आणि सरळ उत्तर असतं- “आपलं अर्थार्जन जर नियंत्रित असेल तर आपोआप आपल्या गरजा कमी होतील. नाही तर एक लाख रुपये पगार मिळाला, तरी महिन्याला साठ-सत्तर हजार रुपये सहज खर्च करू.”

अजित बर्जे यांची जीवनशैली
कर्नल आनंद देशपांडे व सौ. देशपांडे यांनी कारवीने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.

तरीही लोकांचं समाधान होत नाही. खासगी ग्रंथालय हा काही जगण्याचा मार्ग आहे? अनेकांना तर बर्जे दाम्पत्याचा हा साइड बिझनेसच वाटतो. ते म्हणतात, तुमचा वेगळा काही उद्योग आहे का? पण बर्जे त्यांना स्पष्टपणे सांगतात, की आम्ही पूर्ण वेळ हेच करतो. तेव्हा अनेकांना धक्काच बसतो. बर्जे दाम्पत्याला एक मुलगा आहे. वेदान्त त्याचं नाव. तो इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. नाशिकमधल्याच गुरू गोविंदसिंग कॉलेजमध्ये तो शिक्षण घेतो. तसं पाहिलं तर त्याला बाहेर शिक्षणासाठी पाठवता आलं असतं; पण खरंच गरज आहे का? शेवटी इंजिनीअरिंग कुठंही केलं तरी एकच आहे. वेदान्तही बर्जे दाम्पत्यासारखाच विचाराने परिपक्व आहे. गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत त्याने मोबाइलही बाळगला नव्हता; पण अपरिहार्यपणे त्याने यंदा मोबाइल घेतला आहे. कारण बऱ्याचशा शैक्षणिक गोष्टी मोबाइलवर येतात. अर्थात, मोबाइल घेतला असला तरी व्हॉट्सअॅप त्यात इन्स्टॉल केलं नाही. तो सहजपणे म्हणतो, मला त्याची गरज नाही.

अजित बर्जे यांची साधी नि समृद्ध जीवनशैली

बर्जे दाम्पत्याने खर्चही कमी केले. एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर खरंच त्याची गरज आहे का, हा पहिला प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे गरजा कमी करणे हा सर्वांत महत्त्वाचा विषय आहे. आपण पर्यावरणावर एसीत बसून बोलणार असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. अशा बेगडी पर्यावरणगप्पा काही कामाच्या नाहीत. त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणणे योग्य आहे. प्लास्टिक कमी करणं, झाडं लावणं हे तर आहेतच उपाय. ते करायलाच पाहिजे; पण फक्त असं करून उपयोग नाही. आपण पूर्वीपासून पाहत आहोत, की जंगलं अनादिकालापासून आहेतच ना? ती कुणी लावायला गेलं नव्हतं. कारण आपण आज जे काही करतोय, ते अनैसर्गिकच आहे. बर्जेंच्या घरामागे गार्डन आहे. संपूर्ण बर्जे कुटुंब पंधरा दिवसातून एकदा त्याची साफसफाई करतात. बर्जे कुटुंब कोणत्याही मॉलमध्ये हौसेने खरेदी करायला जात नाही. टीव्हीवरील जाहिरात पाहून ती वस्तू खरेदी करण्याचा मोहही त्यांना होत नाही. हॉटेलिंग तर अजिबात होत नाही आणि हे सगळं ते मनाविरुद्ध करताहेत असं कुणाला वाटत असेल तर तसंही नाही. सगळ्यांना मनापासून पटलं म्हणूनच त्यांनी हे सगळं टाळलं. काही दुरुस्ती असेल तर ती स्वतःच करण्यावर भर असतो. त्यासाठी स्वतंत्र माणूस शोधून त्याला पैसे देऊन एखादी वस्तू दुरुस्त करण्याचा विचारही त्यांना शिवत नाही. आधी स्वतः करणार, मग गरज वाटली, की वेगळा पर्याय शोधणार. प्लम्बिंगपासून गवंड्यापर्यंत सगळी कामं ते स्वतःच करतात. अगदी मुलाचे केस कापायचे असेल तर ते काम मनीषा बर्जे करतात. कारण या गोष्टींसाठी फार काही वेगळं करण्याची गरज नाही. अजित बर्जे कुटुंबाची ही साधी नि समृद्ध जीवनशैली पाहिली की मनापासून वाटतं, जगणं यालाच म्हणतात.

