chessInspirational Sport story

जा, मी तुमच्याशी खेळणारच नाही!

महेश पठाडे
Mob. 8087564549

‘‘तुम्ही चीटिंग करतात! जा, मी तुमच्याशी खेळणारच नाही… आई, हे बघ कसे चीटिंग करतात!’’

चिंगूला खेळायचा कंटाळा आला, की तिचे असे बालसुलभ नखरे सुरू व्हायचे. मग डाव संपला, की हळूच टीव्हीसमोर जाऊन कार्टून पाहायची… प्रशिक्षक बिचारा पटावर सोंगट्या लावून तिची वाट पाहत बसायचा.

‘सॉरी! आता नाही ना असं करणार बाळा!’ असं म्हणत तिची मनधरणी करावी लागायची. मग कुठे या बाईसाहेब खेळायला यायच्या… याच नखराली चिंगूने सात वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि मम्मी-पप्पांचे आनंदाश्रू घळाघळा वाहिले…

तुला काय व्हायला आवडेल? डॉक्टर की इंजिनीअर? अवघ्या साडेसहा वर्षांच्या चिंगूला कुणी तरी हा प्रश्न विचारला…

एवढ्या लहानपणी कुणी डॉक्टर, इंजिनीअर होतं का? कधी पाहिलंय का? चिंगूच्या प्रतिप्रश्नाने प्रश्नकर्त्याला काय बोलावे तेच सुचेना…
जेवढी चिंगू हजरजबाबी तेवढीच ती बुद्धिबळाच्या पटावरही तल्लख, किचकट चाली चुटकीसरशी सोडवायची.

चिंगू पटावर एकाग्र कधीच झालेली पाहिली नाही. अतिशय क्रिटिकल पोझिशनवर तर ती पटावर कधीच पाहायची नाही. तिचे मनातल्या मनात कॅल्क्युलेशन सुरू व्हायचे… तेव्हा ती कधी फॅनकडे बघेल, तर कधी प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यांनाच नजर भिडवेल… पण तिच्या डोळ्यांसमोर ना फॅन असेल, ना प्रतिस्पर्ध्याचे डोळे! तिच्या डोळ्यांसमोर अख्खा पट भिरभिरत असायचा. जेव्हा ती पटावर चाल खेळायची तेव्हा मात्र प्रशिक्षकालाही तिची नॉव्हेल्टी चाल बुचकळ्यात टाकायची…

चिंगू तशी खूप बडबडी. तिला काही सूचना केली, की त्यावर तिचा लगेच युक्तिवाद असायचा. चेस क्लॉकमधील आकडे बदलण्यात तर ती माहीर! प्रशिक्षकाची नजर चुकवून ती स्वतःचा टायमिंग वाढवून घ्यायची. पप्पाने दरडावले तर ती आईकडे तक्रार करायची. प्रत्येक प्रशिक्षकाचे तिला शिकवण्याचे तास ठरलेले. मग ‘किती वाजता आले तुम्ही? किती वेळ तुम्ही माझ्याशी खेळले,’ असं विचारत त्याची नोंदही तीच करणार! त्यात ना पप्पाचा हस्तक्षेप, ना मम्मीचा!!!

चिंगू अवघी सहा वर्षे आणि चार महिन्यांची (लेख लिहिला त्यावेळचे हे वय. आता ती बरीच मोठी झालीय). शारदाश्रम शाळा सुटल्यानंतर तिचा संपूर्ण दिवस बुद्धिबळातच जायचा. झोपेचे आणि शाळेचे तास वगळले, तर बाकी सर्व तास बुद्धिबळाच्या सरावासाठीच राखून ठेवलेले होते. आई आणि वडील दोघेही तिच्या सरावासाठी आग्रही असायचे. पण ही एकाजागी कधी बसली नाही. नेहमी काहीना काही खोड्या काढायची. प्रशिक्षकाला तर आधी तिच्यासाठी घोडा व्हावं लागायचं आणि नंतर घोड्याच्या चाली शिकवाव्या लागायच्या!

एक डाव झाला, की म्हणायची, ‘मला पकडून दाखवा. मगच मी तुमच्याशी खेळेन.’ मग तिचा कोणताही युक्तिवाद न घालता थेट इम्प्लिमेंट.

