CricketVanuatu

करोना नसलेल्या देशातलं क्रिकेट

cricket in vanuatu
Cricket in Vanuatu

|

kheliyad.sports@gmail.com
M. +91 80875 64549
     www.linkedin.com/in/maheshpathade03    

Vanuatu cricket | करोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगच लॉकडाउन झाले आहे. सगळीकडे हाहाकार उडाला आहे. जगभरातील क्रीडा स्पर्धांचा कल्लोळ तर एका क्षणात नि:शब्द झाला. विश्वातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यातून जणू २०२० हे वर्षच वजा झालं असताना एका देशात अचानक क्रिकेटचा कल्ला सुरू झाला. हा कल्ला अशा स्थितीत सुरू झाला, ज्या वेळी करोना विषाणूने संपूर्ण जगाला घट्ट विळखा घातला होता. जगण्या-मरण्याच्या या खेळात दुसऱ्या कोणत्या खेळाची अपेक्षा करणंच महाभयंकर आहे. तरीही हा महाभयंकर विचार एका देशाने केला आणि चक्क क्रिकेटचा सामना भरवला…

भुवया उंचावल्या ना…?

हा देश ‘तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खतम’सारखा क्रिकेटवेडा भारत नक्कीच नाही…

‘तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जूनून’ असं पराकोटीचं क्रिकेटप्रेम जपणारा पाकिस्तान तर नक्कीच नाही…

ज्याने क्रिकेटचे धडे दिले त्या साहेबांचं इंग्लंडही नाहीच नाही….

मैदानात शिव्यांची लाखोली वाहत खेळणारा कांगारूंचा ऑस्ट्रेलियाही नाही…

मग हा कोणता देश असेल?

डोकं भंजाळून गेलं असेल, पण नाही अंदाज बांधता येणार!

क्रिकेटच्या यादीत या देशाचं नाव शोधून शोधून वेडे व्हाल, पण तुम्हाला अजिबात सापडणार नाही.

हा देश आहे वानुआतू! Vanuatu | 

वानुआतू?

चक्रावला ना! कारण ज्या देशाचं नावही कधी ऐकलं नाही, त्या देशात क्रिकेटचं वारं वाहतंय यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. अशा देशात करोनाच्या विळख्यातही क्रिकेट खेळण्याची ओढ आश्चर्यकारकच म्हणावी लागेल.

Cricket in Vanuatu | हाच तो महिलांचा क्रिकेट सामना, ज्याने लॉकडाउन विश्वाचं लक्ष वेधून घेतलं.

आधी आपण वानुआतू समजून घेऊ, नंतर त्या देशाचं क्रिकेट…

दक्षिण प्रशांत महासागरात वसलेल्या अनेक बेटांचा समूह म्हणजेच वानुआतू देश. Vanuatu cricket | उत्तर ऑस्ट्रेलियापासून हा देश अवघ्या १७५० किलोमीटरवर आहे. इथे आधी मेलोनेशिया लोकांनी पाऊल ठेवलं. मुळात या बेटाला स्वतंत्र असं अस्तित्व अजिबातच नव्हतं. म्हणजे १९८० पूर्वी या बेटाला स्वत:ची ओळख नव्हती.

या बेटाचा शोध लागला १६०५ मध्ये. पोर्तुगाली नाविक फर्नांडिस डी क्विरोस Fernandes de Queirós | हा पहिला युरोपियन आहे, ज्याने या बेटाचा शोध लावला. तोपर्यंत हे बेट जगाला अनोळखीच होतं. १८ व्या शतकात इंग्लंड, फ्रान्सच्या साम्राज्यवादी धोरणामुळे या बेटावर वर्चस्व राखण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली.

अखेर या दोन्ही देशांनी संयुक्त सत्ता स्थापन केली. त्या वेळी या बेटाला न्यू हेब्रिड्स New Hebrides | म्हणूनच ओळखले जायचे. १९७० च्या दशकात या देशात स्वातंत्र्यलढे झाले आणि अखेर हा देश स्वतंत्र झाला आणि तो ‘वानुआतू’ म्हणून नावारूपास आला. ‘वानुआतूचा’ अर्थ मेलानेशियन भाषेत ‘कायमसाठी माझी भूमी’ (“Our Land Forever”).


हेही वाचा… चीन क्रिकेट का खेळत नाही?


या देशाला स्वातंत्र्य खूपच उशिरा मिळालं. ३० जुलै १९८० हा या देशाचा स्वातंत्र्यदिन. ब्रिटिशांनी जेथे जेथे सत्ता मिळवली तेथे तेथे क्रिकेटची छाप सोडली. वानुआतूही Vanuatu cricket | त्याला अपवाद नाही. मात्र, हा देश लोकांच्या ध्यानीमनी यायलाच मोठा काळ लोटला. हा देश मागासलेलाच राहिला. या देशात ख्रिश्चन हा सर्वांत मोठा धर्म. मात्र, तरीही हा देश फारसा विकसित झाला नाही.

