Literateurआठवणींचा धांडोळा

या कवीने अर्जुनाला का म्हंटले अहंकारी धनुर्धारी?

प्रियदर्शन हे संवेदनशील मनाचे प्रतिभावान कवी. त्यांची अहंकारी धनुर्धर (अहंकारी धनुर्धारी) ही कविता या संवेदनशील जाणिवेचं उत्तम उदाहरण आहे. अर्जुन म्हणजे एकाग्रता, अर्जुन म्हणजे वीरश्री, अर्जुन म्हणजे आदर्श शिष्य, विद्यार्थी, अर्जुन म्हणजे सर्वोत्तमातील सर्वोत्तम… गुणसंपन्नतेने समृद्ध अशीच अर्जुनाची प्रतिमा चितारण्यात आली आहे. पण तो अहंकारीही ही अर्जुनाची दुसरी बाजू का कोणी लक्षात घेतली नाही… पण प्रियदर्शन यांनी ही त्याची दुसरी नकारात्मक बाजू प्रकाशात आणली.त्यांनी अर्जुनातला अहंकार नेमक्या शब्दांत टिपला आहे. हा अहंकार प्रियदर्शनसारख्या एखाद्या संवेदनशील जाणिवेच्या कवीलाच लक्षात येईल.

अहंकारी धनुर्धारी

ज्या प्रसंगाचा आधार घेऊन प्रियदर्शन यांनी अर्जुनाला अहंकारी ठरवलं, तो प्रसंग कोणता आहे हे इथे आधी नमूद करतो. ही कथा अनेकांनी ऐकली, वाचली असेल. पण ही कविता समजून घेण्यापूर्वी ती पुन्हा येथे समजून घ्यायला हवी. ही कथा आजपर्यंत सर्वोत्तम आदर्श शिष्य किंवा विद्यार्थी कसा असावा, यासाठी सांगितली जात होती. पण प्रियदर्शन यांची कविता वाचल्यानंतर कदाचित अहंकारी कसं नसावं यासाठीही ही कथा मुलांना नव्याने सांगावी लागेल…

ती कथा अशी आहे ः

द्रोणाचार्य धनुर्विद्येतील सर्वश्रेष्ठ गुरू मानले जातात. असाही एक आरोप आहे, की अर्जुनाप्रती द्रोणाचार्य पक्षपातीपणा करायचे. पण द्रोणाचार्यांनी अर्जुनाला जे शिकवलं तेच इतरांनाही शिकवलं. मात्र, शिकला फक्त अर्जुन. इतरांना द्रोणाचार्यांनी शिकवलेली सगळीच विद्या अर्जित करता आली नाही. असो. एके दिवशी द्रोणाचार्य धनुर्विद्येसंबंधी सांगत होते. व्यावहारिक ज्ञान मिळावं या हेतूने त्यांनी सर्व शिष्यांना बाहेर बोलावलं. एका वृक्षावर सर्वांत उंचावर पोपट बसलेला होता. (काही कथासूत्रांत, हा पोपट खरा नव्हता, तर त्याची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. अर्थात, खरा किंवा खोटा कसाही असला तरी कथेचा भावार्थ बदलत नाही हे इथे आवर्जून नमूद करतो) ते प्रत्येक शिष्याला म्हणाले, पोपटाच्या डाव्या डोळ्यावर सर्वांनी नेम धरा. सर्वांनी प्रत्यंचा ताणली आणि द्रोणाचार्यांच्या पुढील आदेशाची वाट पाहू लागले. द्रोणाचार्यांनी काही वेळ आदेश दिला नाही. त्यामुळे बहुतांश शिष्य लक्ष केंद्रित करू शकले नाहीत. प्रत्यंचा ताणून बाण सज्ज ठेवणं खूप थकविणारं असतं. काही मिनिटांनी द्रोणाचार्यांनी प्रत्येक शिष्याला विचारलं, तुम्हाला काय दिसत आहे, बहुतांश शिष्यांनी सांगितलं, पाने, फुले, पक्षी, आकाश… ही उत्तरं ऐकल्यानंतर द्रोणाचार्य मनातल्या मनात छद्मीपणे हसले. त्यांचं या उत्तरांनी अजिबात समाधान झालं नाही. जेव्हा अर्जुनाची वेळ आली, तेव्हा द्रोणाचार्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. अर्जुन म्हणाला, मला पोपटाचा फक्त डावा डोळा दिसत आहे. दुसरे काहीही नाही. आणि द्रोणाचार्यांनी अर्जुनाला आदेश दिला, लक्ष्य भेद अर्जुना… त्या आदेशासरशी अर्जुनाने पोपटाच्या डाव्या डोळ्याचा वेध घेतला…

