All SportsMount Everest series

काय आहे माउंट एव्हरेस्टचा इतिहास?

mount everest series part 1
  माउंट एव्हरेस्ट : शिखर की साहसाचं मखर? भाग- १ |   नेपाळमध्ये स्थानिक लोकं एव्हरेस्टच्या शिखराला ‘सगरमाथा’ म्हणतात.

|

kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
      www.linkedin.com/in/maheshpathade03    

  माउंट एव्हरेस्ट : शिखर की साहसाचं मखर? भाग- १ | 


हाडे गोठविणाऱ्या थंडीत एव्हरेस्ट सर करण्याचे मनसुबे बाळगणे सोपे नाही. केवळ थंडी एवढंच एकमेव कारण असतं तरी एव्हरेस्ट सर करणं किमानअंशी सोपं झालं असतं; पण तसं अजिबात नाही. पावलोपावली आव्हानांचा डोंगर तुमची परीक्षा पाहत असतो. सगळ्या यातनांचा सामना करून जेव्हा तुम्ही शिखर गाठता तेव्हा तो स्वर्गीय आनंदच म्हणायला हवा. जाणून घेऊया, काय आहे माउंट एव्हरेस्टचा इतिहास… नेपाळमध्ये स्थानिक लोकं या एव्हरेस्टच्या शिखराला ‘सगरमाथा’ म्हणतात. ‘सगरमाथा’ म्हणजे स्वर्गाचं शिखर! हे नाव नेपाळचे इतिहास अभ्यासक बाबुराम आचार्य यांनी १९३० मध्ये दिले होते. त्याचा शब्दशः अर्थ होतो आकाशाचा माथा. गगनमाथा, ढगाचं कपाळ असंही म्हंटलं तरी चूक ठरणार नाही. तुम्ही कितीही शिखरं सर करा, पण एव्हरेस्ट सर नाही केलं तर त्याला काही अर्थ नाही. सगळ्या शिखरांमध्ये सर्वोच्च शिखर एव्हरेस्टच आहे. बुद्धिबळाच्या पटावर सर्वांत शक्तिमान वजीर असतो. बुद्धिबळाच्याच भाषेत त्याला क्वीन म्हणतात. सर्व शिखरांमध्ये एव्हरेस्ट शिखरही डोक्यावर ताज परिधान केलेली एक महाराणीच आहे. तिबेटमध्ये या एव्हरेस्ट शिखराला ‘चोमोलंगमा’ Chomolungma | म्हणजे ‘पर्वतांची राणी’ म्हंटले आहे.

हे स्वर्गाचं शिखर गाठणं प्रचंड आव्हानात्मक आहे. त्यात हिमस्खलन Avalanches | हे सर्वांत मोठं आव्हान आहे. एव्हरेस्टवर सर्वाधिक मृत्यू हिमस्खलनानेच झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीनंतर बर्फाचा कडा अथवा दरड कोसळण्याच्याही Falling rocks | अनेक घटना घडल्या आहेत. ऑक्सिजन कमी असल्याने अतिथकवा किंवा निर्जलीकरणाचे Severe exhaustion/dehydration आव्हान हे मृत्यू होण्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते. याशिवाय आणखी इतरही अनेक आव्हाने आहेतच. या आव्हानांना तोंड देत आतापर्यंत ९६ देशांतील केवळ 4,587 गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले आहे. ही आकडेवारी फेब्रुवारी २०२० पर्यंतची आहे.

 

कसे पडले माउंट एव्हरेस्ट नाव?


