Tuesday, January 19, 2021
kheliyad
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

सगरमाथ्याची गदळगाथा

सगरमाथ्याची ही गदळगाथा भयंकर धोकादायक आणि तेवढीच किळसवाणीही आहे. पर्वतावर विखुरलेले शेकडो मृतदेह जसे आपल्या अंगावर शहारे आणतात, तसं ही गदळगाथा ऐकली की मळमळायला होतं...

Mahesh Pathade by Mahesh Pathade
October 28, 2020
in All Sports, Mount Everest series, Other sports
2
सगरमाथ्याची गदळगाथा

How Much garbage Is on Mount Everest?

Share on FacebookShare on Twitter

 

सगरमाथ्याची गदळगाथा

सगरमाथा म्हणजे आपलं माउंट एव्हरेस्ट Mount Everest | हो… ते नव्याने सांगण्याची गरज नाही, आपण ते पहिल्या भागात वाचलंच आहे. पण हे गदळ म्हणजे काय हो? गदळ म्हणजे कचरा, घाण. आपण गदळ शब्द कधीच वापरत नाही. तो शब्द शब्दशः कचऱ्यात गेला. असो…

सगरमाथ्याची ही गदळगाथा भयंकर धोकादायक आणि तेवढीच किळसवाणीही आहे. पर्वतावर विखुरलेले शेकडो मृतदेह जसे आपल्या अंगावर शहारे आणतात, तसं ही गदळगाथा ऐकली की मळमळायला होतं… हिमस्खलन, वादळं झेलूनही पाय रोवून कणखरपणे उभ्या असलेल्या या पर्वताचं आरोग्य कचऱ्यामुळे धोक्यात आलं आहे हे मात्र नक्की.

सध्या गिरिभ्रमण, प्रस्तरारोहण, गिर्यारोहण हे निसर्गपूरक राहिलेलं नाही. त्याची जागा आता हौसेने घेतली आहे. माउंट एव्हरेस्टबाबतही असंच म्हणावं लागेल.

अनेकांना दोनचार टेकड्या सर केल्या, की लगेच एव्हरेस्टला गवसणी घालण्याची स्वप्ने पडतात. गेल्या वर्षीच म्हणजे 2019 मध्ये एव्हरेस्टवर गिर्यारोहकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र अनेकांना आठवत असेल.

आपल्याकडे नवरात्रात कालिकेच्या दर्शनासाठी जशी लांबलचक रांग लागते, तशी या पर्वतावर गिर्यारोहकांची रांग लागली होती. ऑक्सिजनचा अभाव असलेल्या उंचीवर तासन् तास उभे राहणारे गिर्यारोहक पाहिल्यानंतर जगभरातून चिंता व्यक्त होत होती.

अर्थात, आपण एव्हरेस्टवीरांचं कौतुकच करीत आलो आहोत. कोणीही एव्हरेस्ट सर करून आला, की अभिमान वाटतो. मात्र, एव्हरेस्टवरील कचऱ्याने जो थर रचला आहे, तो कोणामुळे झाला या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर कदाचित धक्कादायक वास्तव समोर येईल.

काय आहे सगरमाथ्याची गदळगाथा?

तब्बल १८ वेळा एव्हरेस्ट सर करणारे पेम्बा दोरजे शेर्पा यांनी एकदा या कचऱ्याबाबत खंत व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, की इतस्ततः विखुरलेला कचरा डोळ्यांना भयंकर खुपतो. एकूणच सगरमाथ्याची गदळगाथा किती गंभीर आहे याची प्रचीती येते.

पेम्बा दोरजे यांची ही खंत खूप काही सांगून जाते. हा कचरा काय आहे, तर प्लास्टिकचे डबे, ऑक्सिजनच्या रिकाम्या बाटल्या, बीअरच्या बाटल्या, फाटलेले तंबू, शिड्या, दोरखंड आणि इतर बरेच काही.

विचार करा, पन्नासच्या दशकापासून आतापर्यंत चार हजारांवर गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलं आहे. ज्यांना हा पर्वत सर करता आला नाही, अशा गिर्यारोहकांची संख्या वेगळीच. या प्रत्येकाने केलेला कचरा विचारात घेतला तर कचऱ्याचं वजन किती टन असू शकेल, याचा विचारच न केलेला बरा.

नेपाळमधील शेर्पांच्या मते, २००८ पासून आतापर्यंत एव्हरेस्टच्या पायथ्याजवळ तब्बल १५ ते २० टन कचरा काढण्यात आला आहे. हा कचरा साफ करणे प्रचंड अवघड आहे.

जो सहजपणे काढता येईल असा २०-३५ टन कचरा आहे. मात्र, जो काढताच येऊ शकत नाही, त्या कचऱ्याचा हिशेबच नाही.

नेपाळच्या पर्यटन विभागाने एप्रिल ते मे 2019 दरम्यान 45 दिवसांची एव्हरेस्ट स्वच्छता मोहीम राबविली होती. त्यासाठी शेर्पांचे २० जणांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने तब्बल ११ टन कचरा खाली आणला होता.

