All SportsCricketSachin Tendulkar

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण?

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण? क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. इथे कोणा एकाच्या वैयक्तिक कामगिरीवर संघ जिंकला तरी त्यामागे अनेक खेळाडूंची साथ असते. त्यामुळे अमुक फलंदाजामुळेच सामना जिंकला, असं म्हणणं सर्वथैव चुकीचं आहे. मात्र, वैयक्तिक विक्रम रचण्यासाठी काही फलंदाजांनी स्वार्थी खेळी केल्या होत्या. यात काही नामवंत फलंदाजांचा समावेश आहे. त्यांची नावे ऐकाल तर तुम्हाला धक्का बसेल. कोण आहेत हे स्वार्थी फलंदाज?

रवी शास्त्री दोन सामन्यांत स्वार्थीपणाने खेळल्याची टीका झाली होती.

रवी शास्त्रीच्या कूर्मगती फलंदाजीचा कळस

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज कोण, याचं उत्तर रवी शास्त्री असंही दिलं जातं. अष्टपैलू खेळाडू, समालोचक, प्रशिक्षक असा क्रिकेट प्रवास करणारे रवी शास्त्री | Ravi Shastri | यांना कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. 80 च्या दशकात रवी शास्त्री यांचा अष्टपैलू खेळाडू म्हणून लौकिक होता. मात्र, त्यानंतर त्याच्या खेळाला ओहोटीच लागली. विवाहबाह्य संबंधांवरूनही ते चर्चेत आले. खेळाडू म्हणून कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर त्यांनी समालोचक, प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. आता सध्या ते भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. या संपूर्ण प्रवासात त्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द वादग्रस्त ठरलेली आहे. स्वार्थी फलंदाज म्हणून त्यांच्यावर शिक्का मारण्यासही क्रिकेटप्रेमी मागेपुढे पाहत नाही. रवी शास्त्री | Ravi Shastri | दोन सामन्यांत स्वार्थीपणाने खेळल्याची टीका होतेय. रवी शास्त्री यांच्या स्वार्थी खेळीमुळेच भारतीय संघ 1992 च्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत | World Cup Cricket | उपउपांत्य फेरीही गाठू शकला नाही. हा सामना निर्णायक सामना इंग्लंडविरुद्ध होता.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत 50 षटकांत 7 बाद 236 धावसंख्या रचली. तसे पाहिले तर ही धावसंख्या आवाक्याबाहेर अजिबातच नव्हती. 237 धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या भारतीय संघाची सलामीची जोडी होती रवी शास्त्री आणि कृष्णम्माचारी श्रीकांत | Krishnamachari Srikkanth |. श्रीकांतची खेळी तर उत्तमच होती. त्याने 50 चेंडूंत 39 धावा केल्या. त्याच वेळी दुसरीकडे रवी शास्त्री यांच्या धावा होत्या 27 चेंडूंत फक्त 3 ! पुढे शास्त्री यांनी 112 चेंडूंत केवळ 57 धावा केल्या. किमान अर्धशतक तरी पूर्ण होईल हाच यामागे उद्देश होता का, अशीही शंका यामुळे उपस्थित होते. त्यामुळे शास्त्री यांच्या या कूर्मगती खेळीचा फटका भारताला चांगलाच महागात पडला आणि अवघ्या नऊ धावांनी संघ पराभूत झाला. इंग्लंडचे आव्हान सोपे असतानाही भारताला सलामीच्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. याच विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. या वेळीही नाणेफेक भारताविरुद्ध गेली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 बाद 237 धावा केल्या. म्हणजे जवळजवळ इंग्लंडविरुद्धच्या सामन्याची पुनरावृत्तीच.

पहिल्या पराभवातून बोध न घेता संघाने पुन्हा शास्त्री यांना श्रीकांतसोबत सलामीलाच धाडले. दुर्दैवाने हुकमी सलामीवीर श्रीकांत चौथ्याच षटकात बाद झाले. फलकावर धावा होत्या एक बाद 6 धावा. फलंदाजीची धुरा एक प्रकारे शास्त्री यांच्यावर आली. कारण खेळपट्टीवर अनेक षटके खेळून ते जवळपास सेट झाले होते; पण कसले काय, शास्त्रीचं आपलं नेहमीसारखंच टुकूटुकू. या महाशयांनी 67 चेंडूंत 25 धावा केल्या. इथे आव्हान टिकविण्याची कसोटी पणास लागलेली असताना हे महाशय कसोटीवीरासारखे स्टम्पवरील चेंडू बॅटने अडवण्याचेच काम करीत होते. या धावांच्या दुष्काळात तेरावा महिना भारताच्या नशिबी आला. म्हणजे पाऊस आला. त्यामुळे षटके घटवत भारतीयांसमोर नवे लक्ष्य देण्यात आले, ते म्हणजे 47 षटकांत 236 धावांचे. मग काय, व्हायचे तेच झाले. तरीसुद्धा इतर फलंदाजांनी नेटाने फलंदाजी केल्यामुळे भारत विजयासमीप पोहोचलाही होता. पण शास्त्री यांच्या कूर्मगती फलंदाजीमुळे चेंडू आणि धावांतलं अंतर अखेरपर्यंत कायम राहिलं. भारताचा विजय अगदी थोडक्यात हुकला, तो म्हणजे अवघ्या एका धावेने! जर हे दोन्ही सामने जिंकले असते, तर भारत सहज उपांत्य फेरीत पोहोचला असता. पन्नाशीतले क्रिकेटप्रेमी आजही ही हळहळ व्यक्त करतात.

