• Latest
  • Trending
अंजनेरी दुर्मिळ वनस्पती

जगातील ही सर्वांत दुर्मिळ वनस्पती आढळते फक्त अंजनेरी पर्वतावर!

December 26, 2021
रजनी नागेश लिमये

समर्पिता- रजनी नागेश लिमये

March 7, 2023
Jeswin Aldrin Long Jump

Jeswin Aldrin ची Long Jump ठरली हनुमान उडी!

March 3, 2023

पुन्हा कुटप्पा प्रशिक्षक

February 24, 2023
Virat Kohli 25 हजार

Virat Kohli च्या वेगवान 25 हजार धावा

February 20, 2023
चेतन शर्मा वादाचं उत्तेजक

Chetan Sharma Sting- भारतीय खेळाडू उत्तेजक घेतात!

March 3, 2023
फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

फुटबॉल 2022 : भारतीय फुटबॉलवरील बंदीने गाजले वर्ष

February 19, 2023

बॅडमिंटन 2022 : सिंधू, श्रीकांतनंतरच्या फळीने जागविला विश्वास

February 11, 2023
ravindra jadeja ball tampering

काय म्हणता? Ravindra Jadeja ने Ball Tampering केलं?

February 10, 2023
विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच

February 24, 2023
हॉकी वर्ल्ड कप जर्मनी

वर्ल्ड कप हॉकी : जर्मनी 17 वर्षांनी विश्वविजेता

February 5, 2023
खेलो इंडिया

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

February 5, 2023
महिला क्रिकेट वर्ल्ड कप

महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप : कोण आहेत या जगज्जेत्या भारतीय कन्या?

February 3, 2023
Friday, March 31, 2023
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

जगातील ही सर्वांत दुर्मिळ वनस्पती आढळते फक्त अंजनेरी पर्वतावर!

हनुमानाचा जन्म जिथे झाला होता, त्या अंजनेरी | Anjaneri | पर्वतावर काही दुर्मिळ वनस्पती आहेत, ज्या बहुतांश नाशिककरांना माहीतच नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे ‘खुरपुडी’ (कंदीलपुष्प).

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 26, 2021
in Environmental, Raanwata
0
अंजनेरी दुर्मिळ वनस्पती
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email
लक्ष्मणाचे प्राण परत आणण्यासाठी हनुमानाने हिमालयातून संजीवनी पर्वतच उचलून आणला होता. मुळात अशी दुर्मिळ संजीवनी वनस्पती अस्तित्वात आहे की नाही, हे पौराणिकतेच्या आधारावर सांगता येणार नाही, पण हनुमानाचा जन्म जिथे झाला होता, त्या अंजनेरी | Anjaneri | पर्वतावर काही दुर्मिळ वनस्पती आहेत, ज्या बहुतांश नाशिककरांना माहीतच नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे ‘खुरपुडी’ (कंदीलपुष्प). खुरपुडी अर्थात कंदीलपुष्प ही इतकी दुर्मिळ वनस्पती आहे, की या भूतलावर फक्त ती अंजनेरी पर्वतावरच आढळते. जगात इतर कुठेही ती आढळणार नाही.
अंजनेरी दुर्मिळ वनस्पती
‘सिरोपेजिया अंजनेरिका’ (Ceropegia Anjanerica) हे झाड केवळ अंजनेरी पर्वतावरच सापडतं. 


