
मला चांगलं आठवतंय, ९० च्या दशकात आम्ही जेव्हा नाशिक जिमखान्यात बुद्धिबळ स्पर्धा खेळायचो, त्या वेळी एका स्पर्धेत मेहंदळे काकांनी सहभाग घेतला होता. त्या वेळीच त्यांचं वय ८० च्या घरात असेल. साठी बुद्धी नाठी, अशी एक म्हण आहे. पण मेहंदळेकाकांना ही म्हण अजिबात लागू होत नाही. त्या वेळी मी त्यांना खेळताना पाहून थक्कच झालो. कारण इतक्या चुरशीने एका दिग्गज खेळाडूला त्यांनी झुंजवले, की साधारण त्या वेळी ९० चालींपर्यंत त्यांनी ती लढत दिली होती. शास्त्रशुद्ध चाली करणारा एकीकडे तर नैसर्गिक बुद्धिमत्तेने झुंज देणारे मेहंदळेकाका दुसरीकडे.
नाशिकचा देदीप्यमान क्रीडा इतिहास असा देखणा आणि विस्मयकारक होता. हाच समृद्ध क्रीडा इतिहास खंगाळून काढताना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या हाती १०६ रत्ने लागली. ही क्रीडारत्ने आज हयात नाहीत. मात्र, त्यांच्या गौरवशाली आठवणींनी आजही नाशिक झळाळून निघते. खेळासाठी वेडात दौडलेल्या या १०६ वीरांच्या आठवणींचे दीप नाशिकच्या कुसुमाग्रज स्मारकात सोमवारी तेवत राहतील. ही आठवणींची प्रकाशयात्रा आहे. ही क्रीडा इतिहासाची समृद्ध पाने चाळताना या क्रीडारत्नांच्या आठवणींची प्रकाशयात्रा नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. निष्काम कर्मयोग्याप्रमाणे खेळात रममाण होणे काय असते, तल्लीन आणि लीन काय असते याचे धडे या क्रीडारत्नांकडून नव्या पिढीच्या खेळाडूंनी गिरवावे ही अपेक्षा.
नाशिकचा क्रीडासमृद्ध काळ असाही होता, की खेळाडूंमुळे खेळ ‘ग्लॅमरस’ होते. आतासारखी ‘चीअर्सगर्ल’ची कधी गरज पडली नाही. खेळाडूंना ‘भाव’ होता, पण तो पैशांनी नव्हे, तर गुणवत्तेने मोजला जायचा. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या नाशिककरांनी या शहराला क्रीडासमृद्धी दिली, त्यांची आजच्या पिढीला धूसरशी ओळखही नाही, यासारखं दुर्दैव दुसरं नाही.
60-70 च्या दशकातील क्रीडाप्रेमाची सर आजच्या क्रीडा क्षेत्राला तसुभरही येणार नाही. इडियट बॉक्स नसलेल्या जमान्यात एक क्रिकेटवेडा रेडिओवर मोठ्या आवाजात कॉमेंट्री ऐकायचा आणि दुकानाबाहेर एका फलकावर स्कोअरबोर्ड लिहायचा. आज गंमत वाटेल, पण आप्पा भवाळकर यांच्यासारखे दर्दी खेळाडू या नाशिकमध्ये होऊन गेले आहेत. वेस्ट इंडिजचा ५० च्या दशकातील आघाडीचा क्रिकेटपटू फ्रँक वॉरेलसारख्या दिग्गज खेळाडूची लीलया विकेट घेणारे राजा शेळके यांच्यासारखे क्रिकेटपटूही याच नाशिकमधील. आपल्या फिरकीने त्याने अनेक दिग्गज फलंदाजांची लय बिघडवली. ज्यांनी त्यांची फिरकी गोलंदाजी अनुभवली ते नाशिककर भाग्यवानच म्हणावे लागतील. नाशिकचा क्रिकेटलौकिक वाढविणारे आणखी एक नाव आहे, ते म्हणजे कसोटी सामने खेळलेले जिभाऊ जाधव याच भूमीतले.
