All SportsInspirational Sport storyOther sportsTennis

वयोमर्यादा पुरुषोत्तम लिअँडर पेस!

तो मस्त जगतोय. मनासारखं जगतोय आणि मनापासून जगतोय. म्हणजे बघा ना, तो नुकताच १०० व्या जोडीदारासोबत वयाच्या ४२व्या वर्षी त्याच उमेदीने खेळला, ज्या उमेदीने तो पहिला सामना खेळला होता ! भारतीय टेनिसचा नायक लिअँडर पेस याचा हा पराक्रम सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला आहे.

पण ठराविक टप्पे ठरवून टाकले आहेत, मग ते खेळातले असो, शिक्षणातले असो वा नोकरीतले. एरव्ही वयाची चाळिशी ओलांडली, की निवृत्तीचे वेध लागतात. कॉर्पोरेट क्षेत्रात तर ४५व्या वर्षी आदर्श निवृत्ती मानली जाते. व्हॉलंटरी रिटायरमेंट (व्हीआरएस) आणि कम्पल्सरी रिटायरमेंट (सीआरएस) या दोनपैकी कोणती निवृत्ती स्वीकारायची एवढाच विचार आपण करतो. अगदी खेळातही व्हीआरएस आणि सीआरएस हे दोन निवृत्तीचे प्रकार पाहायला मिळतात. कारण वय वाढत जातं तसतसा कामगिरीवरही परिणाम होतोच. मात्र, येथे व्हीआरएस गौरविला जातो, तर सीआरएस लाजीरवाणी ठरते. काही क्रिकेटपटूंच्या बाबतीत ‘सीआरएस’चा नियम लवकर लागू करावासा वाटतो. लिअँडर पेससारख्या खेळाडूंना हे दोन्ही प्रकार अजिबात लागू होत नाहीत. टेनिस म्हणजे शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा खेळ. त्यातही दुहेरीतला खेळ एकेरीपेक्षाही वेगवान. असं असतानाही चाळिशीनंतर त्याचे चापल्य तसूभरही कमी झालेले नाही.

भारतीय क्रीडाविश्वात शारीरिक तंदुरुस्तीची क्षमता पाहणाऱ्या खेळात लिअँडर पेसशी बरोबरी करणारा एकही खेळाडू नाही. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने वयाच्या चाळिशीपर्यंत क्रिकेटचे मैदान गाजवले. मात्र, वय झालं तरी त्याने खेळतच राहावं, असं कोणालाही वाटलं नाही. त्याच्या रिटायर्डमेंटविषयी अनेकदा चर्चा व्हायच्या. दोन वर्षांपूर्वी त्याच्या रिटायर्डमेंटचा सोहळा दिमाखात पार पडल्यानंतर सर्वांनी त्याचा तो ‘योग्य निर्णय’ ठरवला. याउलट लिअँडरच्या खेळाचा विचार केला, तर त्याचं दुहेरीतलं कौशल्य, चापल्य यावरच चर्चा होते. निवृत्तीचा विषय कधी चर्चिला जात नाही. हीच त्याच्या गुणवत्तेची पावती आहे.

‘‘मी माझ्या जोडीदारांमध्ये चांगला मित्र पाहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या साथीने खेळताना त्यांचा मान राखणे, आदर राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे लिअँडर पेस याने म्हटले आहे. खेळाकडे पाहताना, सहकाऱ्याविषयीच्या भावना व्यक्त करताना लिअँडर पेस याने समंजसपणाचा संदेश दिला आहे. लिअँडरच्या दुहेरीतील १०० पुरुष जोडीदारांमध्ये १३ भारतीय आहेत. मात्र, मिश्र दुहेरीत २४ महिला जोडीदारांमध्ये सानिया मिर्झा या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची पहिली फेरी जिंकून पेसने कारकिर्दीतील सातशेवा विजयही साजरा केला. असा पराक्रम करणारा तो जगातला आठवा टेनिसपटू ठरला. विशेष म्हणजे या ७०० विजयांत ५० जेतेपदे मिळविणारा तो जगातला एकमेव खेळाडू आहे.

कदाचित लिअँडरशी बरोबरी करण्यासाठी भारतीय ग्रँडमास्टर व बुद्धिबळविश्वात पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या विश्वनाथन आनंदचे नाव घेतले जाईल. वयाच्या ४५व्या वर्षीही त्याने नुकतेच नॉर्वे क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले आहे. जगातील अव्वल नऊ खेळाडूंच्या या स्पर्धेत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन जेथे सातव्या स्थानी राहावे लागले, त्या स्पर्धेचे उपविजेतेपद आनंदने मिळविले. मात्र, बुद्धिबळ आणि टेनिस हे दोन्ही खेळ भिन्न आहेत. दोन्ही खेळांत तंदुरुस्ती हवीच. मात्र टेनिस हा खेळ शारीरिक तंदुरुस्तीची, तर बुद्धिबळ हा बुद्धीची कसोटी पाहणारा खेळ आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात अनेक बुद्धिबळपटू वयाच्या पन्नाशीनंतरही खेळत आहेत. अर्थात, गुणवत्तेच्या बाबतीत दोघेही क्रीडाविश्वात महान आहेत. मात्र, तंदुरुस्तीच्या पातळीवर लिअँडर अधिक उजवा ठरतो. कारण टेनिसमध्ये समयसूचकतेला जास्त महत्त्व आहे आणि त्यासाठी बुद्धी असावीच लागते.

