नाशिकमध्ये मेमध्ये टेनिससारख्या ग्लॅमरस खेळाची आयटीएफ स्पर्धा झाली आणि नाशिकचा लौकिक जगभरात पोहोचला. ही स्पर्धा उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना बळ देणारी ठरली, तर नाशिकच्या खेळाडूंना अनुभव गिफ्ट देऊन गेली. केवळ महागडी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहणे संकुचितपणा ठरेल. या स्पर्धेविषयी थोडेसे…
नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली आयटीएफ टेनिस स्पर्धा ८ ते १७ मेदरम्यान झाली, एवढ्या एका वाक्यात या स्पर्धेचं महत्त्व अजिबात अधोरेखित होणार नाही. मुळात इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनची (आयटीएफ) टेनिस स्पर्धा नाशिकमध्ये होणे हीच टेनिस विश्वाने ऐतिहासिक नोंद घेण्यासारखे आहे. आयटीएफची कोणतीही स्पर्धा आयोजित करायची असेल तर फाइव्ह स्टार हॉटेल आणि एअरपोर्ट असणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये हे दोन्हीही नाही. तरीही ही स्पर्धा नाशिकमध्ये यशस्वी आणि देखणी झाली. मुळात या स्पर्धेचे आणखी इतरही निकष पाहिले तर कोणीही म्हणेल, ही स्पर्धा मुंबई, पुण्यातच बरी! मात्र, ‘निवेक’च्या सहकार्याने स्पर्धेचे संचालक आणि नाशिकच्या टेनिसला आकार देणारे प्रशिक्षक राकेश पाटील यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. या त्यांच्या धाडसाचं आणि ‘निवेक’च्या सहकार्याचं कौतुकच म्हणावं लागेल.
आयटीएफ स्पर्धेचं वैशिष्ट्य एका वाक्यात सांगायचं झालं, तर विम्बल्डन, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन ओपनसारख्या ग्रँडस्लॅम स्पर्धांकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ही स्पर्धा. कारण या ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये थेट खेळता येत नाही. त्यासाठी सर्वाधिक गुण मिळवावे लागतात आणि हे गुण आयटीएफ स्पर्धांमधून मिळतात. क्षमता आणि कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेचा दर्जा पाहता ही स्पर्धा नाशिकने जर स्वीकारली नसती तर कदाचित ती स्पेन, ब्राझील, चीन, जपान आदी कोणत्या तरी देशात झाली असती. भारतातील जे ६० खेळाडू नाशिकमध्ये खेळले त्यापैकी निम्मे खेळाडूही कदाचित बाहेरच्या देशात खेळले नसते! विशेष म्हणजे नाशिकच्या खेळाडूंना तर अजिबात संधी मिळाली नसती. त्यामुळेच नाशिकमध्ये आयटीएफची स्पर्धा होणे ही नाशिककरांसाठी अनोखी गिफ्ट आहे.
स्पर्धेत भारताव्यतिरिक्त तैपेई, स्पेन, हंगेरी, सिंगापूर, थायलंड, ब्राझील आदी देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. यात कोमल नागरे, जिताशा शास्त्री आणि महारूक कोकणी या नाशिकच्या तीन खेळाडूंना वाइल्ड कार्डवर संधी मिळाली. यापैकी केवळ जिताशाने एक फेरी जिंकली. इतरांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. येथे जय-पराजयाचा हिशेब नाही, तर अनुभव महत्त्वाचा आहे. खरं तर यजमान म्हणून नाशिकला वाइल्ड कार्डवर दोनच खेळाडू खेळवता आले असते. मात्र, थोडासा भावनिक जोर लावल्याने तिसरा खेळाडू खेळविण्याची संधी नाशिकला मिळाली. भविष्यात हा अनुभव मोठ्या यशात नक्कीच रूपांतरित होईल, यात शंका नाही.
आयटीएफ स्पर्धा खेळण्याची संधी भारतातील मानांकित खेळाडूंनाच मिळते. नाशिकची ही स्पर्धा दहा हजार डॉलरची होती. त्याला टेनिसच्या भाषेत ‘टेन थाऊजंड के’ दर्जाची म्हटले जाते. आता त्यात बदल झाला असून, हीच स्पर्धा पुढे ‘१५ थाउजंड के’ म्हटली जाईल. नाशिकचे टेनिस वातावरण समृद्ध होत असल्याने अशा स्पर्धा नाशिकची गरज आहे. नुकत्याच बँकॉकमध्ये झालेल्या १४ वर्षांखालील एशियन रँकिंग टेनिस स्पर्धेत अभिषेक शुक्लने पाचवा क्रमांक मिळवला. दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या एटीएफ एशियन सीरिज स्पर्धेत विक्रांत मेहताने उपविजेतेपद मिळविले. जिताशा शास्त्री, कोमल नागरे, तेजल कुलकर्णी, महारूक कोकणी, अपूर्वा रोकडे, सिद्धार्थ साबळे, कौशिक कुलकर्णी या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर छाप सोडली आहेच. त्यामुळे त्यांचा पुढचा टप्पा आयटीएफ स्पर्धाच असेल.