शहरातला पहिला मुलींचा खो-खो संघ घडविणाऱ्या सुधाताई दाते किती जणांना माहीत आहेत? विशेष म्हणजे त्यांनी संघ घडविलाच नाही, तर भारतातील सर्वोत्तम खो-खो संघ म्हणून नाशिकला लौकिक मिळवून दिला. त्या काळात कोणतीही सुरक्षा साधने नव्हती. आजही नाहीत. म्हणूनच सूर मारला तर पुन्हा मैदानावर पाऊल ठेवायचं नाही, असं निक्षून सांगणाऱ्या सुधाताई दाते यांना मुलींच्या सुरक्षेची किती काळजी होती याचा प्रत्यय येतो. सुरक्षा साधनांशिवाय मुलींनी सूर मारल्यास भविष्यात मुलींना काय गंभीर समस्या होतात हे आजही पटवून सांगावे लागते. सुधाताई दाते यांनी ते फार पूर्वीच सांगितले होते.
केवळ राजकारणापुरती नाही, तर त्या पलीकडेही ओळख असलेले काही खेळाडू असेही आहेत ज्यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं. त्यापैकी तरुण ऐक्य मंडळाचे कबड्डीपटू डॉ. वसंतराव पवार, कबड्डीसह कुस्तीत पारंगत असलेले अॅड. उत्तमराव ढिकले, गुलालवाडी व्यायामशाळेचे कबड्डीपटू बंडोपंत जोशी, क्रिकेटपटू सुरगाण्याचे राजे धैर्यशीलराव पवार अशी किती तरी नावे आहेत ज्यांनी नाशिकचा क्रीडालौकिक वाढवला. ज्यांच्यामुळे क्रीडामानसशास्त्राची दखल जगाने घ्यावी असे भीष्मराज बाम यांनी नाशिकचा लौकिक सातासमुद्रापार नेला. असं म्हणतात, की व्हॉलीबॉलपटू बी. के. शिंत्रे, क्रिकेटपटू जिभाऊ जाधव यांच्यासारखे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी नाशिक सोडले असते तर त्यांचे जगभर नाव झाले असते.
अनेक नावे आता धूसर होत चालली आहेत. या धुरिणांच्या आठवणींशिवाय नाशिकचा भरजरी क्रीडा इतिहास पूर्ण होणार नाही. या कर्तृत्ववान नाशिककरांच्या रोमहर्षक आठवणींची प्रकाशयात्रा सतत तेवत ठेवण्यासाठी पणती जपून ठेवण्याची गरज आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विनायक रानडे, कैलास पाटील, सचिन शिंदे यांच्यासह अनेक क्रीडा संघटक, खेळाडूंच्या सहकार्याने ही क्रीडाविश्वातील कीर्तिस्तंभ नाशिककरांसमोर येत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष. यापूर्वी कला, साहित्य क्षेत्रातील धुरिणांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला होता.
आठवणींची प्रकाशयात्रा उपक्रमाची संकल्पना
या उपक्रमाची संकल्पना अशी आहे, की या प्रत्येक दिवंगत खेळाडूच्या नावाने कुसुमाग्रज स्मारकात आकाशकंदील उभारण्यात येईल. या खेळाडूंच्या कुटुंबातील व्यक्तीने या आकाशकंदिलाजवळ एक पणती लावायची आणि खेळाडूंच्या आठवणींना उजाळा द्यायचा. यात कोणतेही भाषण नाही, कोणाचाही सत्कार नाही. ही केवळ आठवणींची प्रकाशयात्रा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे क्रीडाविश्वाशी दृढ नाते होते. गरुडासम भरारी घेणाऱ्या वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्थेला कुसुमाग्रजांनीच नाव दिलं आहे. कुसुमाग्रजांच्या भूमीत या क्रीडाविभूतींचा गौरव अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाने व्हावा ही नाशिकसाठी भूषणावह बाब आहे. हा युगायुगांचा प्रवास असाच सुरू राहील. फक्त प्रकाश पेरणारे यात्रेकरू बदलतील…
नाशिकमधील या खेळाडूंच्या आठवणींना उजाळा…
शतायुषी प्रवासातला नाशिकचा मित्रविहार…