स्वयंपाकही त्यांचा तेवढाच होतो जेवढी त्यांना गरज आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अन्न शिल्लक राहत नाही. म्हणजे आज अन्न उरलं म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ते खाल्लं, असं अजिबात होत नाही. ते सिझनल फळेच खातात. सफरचंद कधीच खात नाहीत. कारण ते आपलं फळच नाही. काकडी, कलिंगड ही फळं हिवाळ्यातही मिळतात. मुळात ती उन्हाळ्यातली फळे आहेत. कारण त्यांनी निसर्गानुरूप जगणं स्वीकारलं आहे. एकूणच अनैसर्गिक पद्धतीने जे जगणं आहे, ते बर्जे यांनी केव्हाच टाळलं आहे. कारण ते स्वतःला पहिला प्रश्न विचारतात, याची आपल्याला खरंच गरज आहे का? त्याचं उत्तर नकारार्थीच असतं. त्यामुळे ते तेथेच टाळायला हवं. त्यामुळे कमी पैशांत ते चरितार्थ भागवू शकतात. त्यांनी घरातच वस्तू कमी येऊ दिल्या. आहे त्याचाच पुनर्वापर करायचा. बर्जे दाम्पत्याचं घरच ५५ वर्षे जुनं आहे. हे घर बर्जे यांच्या वडिलांनी बांधलेलं आहे. त्यांचा जो बेड आहे तोही साठ वर्षे जुना आहे. फर्निचरही जुनं आहे. फ्रिज आहे, पण तो खराब झाला तर पुन्हा घ्यायचा नाही, असं त्यांनी कायमचं ठरवलं आहे. मायक्रोवेव नाही. घरात कोणतेच गॅझेट ठेवलेले नाहीत. टीव्हीमध्ये तर किती क्रांती आली आहे! मात्र, त्यांच्याकडे अद्याप तीस वर्षे जुना टीव्ही अजूनही ते वापरत आहेत. त्यांनी वेदान्तला त्याच्या संपूर्ण शैक्षणिक करिअरमध्ये एकदाही क्लास लावला नाही.

विवाह समारंभही टाळले…

आता बर्जे दाम्पत्याने निर्णय घेतला आहे, की नाशिकबाहेर कोणत्याही विवाह समारंभाला हजेरी लावायची नाही. गावातल्याच कार्यक्रमांना हजेरी लावायची. गावातल्या कार्यक्रमांना हजेरी लावताना फक्त भेटून यायचं. त्यात जेवण घ्यायचं नाही. ज्या कार्यक्रमांना जायचं तेथे त्यांनी पुस्तकंच भेट दिली आहेत. पुस्तकं भेट देताना त्यांनी त्यावर नावं अजिबात टाकली नाहीत. कदाचित तुम्हाला आवडली नाही तर ते ही पुस्तकं इतरांना भेट देऊ शकतात. ही छोटीशी गोष्ट आहे, पण त्यातला सूक्ष्म विचार किती मोठा आहे! बर्जे दाम्पत्य वेगवेगळ्या संस्थांनाही पुस्तकं भेट देतात. उत्तराखंडमधील एका संस्थेलाही त्यांनी अशीच पुस्तकं भेट दिली होती. शक्यतो ते ग्रामीण भागातील संस्थांना पुस्तकं भेट देतात. साधी राहणी उच्च विचारसरणी बर्जे दाम्पत्याच्या जीवनशैलीत ठायी ठायी पाहायला मिळते. अगदी दिवाळीतही ते कोणताही गोडधोड पदार्थ बनवत नाहीत. कारण एरवीही आपण काही ना काही पदार्थ खातच असतो. त्यात दिवाळीच्या निमित्ताने आणखी पदार्थांची भर कशाला?