केवळ अर्धाएक तासाची तिला उसंत मिळायची. कारण दुपारी एकपासून विवेक दाणी, महेश पठाडे, प्रवीण सोमाणी, प्रवीण ठाकरे , प्रशांत पाटील, प्रशांत कासार या सहा प्रशिक्षकांचे जे तास सुरू व्हायचे, त्यातून तिला सायंकाळपर्यंत उसंत नसायची. कुणाला वाटेल, की एवढ्याशा जिवावर केवढा हा अत्याचार! पण चिंगू म्हणजे एवढासा जीव? अजिबात नाही!!! वेळ मिळाला, की कार्टून बघ, घरातल्याचा पाइपवर जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपसारखी पायांच्या आधारे हात सोडून झोके घे, हळूच प्रशिक्षकांच्याच खोड्या काढ, असे एक ना अनेक उपद्व्याप तिचे सुरू असायचे.

चिंगूला बुद्धिबळ शिकवायचं म्हणजे मोठी कसरत करावी लागते. एक डाव खेळल्यानंतर लगेच टीव्ही पाहायला पळायची. कार्टून चॅनल तिच्या आवडीचे. प्रशिक्षकाला तिथूनच सांगायची, तुम्ही बोर्ड लावा, तोपर्यंत मी टीव्ही पाहते. बुद्धिबळाचा पट मांडल्यानंतरही या बाईसाहेब कार्टूनसमोरून हलायला तयार नसतात! आईने दरडावले, की थोडीशी चिडूनच खेळायला येते. पटकन बोर्डावर चाल करीत प्रशिक्षकाकडे रागाने पाहतच, खेळा आता असे ओरडूनच सांगणार.

चिंगू तुझी मूव्ह आहे, असं प्रशिक्षकाने सांगितलं, तर लगेच म्हणायची, डाव चालू असताना बोलायचं नसतं. माझं घड्याळ चालू आहे ना? मग कशाला बोलतात? चिंगूशी खेळताना दुसऱ्या व्यक्तीशी प्रशिक्षकाने बोलायचंही नाही. नाही तर चिंगूचा संताप सहन करावा लागायचा. जाऊ दे बाई, मी खेळतच नाही!

एवढेच नाही, तर ती एक उत्कृष्ट जलतरणपटूही आहे. दुपारचा वेळ तर खास जलतरणासाठी तिच्या हट्टामुळेच राखून ठेवलेला असायचा. स्प्रिंगबोर्डवर उंचावरून जम्प घ्यावी तशी ती कोकिळ गुरुजी जलतरण तलावावर जम्प घ्यायची. इतक्या उंचावरून ती उडी घ्यायची, की चांगला जलतरणपटू तशी जम्प कधी तरीच मारायचा!!!

वडील प्रवीण पाटील म्हणजे मलूल स्वभावाचा माणूस. चिंगूला तिच्या या पप्पाचा संताप कधी संतापच वाटत नव्हता.

‘‘चिंगू, विचार करून खेळ! पटापट खेळू नको, तुझ्याकडे दीड तास आहे ना?’’

चंचल चिंगूला पप्पाने असं दरडावलं, की ती लगेच त्यावर कडी करायची… आणि त्यांना आईचाच धाक दाखवायची…

तुम्ही माझ्यावर चिडू नका! मला माहितीये तुम्हीही त्यातलेच. आईला सांगू का तुमचं नाव? सांगू? आता बोला ना? आता का बोलत नाही? मी थोडावेळ बोलायला लागले तर लगेच म्हणता आणि तुम्ही बोलता ते? दाणी सरांशी कसे गप्पा मारतात? मला का माहीत नाही?

अशी ही चिंगू सात वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल आली नि सगळ्यांनी तोंडात बोटे घातली. कोण ही चिमुरडी, असं म्हणून काहींच्या भुवयाही उंचावल्या. तिच्या या यशात तिची आई, पप्पा आणि आजी (आईची आई) या तिघांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आजीशी तर एखाद्या टिपिकल मुलीसारखा संवाद.

धुळ्याहून आजी आली, की ही तिच्याभोवती गोंडा घोळायची. आजीशी नेलपेंटविषयी बोलेल, बांगड्यांविषयी बोलेल. ‘‘आजी, मला तू छान बांगड्या आणल्यास हं!’’ ‘‘ए आजी, मला हा रंग फार आवडतो…’’ असं काही तरी ती बोलत असायची.