‘खुरपुडी’ हे तसं स्थानिक नाव आहे. त्याला मराठीत ‘कंदीलपुष्प’ असेही म्हणतात. या वनस्पतीचेच शास्त्रीय नाव ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ | Ceropegia Anjanerica | असे आहे. ही अंजनेरी पर्वतावरील इतकी दुर्मिळ वनस्पती आहे, की तिचं आज जतन केलं नाही, तर ती जगातूनच नाहीशी होईल. म्हणूनच यांसारख्या दुर्मिळ वनस्पतीच्या संवर्धनासाठी एक महिला पुढे आली आणि तिने या वनस्पतीला जागतिक दर्जा मिळवून दिला. एवढेच नाही, तर यांसारख्या दुर्मिळ वनस्पतींवर अभ्यास करून त्यांनी जे प्रयत्न केले, त्याची दखल घेऊन राज्य सरकारने या अंजनेरी पर्वतालाच संवर्धन राखीव म्हणून जाहीर केले. पर्यावरण रक्षणातले हे महत्त्वाचे काम केले, ते नाशिकमधील वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासक जुई पेठे-टिल्लू | Jui Pethe-Tillu | यांनी. संवर्धन राखीव म्हणून दर्जा मिळालेले हे महाराष्ट्रातले हे तिसरेच ठिकाण आहे, ज्याचा मान अंजनेरी पर्वताला मिळाला. त्याचे बरेचसे श्रेय जुई टिल्लूंना द्यायला हवे. एकूणच अंजनेरी पर्वतावरील दुर्मिळ वनस्पती आणि त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न समजून घ्यायचे असेल तर त्यांचा हा प्रवास नक्कीच वाचायला हवा…

हरणाला जसं आपल्या नाभीत कस्तुरीचा सुगंध आहे, हे माहीत नसतं तसंच नाशिककरांचं झालं आहे. आपल्या डोंगर, पर्वतांच्या कुशीत इतक्या काही दुर्मिळ वनस्पतींची ‘कस्तुरी’ आहे, की ती आपल्याला माहितीच नाही. किंबहुना आपण अज्ञानमूलक डोंगर चढून तिथं धिंगाणा घालण्यातच धन्यता मानतो. मात्र, जुई टिल्लू यांनी या पर्वताचं महत्त्व समोर आणल्यानंतर संपूर्ण विश्व या पर्वताबाबत कुतूहल व्यक्त करीत असतील. म्हणूनच या वनस्पतीचं जतन व्हायला हवं. लोकसहभागातून संवर्धन हा विषय सध्या प्राधान्याने घेतला जात आहे. लोकसहभागातूनच वनसंवर्धन किंवा परिसंस्थेचे संरक्षण करता येते, यावर जुई पेठेंचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच सरकारनेही आता संरक्षण आणि संवर्धनासाठी जंगल समाजाच्या ताब्यात दिली आहेत. देवरायांचे संवर्धन हा जुई टिल्लूंचा आवडता विषय.

काय असतात गवतांमधील पोषक घटक?


डांगी नावाचं दुभत्या जनावरांची एक जात आहे, जी संगमनेर, अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. काही आजारांमुळे या जातीच्या गाय-वासरांची मोठ्या प्रमाणावर मरतूक होत होती. त्या मरतुकीचं कारण कोणी लक्षातच घेतलं नाही. नंतर त्यामागचं कारण असं लक्षात आलं, की त्यांना सकस आहारच मिळत नसल्याने ही मरतूक होत होती. त्याचं कारण एकच, जंगल नाहीसं होतंय. आततायी वृक्षलागवड होतेय, तसतशा स्थानिक गवताच्या ज्या जाती आहेत त्याही नाहीशा होत आहेत. जी गुरं या स्थानिक गवतांच्या जाती खाऊन जगत होती, त्यांना आता एकाच प्रकारचं, चांगल्या दर्जाचं गवत खायला मिळत आहे. जसं रोज पुरणपोळी चांगली आहे; पण रोज पुरणपोळी खाऊन कसं चालेल? सकस आहारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा मेनू हवा असतो, तसंच जनावरांचंही आहे. आपण जसा चौरस आहार घेतो, तसाच तो जनावरांनाही मिळायला हवा. म्हणूनच त्याला सगळ्याच प्रकारचं गवत, रोपं खायला मिळायला हवीत. त्याचा अभ्यास जुई टिल्लू यांनी केला. त्यातूनच विविध गवताच्या जाती, गवतातील पोषक घटक यांचा अभ्यास त्यांनी केला. त्यातून त्यांना एक छान माहिती मिळाली, ती म्हणजे राखणरान. समाजाने राखलेली गवताळ रानं ही नवी संज्ञा त्यातून पुढे आली. त्यावर त्यांचा एक वैज्ञानिक शोधप्रबंधही प्रसिद्ध झाला आहे.

‘सडे’ म्हणजे काय?