रवी शास्त्री यांच्या कूर्मगतीची आणखीही काही उदाहरणे…
1991 : वेस्ट इंडीजविरुद्ध 110 चेंडूंत 33 धावा
1991 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध 62 चेंडूंत 10 धावा
1991 : वेस्ट इंडीजविरुद्ध 38 चेंडूंत 6 धावा

(1992 च्या वर्ल्डकपनंतर शास्त्री यांना संघातून वगळण्यात आले. त्यानंतर ते अवघे चार एकदिवसीय सामने खेळू शकले.)


महेंद्रसिंह धोनी : पाकविरुद्धची ती खेळी स्वार्थी?

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज महेंद्रसिंह धोनीला म्हणता येईल का? कारण त्याच्या काही सामन्यांतील फलंदाजी टीकेचे लक्ष्य ठरली होती. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीचे | Mahendra Singh Dhoni | क्रिकेटमधील लौकिक कौतुकास्पदच आहे. त्यात कुणाचे दुमत नाही. एक कर्णधार म्हणून जेव्हा तो मैदानात असतो तेव्हा साहजिकच सांघिक कामगिरीवर लक्ष देणे हे कर्णधाराचे पहिले कर्तव्य आहे. असे असले तरी २०१३ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याची खेळी अजिबात कर्णधारास शोभणारी नव्हती. किंबहुना तो स्वत:साठीच खेळत असल्याचे अनेकांना वाटते. जानेवारी २०१३ मध्ये पाकिस्तानने भारत दौरा केला होता. त्या वेळी कोलकात्याच्या इडन गार्डनवरील वन-डे सामन्यात भारताने पाकिस्तानला ४८.३ षटकांत २५० धावांत गुंडाळले. जिंकण्यासाठी भारतासमोर फक्त २५१ धावांचे लक्ष्य होते. भारतासाठी हे अतिशय माफक लक्ष्य होतं.

मात्र, भारतीय संघाला हे माफक लक्ष्य गाठणं अवघड झालं, ते आघाडीच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे. पुढे पुढे हा संघर्ष खूपच अटीतटीचा झाला. प्रमुख फलंदाजांनी तंबूचा रस्ता धरल्याने सहाव्या क्रमांकावर ट्रबलशूटर धोनी मैदानात उतरला. इथे धोनीच्या फलंदाजीतली जादू अपेक्षित होती. भारताची ४० व्या षटकात ९ बाद १३२ अशी अवस्था होती. आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यासाठी भारतीय संघाला आणखी ११८ धावांची गरज होती. म्हणजे जिंकण्यासाठी ११.९ च्या सरासरीने ६० चेंडूंत ११९ धावा आवश्यक होत्या. धोनी मैदानात असल्याने हे आव्हान काहीसे अवघड असले तरी आवाक्याबाहेर नव्हते. कारण टी-२० चा अनुभव असलेला हुकमी फलंदाज मैदानावर होता. मात्र, त्याची संयमी फलंदाजी कमालीची त्रासदायक ठरली. त्याने ५८ चेंडूंत ३१ धावा केल्या.

त्या वेळीच वाटले, की सामना खेचणे जड जाणार. इथे क्रिकेटप्रेमींनी काही संशय व्यक्त केले आहेत. या इनिंगमधील एमएस धोनीची फलंदाजी स्वार्थी होती, असा दावा आहे. त्याने इथे अचानक पवित्रा बदलला, ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. सोबतीला अकरावा फलंदाज इशांत शर्मा | Ishant Sharma | होता. त्यामुळे त्याने एकेरी धावा घेण्यास नकार दिला. काढायच्या तर दोन धावा किंवा चौकार, पण एकेरी धाव घ्यायची नाही. एकवेळ मानले, की इशांत शर्मा तळातला फलंदाज असल्याने तो सामना जिंकून देऊ शकत नाही. कदाचित त्याची विकेट गेली तर खेळच खल्लास होईल. म्हणून फलंदाजी धोनीकडेच असायला हवी. पण त्याने ठरविलेल्या व्यूहरचनेप्रमाणे काहीच घडले नाही.