आणखी बराच गोळा केलेला कचरा वादळामुळे खाली आणता आलेला नाही. याच मोहिमेत त्यांना चार मृतदेहही हाती लागले होते. एकूणच या मोहिमेसाठी नेपाळ सरकारला खर्च आला, १ कोटी ४३ लाख रुपयांचा. म्हणजेच प्रतिटन १३ लाख रुपये मोजावे लागले. गिर्यारोहकांची एक चूक किती महागात पडते, याचे हे ज्वलंत उदाहरण.

ही मोहीम राबवताना नेपाळ सरकारने कॅम्पनिहाय विभागणी केली होती. बेस कॅम्पवर किमान पाच टन कचराला, दक्षिण मार्गावरून 2 टन, तर कॅम्प 2 व कॅम्प 3 वरून दोन टन कचरा गोळा करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात 11 टन कचरा गोळा झाला.

साथीच्या आजारांचा धोका

एव्हरेस्ट पर्वत खरंच खूप सुंदर आहे. त्याची छायाचित्रे तुम्ही पाहिलीच असतील. पण या सुंदर पर्वताचा दुसरा चेहरा काळवंडलेला आहे. भविष्यातल्या धोक्याचा इशारा देणारी ही सगरमाथ्याची गदळगाथा एव्हरेस्टवीरांनीच गंभीरपणे समजून घेणे आता आवश्यक झाले आहे. 

जे निसर्गदत्त सौंदर्य या पर्वताला मिळालं आहे, ते मानवाच्या हस्तक्षेपामुळे आता लयास चाललं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये कोणतीही वस्तू ठेवली तर ती जशीच्या तशीच राहते. एव्हरेस्ट पर्वताच्या बेस कॅम्पवरच उणे 40 अंश तापमान असते.

शिखरापर्यंत गेला तर हेच तापमान उणे साठ अंशांपर्यंत राहते. ज्याला निसर्गाची खरंच काळजी आहे असे उत्तम गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करताना सोबत डिस्पोजल टॉयलेट बॅग घेऊन जातात. त्यामुळे पर्वतावर घाण होत नाही. असे गिर्यारोहक फार कमी असतात.

बहुतांश गिर्यारोहक तर मोकळ्या वातावरणात शौचाला जातात. आता तुम्ही फ्रीज डोळ्यांसमोर आणा आणि मग या एव्हरेस्टचा विचार करा. हाडे गोठविणाऱ्या थंडीत एव्हरेस्टवर मानवी विष्ठा नष्ट होत नाही. हे मानवी मलमूत्र उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात पाण्याबरोबर खाली वाहत येतं.

कोलोरॅडोच्या आर्क्टिक आणि अल्पाइन रिसर्चचे पर्वतीय भूवैज्ञानिक अल्टन बायर्स यांच्या मते, माउंट एव्हरेस्टवरून सुमारे साडेचार हजार किलो मानवी मलमूत्र वाहत येतं, ज्यामुळे अतिसार व आतड्याशी संबंधित आजार उद्भवतात. कारण हे पाणी पूर्णपणे फिल्टर होत नाही ही आणखी गंभीर बाब आहे.

तिबेटकडील उत्तरी मार्गावर चीनने नवख्या गिर्यारोहकांना बेस कॅम्पपर्यंत येण्यास बंदी घातली होती. अर्थात, हा काही कचरा रोखण्याचा उपाय असूच शकत नाही.

कचऱ्याचा प्रश्न इतका गंभीर आहे, की सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगाने होत आहे आणि त्यात एव्हरेस्टवरील कचरा नद्यानाल्यांतून वाहत जातो, तेव्हा त्याचे विषारी घटक पाण्यात मिसळतात. हेच पाणी पुन्हा आपल्याच घशाखाली जाणार आहे, हे कुणीही गंभीरपणे घेत नाही.

या उपाययोजनांचे काय झाले?

कचऱ्यावर नेपाळ सरकारने काहीच केले नाही, असे अजिबात नाही. मात्र, त्याचे परिणाम शून्य ठरले. तिथल्या पर्यटन मंत्रालयाने काही नियम घातले होते. म्हणजे जो पहिल्यांदा एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा बाळगतो, त्याला आता थेट एव्हरेस्ट चढाई करू न देणे हा त्यातलाच एक नियम.

त्यासाठी त्यांना आधी छोटी छोटी शिखरं सर करावी लागतील. त्यातून त्यांना अनुभव मिळेल आणि साफसफाईचं प्रशिक्षणही दिलं जाईल. हा उपाय खूपच आदर्शवादी असल्याची टीका पर्यावरणप्रेमींनी केली.

मुळात सध्या एव्हरेस्टवर जो कचरा आहे, तो स्वच्छ करण्याची गरज आहे आणि जोपर्यंत एव्हरेस्ट मोहिमा सुरू राहतील तोपर्यंत कचरा साफ होऊच शकणार नाही. त्यासाठी गिर्यारोहकांच्या एव्हरेस्ट मोहिमांना काही काळ बंदी घालावी लागेल.

