All SportsCricketSports ReviewVirat Kohli

विराट कोहली प्रथमच सोसला विरह- बायकोपासून की शतक करण्यापासून?

विराट कोहली प्रथमच सोसला विरह- बायकोपासून की शतक करण्यापासून? प्रत्येक मोसमात शतकांचा धडाका लावणाऱ्या विराट कोहलीसाठी Virat Kohli | 2019 हे वर्ष तसे वांझोटेच म्हणावे लागेल. कारकिर्दीत आतापर्यंत त्याने ७० शतके झळकावली आहेत. हा वेग पाहता लवकरच विराट कोहली शतकांचे शतक करील अशी अटकळे बांधली जात असतानाच यंदाचे वर्ष त्याच्यासाठी निराशाजनक ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीला एकही शतक न झळकावलेल्या विराटला करोना विषाणूच्या प्रकोपाने पुढेही संधी मिळेल की नाही, हा प्रश्नच आहे. त्यामुळे यंदा त्याला शतकासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार की शतकाविना राहावे लागणार हे करोनाच्या नियंत्रणावरच अवलंबून असेल. जर यंदा स्पर्धा झाल्याच नाहीत तर कोहलीला कारकिर्दीत प्रथमच शतकी खेळीचा विरह सहन करावा लागणार आहे.

विराटला 2020 मध्ये शतकासाठी मोठा विरह सहन करावा लागणार आहे.

भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार विराट कोहलीला गेल्या सहा वर्षांत कधीच शतकासाठी फारशी वाट पाहावी लागलेली नाही. मात्र, यंदाचे वर्ष त्याच्यासाठी भयंकर त्रासदायक ठरत आहे. यंदाच्या २०२० या वर्षात त्याला फॉर्म टिकवता आला नाही आणि दुसरे म्हणजे करोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण क्रीडाविश्वच ठप्प झालं आहे. त्यामुळे पूर्वीचा जोश पुन्हा आणण्यासाठी त्याला लवकर संधीही मिळणार नाही. कारण जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेच रद्द झाले आहेत. त्यामुळे नव्या वर्षात विराट कोहली याला शतक ठोकण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. किंबहुना त्याला खेळपट्टीवर उभे राहण्याची संधीही मिळते का, यावरच प्रश्नचिन्ह आहे.

यंदाची सर्वोच्च धावसंख्या ८९


कोहली एकमेव नाही, ज्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्याला २०२० मध्ये ज्या संधी मिळाल्या, त्याचं त्याला सोनं करता आलेलं नाही. आता हेच पाहा ना, या वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तीन प्रकारात कोहलीच्या वाट्याला एकूण १६ वेळा फलंदाजीची संधी आली आहे. या १६ डावांमध्ये एकदाही तो शतकाच्या जवळपासही पोहोचू शकलेला नाही. या संपूर्ण डावांत त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे ८९. ही एकमेव ८९ धावांची खेळी त्याने बेंगलुरू येथे १९ जानेवारी २०२० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात केली होती. दिग्गज खेळाडूंच्या वाट्याला असा बॅडपॅच येतच असतो, पण यंदाचा बॅडपॅच कोहलीसाठी भयंकर म्हणावा लागेल. कारण त्याला यातून सावरण्याची संधी फारशी मिळण्याची तूर्तास तरी दिसत नाही. कारण करोनाचे सावट जगावर गहिरे होत असल्याने वर्षअखेरपर्यंत क्रीडा स्पर्धा होतील की नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही.