या देशात डुक्कर हे धनाचं प्रतीक मानलं जातं आणि शिक्षण इथं अजिबात आवश्यक नाही. त्यामुळेच शाळेत विद्यार्थ्यांची हजेरी जेमतेमच असते.

वानुआतूचं क्षेत्रफळ १२ हजार १८९ वर्ग किलोमीटर. म्हणजे चार हजार ७०६ मैलांचं. महाराष्ट्रापेक्षा निम्म्याने कमी. बिस्लामा ही या देशाची राष्ट्रभाषा. फ्रान्स आणि इंग्लंडने हा देश सोडला तरी या देशांनी भाषा आणि संस्कृती काहीअंशी इथे रुजवली. त्यामुळे बिस्लामाबरोबरच फ्रेंच आणि इंग्रजीही या देशाच्या अधिकृत भाषा.

या देशाची लोकसंख्या आपल्या नाशिक जिल्ह्यापेक्षाही कमी. म्हणजे अवघी दोन लाख ७० हजार. ही २०१६ मध्ये नोंदली गेलेली जनगणना. या देशातला सर्वोच्च पर्वत माउंट तब्वेमसाना Mount Tabwemasana | त्याची उंची आहे १८७९ मीटर. प्रशांत महासागराने वेढलेल्या या देशाला सरकाता नदीचा Sarakata River | चमचमता काठही आहे.

असा हा सुंदर आणि शांत देश. मात्र, भौगोलिक वातावरणामुळे हा देश आतून नेहमी धगधगता असतो. म्हणजे जगातल्या सर्वांत सक्रिय ज्वालामुखींपैकी एक या देशात आहे. माउंट यासूर नावाचा हा ज्वालामुखी वानुआतूच्या ताना बेटावर आहे. वानुआतूच्या लोकांचं राष्ट्रीय खाद्य लॅपलॅप Laplap | आहे. हे खाद्य नारळाच्या दुधापासून बनवलं जातं. यू ट्यूबवर मी या खाद्याची रेसिपी पाहिली आहे. ते पाहतानाच तोंडाला पाणी सुटतं… असो.. तर असा हा वानुआतू देश.


साहेबांनी या देशावर आपली एक छाप सोडलीच, ती म्हणजे क्रिकेटची. आपल्याकडे जसे क्रिकेटवेडे लोक आहेत, तसेच तिकडेही आहेत. फरक एवढाच, की आपल्या वेडेपणाला आंतरराष्ट्रीय ओळख आहे, तर त्यांच्या वेडेपणाला अद्याप ती मिळालेली नाही. या देशाचा संघही आहे. विश्वास बसणार नाही, पण आठ हजार अधिकृत क्रिकेटपटू या देशात आहेत.

Vanuatu cricket | क्रिकेटशिवाय या देशात रग्बी आणि फुटबॉलही खेळला जातो. फुटबॉल खेळण्यामागे फ्रेंचांचा हात असू शकतो. या देशात महिला आणि पुरुषांचं प्रमाण पाहिलं, की महिलांना दुय्यम स्थान इथंही प्रकर्षानं जाणवतं. त्याचे कारण म्हणजे पुरुषांची संख्या महिलांपेक्षा अधिक आहे. दुसरे म्हणजे खेळाकडे पाहतानाही हा लिंगभेद डोकावतो. म्हणजे हेच बघा ना, व्हॉलिबॉल हा मुलींचा खेळ म्हंटला जातो, तर फुटबॉल पुरुषांचा.

अशा या वानुआतू देशात Vanuatu cricket | क्रिकेटची लोकप्रियता कमालीची आहे. उष्णकटिबंधीय देश असल्याने उन्हाळा भयंकर असतो. त्यामुळे एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान या देशात क्रिकेटचा मोसम असतो. वानुआतूमध्ये दहा क्रिकेट क्लब कार्यरत आहेत. ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा या देशाला ‘न्यू हेब्रिड्स’  New Hebrides | म्हणून ओळखलं जायचं.

स्वातंत्र्यापूर्वी १९०५ मध्ये या देशात क्रिकेटचे सामने होत होते. राजधानी पोर्ट व्हिलामध्ये स्वातंत्र्यापूर्वी अनेक दशकं क्रिकेट खेळला गेला. त्या वेळी क्रिकेटसाठी एकच मैदान होतं. ७० च्या दशकात या देशात आणखी एक मैदान तयार झालं. एकूण दोनच मैदाने या देशात आहे. त्यापैकी एक मैदान जवळच्याच इफेट बेटावर, तर दुसरे पोर्ट व्हिलापासून २० किलोमीटरवर.