अखेर तो ५४ धावांवर नाबाद राहिला. त्यासाठी त्याने मोजले तब्बल ८९ चेंडू!  आता प्रश्न इथे असा उपस्थित होतो, की तो सामना जिंकण्यासाठी खेळत होता की वैयक्तिक अर्धशतक करण्यासाठी? त्यामुळे काही क्रिकेटप्रेमींच्या मते, धोनी स्वत:साठीच खेळत होता; संघासाठी नाही, असे स्पष्ट मत नोंदवले आहे. त्याने त्याच्या वैयक्तिक फलंदाजीचीच सरासरी वाढली एवढेच यातून स्पष्ट होते. यावरून खरंच धोनीची स्वार्थी फलंदाजी | Selfish Cricket player | मानायची की नाही यावर दुमत असूही शकेल, पण धोनी जिंकण्यासाठी खेळत नव्हता हे त्याच्या धावा आणि चेंडूंतील अंतर स्पष्ट करते हे नक्की.

मनोज प्रभाकर : स्वतःच्या शतकासाठी संघ अडचणीत आणला

मनोज प्रभाकरच्या खोटेपणामुळे सचिनने धरला अबोला

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज म्हणून मनोज प्रभाकर | Manoj Prabhakar | आणि नयन मोंगियाचाही | Nayan Mongia | उल्लेख केला जातो. १९९४ ची गोष्ट आहे. कानपूरमध्ये विल्स वर्ल्ड सीरिज स्पर्धेच्या पाचव्या सामन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीज संघाशी भिडला होता. या सामन्यात मनोज प्रभाकरने १०२ धावांची शतकी खेळी साकारली होती, तर नयन मोंगियाने या सामन्यात अवघ्या चार धावा केल्या होत्या. मनोज प्रभाकरचं हं वन-डेमधील दुसरे शतक ठरले होते.  भारताने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीजने ५० षटकांत ६ गडी बाद २५७ धावा केल्या होत्या. किथ आथर्टन ७२ आणि फिल सिमन्सच्या ६५ धावांच्या जोरावर त्यांनी ही आश्वासक धावसंख्या उभारली होती. विजयी लक्ष्य साधण्याचे भारतासमोर तसे फारसे मोठे आव्हान नव्हते. भारताच्या सलामीची जोडी होती मनोज प्रभाकर आणि सचिन तेंडुलकर | Sachin Tendulkar |.

मनोज प्रभाकरला सलामीला धाडण्यामागे ड्रेसिंग रूममध्येच एक व्यूहरचना ठरली होती, की प्रभाकरने डावाची सुरुवात करायची आणि इतर फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांवर तुटून पडायचे. फक्त वॉल्शची भेदक गोलंदाजी सावधपणे  खेळायची. म्हणजे प्रभाकरने एक धाव काढून सहकारी फलंदाजाला खेळण्याची संधी द्यायची. भारताच्या नियोजनाप्रमाणे सगळं काही योग्य घडत होतं. सचिनने ७ खणखणीत चौकारांसह ३४ धावा केल्या. दुर्दैवाने तो बाद झाला. भारताची अवस्था एक बाद ५६ अशी होती. सचिनसारखा उत्तम फलंदाज बाद झाल्याने त्याचे पाठीराखे नाराज झाले, पण भारताने चांगली सुरुवात केली ही जमेची बाजू होती. आता फलंदाजीने गती पकडणे आवश्यक होते. इथेच भारतीय संघाचे प्रयत्न फसले ते प्रभाकरमुळे.

सचिननंतर फलंदाजीला उतरलेले नवज्योतसिंग सिद्धू यांना तर खेळायला संधीच मिळाली नाही. किंबहुना प्रभाकरनेच ती दिली नाही. सतत स्ट्राइक स्वत:कडेच ठेवली. एकेरी धावा टाळल्या. चेंडू वाया घालवले. म्हणजे सिद्धू खेळपट्टीवर 28 मिनिटे होते. मात्र, त्यांना खेळायला मिळाले केवळ पाच चेंडू. यावरून लक्षात येईल, की प्रभाकर स्वत:कडे फलंदाजी ठेवण्यात किती स्वार्थी होता! बरं सिद्धूला खेळायला मिळालं नाही हे दुर्दैवीच, पण ते बाद झाले तेही धाव घेताना! म्हणजे रनआउट झाले. अशा पद्धतीने २८ मिनिटांच्या खेळीत केवळ पाच चेंडूंचा सामना करीत सिद्धू तंबूत परतले. नंतर मोहंमद अझरुद्दीन, विनोद कांबळी आले. वेगवान धावगती राखण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. मात्र, त्यातच त्यांनी विकेटही गमावल्या. अजय जडेजाचाही निभाव लागला नाही. भारतीय संघाची अवस्था पाच बाद १९५ अशी झाली होती. जिंकण्यासाठी ९ षटकांत (५४) ६३ धावांची गरज होती.