दहा वर्षांत प्रथमच विराट कोहली शतक करण्यापासून वंचित


२०१० नंतर कोहलीच्या कारकिर्दीतली ही पहिलीच घटना आहे, ज्याने वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत एकाही आंतरराष्ट्रीय शतकाची नोंद केलेली नाही. कोहलीने २०२० मध्ये आतापर्यंत घरच्या मैदानावर म्हणजे मायदेशात श्रीलंकेविरुद्ध तीन टी२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत, तर न्यूझीलंडच्या दौऱ्यात चार टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने १६ डावांत केवळ ३०.४६ च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह ४५७ धावा केल्या आहेत. ही अगदीच निराशाजनक कामगिरी म्हणावी लागेल. अपेक्षा होती, की आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांत तरी त्याला जोश दाखविण्याची संधी मिळेल. मात्र, यातही दुर्दैव आड आलं. धर्मशाला येथे झालेला या मालिकेतील पहिलाच सामना पावसामुळे वाया गेला. उर्वरित दोन सामने तर करोना विषाणूच्या प्रकोपामुळे रद्द करण्यात आले. ही मालिका नंतर खेळविली जाणार आहे. मात्र, करोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण विश्वच लॉकडाऊन झाले असल्याने पुढे ही स्पर्धा होईल का, हाच खरा प्रश्न आहे. आयसीसीच्या आगामी कार्यक्रमांनुसार जूनजुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळेल. त्यानंतर आशिया कप स्पर्धा होईल. मात्र, या सर्व मालिका करोना महामारीच्या स्थितीवर अवलंबून आहेत. जर ही महामारी नियंत्रित झाली नाही, तर 2019 हे संपूर्ण वर्ष वाया जाईल.

७० शतकांचा मानकरी


विराट कोहली याने कारकिर्दीतले पहिले शतक कोलकात्यात 24 डिसेंबर 2009 रोजी श्रीलंकेविरुद्ध झळकावले होते. या कॅलेंडर वर्षातील हा नववा डाव होता, ज्यात त्याने शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला केवळ 2013 मध्ये शतकासाठी आठव्या डावापर्यंत वाट पाहावी लागली होती. कोहली गेल्या सहा वर्षांत जबरदस्त फॉर्मात होता. या कालावधीत 2014, 2015 आणि 2017 मध्ये तर त्याने वर्षाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय डावातच शतक ठोकले होते. मात्र, 2016, 2018 आणि 2019 मध्ये त्याला केवळ तिसऱ्या डावापर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. या आक्रमक कर्णधाराने २०१० पासून २०१९ पर्यंत म्हणजे दहा वर्षांत जानेवारीतच शतकांचा धडाका सुरू केला होता. मात्र, दोन वेळा त्याला (2011 आणि 2013) फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागली होती. कोहलीच्या नावावर आतापर्यत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक शतके (एकूण ३६) त्याने गेल्या चार वर्षांतच (2016 ते 2019 पर्यंत) झळकावलेली आहेत. या दरम्यान 2017 आणि 2018 मध्ये त्याने 11 शतकांचा रतीब घातला. मात्र, 2020 च्या सुरुवातीपासून त्याच्या बॅटची भूक मंदावली आहे. लौकिकाला साजेशी खेळी त्याला यंदाच्या वर्षात अद्याप साकारता आलेली नाही. त्याने 2020 मध्ये दोन कसोटी सामन्यांत केवळ 38 धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या होती केवळ 19.

कोहलीने या वर्षात आतापर्यंत सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यातील तीन सामन्यांत तो 50 धावांच्या पलीकडे पोहोचला खरा; पण अर्धशतकाचे रूपांतर शतकात करता आलेले नाही. खरं तर अर्धशतकाचे शतकात रूपांतर करण्यात कोहलीची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मात्र, 2020 मध्ये त्याला अद्याप असा करिश्मा करता आलेला नाही. त्याने सहा एकदिवसीय सामन्यांत 43 च्या सरासरीने 258 धावा केल्या आहेत. त्याने टी-20 चे सात आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात एकूण १६१ धावाच करू शकला. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे ४३. एकूणच कोहलीसाठी हे वर्ष ‘करोना’ आणि ‘करुणा’मय म्हणावे लागेल, ज्याला शतकासाठी मोठा विरह सहन करावा लागत आहे. कोहलीसाठी 2019 हे वर्ष जरी कठीण असले तरी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांनी विराट कोहलीची निवड आवडता फलंदाज म्हणून केली आहे. मियांदाद यांना त्याची फलंदाजी कमालीची भावते. तो ‘क्लीन हिटर’ म्हंटले आहे. या भारतीय कर्णधाराचे विक्रम खूप काही सांगून जातात, असंही ते कौतुकाने सांगतात.

‘‘मला कोणी विचारले, की भारतीय क्रिकेट संघात सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर मी विराट कोहलीचे नाव सांगतो. मला जास्त काही सांगण्याची गरज नाही. कारण त्याची कामगिरीच सर्व काही सांगते. लोकांनाही हे स्वीकारावे लागणार आहे. कारण त्याचे आकडेच सर्व काही बोलतात.’’

जावेद मियांदाद

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”71″]


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!