धाडसी निर्णय
‘निवेक’च्या सहकार्याने राकेश पाटील यांनी नाशिकमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याचा धाडसी निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण स्पर्धेसाठी लागणाऱ्या सुविधांचा दर्जा राखण्याचे दिव्य कसे पार पाडणार, हा मोठा प्रश्न होता. सुदैवाने त्यात उणीव राहिली नाही. विशेष म्हणजे ‘टेन थाऊजंड के’ दर्जाची स्पर्धा असली तरी सुविधा ‘५० थाऊजंड के’ दर्जाच्या मिळाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. खेळाडूंना जाण्या- येण्यासाठी कार, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूसने सज्ज असलेले पाच फ्रीज, कोर्टवर खेळाडूसाठी उभारलेल्या छत्र्या, अपोलो हॉस्पिटलच्या अँब्युलन्स, स्वीमिंग पूल, खेळाडूंसाठी विशेष मसाजर आदी सुविधांनी खेळाडू सुखावले होते. स्पर्धेचे सामने ‘निवेक’च्या चार क्ले कोर्टवर सुरू होते. निवेकचे टेनिस चेअरमन अरुण आहेर, अध्यक्ष संदीप सोनार, सचिव राजकुमार जॉली, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, क्रीडा सचिव संदीप गोयल, मंगेश पाटणकर यांनी या सुविधांवर विशेष लक्ष दिले. नाशिकमध्ये प्रथमच स्पर्धा होत असताना मनात शंकेचे काहूर उठणे स्वाभाविक आहे. यजमान असले तरी राज्य संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनाही तसे वाटणारच. मात्र, देखण्या आयोजनात त्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. या देखण्या आयोजनाचे आयटीएफने विशेष कौतुक केले. आता तुम्ही २५ हजार डॉलरची स्पर्धा घेऊ शकता, असा अभिप्रायच नोंदवल्याने नाशिककरांचा आत्मविश्वास दुणावणार नाही तरच नवल.
मुंबईची मिहिका मानांकन यादीत!
नाशिकच्या स्पर्धेने मुंबईच्या मिहिका यादव या अवघ्या १५ वर्षीय खेळाडूला जागतिक मानांकन यादीत स्थान मिळवण्याची संधी मिळाली. मिहिकाला या स्पर्धेत वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला. वाइल्ड कार्डवर ही तिची तिसरी आयटीएफ स्पर्धा. यात तिने एक सामना जिंकत आयटीएफचे पॉइंट मिळविले. नियम असा आहे, की तीन स्पर्धांमध्ये तीनदा वाइल्ड कार्ड मिळवून गुण मिळविणाऱ्या खेळाडूस जागतिक मानांकन प्राप्त होते. मिहिकाने यंदा जागतिक मानांकित खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याला नाशिक निमित्त ठरले. जर ही स्पर्धा परदेशात गेली असती तर कदाचित ती खेळली नसती आणि वाइल्ड कार्डही मिळाले नसते.
नाशिकचे जगभरात ब्रँडिंगही!
या स्पर्धेने नाशिकला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर खेळाडूंपुरते अजिबात नाही. खेळाडूंना अनुभव गिफ्ट मिळालाच आहे, पण नाशिकचेही ब्रँडिंगही जगभरात झाले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण जगभरात आयटीएफशी संलग्न २१२ संलग्न देश आहेत. या देशांमध्ये स्पर्धेचे रिझल्ट ऑनलाइन जाहीर होत होते. शिवाय स्पर्धेदरम्यान परदेशी खेळाडूंनी नाशिकची मंत्रभूमी जवळून न्याहाळली. वाइन पर्यटनही अनुभवल्याने त्याचा नाशिकला भविष्यात फायदाच होणार आहे.
जळगावला स्टेट रँकिंग?
उत्तर महाराष्ट्रात नाशिकने आयटीएफच्या यजमानपदाचे आव्हान यशस्वीपणे पेलल्याने यातून खान्देशालाही नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रातली पहिली दहा वर्षांखालील राज्य मानांकन टेनिस स्पर्धेचा मान जळगावला मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यासाठी एकाच ठिकाणी दोन कोर्ट असणे आवश्यक आहे. जळगावात तशी सुविधा नाही. मात्र, दोन वेगवेगळ्या ठिकाणावरील कोर्टवर स्पर्धा घेता येऊ शकेल. जळगावसाठी हा नियम शिथिल करून संधी देण्याबाबत विचारणा झाली आहे. वर्षअखेरीस जळगावात स्टेट रँकिंग स्पर्धा होईल अशी आशा आहे.
(Maharashtra Time, Nashik & Jalgaon : 8 June 2015)