खरं तर वनस्पतिशास्त्र हाच जुई यांच्या अभ्यासाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे वनस्पतिशास्त्राला धरून त्या संवर्धनावर काम करीत आहेत. त्या आता सड्यांवरही काम करीत आहेत. आता हे सडे म्हणजे काय, तर आपल्याकडे सातबारा जो आहे, त्यात ‘पोटखराबा’चा उल्लेख असतो. पोटखराबा म्हणजे काय, तर जी जमीन आहे, त्या जमिनीवर उघडा कातळ असतो. त्यामुळे तेथे शेती करता येत नाही. म्हणून त्याला ‘पोटखराबा’ म्हणतात. यालाच कोकणात ‘सडे’, तर इंग्रजीत लॅटरिटिक प्लॅट्यूज | Lateritic Plateaus | म्हंटले जाते. समजा, एका एकरमध्ये एक गुंठ्याचा ‘पोटखराबा’ आहे. म्हणजे कागदोपत्री तुमची जमीन ४० गुंठ्यांपैकी ३९ गुंठे आहे. त्यावर जो शेतसारा भरावा लागतो, तो केवळ ३९ गुंठ्यांचाच भरावा लागतो. विक्री व्यवहार झाला तर तो ३९ गुंठ्यांचाच होतो. उरलेल्या एका गुंठ्याचा ‘पोटखराबा’ झालेला असतो. त्याचा कोणताही व्यवहार होत नाही. गंमत अशी आहे, की हा ‘पोटखराबा’च निसर्गाच्या दृष्टीने फार आवश्यक असतो. ‘पोटखराबा’वर अत्यंत वेगळ्या प्रकारची जैवविविधता फुलत असते. एका पोटखराब्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीव जगत असतात आणि ते जगतात म्हणून बाकी सगळ्या गोष्टीपण जगतात. तीही एक अन्नसाखळीच आहे.

जगात फक्त अंजनेरीवरच सापडते ‘खुरपुडी’!


अंजनेरी दुर्मिळ वनस्पती

‘सिरोपेजिया अंजनेरिका’ | Ceropegia Anjanerica | ही दुर्मिळ वनस्पती केवळ अंजनेरी पर्वतावरच सापडते. जुई यांचा या वनस्पतीवर अभ्यास आहे. संपूर्ण जगात फक्त अंजनेरी पर्वतावरच ही दुर्मिळ वनस्पती सापडते. मध्यंतरी 2014 मध्ये जळगावात ही वनस्पती आढळली होती. अर्थात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत काही ठिकाणी ही दुर्मिळ वनस्पती अंजनेरी पर्वतासह इतरत्र आढळते. या झाडाचं पर्यावरणशास्त्र, संवर्धन, झाडाला लागणारे पोषक घटक, हे झाड वाढतं कसं, याचा अभ्यास जुई यांनी केला. या वनस्पतीला आंतरराष्ट्रीय स्टेटस मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. प्रत्येक वनस्पतीला आंतरराष्ट्रीय दर्जावर एक स्टेटस असतं, ते ‘आययूसीएन’ | International Union for Conservation of Nature | देत असतं. ही वनस्पती अतिदुर्मिळ आहे, धोकादायक आहे की अतिधोकादायक आहे, असे वेगवेगळे प्रकार निश्चित केले जातात. जुई यांनी या झाडाचा अभ्यास करून, विश्लेषण करून, त्याचं सादरीकरण ‘आययूसीएन’पुढे केलं आणि त्यामुळे हे झाड धोकादायक स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं. धोकादायक स्थितीत आणल्यानंतर होतं काय, की लोकांचं त्याकडे लक्ष जातं आणि त्याच्या संवर्धनाचं काम केलं जातं. अंजनेरीवरील लोकांना त्याची काहीही माहिती नव्हती. त्याला स्थानिक भाषेत ‘खुरपुडी’ (कंदीलपुष्प) म्हणूनच ओळखले जायचे; पण ती किती दुर्मिळ आहे, याची माहितीच कुणाला नव्हती. ही खुरपुडी एक खाद्य वनस्पती आहे. ती औषधी नाही. माकडं आणि माणसं ही वनस्पती खात होती. ती इतकी खाल्ली की नामशेषच होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली. हीच ती ‘खुरपुडी’ जिला मराठीत ‘कंदीलपुष्प’ | Kandil pushpa | असंही म्हणतात. त्याला कंदिलासारखे फूल येते म्हणून तिला ‘कंदीलपुष्प’ म्हंटले गेले. ‘खुरपुडी’चा शोध जुई यांनी लावलेला नाही, तर तो एका वरिष्ठ वनस्पती अभ्यासकाने लावला होता. शोध लागला, पण त्यावर पुढे काहीच हालचाल झाली नाही. या दु्र्मिळ वनस्पतीचं संरक्षण व संवर्धन करणं तर गरजेचं होतं. त्यावर वैज्ञानिक अभ्यास करणंही गरजेचं होतं. हा अभ्यास जुई करीत होत्या. त्यामुळेच अंजनेरीचं संवर्धन असो की ‘आययूसीएन’चं | IUCN | स्टेटस असेल, ते जुई यांच्या प्रयत्नामुळे मिळालं, हे महत्त्वाचं आहे.