म्हणजे सामना अगदीच हाताबाहेर गेलेला नव्हता. संघाची सूत्रे आता मनोज प्रभाकर आणि नयन मोंगियाच्या हाती होती. अशा परिस्थितीत या दोघांनी अखेरच्या या नऊ षटकांत केवळ १६ धावा केल्या! प्रभाकरने १५४ चेंडूंत नाबाद १०२ धावा केल्या. त्याचे हे कारकिर्दीतील दुसरे वन-डे शतक ठरले. मोंगियाने नाबाद २१ चेंडूंत केवळ ४ धावा केल्या. या खेळीवरून प्रभाकरवर टीकेची झोड उठली. प्रभाकरने दावा केला, की मला व्यवस्थापनाने सूचना केल्या होत्या, की खेळपट्टी अतिशय धिमी असून, विकेट सांभाळून खेळणे आवश्यक आहे. त्या वेळी सचिन तेंडुलकर उपकर्णधार होता. त्याने प्रभाकरचा हा दावा फेटाळून लावला. तो म्हणाला, की अशा कोणत्याही सूचना करण्यात आलेल्या नव्हत्या. प्रभाकरच्या या खोटेपणामुळे सचिनला प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने त्याच्याशी बराच काळ अबोला धरला होता. ही घटना कर्णधार मोहंमद अझरुद्दीनवर बेतलेल्या ‘अझर’ या चित्रपटातही दाखविण्यात आली आहे.

रवींद्र जडेजाच्या स्वार्थीपणामुळे जिंकला पाकिस्तान

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज

सर्वाधिक स्वार्थी फलंदाज म्हणून रवींद्र जडेजाचाही उल्लेख करावा लागेल. भारतीय संघ २०१७ मधील पाकिस्तानविरुद्धचा सामना विसरू शकणार नाही. लंडनच्या ओव्हल मैदानावर आयसीसी चॅम्पियन करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऐन भरातल्या भारतीय संघाला पराभूत केले होते. फखर झामनच्या १०६ चेंडूंत ११४ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ५० षटकांत ३३८ धावांचा डोंगर रचला होता. मोहंमद आमिरच्या निर्दयी गोलंदाजीपुढे भारतीय संघ खेळपट्टीवर फारसा टिकू शकला नाही. भारताची अवस्था ६ बाद ७२ अशी झाली होती. आमिरचा एकीकडे नरसंहार सुरू असताना हार्दिक पंड्यासारखा योद्धा मैदानात उतरला आणि त्याने पाकिस्तानी गोलंदाजीची पिसे काढली. त्याने ४३ चेंडूंत ७६ धावा फटकावताना चार चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली. भारताच्या आशा पंड्यामुळे जिवंत झाल्या, पण एक प्रसंग असा आला, की तिथं रवींद्र जडेजाला | Ravindra Jadeja | ऐन भरातल्या पंड्यासाठी विकेटचे बलिदान देण्याची संधी होती. मात्र, त्याने तसे केले नाही. धाव घेताना जडेजाने स्वत:चा बळी देऊन पंड्याला वाचवायला हवे होते.

2017 : हाच तो क्षण, जेथे पंड्या धाव घेत होता, तर जडेजा बाद होण्याच्या भीतीने पुन्हा मागे फिरला.

तशी संधी जडेजाला होतीही. पण जडेजाने तसे केले नाही आणि पंड्या धावबाद झाला. इथे भारताच्या आशा संपुष्टात आल्या. जडेजानेही फार काही दिवे लावले नाही. तो २६ चेंडूंत १५ धावा करू शकला. इथे क्रिकेटप्रेमींना रवींद्र जडेजा सर्वांत स्वार्थी फलंदाज वाटला.

जावेद मियांदाद : 1992 च्या वर्ल्डकपमध्ये 110 चेंडूंत 40 धावा

जावेद मियांदादच्या स्वार्थी खेळीमुळे त्याच्याच सहकाऱ्यांना विकेट गमवाव्या लागल्या.

भारतीय फलंदाजांवर खूप चर्चा झाली. कारण आपण आपल्या बाजूने उणिवा शोधत असतो. पण पाकिस्तानमध्येही जावेद मियांदाद | Javed Miandad | स्वार्थी फलंदाज ठरला आहे. अर्थात, जावेद मियांदादची क्रिकेट कारकीर्द उत्तमच आहे. अनेक खेळाडूंनी त्याच्या फलंदाजीचे कौतुकही केले आहे. मात्र, भारताविरुद्ध जेव्हा पाकिस्तान समोर येतो तेव्हा कोणाच्याही चुकीला माफी नसते. १९९२ मधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील लढतही त्यापैकीच एक. सिडनीमध्ये ही स्पर्धा सुरू होती. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. अजय जडेजा आणि कृष्णमाचारी श्रीकांत | Krishnamachari Srikanth | ही सलामीची जोडी मैदानात उतरली. अर्थात, धावगती फारच धीम्या गतीने होती. नंतर अझर आणि विनोद कांबळी या जोडीने सूत्रे हाती घेत गती वाढविण्याचा प्रयत्न केला. सचिनला पाचव्या स्थानावर खेळविण्यात आले होते. कारण कांबळीपेक्षा सचिन अधिक हुकमी फलंदाज होता.