ही पर्वतांची राणी सर्व शिखरांमध्ये सर्वोच्च आहे. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 18,513 फूट उंच आहे. मात्र, ही उंची मोजली कोणी? या पर्वताचे नाव ‘माउंट एव्हरेस्ट’ कसे पडले? माउंट एव्हरेस्ट या नावामागेही एक कहाणी दडलेली आहे. ब्रिटिशांच्या काळात ‘कांचनजंघाला’ Kanchenjunga | सर्वोच्च शिखर मानले जायचे. हे शिखर नेपाळ आणि सिक्कीम (भारत) यांच्या मध्ये आहे. मात्र, या शिखरापेक्षाही उंच शिखर नेपाळमध्ये आहे, याचा उलगडा नंतर झाला. ते शिखर होते पीक-१५ Peak XV |. जर पीक-१५ सर्वोच्च शिखर असेल तर त्याची उंची मोजणे आवश्यक होते. मात्र, ही उंची मोजायची कशी? म्हणून वेल्सचा एक सर्व्हेअर आणि भूगोलशास्त्रज्ञ जॉर्ज एव्हरेस्ट George Everest | याने या शिखराची उंची आणि ठिकाण अचूकपणे सांगितले. ही माहिती महत्त्वपूर्ण होती. पीक-१५ ला सर्वोच्च शिखर असल्याचं जगासमोर आणणारा जॉर्ज एव्हरेस्ट George Everest | होता. त्यामुळे त्याच्याच नावाने 1865 मध्ये या शिखराचं नाव ‘माउंट एव्हरेस्ट’ Mount Everest | असे ठेवण्यात आले. बाकी स्थानिक नावं तर वेगवेगळी होती. मात्र, ‘माउंट एव्हरेस्ट’ हे नाव आता जगभरात लोकप्रिय झालं आहे. जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म 4 जुलै 1790 रोजी झाला होता. 1830 ते 1843 या कार्यकाळात ते भारताचे सर्व्हेअर जनरल होते. ते 1862 मध्ये रॉयल जिओग्राफल सोसायटीचे ते उपाध्यक्षही होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी अशा काही उपकरणांना जन्म दिला, ज्याच्या उपयोगामुळे आजही सर्व्हे अचूकपणे नोंदवला जातो.

mount everest series part 1
तेन्झिंग नोर्गे Tenzing Norgye | याने २९ मे १९५३ मध्ये न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी Edmund Hillary | याच्या साथीने एव्हरेस्ट शिखरावर पहिले मानवी पाऊल ठेवले.

पहिला एव्हरेस्टवीर


एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी आता बऱ्यापैकी सुविधा आल्या आहेत. असे असूनही एव्हरेस्टवर चढाई करणे सोपे नाही. विचार करा, पन्नासच्या दशकात एव्हरेस्टच्या काठिण्यपातळीची कल्पना काय असेल? कल्पनाही करता येणार नाही, पण भारताच्या तेन्झिंग नोर्गे Tenzing Norgye | याने २९ मे १९५३ मध्ये न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी Edmund Hillary | याच्या साथीने एव्हरेस्ट शिखरावर पहिले मानवी पाऊल ठेवले. नोर्गे मूळचा नेपाळी गिर्यारोहक. १९३३ मध्ये नोकरीच्या शोधात तो दार्जिलिंगमध्ये आला आणि कायमचा भारतवासी झाला. त्याचे मूळ नाव नामग्याल वांगडी Namgyal Wangdi | नामग्याल वांगडी म्हणजे ‘धर्माचा भाग्यवान शिष्य.’ शेर्पा बौद्ध परिवारात जन्मलेल्या नोर्गेला पर्वतारोहणाचं प्रचंड वेड होतं. सुरुवातीला १९३५ मध्ये एव्हरेस्ट सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. त्या वेळी नोर्ग्ये कुली म्हणून या अभियानात सहभागी झाले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर नोर्ग्ये यांना बढती मिळाली. ते कुलींचे सरदार झाले. त्यामुळे ते एव्हरेस्टच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाले. स्वित्झर्लंडच्या गिर्यारोहकांनी १९५२ मध्ये एव्हरेस्टवर दक्षिणेकडून चढाई करण्याची मोहीम आखली होती. मात्र एकापाठोपाठ दोन्ही मोहिमा अयशस्वी ठरल्या. या दोन्ही मोहिमांमध्ये नोर्ग्ये त्यांच्यासोबत होते. अखेर १९५३ मध्ये ब्रिटिश एव्हरेस्ट मोहिमेत ते यशस्वी ठरले. त्या वेळी त्यांच्यासोबत एडमंड हिलरी होते. त्यांनी 29 मे 1953 रोजी सकाळी साडेअकरा वाजता एव्हरेस्टचं शिखर सर केलं. तेथे त्यांनी फोटो काढले आणि पुदिना खाल्ला. तब्बल 15 मिनिटे ते या स्वर्गाच्या शिखरावर होते. नोर्ग्ये श्रद्धाळू होते. बौद्ध परंपरेप्रमाणे त्यांनी त्या शिखराला प्रसाद अर्पण केला. या देदीप्यमान कामगिरीमुळे तेन्झिंग नोर्ग्ये एव्हरेस्टच्या इतिहासात अजरामर झाले. ते पहिले भारतीयच नाही, तर जगातील पहिले एव्हरेस्टवीरही ठरले. 1959 मध्ये भारताने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंग्लंड आणि नेपाळ सरकारनेही त्यांचा गौरव केला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक एव्हरेस्ट मोहिमा केल्या आहेत. एव्हरेस्टची निष्काम भावनेने सेवा करणाऱ्या या एव्हरेस्टवीराने वयाच्या 71 व्या वर्षी 9 मे 1986 रोजी अखेरचा श्वास घेतला. दार्जिलिंगमध्ये हिमालयन माउंटेनीअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये Himalayan Mountaineering Institute | तेन्झिंग नोर्ग्ये यांचा पुतळा आजही एव्हरेस्टवीरांना प्रेरणा देत उभा आहे.