जंगल वाचवायचे तर हे केले पाहिजे…


आता त्या कन्झर्वेशन बायोलॉजीतही लक्ष घालत आहेत. त्याचबरोबर योजक नावाच्या संस्थेबरोबर कृषीमधील जैवविविधता | Agro Biodiversity | आणि पर्यावरणात असलेल्या वेगवेगळ्या घटकांचं संरक्षण करायचं असेल तर ते स्थानिक लोकांबरोबर राहूनच शक्य आहे. कारण जंगल आणि स्थानिक माणूस यातलं जे नातं आहे, ते तोडून चालणार नाही. सह्याद्रीच्या कुठल्याही भागात तुम्ही गेलात तर तेथे माणूस हा कायम राहिलेला आहे. त्यामुळे माणसाशिवाय सह्याद्रीच्या जंगलाची कल्पनाच करता येणार नाही. आता जर आपण जंगल संवर्धन करायचं झालं, तर आपल्याला काय करायला हवं, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर पहिलं उत्तर हेच येईल, की माणूस बाहेर काढा. पण जुईंनी त्याच्या उलट विचार मांडला. अर्थात, हा विचार यापूर्वीही अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी मांडला आहे. तोच जुई मांडतात. पण जर एखाद्या वस्तूवर जसा तुमचा हक्क नाही, तसा माझाही नाही. त्यामुळे काय होईल, की त्या वस्तूची काळजी कोणीच घेणार नाही. पण जर तुम्ही त्याला सांगितलं, की ही वस्तू तुझी आहे, तर मग तुम्ही त्या वस्तूची काळजी घेणार. याच तंत्रावर जुई यांचं काम सुरू आहे. जंगल कुणाचंच नाही, म्हणून कुणीच लक्ष घालत नाही. त्यामुळे जंगल तुटतं. जंगल तुझं आहे. जंगलात मिळणारा आंबापण तुझा आहे. करवंदंपण तुझी आहे, लाखपण तुझी आहे, मधपण तुझं आहे आणि लाकूडपण तुझं आहे, असं जेव्हा सांगितलं तर तो लाकडावर घाव घालण्यापूर्वी विचार करतो. हाच दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी जुई यांचं काम सुरू आहे. सध्या पंधरा-वीस तरुणांचा एक गट जुई यांच्याबरोबर काम करतो. हाच ग्रुप गाइड म्हणूनही काम करतो. त्याचबरोबर वणवे विझवणं, कुणी लाकूडतोडी करीत असेल किंवा वनस्पती चोरून नेत असेल तर त्याची माहिती वन खात्याला देणे हे सगळी कामे हा ग्रुप करीत आहे. अंजनेरीवर पर्यटक खूप येतात. त्या वेळी वनस्पतींचं नुकसानही होतं. ते रोखण्याचं काम हा ग्रुप करीत आहे. जुई यांना ‘डब्लूडब्लूएफ’चे | World Wildlife Fund | अनुदानही मिळालं आहे. स्थानिक लोकांच्या सहकार्याने हळूहळू का होईना अंजनेरीचं संवर्धन होत आहे. अंजनेरी पर्वतावरी दुर्मिळ वनस्पती संवर्धनाच्या कवचात येत आहेत.