चिंगू आता राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची विजेती ठरली, या सर्वाधिक आनंद पप्पालाच. कारण त्यांनी तिच्यासाठी जी मेहनत घेतली ती ग्रेटच.

अर्थात, हे आश्चर्यच होतं. कारण पुण्यात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद मिळविणारी ती एक असाधारण बालिका ठरली होती. पुणे येथील जुलैतल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत देशभरातील चिमुरड्या सहभागी झाल्या होत्या. अव्वल मानांकित खेळाडू म्हणजे फिडे मानांकित खेळाडूंचीही कमी नव्हती. या गर्दीच जळगावातून आलेली कुणी तरी चिंगू सगळ्यात मागे कुठे तरी २५- ३० व्या पटावर खेळत होती. कोणत्याही स्पर्धेचा अनुभव नसलेली, मानांकन नसलेली एक अनोळखी चिंगू या पिनड्रॉप सायलेंट स्पर्धेत अदखलपात्र खेळाडू होती. एकामागोमाग विजय मिळवल्यानंतरही ती कधी चर्चेत आली नाही. दहाव्या फेरीत ती एकदम दुसऱ्या पटावर आली, तरीही तिच्या कामगिरीची चर्चा नाही. मानांकितांविरुद्ध तिचा विजय खळबळजनक नसायचा, तर मानांकित खेळाडूंचा खळबळजनक पराभव महत्त्वाचा मानला जायचा. एका स्पर्धेत विजयाची स्थिती असतानाही असा प्रसंग उद्भवला, की तिच्या प्रतिस्पर्ध्याने टच न् मूव्हचा आक्षेप नोंदवला. पंचाने तो आक्षेप नाकारत कंटिन्यू असे म्हंटले. चिंगूला काही कळलंच नाही. चिंगूने हातातला मोहरा घाईघाईत कुठे तरी ठेवून मोकळी झाली. ही चूक अंगलट आली असती; पण चिंगूचं नशीब बलवत्तर. तो डाव अखेर बरोबरीत सुटला. नंतर मात्र अखेरच्या अकराव्या फेरीत सनसनाटी विजय नोंदवत चिंगूने स्पर्धेतली ऐतिहासिक कामगिरी साकारली. साडेनऊ गुण मिळवले, पण तिच्याबरोबरच आणखी एका खेळाडूचे तेवढेच गुण होते. कोणकोणत्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत गुण घेतले याला जास्त महत्त्व होते. सरस गुणांत चिंगूच सरस ठरली आणि तिच्या शिरपेचात विजेतेपदाचा मुकुट खोवला गेला. चिंगूने महाराष्ट्राच्या बुद्धिबळ क्षेत्रात इतिहास रचला होता. सात वर्षे वयोगटातील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रातील एकाही महिला खेळाडूला विजेतेपद मिळालेले नाही. चिंगू ऊर्फ भाग्यश्री प्रवीण पाटील ही पहिली महाराष्ट्रीय मुलगी होती.

‘‘चिंगू, आता तुझे भरपूर सत्कार, कौतुक सोहळे होतील, हो की नाही?’’ असं तिच्या आईने सहज विचारलं.

‘‘बक्षीस मिळवल्यानंतर कुणाला वाईट वाटतं का? अरेरे! तुला बक्षीस मिळालं, असं म्हणतं का कुणी? कौतुकच होतं ना!’’ अशी ही चिंगू बोलण्यात एकदम फटाकडी!

चिंगूच्या विजेतेपदाचं वैशिष्ट्य म्हणजे तिला बुद्धिबळ स्पर्धेचा काडीमात्र अनुभव नव्हता. ना गल्लीतल्या, ना जिल्हास्तरीय स्पर्धेतला. थेट राष्ट्रीय स्पर्धेतच तिने आपला लौकिक सिद्ध केला. या विजेतेपदानेच तिची दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. जळगावातील जैन स्पोर्टस अ‍ॅकॅडमीने तिला दत्तक घेतलं असून, तिच्या आगामी स्पर्धेचा, प्रशिक्षणाचाही खर्च उचलला आहे. यशाची शिखरं सर करण्यास निघालेल्या या चिमुरडीला आता तू कोण होणार, असं कोणी विचारणार नाही. पण माझं पोरगं चिंगूसारखं असावं, असं मात्र नक्कीच म्हणत असतील…



e-mail : rhythm00779@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!