त्याने ६२ चेंडूंत ५२ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. कपिलदेव यांनी २४ चेंडूंत ३५ धावा केल्या. भारतीय संघाने ४९ षटकांत २१६ धावा केल्या. पाकिस्तानच्या वेळखाऊ धोरणामुळे सामना ४९ षटकांचा झाला. पाकिस्तानसाठी हे लक्ष्य तितकेसे आव्हानात्मक नव्हते. अव्वल फलंदाज नसतानाही आमिर सोहेलसारख्या खेळाडूसोबत मियांदादने १०५ धावांची भागीदारी रचली. मात्र, हा सामना गाजला तो जावेद मियांदाद आणि किरण मोरेच्या जुगलबंदीने. यष्टिरक्षक किरण मोरे विकेटच्या मागे जोरजोरात अपील करायचा. त्यामुळे मियांदादचे लक्ष विचलित झाले. त्याने बेडूकउड्या मारत किरण मोरेची नक्कलही केली. मियांदादने स्वत:ला वाचविण्यासाठी कर्णधार इम्रान खान यालाही बाद केले. त्याच्या स्वार्थी खेळीमुळे त्याच्याच सहकाऱ्यांना आपल्या विकेट गमवाव्या लागल्या. अखेर श्रीनाथच्या एका यॉर्करवर त्याची मात्रा चालली नाही. ११० चेंडूंत ४० धावांवर तो बाद झाला. इथेच पाकिस्तानने सामना गमावला. अर्थात वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताला एकदाही पराभूत करू शकलेला नाही.

1996 च्या वर्ल्डकपमध्ये मियांदादला संघात घेऊन पस्तावला पाकिस्तान

1996 मधील वर्ल्डकपचा उपांत्य फेरीतला सामनाही अनेकांना आठवत असेल. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. आता सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरवर खिळल्या होत्या. कारण विकेट वाचवून एका बाजूने त्याने किल्ला लढवायचा, तर दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू होताच धावांचा वेग वाढविण्यासाठी. सिद्धूने लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना 115 धावांत 93 धावांचे योगदान दिले, तर सचिनची धावसंख्या होती 59 चेंडूंत 31. हे दोघे बाद झाल्यानंतर उपाहारानंतर अजय जडेजा आला. जडेजाची खेळी विसरणेच शक्य नाही. त्याने अवघ्या 25 चेंडूंत 45 धावांची वेगवान खेळी रचली. यात चार चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

जडेजाच्या या वेगवान खेळीमुळेच भारत 50 षटकांत 288 धावांची आश्वासक धावसंख्या उभारू शकला. अर्थात, आज ती खूपच कमी वाटत असली तरी त्या वेळी हे मोठे आव्हान ठरायचे. आता इथे पाकिस्तान भारताला कसे प्रत्युत्तर देतो याची उत्सुकता दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींना लागली होती. त्या वेळी आमिर सोहेल आणि सईद अन्वर ही पाकिस्तानची जोडी सुरुवात तर धडाक्यात करायचे. त्या वेळी प्रसाद आणि सोहेलमधील चकमकही क्रिकेटप्रेमी विसरले नसतील. सोहेलने खणखणीत चौकार लगावल्यानंतर वेंकटेश प्रसादला बाउंड्रीकडे बॅट दाखवत डिवचले होते. मात्र, प्रसादनेही सोहेलला पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवत हिशेब चुकता केला आणि त्याला तंबूची जागा दाखवली.

सलामीची जोडी फुटल्यानंतर पाकिस्तानची स्थिती भक्कम होती. म्हणजे 15 षटकांत 2 बाद 113. नंतर भारतीय माऱ्यापुढे पाकिस्तानला सावरताच आले नाही. त्यानंतर इजाज अहमद आणि इंझमाम उल हक या दोन विकेट पाकने स्वस्तात गमावल्या. पाकिस्तानी चाहत्यांच्या आशा आता मियांदादवरच होत्या. मियांदाद मैदानात उतरला तेव्हा पाकिस्तानची अवस्था चार बाद 132 अशी झाली होती. जिंकायला हव्या होत्या 162 चेंडूंत 156 धावा. आव्हान तसे आवाक्यात होते, पण फलंदाजही टिकायला हवेत ना… या सामन्यात बेफिकीर मियांदादने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा रोष ओढवून घेतला. कामगिरीचाच विचार करायचा झाला तर वर्ल्डकपसाठी पाकिस्तानी संघात मियांदादचा समावेश करण्याचे काहीही कारण नव्हते. त्याचा समावेश दोनच कारणांमुळे झाला. एक म्हणजे, मियांदादला भारतीय गोलंदाज खूप घाबरतात, अशी पाकिस्तान्यांची झालेली भावना. कारण पाकिस्तानी दहा वर्षांपूर्वी म्हणजे 18 एप्रिल 1986 रोजीच्या आशिया कपमधील सामन्याच्या स्वप्नरंजनातच रमलेले होते.