एव्हरेस्टवर चढाईसाठी दोनच मार्ग


माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग नेपाळमधील दक्षिणेकडील आहे, तर दुसरा मार्ग तिबेटमधील उत्तरेकडील. तिबेटमधून जाणारा मार्ग म्हणजे उत्तरी मार्ग अधिक सोपा आहे, तर नेपाळमधील सोलखुम्भू भागातून जाणारा परंपरागत दक्षिणी मार्ग खूपच खडतर आणि दुर्गम आहे. या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाने एव्हरेस्ट मोहीम फत्ते करता येऊ शकते. तिबेटचा मार्ग सोपा असला तरी गिर्यारोहकांची पहिली पसंती नेपाळलाच असते. त्याची दोन कारणे आहेत, ती म्हणजे सुविधा आणि मार्गदर्शन. नेपाळमधून जाणारा मार्ग अतिशय अवघड आणि खडतर असला तरी तेथे सुविधा मुबलक आहेत. शेर्पांची मदतही सहजपणे उपलब्ध होते. याव्यतिरिक्त आणखी महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे नेपाळ सरकारकडून एव्हरेस्ट मोहिमेसाठी सहजपणे मिळणारी परवानगी. तिबेटच्या उत्तरेतील मार्गावरून चढाई करताना अनेक बाबींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे तेथे इतकी सहजपणे परवानगी मिळत नाही, जितकी नेपाळमधून मिळते. भारतीय गिर्यारोहक तर नेपाळलाच अधिक पसंती देतात. त्याचे मुख्य कारण असेही आहे, की पहिले गिर्यारोहक तेन्झिंग नोर्ग्ये यांनी न्यूझीलंडच्या एडमंड हिलरीसोबत एव्हरेस्टवर चढाई केली ती याच दक्षिण मार्गाने. २०१९ चा विचार केला तर या वर्षात नेपाळने ३८१ गिर्यारोहकांना परवानगी दिली, तर तिबेटकडून केवळ ६४ जणांना परवानगी दिली. हा फरक पाहिला तर लक्षात येते, की कुठे सहजपणे मंजुरी मिळते ते!


किती खर्चिक आहे एव्हरेस्ट चढाई?


हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कुणीही एव्हरेस्ट शिखर सर केलं, की कुणाच्याही मनात एक भावना आपसुकच उमटते, की आपणही अशीच कामगिरी करावी. पण ते तेवढे सोपे नाही. त्यासाठी केवळ शारीरिक क्षमता असून उपयोग नाही, तर आर्थिक बाबतीतही तितकंच सक्षम असावं लागतं. कारण छोटा-मोठा गडकिल्ला सर करायचा असेल तरी एका व्यक्तीला किमान पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अर्थात, या गड-किल्ल्यांवर सध्या तरी आपण मोफतच जातो. मात्र, एव्हरेस्टवर चढाई करायची असेल तर तुम्हाला आधी नेपाळ सरकारला शुल्क द्यावे लागेल. कारण नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्रोत या एव्हरेस्ट मोहिमांवरच अवलंबून आहे. जगातील सर्वांत उंच १४ शिखरांपैकी आठ फक्त नेपाळमध्ये आहेत. नेपाळमध्ये हिमालयाची तब्बल दोन हजार शिखरं आहेत. यातील 326 शिखरं गिर्यारोहकांसाठी खुली करण्यात आलेली आहेत. केवळ ही शिखरंच नेपाळच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानली जातात. नेपाळच्या एकूण जीडीपाचा चार टक्के पैसा या गिरिभ्रमणातूनच येतो. एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रत्येक गिर्यारोहकाला किमान २५ ते ३० लाख रुपये मोजावे लागतात. यात नेपाळ सरकारलाच सात लाखांपर्यंत शुल्क द्यावे लागते. युरोपीय देशांसह इतर देशांतील गिर्यारोहकांना येण्या-जाण्यासह अनेक बाबतीत प्रचंड खर्च येतो. आता तुलनेने तो कमी झाला असला तरी ३० लाखांपर्यंतचा खर्च एका गिर्यारोहकाला करावाच लागतो. २०१५ पूर्वी हा खर्च ५० लाखांपर्यंत जात होता. मात्र, नेपाळ सरकारने २०१५ नंतर शुल्क निम्म्याने घटवले आहे. आधी सुमारे 15 लाख 56 हजार रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागत होते. आता केवळ सात लाख रुपयांपर्यंत शुल्क मोजावे लागते. त्याचा परिणाम असा झाला, की एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची गर्दी इतकी वाढली, की दोनचार गड सर करणाराही एव्हरेस्टचं स्वप्न पाहू लागला. कारण सात जणांचा एक ग्रुप जर एव्हरेस्टवर चढाई करणार असेल तर त्यांना एकूण ७० हजार डॉलर शुल्क द्यावे लागते. अन्य खर्चही मग विभागूनच केला जातो. असं असलं तरी वैयक्तिक सुविधांसाठी खर्च विभागला जात नाही. तो प्रत्येकाला आपापल्या पातळीवर करावाच लागतो. त्यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन बाटली.