आताच्या भाषेत सांगायचं, तर एव्हरेस्ट पूर्णतः लॉकडाउन करावं लागेल. पर्यावरणप्रेमींचा हा पर्याय नेपाळ सरकारला कदाचित रुचणार नाही. किमान एक वर्ष जरी मोहिमा बंद झाल्या तरी नेपाळचा जीडीपी दर कमालीचा घसरेल. याच भीतीमुळे या मोहिमांवर बंदी घातली जात नाही. त्यामुळे हा कचरा असाच वाढत राहील.

दंड भरू, पण कचरा करू

कचरा करण्याची वैश्विक मानसिकता आहे. माउंट एव्हरेस्टवर कचरा पाहिला, की ही मानसिकता अधोरेखित होते. कचरा रोखण्यासाठी नेपाळ सरकारच्या उपाययोजनांना गिर्यारोहकांची साथ अजिबातच मिळालेली नाही.

2013 मध्ये नेपाळ सरकारने एक शक्कल लढवली होती. त्यांनी गिर्यारोहकांच्या प्रत्येक टीमकडून 4000 डॉलर (सुमारे 3 लाख 20 हजार रुपये) आगाऊ रक्कम घेतली होती.

मात्र, ही रक्कम तेव्हाच परत मिळेल, जेव्हा तुम्ही आठ किलो कचरा एव्हरेस्टवरून खाली आणत नाही. किमान दंड वाचविण्यासाठी तरी गिर्यारोहक कचरा गोळा करतील… पण छे! केवळ निम्म्याच गिर्यारोहकांनी कचरा खाली आणला.

निम्म्या गिर्यारोहकांनी रकमेवर पाणी सोडले. दंड भरू, पण कचरा करू, ही मानसिकता असेल तर दंड करूनही काय उपयोग?

रेडिएशनच्या धोक्याचं नवं संकट

दुरून डोंगर साजरे हे पन्नास वर्षांपूर्वी एव्हरेस्टबाबत म्हंटलं जात होतं. मात्र, ५० च्या दशकानंतर जेव्हा एडमंड हिलरी व तेन्झिंग नोर्ग्ये यांनी पाऊल ठेवलं, तेथूनच या सर्वोच्च शिखराचं अस्तित्व धोक्यात आलं.

हिलरी आणि नोर्ग्ये यांनी १९५३ मध्ये एव्हरेस्ट शिखर सर केलं तेव्हा आजच्याइतक्या सुविधा अजिबात नव्हत्या. मोबाइलचा तर जमानाच नव्हता. हिलरी ज्या वेळी शिखरावर पोहोचले तेव्हा या यशाचा संदेश पोहोचविण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयात दूत पाठवावा लागला होता! आता तशी परिस्थिती राहिली नाही.

नेपाळच्या एनसेल या दूरसंचार कंपनीने एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत थ्रीजीचे तीन टॉवर उभे केले आहेत. चीननेही मोबाइल टॉवर उभारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोबाइलचा एक सेल्फी काही क्षणांत जगभर व्हायरल होऊ शकतो. मात्र, हा बदल कदाचित एव्हरेस्टच्या मुळावरच घाव घालणारा ठरू शकेल.

एव्हरेस्टवर सर्वांत उंच टॉवर 5200 मीटर उंचावर आहे. मात्र, या तांत्रिक घुसखोरीवर अनेकांनी टीका केली आहे. मोबाइल कंपन्यांनी शिरकाव केला तर रेडिएशनचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे तेथे आढळणाऱ्या सूक्ष्म जिवांवर त्याचा विपरित परिणाम होईल.

गिर्यारोहकांनाही अनेक समस्यांना सामोरे जाण्याचा धोका आहे. सध्या तरी नेपाळ सरकारचा तिथं अंकुश आहे. कदाचित इतर दूरसंचार कंपन्यांनी आपले टॉवर उभे केल्यास ही समस्या आणखी गंभीर स्वरूप धारण करेल.

तूर्तास सगरमाथा निमूटपणे उभा आहे. कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असेल.

 

Read more at :

Ang Rita Sherpa
Mount Everest series

Ang Rita Sherpa | ऑक्सिजन नाकारणारा हिमबिबट्या

September 23, 2020
Edmund Hillary : First on Everest
All Sports

Edmund Hillary : First on Everest

October 28, 2020
Edmund Hillary : First on Everest
Mount Everest series

हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे

October 28, 2020
George Mallori mystery on everest
All Sports

पहिल्या एव्हरेस्टवीराची शोकांतिका

October 28, 2020

 

Tags: How Much garbage Is on Mount Everest?Mount Everestसगरमाथासगरमाथ्याची गदळगाथासागरमाथा
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
Mount Everest series 3 : शोकांतिका ग्रीन बुटाची…

Mount Everest series 3 : शोकांतिका ग्रीन बुटाची...

Comments 2

  1. Pingback: अबब! एव्हरेस्टवर शेकडो मृतदेह!!! - kheliyad
  2. Pingback: हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Home
  • About US
  • Contact

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • Football
  • Other sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website Development Divesh Consultancy-9028927697

error: Content is protected !!