त्या वेळी या मियांदादने चेतन शर्माला अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून पाकला विजय मिळवून दिला होता. याच बेगमीवर मियांदाद पुढची बरीच वर्षे क्रिकेट अक्षरशः जगला.  दुसरे कारण म्हणजे सहा वर्ल्डकप (1975 ते 1996) खेळण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर करण्याची महत्त्वाकांक्षा. सहा वर्ल्डकप खेळण्यात त्याचा हा वैयक्तिक स्वार्थ दडलेला होता. पुढे मियांदादच्या या विक्रमाची बरोबरी सचिनने केली (1992 ते 2011) हा भाग निराळा.  केवळ या दोन कारणांसाठी मियांदाद पाकिस्तानच्या संघात ऐनवेळी घुसडला (की घुसला). मियांदादने भलेही दहा वर्षांपूर्वी उत्तम खेळ केला असेल, पण हे वर्ष 1996 होतं. त्याचा फॉर्मही गेलेला होता.

धक्कादायक म्हणजे 1996 च्या वर्ल्डकपपूर्वी वर्षभरात तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता. त्याचा या वर्ल्डकप पूर्वीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1994 मधील होता. तोही कोणाविरुद्ध… तर झिम्बाब्वेविरुद्ध. त्याने धावगती राखण्याचा ना प्रयत्न केला, ना त्याने स्ट्राइक सोडली. षटकातल्या अखेरच्या चेंडूवर एकच धाव घ्यायची किंवा चेंडू टोलवूनही धाव घेत नव्हता. त्यामुळे मियांदादने गल्लीतल्या पोरांसोरांसारखी फलंदाजीची पुरेपूर हौस करून घेतली.  त्यामागे त्याला स्वतःचं एकच कौतुक होतं, ते म्हणजे सर्वाधिक वर्ल्डकप खेळण्याचं. त्याची हीच स्वार्थी फलंदाजी त्याच्यावर उलटली. फलंदाजी स्वतःकडे ठेवण्याच्या नादात शेवटी हे महाशय धावबादच झाले. त्याने 64 चेंडूंत 38 धावा केल्या. पुढे फलंदाज उरलेच नाहीत. वकारने 21 चेंडूंत 4 धावा केल्या. अखेर पाकिस्तान 39 धावांनी पराभूत झाला आणि मियांदादचीही वर्ल्डकपची हौस फिटली.

सचिनचे शतकांचे शतकही स्वार्थीपणाचेच!

सचिन तेंडुलकर सर्वाधिक स्वार्थी फलंदाज?

सचिन तेंडुलकर | Sachin Tendulkar | हा भारतीय क्रिकेटला गवसलेला हिरा आहे. क्रिकेटचा देव म्हणूनही चाहत्यांनी त्याचा सन्मान केला आहे. मात्र, तरीही सचिनच्या फलंदाजीबाबत काही जणांना आक्षेप आहेत. सर्वाधिक स्वार्थी फलंदाज म्हणून त्यालाही गणलं जातंय. अर्थात, त्याच्या अलौकिक क्रिकेट कौशल्याबाबत कुणालाही आक्षेप नाही, एक कपिलदेव यांचा अपवाद सोडला तर. कपिलदेव यांनी एके ठिकाणी म्हंटले होते, की सचिनने मुंबई स्टाइल बॅटिंगमधून बाहेर पडायला हवे. अर्थात, त्यांची ही अपेक्षा होती, आक्षेप नाही. एवढेच नाही, तर विस्डेनने सचिनच्या एकाही कामगिरीची नोंद सर्वोच्च १०० फलंदाजीच्या खेळ्यांमध्ये केलेली नाही. काही क्रिकेटप्रेमींना वाटतं, की एके ठिकाणी त्याची स्वार्थी फलंदाजी डोकावते. ती म्हणजे त्याने वैयक्तिक विक्रमासाठी त्याने घेतलेला वेळ. 

2012 मध्ये आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने भारताला पाच गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात भारताकडून सचिनची शतकी खेळी व्यर्थ गेली म्हणण्यापेक्षा ती खेळीच व्यर्थ होती. बांगलादेशने 50 षटकांत 289 धावसंख्या उभारली होती. त्यामुळे जिंकण्यासाठी वेगवान खेळी करण्याची गरज होती. भारताकडून सचिनने 147 चेंडूंत 114 धावांची शतकी खेळी केली. मात्र, धावांचा वेग मंदावला होता. याउलट इतर खेळाडूंनी वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला. सचिन मात्र शतकासाठीच खेळत होता, असे अनेकांना वाटते. कारण नागपुरात 2011 च्या वर्ल्डकप सामन्यात सचिनने कारकिर्दीतले 99 वे शतक साकारले होते. त्यामुळे या सामन्यात तो शतकांचे शतक करण्याच्या मानसिकतेतच उतरल्याचे लक्षात येते. एकीकडे सुरेश रैनाने | Suresh Raina | 38 चेंडूंत 51 धावा करीत लक्ष्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असताना सचिनने मात्र विकेट जपून खेळत शतक झळकावले. त्यामुळे धावगती मंदावली आणि भारताची खेळी 50 षटकांत 289 धावांत आटोपली.