कसे होते ‘खुरपुडी’चे परागीभवन?


‘खुरपुडी’ झाडाला परागीभवन करण्यासाठी एक छोटीशी एक खाच असते. तेथून एक किडा आत जातो. तो आत गेल्यानंतर एक छोटीशी खिडकी आत बदलली जाते. त्या खिडकीतून सूर्यप्रकाश बरोबर आतल्या स्त्रीकेसरावर पडतो, जेणेकरून आतल्या किड्याला आत कुठे जायचं हे दिसू शकतं. तो आतमध्ये परागीभवन करतो आणि परत बाहेर येतो. हेच किडे तुमच्या शेतातल्या पिकांचंही परागीभवन करीत असतात. मात्र, आता ‘खुरपुडी’च नाहीशी झाली तर हे किडे खातील काय? मग तुमच्या शेताचं परागीभवन कसं होईल? परिणामी, शेती जगणारच नाही. पर्यावरणात मधमाश्यांची जी भूमिका आहे, तीच या किड्यांची आहे. आपण ज्या गोष्टी खातो, त्यातल्या बहुतांश खाद्यगोष्टी या मधमाश्यांकडून परागीभवन झालेल्या असतात. फळं वगैरे जे खातो, ते मधमाश्यांच्या परागीभवनामुळे खाता येतात. जर मधमाश्याच नाहीशा झाल्या तर तुम्हाला काहीही खाता येणार नाही. आइनस्टाइन एके ठिकाणी म्हणाला होता, की जर मधमाश्या जगातून नाहीशा झाल्या तर मानवजात चार वर्षांत नामशेष होईल. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन सांभाळणे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच ‘खुरपुडी’सारखं झाडही खूप महत्त्वाचं आहे. तेच जर नाहीसं झालं तर पर्यावरणाची साखळीच आपण नष्ट करू हा धोका येथे समजून घ्यायला हवा.

अंजनेरीच्या संवर्धनाला अशी केली सुरुवात


अंजनेरीची सुरुवात कशी झाली, तर जुई यांचं लग्न झालं तेव्हा सहजपणे कशाचा तरी अभ्यास करावा म्हणून टिल्लू दाम्पत्य अंजनेरी पर्वतावर गेलं. त्या वेळी वन विभाग तेथील औषधी वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ लोक शोधत होते. थोडक्यात म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी वनस्पतींवर अभ्यासाचा एक करार होता. जुई यांनी सांगितलं, की मी काम करते. कुणीच काम करणारं नव्हतं, म्हणून जुई यांना ते काँट्रॅक्ट मिळालं. तेथूनच अंजनेरी पर्वतावरील औषधी वनस्पतींचा अभ्यास सुरू झाला. दर आठवड्याला टिल्लू दाम्पत्य अंजनेरीवर जाऊ लागलं. अंजनेरीवरील वनस्पतींचे, झाडांचे फोटोग्राफ काढले. त्या सगळ्यांची जंत्रीच तयार केली आणि त्याची एक पुस्तिका वन खात्याला सादर केली. विशेष म्हणजे अंजनेरीवरील वनस्पती ओळखण्याची संगणकीय प्रणालीही (सॉफ्टवेअर) त्यांनी बनवलं. तेही वन खात्याला दिलं. या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन सरकारने संवर्धन राखीव (Conservation Reserve) म्हणून अंजनेरीला जाहीर केलं. यात वन विभाग, स्थानिक लोकं आणि एखादी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संवर्धन करायचं असतं. जसं पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा यांनी बोरगडला काम केलं, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अंजनेरी संवर्धन राखीव म्हणून जाहीर झालं आहे. त्यात जुई यांनी मिळवलेल्या माहितीचा मोलाचा वाटा होता. तेव्हापासून अंजनेरीचं महत्त्व नव्याने अधोरेखित झालं.