अजित बर्जे यांची जीवनशैली
पर्यावरण पुस्तकांनी बहरलेले ‘कारवी’ ग्रंथालय

बिश्वरूप राहा यांच्यासोबत पक्ष्यांच्या दुनियेत

विशेष म्हणजे बर्जे दाम्पत्याचं लग्नही अगदी साध्या पद्धतीने झालं. दोघांच्या कुटुंबाकडील मोजकीच माणसं लग्नाला हजर होती. कोणताही तामझाम नाही. एकूणच गरजा कमी करणं हे बर्जे दाम्पत्याच्या डोक्यात इतकं फिट्ट बसलं आहे, की त्यासाठी त्यांना प्रयत्नपूर्वक काहीही करावं लागत नाही. गेल्या पंधरा-वीस वर्षांत सौ. बर्जे यांनी एकही नवी साडी घेतली नाही. त्यांच्या लग्नाचा शालू त्या आजही वापरतात. बर्जे दाम्पत्य दिवाळीत कपडे अजिबातच खरेदी करीत नाहीत. कपडे खरेदी करण्यासाठी कोणतंही औचित्य लागत नाही. गरज असेल तरच कपडे खरेदी केले जातात. या त्यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीतूनच ते अमित टिल्लू, अजित टक्के यांच्या संपर्कात आले. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या पातळीवर ते कामही करतात. २०१३ मध्ये बर्ड्स ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट Birds of Nashik District | हे पुस्तक बिश्वरूप राहा यांच्यासोबत बर्जे यांनी लिहिलं आहे. या पुस्तकावर दोनअडीच वर्षे काम सुरू होतं. पाणथळ, जंगल, गवताळ प्रदेश अशा वेगवेगळ्या बाबींवर त्यांनी या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत एकाच ठिकाणी माहिती दिल्याने ते कोणालाही उपयोगी पडू शकेल. अभय बंग म्हणतात, जिथं गर्दी आहे तिथं जाऊ नका. जिथं गर्दी नाही तिथं जा… बर्जेंनी याच विचारांवर पाऊल ठेवलं. उगाच कम्प्युटर, खानावळीची, कपड्यांची दुकानं चालतात म्हणून ते करायचं असं त्यांच्या डोक्यात अजिबात आलं नाही. म्हणून त्यांनी ग्रंथालय सुरू करण्याचा मार्ग निवडला. ग्रंथालयांत गर्दी होत नाही; पण तिथं जायला हवं. लोकसंस्कृती लोप पावतेय, असं म्हणून उपयोग नाही. प्रत्यक्षात त्यात कुणी तरी कामही करायला हवं ना.

बर्जेंची ही जीवनशैली तशी कुणालाही अश्मयुगातली वाटेल; पण याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहेत. कारण वडीलही अगदी नाममात्र शुल्कात उपचार करायचे. इंजेक्शन दिलं, की १० रुपये आणि गोळ्या दिल्या तर पाच रुपये. उपनगरला दवाखाना आहे. पन्नास वर्षे त्यांनी प्रॅक्टिस केली. वडील फारच कमी पैशांत उपचार करायचे. तेव्हा अजित बर्जे यांनी वडिलांना विचारले, की हल्ली न्हावीसुद्धा जास्त पैसे घेतो… तर ते म्हणायचे, तुला काही कमी पडलंय का?

वडिलांची महिमा त्यांच्या निधनानंतर लक्षात आली. अंत्यसंस्कारावेळी त्यांचे पार्थिव काही काळ दवाखान्याजवळ ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. गरिबांचा देवाचं जाणं अनेकांच्या पापण्यांत ओल ठेवून गेलं. डॉ. बर्जे यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी लोटली होती. त्यांची आठवण म्हणून एका चौकाला डॉ. शरद बर्जे चौक असे नाव देण्यात आलं आहे. एक जेलरोडला रस्ता जातो आणि एक टाकळीला जातो. तो जो चौक आहे तो म्हणजे डॉ. शरद बर्जे चौक. आजच्या व्यावसायिक जगात डॉ. बर्जे यांच्यासारखे डॉक्टर शोधून सापडणार नाहीत. त्यांनी पैसे कमावले नाहीत, पण माणूस कमावला. अजित बर्जे हेही वडिलांचा हाच आदर्श पुढे नेत आहेत.

एकूणच बर्जे कुटुंबाचा हा त्यागाचा प्रवास अंतर्मुख करायला लावणारा आहे. कारवी झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सात-आठ वर्षांतून एकदाच या झाडाला जांभळी फुलं येतात. ही फुलं आली, की आदिवासी त्याला ‘कारवेल आली’ असं म्हणतात. बर्जेंच्या ग्रंथालयाचं नावही ‘कारवी’ आहे. मात्र, त्यांच्या या कारवीला सात-आठ वर्षांच्या फुलोऱ्याचा नियम अजिबात लागू नाही. या ग्रंथालयात सातही दिवस पुस्तकांची कारवेल पाहायला मिळते. ही कारवेल आत्मिक समाधान देऊन जाते. हे समाधान बर्जे कुटुंबाच्या चेहऱ्यावर विलसताना पाहिल्यावर जाणवतं, की व्हॉट्सअॅपमधील शब्दांच्या वर्दळीतही ‘कारवी’च्या शब्दगंधाचा दरवळ काही औरच आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!