जिंकण्यासाठी केवळ पाच धावा कमी पडल्या, त्या केवळ सचिनने वाया घालवल्या चेंडूंमुळे. इथे क्रिकेटप्रेमींनी शंका उपस्थित केली आहे, की सचिन केवळ शतकांच्या शतकासाठीच खेळत होता का. असो, सचिनने शतकांचे शतक करीत नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, त्याचा संघासाठी किती उपयोग झाला, हे ज्याने-त्याने ज्याच्या-त्याच्या चष्म्यातून पाहावे.

मिसबाह उल हक : वैयक्तिक कामगिरीसाठी संघाला धरले वेठीस

वर्ल्डकपमध्ये जेव्हा जेव्हा पाकिस्तान विरुद्ध भारत हा सामना येतो त्या वेळी खेळाडूंवर प्रचंड दबाव असतो. फायर क्रॅकर सामना म्हणूनच याकडे पाहिले जाते. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये मिसबाह-उल-हकला | Misbah Ul Haq | पाकिस्तानी चाहत्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. त्याची 76 चेंडूंतली 56 धावांची कूर्मगती खेळी संतापजनकच ठरली. स्वार्थी फलंदाज म्हणून त्याची अवहेलना झाली. सर्वाधिक स्वार्थी फलंदाज म्हणून या यादीत त्याचा समावेश करताना पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींंना जराही संकोच वाटत नाही. असे असले तरी पाकिस्तान्यांना इम्रान खाननंतर मिसबाह-उल-हक हा पाकिस्तानचा उत्तम कर्णधार वाटतो. तो उत्तम फलंदाज होता, पण मोहालीतील 2011 मधील वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत त्याची कूर्मगतीच पाकिस्तानच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे. Cricinfo च्या समालोचनातही त्याच्या खेळीवर टिप्पणी केली होती, की मिसबाह उल हकला कुणीतरी सांगावे, अरे बाबा ही वर्ल्डकपची उपांत्य फेरी आहे.

तो जणू काही पाच दिवसांच्या कसोटी सामना वाचविण्याच्या मानसिकतेतच खेळत आहे. यावरून मिसबाह स्वार्थीपणाने खेळत असल्याचे स्पष्ट होते, असे पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटते. त्याने अर्धशतक तर पूर्ण केले, पण सामना गमावला होता. जर त्याने स्ट्राइक रेट 100 चा ठेवला असता तर कदाचित पाकिस्तान जिंकला असता. कारण मिसबाह उत्तम फलंदाज म्हणूनच संघात होता. म्हणूनच पाकिस्तानला सामना गमावण्याचं एवढं दुःख झालं नाही, जेवढं मिसबाहच्या ढिसाळ फलंदाजीचं होतं.  मिसबाहच्या आधी युनिस खाननेही 32 चेंडूंत केवळ 13 धावांची भर घातली होती. त्यामुळे या सुमार कामगिरीनंतर हे दोघे नंतर दिसले नाहीत.

सुनील गावस्कर : 1975 च्या वर्ल्डकपमध्ये 174 चेंडूंत फक्त 36 धावा

सुनील गावस्कर | Sunil Gavaskar | भारतीय फलंदाजीत लिट्ल मास्टर | Little Master | म्हणून ओळखले जातात. कमी उंची असली तरी आपल्या सर्वांगसुंदर फलंदाजीने त्यांनी कर्तृत्वाची उत्तुंग उंची गाठत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली होती. तो काळ असा होता, की कसोटी | Test Cricket | सामन्याच्या मानसिकतेतून अनेक खेळाडू बाहेरच पडलेले नव्हते. कारण 70 च्या दशकातील खेळाडूंसाठी वन-डेचा फॉरमॅट नवीन होता. त्या वेळी आजसारखा 50 षटकांचा वन-डे सामना नव्हता, तर 60 षटकांचा असायचा. त्यामुळे या मर्यादित षटकांच्या सामन्यातही अनेकांची टुकूटुकू फलंदाजी भयंकर त्रासदायक ठरायची. गावस्करांची खेळीही संघासाठी अशीच भयंकर तापदायक ठरली. 1975 च्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना सुनील गावस्कर यांनी 174 चेंडूंत अवघ्या 36 धावा केल्या होत्या. आज जर अशी खेळी कुणी केली तर त्या खेळाडूवर क्रिकेटप्रेमी खटला भरायचे बाकी ठेवतील, असो. पण गावस्करांची ही कूर्मगती खेळी भयंकर संतापजनक ठरली एवढे मात्र खरे. त्यामुळेच ते सर्वाधिक स्वार्थी फलंदाज ठरतात. 