अंजनेरी दुर्मिळ वनस्पती

टिश्यू कल्चरने ‘खुरपुडी’चे जतन होणे अशक्य


अंजनेरी पर्वतावरील सर्वच दुर्मिळ वनस्पती आपण टिश्यू कल्चरने जतन करू शकत नाही. जर त्या टिश्यू कल्चरने वाढवल्या तर त्यांची जी पर्यावरणीय भूमिका आहे, त्यांच्यावर अवलंबून असलेले जे कीटक आहेत, जमिनीतले जे जीव आहेत, त्या सगळ्यांना त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे ज्या जागी ते वाढले आहेत, त्याच जागी त्यांचं संरक्षण करून वाढवणं महत्त्वाचं आहे. मग जुई यांनी वन खात्याला सांगितलं, की पर्यटनामुळे अंजनेरीवरील वनस्पतींचं जे नुकसान होतं ते आपण कमी करायला हवं. त्यातून अनेक सूचना पुढे आल्या. लोकांच्या पायदळी तुडवून जे वनस्पतींचं नुकसान होतं ते रोखणे आवश्यक आहे. लोकांचा जेथून पायरव होतो, तेथील जमीन कडक होत जाते. ती एक पायवाट तयार होते. त्यावर कोणतीही झाडं जगू शकत नाहीत आणि बिया पडल्या तर त्या रुजूही शकत नाहीत. तसं होऊ नये म्हणून रस्ते आखणे महत्त्वाचे आहे. यात आता कुठे काही प्रमाणात यश आलं आहे. दुसरी सूचना म्हणजे, लोकं अंजनेरीवर जाऊन वनस्पती काढून आणतात ते रोखणे आवश्यक आहे. ते रोखण्यासाठी पर्यटकांबरोबर गाइड पाठवायचे. त्यातून लोकांना हे गाइड माहितीही देतील आणि काय करू नये, हेपण सांगतील. तिसरी सूचना म्हणजे गुरं चारणं. अंजनेरी पर्वतावर गुरे चारणे मोठ्या प्रमाणावर आहे. जर गुरे चारणे बंद केले तर गवत मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे इतर वनस्पती वाढणार नाहीत. त्यामुळे गुरे चारणे पूर्ण बंद करता येणार नाही. तेथे परिसरातील वीस-पंचवीस गावांतील जनावरं या पर्वतावर चरण्यास आणली जातात. त्यामुळे ही गायरान जमीन आहे, तर ती फक्त ग्रामस्थांनीच वापरायला हवी. इतर गावांतील जनावरांना तेथे मनाई करावी. लोकांना पूर्णपणे न तोडता, लोकांची उपजीविका सांभाळून या गोष्टी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

‘खुरपुडी’ जपली नाही तर ती जगातूनच नामशेष होण्याचा धोका


अंजनेरीवर जुई यांनी एक वर्षच अभ्यास केला. खरं तर अशा प्रकारचा अभ्यास तीन ते चार वर्षे असायला हवा. कदाचित वन खात्याकडे तेवढा निधी नसेल; पण वर्षभराचा अभ्यास जुई यांनी केला. त्यातून सुमारे ३५५ वनस्पतींचा शोध घेतला. यातील निम्म्या वनस्पती अशा होत्या, ज्या स्थानबद्ध म्हंटल्या जातात. त्या एखाद्या विशिष्ट ठिकाणीच सापडतात. जसे सह्याद्री पर्वतरांगेला हॉटस्पॉट म्हंटले जाते, जेथे अनेक वनस्पती, पशू-पक्षी निर्माण झाले आणि मग ते इतरत्र विखुरले गेले. मग तुम्ही सह्याद्री सोडून दुसरीकडे कुठेही गेलात तरी तुम्हाला तशा वनस्पती कुठेच सापडणार नाहीत. अशा स्थानिक वनस्पती जवळपास १२० ते १२५ आहेत. त्यापैकी ३३-३४ वनस्पती अशा आहेत, ज्याला ‘आरईटी’ | Rare Endangered Rhreatened species | असे म्हंटले जाते. आठदहा वनस्पती अशा आहेत, की त्या गंभीर धोकादायक स्थितीत (Critically Endangered Species) आहेत. म्हणजे आता जर काही केलं नाही तर त्या जगातूनच नामशेष होतील. ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ | Ceropegia Anjanerica | अशी वनस्पती आहे, की जी पृथ्वीतलावरच फक्त अंजनेरीच्या एक स्क्वेअर किलोमीटर चौकानातच सापडते. एखादी आग लागली, एखादा वणवा पेटला, तर ही वनस्पतीच नाहीशी होईल.