एव्हरेस्टविषयी हे वाचलं का?


  • माउंट एव्हरेस्ट’ सर करण्यासाठी ४० ते ६० दिवसांचा कालावधी लागतो.

  • एव्हरेस्ट सर करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यातलं सर्वांत कठीण आव्हान म्हणजे वेगवान वारे.

  • एव्हरेस्टवर सुमारे ३२१ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतात. दुसरे म्हणजे हाडे गोठविणारी थंडी. इथलं तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत असतं.

  • सुमारे ४०० गिर्यारोहकांनी आपला जीव गमावला आहे.

  • आतापर्यंत पाच हजारांवर लोकांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला आहे.

  • एव्हरेस्ट सर करणाऱ्या प्रतिदहापैकी एक व्यक्ती परत येत नाही.

  • एव्हरेस्ट चढाईत नैसर्गिक आपत्ती सर्वांत मोठा आघात ठरू शकते. 2014 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यात 16 लोकांचा मृत्यू झाला, तर 61 जण गंभीर जखमी झाले होते.

  • एव्हरेस्ट पर्वताचं वैशिष्ट्य म्हणजे शिखराची उंची दरवर्षी चार मिलिमीटरने वाढत आहे.

  • एव्हरेस्ट चढाईत अंगाला कापरं भरवणारा ‘स्पायडरमॅन’सारखा अंगावर उडी घेणारा कोळी आहे. त्याला ‘जम्पिंग स्पायडर’ Jumping Spider | असं म्हणतात. तो सुमारे २२ हजार फूट उंचावर आढळतो.

  • आपल्याकडे गड-किल्ल्यांवर गेलं तरी प्रचंड प्लास्टिक आणि इतर कचरा पाहायला मिळतो. एव्हरेस्टही त्याला अपवाद नाही. गिर्यारोहकांच्या निष्काळजीपणामुळे पर्वतावर तब्बल ५० टनांपेक्षा अधिक कचरा आहे.

  • अमेरिकेचा जॉर्डन रोमेरो Jordan Romero Everest | हा सर्वांत लहान एव्हरेस्टवीर ठरला. त्याने जून २००८ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याची किमया साधली. जगातील सर्वांत कमी वयाचा एव्हरेस्टवीर म्हणून हा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे. २०२० मध्ये तो २३ वर्षांचा झाला.

  • जगातील सर्वांत जास्त वयाच्या एव्हरेस्टवीराचा विक्रम जपानच्या यूइचिरो मियूरा Yuichiro Miura | यांच्या नावावर आहे. त्यांनी 23 मे 2013 रोजी एव्हरेस्ट सर केले होते. त्या वेळी त्यांचे वय होते 80 वर्षे. २०२० मध्ये त्यांनी 87 व्या वर्षात पदार्पण केले असून, अजूनही ते ठणठणीत आहेत.

  • माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी मार्च ते मे हा काळ उत्तम मानला जातो. या कालावधीत पाऊस नसतो, पण ऊन असते.

  • माऊंट एव्हरेस्टवर २०१५ या वर्षी एकही एव्हरेस्ट मोहीम होऊ शकली नाही. कारण २०१५ मध्ये नेपाळमध्ये भूकंप होण्याची पूर्वसूचना मिळाली होती.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!