केवळ क्रीझवर टिकून स्वतःसाठीच धावा जमवण्यातच ते मश्गुल होते हे स्पष्टपणे जाणवत होते. कारण इंग्लंडने 60 षटकांत चार बाद 334 धावांचा रतीब घातला होता. प्रत्युत्तरात सुनील गावस्करांची ही कूर्मगती खेळी. बरे या 36 धावांमध्ये या महाशयांचा एकच चौकार. म्हणजे ते स्वतःसाठीच खेळत होते. मग संताप होणार नाही तर काय… 334 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 131 धावांत आटोपला. म्हणजे 60 षटकांत आपण 3 बाद 132 धावाच करू शकलो.

जॅकस कॅलिस : भरवशाच्या म्हशीला टोणगा

 

2007 मधील वर्ल्डकप सामन्यात दक्षिण आफ्रिकाही अशाच कूर्मगती फलंदाजीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला. आफ्रिकेचा हा स्वार्थी फलंदाज होता जॅकस कॅलिस. त्याची 63 चेंडूंमधील 48 धावांची खेळी संघाच्या पराभवास कारणीभूत ठरली. त्या वेळी फार कमी संघ होते, जे ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाला जेरीस आणायचे. त्यापैकीच एक म्हणजे दक्षिण आफ्रिका. ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड खेळ दक्षिण आफ्रिकेकडे होता. 

ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 377 धावसंख्या उभारली होती. मात्र, समोर दक्षिण आफ्रिका होती. जो संघ 434 धावांचा पाठलाग करू शकतो, त्या संघाला 377 धावा काहीच नव्हत्या. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि एबी डिव्हिलिअर्स या सलामीच्या जोडीने सुरुवात तर धडाक्यात करून दिली होती. 20 षटकांतच या जोडीने 160 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे कांगारूंच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. ही जोडी फुुटल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जॅकस कॅलिस मैदानात उतरला. कॅलिस भरवशाचा खेळाडू. पण म्हणतात ना, भरवशाच्या म्हशीला टोणगा! नेमकं तसंच झालं.

कॅलिसने आपल्या कूर्मगती फलंदाजीने आफ्रिकेच्या आशा धुळीस मिळवल्या आणि चेंडू आणि धावा यातले अंतर वाढत गेले. ज्या वेळी आफ्रिकेला षटकामागे सात धावा हव्या होत्या, त्या वेळी कॅलिस महाशय 63 चेंडूंत 48 धावा करून तंबूत परतले. अखेर व्हायचे तेच झाले, आफ्रिका गतविजेत्यांकडून 83 धावांनी पराभूत झाला.

मायकेल व्हँडर्ट : 117 चेंडूंत 48 धावा

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्हीबी सीरिज स्पर्धाही प्रतिष्ठेची मानली जाते. ही तीन देशांची स्पर्धा आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने या सीरिजची प्रतिष्ठा वाढवली असली तरी श्रीलंकेच्या समावेशानेही ही सीरिज अधिक प्रेक्षणीय ठरली आहे. 2006 मध्ये व्हीबी सीरिजमधील सामन्यात श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाने दारुण पराभव केला होता. हा पराभव खरं तर ऑस्ट्रेलियाच्याही आधी लंकेच्याच मायकेल व्हँडर्टने केला होता. त्याची 117 चेंडूंतली 48 धावांची खेळीच श्रीलंकेच्या पराभवास कारणीभूत ठरली. सर्वाधिक स्वार्थी फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख यामुळेच केला जातो.

ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 318 धावांचे मजबूत आव्हान ठेवले असताना श्रीलंकेला वेगवान धावा जमवणे आवश्यक होते. इथेच श्रीलंका सपशेल अपयशी ठरली. सलामीची जोडी स्वस्तात गमावल्यानंतर व्हँडर्टकडूनच लंकेला आशा होत्या. कारण फलकावर 2 बाद 11 अशी केविलवाणी अवस्था लंकेची झाली होती. व्हँडर्टने जर डाव सावरला तर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे होईल, अशी भाबडी आशा लंकेला होती. मात्र, तसे काहीही घडले नाही. ऑस्ट्रेलियाचा मॅकग्रथ, ब्रेट ली, नॅथन ब्रेकनसारखा तोफखाना धडाडत होता. मात्र, व्हँडर्ट आपल्याच मस्तीत खेळत राहिला. त्याने आपल्या 48 धावांच्या खेळीत 117 चेंडू मोजताना केवळ तीन चौकार लगावले. या कूर्मगतीचा फटका लंकेला बसला. कांगारूंनी त्यांचा 116 धावांनी पराभव केला.

सचिनला बाद देणे ही मानवी चूक…

Follow us Facebook page kheliyad

या फलंदाजांपैकी तुम्हाला कोणता फलंदाज सर्वाधिक स्वार्थी वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_accent_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!