‘खुरपुडी’ला धोका अतिरेकी विकासाचा


खुरपुडी नैसर्गिक आपत्तीने नष्ट होण्याचा धोका आहेच, पण अतिरेकी विकासामुळे नक्कीच ही खुरपुडी नाहीशी होईल. या विकासाच्या नावाखाली एखादा रोडच बनला तर मग काही खरं नाही. यात राजकारण असं आहे, की मुळेगावहून रस्ता येऊ शकतो. अंजनेरीच्या ग्रामस्थांना असं वाटतं, की जर मुळेगावहून रस्ता आला तर आमचं पर्यटनच संपेल. त्यामुळे ते अजून झालेलं नाही. मात्र, ते कोणत्याही क्षणी होऊ शकतं, अशी भीतीही व्यक्त केली जाते. मात्र, त्याला विरोध व्हायला हवा, असं जुई यांचं ठाम मत आहे. कारण रस्ता कुठे गरजेचा आहे, जर एखादं गाव डोंगरावर असेल आणि तेथील एखादी महिला आजारी पडली किंवा ती गर्भवती असेल तर तिला दवाखान्यात नेता येऊ शकेल, असा रस्ता जरूर करावा; पण अंजनेरीवर कुठलीही वस्ती नाही. अंजनेरीवर लोकांना कशाला रस्ता हवा, तर अंजनीमाता व हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी. जर दर्शनच घ्यायचं असेल तर अंजनीमाता, हनुमानाच्या मूर्तीची पायथ्यालाही प्रतिष्ठापना केली आहे. तेथे दर्शन घेता येईल. जर अंजनेरीवरच जायचं असेल, तुमची तेवढी श्रद्धा, क्षमता असेल तर मग डोंगर चढा.

कन्झर्वेशन बायोलॉजीवर जुई फोकस करणार


जुई टिल्लू आता कन्झर्वेशन बायोलॉजीत | Consrvation Biology | काम करण्याचा विचार करीत आहेत. मानवाने फार पूर्वीपासून जंगलाचं कमीत कमी नुकसान केलं किंवा जंगलाच्या बरोबरीने जगण्याचा तरी प्रयत्न केला. त्यातून माणसाने त्याच्या अनुभवातून नैसर्गिक पद्धतीने जंगलांचं संवर्धनच केलं आहे. त्याच्या या ज्ञानाची जंत्री गोळा करणं गरजेचं आहे. जुन्या व्यवस्थापनाच्या नोंदी करण्याचा जुई यांचा प्राधान्याने विचार आहे. आता ‘कम्युनिटी फॉरेस्ट राइट्स’ बरेच मिळालेले आहेत. बऱ्याच गावांना सामूहिक जंगल हक्क मिळाले आहेत; पण त्यांना हे माहीत नाही, की आता या जंगलाचं करायचं काय? याला पुढे कसं न्यायचं? त्यासाठी जंगलं पुनर्जीवित कशी करता येतील, यावर काही करता येईल का, यावर जुई विचार करीत आहेत. त्याचबरोबर वनौपजीव असलेला मोह जो काढला जातो, तो दारूसाठीच वापरला जातो. स्थानिक लोकं जेव्हा मोह काढतात, तेव्हा सिझनमध्ये त्याला दहा-बारा रुपये भाव मिळतो. सिझन जसजसा पुढे जातो, तसतसा ६० ते ८० रुपयांपर्यंतही दर मिळतो. जुई यांचा प्रयत्न असा आहे, की लोकांनी एकत्र यावं, तो साठवून ठेवावा आणि योग्य वेळी त्याची विक्री करावी. त्यामुळे त्यांना चांगला दर मिळेल. अर्थात, त्याचे काही धोकेही आहेत. त्यावरही त्यांनी उपाय योजले आहेत.