४५ व्या वर्षीही ‘आनंद’


अर्थात, लिअँडरसोबत आनंदचेही भारतीय क्रीडाविश्वात योगदान तितकेच प्रेरणादायी आहे. १९७३ मध्ये जन्मलेल्या आनंद फक्त खेळत नाही, तर तो जगातील पहिल्या तीन खेळाडूंपैकी एक आहे. मॅग्नस कार्लसनसोबत सलग दोन जागतिक स्पर्धांमध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी त्याचा खेळ वयामुळे मंदावला आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. कारण जागतिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी कँडिडेट स्पर्धा खेळावी लागते. त्यातील विजेताच जागतिक स्पर्धेत खेळू शकतो. म्हणूनच आनंद ग्रेट. जगातील केवळ नऊच खेळाडू २८०० पर्यंतचे एलो रेटिंग मिळवू शकले आहेत. त्यात आनंदचा समावेश आहे. भारताचा पद्मविभूषण पुरस्कार मिळविणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. कामगिरीतलं सातत्य राखणारा ‘फोर्टी प्लस’मधील तोही प्रेरणादायी खेळाडू आहे. खेळातला खऱ्या अर्थाने ‘आनंद’ घेतोय.

थर्टी प्लस क्रिकेटपटू


क्रिकेटमध्ये सचिननंतरही पस्तिशीनंतर खेळणारे अनेक क्रिकेटपटू आहेत. मात्र, त्यांचं मैदानात असणं विशेष मानलं जात नाही, जेवढं विशेष सचिनबाबत वाटलं. कसोटी क्रिकेटमधील काही उदाहरणंच द्यायची तर त्यात पाकिस्तानचा मिसबाह-उल-हक याचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. वयाच्या ४१ वर्षीही तो पाकिस्तानचं नेतृत्व खंबीरपणे करीत आहे. वेस्ट इंडीजचा डावखुरा फलंदाज शिवनारायण चंदरपॉल वयाच्या चाळिसाव्या वर्षी संघाचं प्रतिनिधित्व करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारीत तो मोसमातली शेवटची कसोटी खेळला आहे. वयाच्या ३७व्या वर्षीही मैदान गाजविणाऱ्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ख्रिस रॉजर्स, पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमल, ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन, श्रीलंकेचा कुमार संगकारा, पाकिस्तानचा युनूस खान यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. हे खेळाडू आजही मैदानावर टिकून आहेत. खेळात वयाचं बंधन नसतं. खेळातच आयुष्य पाहणाऱ्या खेळाडूंतच ही ऊर्जा पाहायला मिळते.

प्रौढही गाजवतात मैदान


राजे- महाराजे लढायचे तेव्हा समोर कोण आहे, हे पाहिलं जात नव्हतं. लढाया करताना प्रतिद्वंद्वी निवडण्याची संधी तर अजिबात नव्हती. आयुष्यही असंच आहे. तुम्हाला प्रतिस्पर्धी मनासारखा मिळत नाही. लिअँडर पेससारख्या खेळाडूंना कदाचित हे पुरतं माहिती आहे. कालौघात खेळातले नियम बदलले, गट बदलले. वयोगटानुसार लढती पाहायला मिळतात. गुणवत्ता आणि क्षमतेनुसार लढण्याची संधी मिळते. त्यामुळेच प्रौढांच्या क्रीडा संघटना अस्तित्वात आल्या आणि पस्तिशी ओलांडणाऱ्या खेळाडूंसाठी या संघटना पर्याय ठरू लागल्या. आजही अनेक खेळाडू प्रौढ गटातल्या स्पर्धा गाजवत आहेत. कदाचित बदलत्या जीवनशैलीने निर्माण केलेला हा पर्याय आहे. त्यामुळेच पस्तिशीनंतर वयाची उतरंड लागली, असं म्हणतात. ही उतरंड कर्तृत्व गाजविण्याची ऊर्मी बाळगणाऱ्यांना मान्य नसते. कदाचित लिअँडर पेससारख्या खेळाडूंसाठी प्रौढ गटातली वयोमर्यादा वाढवावी लागेल!
(Maharashtra Times, Nashik, Jalgaon : 29 June 2015)
[jnews_hero_7 include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!