१९९५ मध्ये वानुआतूला Vanuatu cricket | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे संलग्नत्व मिळाले. नि-वानुआतूनींच्या समूहामध्ये हा खेळ विशेष लोकप्रिय आहे. वानुआतूने २००१ मध्ये पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यांचा पहिला सामना होता टोंगा संघाशी. वानुआतूची आता क्रिकेटमधील वाटचाल सुरू झाली होती.

Vanuatu cricket |  आत्मविश्वासही मिळाला आणि २३ ते २९ सप्टेंबर २००५ मध्ये आयसीसी ईएपी क्रिकेट कप ICC EAP Cricket Cup | स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत वानुआतूला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यानंतर २००८ चा अपवाद वगळता ते दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होत राहिले.

२००९ मध्ये वानुआतूला Vanuatu cricket | आयसीसीमध्ये सहसदस्यत्व मिळाले. त्याच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे २०१० मध्ये वानुआतूने आठ देशांच्या वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला. सुरिनाम, जिब्राल्टर, बहामास, भूतान, जर्मनी, कुवेत, झांबिया या देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत वानुआतूने तिसरा क्रमांक मिळविला.

बीडीओ क्लब चॅम्पियनशिप ही या देशाची प्रथमश्रेणीतील स्पर्धा. साखळी पद्धतीने ही स्पर्धा होते. राजधानी पोर्ट व्हिला येथेच ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेची अंतिम फेरी ३० जुलैला होते. हा वानुआतूचा स्वातंत्र्यदिन. ज्या दिवशी फ्रान्स आणि इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवलं, त्या दिवशी या स्पर्धेची अंतिम फेरी कमालीची रंगते. या देशाचा अधिकृत संघ २००१ मध्ये जाहीर झाला.

Cricket in Vanuatu | वानुआतू देशातील क्रिकेटचे चाहते आणि खेळाडू.

पुरुषांबरोबरच महिलांचाही क्रिकेट संघ वानुआतूमध्ये अस्तित्वात आला. अर्थात, त्यासाठी २०११ हे साल उजाडावं लागलं. उशिरा दाखल झालेल्या महिला संघानेच वानुआतूचं क्रिकेटप्रेम जगासमोर आणलं, असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. त्याला कारणही तसंच आहे. २०२० हे वर्ष जवळज‌वळ सर्वच देशांसाठी काळं वर्ष म्हणजे ब्लॅक ईअर म्हणावं लागेल.

करोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण विश्वच लॉकडाउन झालं होतं. कोणत्याही देशात खेळाचा विचारही मनाला शिवत नव्हता. करोनाचा विळखा एप्रिलच्या मध्यात जवळजवळ संपूर्ण जगाला बसला असताना वानुआतूने Vanuatu cricket |  मात्र क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

करोनाच्या भयाने संपूर्ण विश्वातल्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या असताना हा कोणता देश आहे, ज्याला क्रिकेटची खुमखमी आहे? अर्थात, वानुआतूला त्याचं काहीही सोयरसुतक नव्हतं. कारण हा काही निवडक देशांपैकी एक आहे, जेथे करोनाचा शिरकावच झालेला नाही. त्यामुळे वानुआतूमध्ये सगळे व्यवहार सुरळीत सुरू होते.

वानुआतूचा एप्रिलपासूनच क्रिकेटचा मोसम सुरू होता. त्यामुळे त्यांच्याकडे महिलांच्या गटातील प्रथम श्रेणी क्रिकेटचा अंतिम सामना २५ एप्रिल रोजी सुरू होणार होता. दक्षिण प्रशांत महासागरातल्या उष्णकटिबंधीय बेटावरील वानुआतू Vanuatu cricket | हा विश्वातला एकमेव देश होता, जेथे क्रिकेटचा सामना होणार होता. विश्वात एकही लाइव्ह खेळ सुरू नव्हता.

हीच संधी साधून वानुआतूने संपूर्ण विश्वासाठी आपला घरचा क्रिकेट सामना सर्वांसाठी फेसबुकच्या माध्यमातून खुला केला. वानुआतूच्या फेसबुक पेजवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली. वानूआतू क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी शेन डेट्ज सर्वांना हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी आवाहन करीत होते.

आधी उपांत्य फेरी महिलांच्या दोन संघांमध्ये रंगणार होती. हे दोन संघ होते- टाएफा ब्लॅकबर्ड्स आणि पॉवर शार्क्स. यातील विजेता संघ अंतिम फेरीत मेले बुल्स या संघाविरुद्ध लढणार होता. याच दरम्यान पुरुषांचाही प्रदर्शनीय सामना खेळविण्यात येणार होता.