चिमुकल्या इरानेही शोधल्या शहरातल्या ५१ खाद्य वनस्पती


एकूणच टिल्लू दाम्पत्य पर्यावरणातच रममाण असल्याने त्यांची चिमुकली इरा तरी कशी मागे राहील… ती आता सातवीत आहे. तिने एनसीएससी | NATIONAL CHILDREN’S SCIENCE CONGRESS | या संस्थेची एक परीक्षा दिली होती. ती Science, Technology and Innovation for a clean, green and healthy nation या विषयावर होती. म्हणजे पर्यावरणाच्या वेगवेगळ्या घटकांवर अभ्यास करून त्याचा प्रकल्प सादर करायचा असतो. तिला त्यात आवड होतीच. तिने नाशिक शहरातील रस्त्याच्या किनारी, खुल्या भूखंडांवर वेगवेगळी झाडं उगतात. त्यात काही खाद्य वनस्पतीही असतात. त्या वनस्पती कोणकोणत्या आहेत, त्याचा अभ्यास इराने केला. आश्चर्य म्हणजे तिने त्यातून ११० प्रजातींची नोंद केली. त्यापैकी ५१ प्रजाती अशा आहेत, की त्या आपण खाऊ शकतो. तिची आई जुई यांनी २०१३-१४ मध्ये त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये सव्वाशे रानभाज्यांची नोंद घेतली होती. त्याच धाटणीवर इराने शहरातल्या खाद्य वनस्पतींची नोंद घेतली. बाहेरून जो भाजीपाला येतो तो विषयुक्त असतो. तो स्वीकारण्यापलीकडे आपल्याकडे अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे स्थानिक जर भाज्या खायच्या असतील तर त्या नैसर्गिकपणे वाढलेल्या वनस्पती अधिक चांगल्या असतात. फक्त त्या व्यवस्थित धुऊन घेतल्या पाहिजेत. बाकी कोणतीही रसायनं त्यावर नसतात. त्यातून आपल्या शरीराला कॅल्शियम खूप मिळतं. असंच एक ‘बोखरू’ नावाचं झाड आहे, ती एक रानभाजी आहे. ती रस्त्याची किनारीपण वाढते. ती जर खाल्ली तर आपल्याला त्यातून तब्बल दीड ग्रॅम कॅल्शियम मिळतं. आपण औषधाचा नियमित डोस घेतो, तो केवळ ३०० मिलिग्रॅम असतो. बोखरू तर त्यापेक्षा अनेक पटींनी उत्तमच मानायला हवं. त्यामुळेच चिमुकल्या इराचं हे काम शहरी माणसांसाठी पथदर्शीच म्हणायला हवं.

अंजनेरीवरील एक श्रावणी ट्रेक

Follow on Facebook Page

Read more at:

बिबट, बिबट्या (Leopard) प्राण्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी
All Sports

बिबट, बिबट्या (Leopard) प्राण्याविषयी न ऐकलेल्या गोष्टी

February 13, 2023
आशियात चित्ता नामशेष का झाला?
All Sports

आशियात चित्ता नामशेष का झाला?

February 14, 2023
अजित बर्जे जीवनशैली
Environmental

अजित बर्जे यांची जीवनशैली… आनंदी जीवनाची ‘कारवेल’

August 31, 2021
शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट
Environmental

शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट

February 22, 2023
पर्यावरणपुरुष : श्रीकांत नावरेकर
Environmental

पर्यावरणपुरुष : श्रीकांत नावरेकर

December 14, 2021
पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी
Environmental

पक्ष्यांना त्यांचं आकाश देणारी पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी

December 8, 2021
Tags: अंजनेरी दुर्मिळ वनस्पती
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
गौतम भटेवरा

गौतम भटेवरा यांच्या घरातल्या कचऱ्याचं होतं सोनं...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

CONTENT

  • All Sports
  • Women Sports
  • Cricket
  • Tennis
  • Environment
  • Jagjit Singh Gazal
  • Online Chess

INFORMATION

  • Sports History
  • About Us
  • Sports Quiz
  • Inspirational Sports Story

    SOCIAL MEDIA

    • Disclaimer
    • Privacy Policy
    • Home
    • About US
    • Gallery
    • Contact

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    No Result
    View All Result
    • Home
    • Cricket
    • All Sports
    • Inspirational story
    • Online Chess Puzzle
    • Raanwata
    • Video
    • sports quiz

    © 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

    error: Content is protected !!