‘‘सध्या विश्वात वानुआतूमध्येच एकमेव क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. जे लॉकडाउनमध्ये घरात बसले आहेत, त्या सर्वांना थोडेसे को होईना आम्ही क्रिकेट दाखवू शकतो.’’
शेन डेट्ज, मुख्य कार्यकारी,
वानूआतू क्रिकेट संघटना

वानूआतू क्रिकेटच्या फेसबुकवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यासाठी मैदानावर चार कॅमेरे लावण्यात आले होते. या वेळी समालोचनाचीही खास व्यवस्था करण्यात आली होती. हे सगळं अद्भुतच होतं.

मार्चमध्ये याच वानूआतू देशाने करोना महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाउन केला होता. नंतर सहा एप्रिल रोजी भयंकर वादळ आलं. संपूर्ण देश लॉकडाउन केल्यामुळे या देशात करोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही.

नियोजनाप्रमाणे सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण पावसाने खोडा घातला. टाएफा ब्लॅकबर्ड्स आणि पॉवर शार्क्सदरम्यान होणारा उपांत्य सामना स्थगित करावा लागला.

वानुआतूमध्ये Vanuatu cricket | तर उत्साहाचे वातावरण होते. म्हणजे सामना नुकताच कुठे सुरू झाला नाही तोच काही मुलं मैदानात घुसली. सुरक्षा रक्षकांची संख्या अगदीच नाममात्र होती. त्यामुळे सामना थांबवावा लागला होता.

वानूआतू क्रिकेटच्या Vanuatu cricket | फेसबुक पेजवर क्रिकेटप्रेमींनी हौशीने भेट दिली. वेगवेगळ्या वेळांमध्ये या फेसबुक पेजवर तीन हजारपेक्षा अधिक लोकांनी भेट दिल्याची नोंद आहे. सुरुवातीला पुरुषांच्या दहा षटकांचा प्रदर्शनी सामना झाला. त्यानंतर महिलांचा टी-२० अंतिम सामना खेळविण्यात आला. यात मेले बुल्स संघाने विजेतेपद जिंकले.

वानुआतू नावाचाही एक देश आहे, जेथे क्रिकेटची लोकप्रियता आपल्यापेक्षा तसुभर जास्तच आहे, हे या निमित्ताने समोर आले. शिक्षणाची आस या देशाला फारशी नसली तरी जगातील सर्वच देशांपेक्षा तो पुढेच आहे.

अहो, ज्या करोनाने संपूर्ण विश्वाला विळखा घातला, त्यातून पुढारलेले देशही सुटले नाहीत, तेथे वानुआतूने खबरदारी घेत करोनाला देशाबाहेर ठेवले. उच्च शिक्षण घेऊनही ज्या देशातील नागरिक प्राथमिक नियम पाळत नाहीत, ते करोनाच्या भीतीने घरात बंदिस्त झाले आणि ज्या देशाला क्रमिक पुस्तकाचं शिक्षण महत्त्वाचं वाटत नाही, त्या वानुआतूने जगण्याच्या शिक्षणातून मोकळा श्वास घेतला.

करोनाला शिरकावही करू न देणाऱ्या या देशात भलेही विश्वविजयी सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, लोबुशेन, विराट कोहली, रोहित शर्मासारखे खेळाडू नसतील, पण करोनावर मात करणारी सांघिक कामगिरी कौतुकास्पद आहे, जी या जगातील कोणत्याही देशाला साधता आलेली नाही. म्हणूनच हा देश ऐटीत क्रिकेटची स्पर्धा खेळू शकतो, रस्त्यावर मुक्तपणे वावरू शकतो, आलिंगन देऊ शकतो.

ज्या सोशल डिस्टन्सच्या गप्पा आज सगळं जग करतंय, त्या देशांना फेसबुकसारख्या सोशल मीडियावर हाच वानुआतू देश थेट क्रिकेटचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवतोय. ही साधारण कामगिरी नक्कीच नाही.

वानुआतूमध्ये कावा हे मद्य अतिशय लोकप्रिय आहे. या मद्याची धुंदी अन्य कोणत्याही मद्यात नाही, असं म्हणतात. कावा की क्रिकेट यापैकी वानूआतूवासीयांना एकच काही तरी निवडायचं असेल तर कदाचित ते क्रिकेटच निवडतील.

कारण कावापेक्षाही या देशात क्रिकेटची कावा किती रोमारोमात भिनली आहे, याचा प्रत्यय या विश्वाने लॉकडाउनमध्ये अनुभवलाच आहे. या देशाच्या जगण्यातही क्रिकेट, वागण्यातही क्रिकेट… असं क्रिकेट की ज्यांनी करोनालाही सीमापार धाडले आहे…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!