उत्तम शिष्याची ही लक्षणे आहेत. ज्या लक्ष्याचा वेध घ्यायचा आहे, त्या लक्ष्याशिवाय दुसरं काहीही पाहू नये. याला म्हणतात कमालीची एकाग्रता. थोडक्यात म्हणजे गणिताचा अभ्यास करायचा तर भूगोलातल्या नकाशावर उगाच बोटं फिरवू नयेत. जे शिकवलं ते लक्षात ठेवणं हे आदर्श शिष्याचं आणखी एक उदाहरण या प्रसंगातून मिळतं. पण प्रियदर्शन स्वतंत्र दृष्टीचे संवेदनशील कवी. ते या सर्व संकल्पनांनाच छेद देतात आणि आपल्याला नवी दृष्टी देतात. अर्जुन असा नाही, जो तुम्ही चितारला आहे. हा अर्जुन अहंकारी धनुर्धर आहे, निर्दयी आहे…. तो कसा, तर ही कविता आता वाचायला हवी…

प्रियदर्शन यांच्या अहंकारी धनुर्धर या कवितेची सुरुवातच हे स्पष्ट करते…

सिर्फ़ चिड़िया की आंख देखते हैं अहंकारी धनुर्धर

आंख के भीतर बसी हुई दुनिया नहीं देखते

अर्जुना, तुला फक्त त्या पक्ष्याचा डोळा दिसतो, पण त्या डोळ्यांत त्याचं स्वतःचं जग नाही दिसत. प्रत्येकाच्या डोळ्यांत अनेक स्वप्ने दडलेली असतात. ही स्वप्ने आपल्या कुटुंबाच्या भविष्याची असतात. रामायणातही एक प्रसंग असाच काहीसा आहे. राजा दशरथ जेव्हा शिकारीला जातो तेव्हा त्याचा बाण चुकून श्रावणबाळाला लागतो. ज्या अंध माता-पित्याची जबाबदारी श्रावणावर असते त्याच्याच प्राण दशरथाच्या बाणाने घेतला. आपला मुलगा गेला हे ऐकून त्याच्या मातापित्यानेही प्राण सोडले. एका बाणाने एक परिवार उद्ध्वस्त झाला. ज्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेण्यासाठी अर्जुनाने प्रत्यंचा ताणली त्या पक्ष्याच्याही डोळ्यांत किती तरी स्वप्ने दडलेली असतील. पण अर्जुनाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्याला फक्त डोळा दिसत असतो. अर्जुन अहंकारी धनुर्धारी का आहे, हे या ओळींतून स्पष्ट केलं आहे.

प्रियदर्शन यांनी या पक्ष्याचं विश्व इतकं छानपैकी उलगडलं आहे… ते म्हणतात…

नहीं देखते विशाल भरा-पूरा पेड़

नहीं देखते अपने ही वजन से झुकी हुई डाली

नहीं देखते पत्ते जिनके बीच छुपा होता है चिड़िया का घोंसला

नहीं देखते कि वह कितनी मेहनत से बीन-चुन कर लाए गए तिनकों से बना है

नहीं देखते उसके छोटे-छोटे अंडे

जिनके भीतर चहचहाहटों की कई स्निग्ध मासूम संभावनाएं

मातृत्व के ऊष्ण परों के नीचे

सिंक रही होती हैं

एकाग्रता असावी, पण ती इतकी आंधळी आणि निर्दयी नसावी, हे प्रियदर्शन यांनी इथं सांगितलं आहे.. तो वृक्ष, त्याला लागलेली पानेफुले, फळे हे या पक्ष्याचं विश्व आहे. जसं मानवाच्या डोळ्यांत घर, पैसा, गाडी, बंगला, छानसे रस्ते, नदी वगैरे असतं. तसं त्या पक्ष्याचंही हे विश्व आहे. या वृक्षाच्या पानांमध्ये त्याचं स्वतःचं एक घरटं असतं. या घरट्यासाठी त्याने घेतलेले कष्ट आहे. एकेक काडी इवल्याशा चोचीत धरून त्याने हे घरटं विणलेलं असेल. या घरट्यात त्याची छोटी छोटी अंडी आहेत. या अंड्यांतून लवकरच सुंदर पिले बाहेर येतील आणि या निरागस पिलांच्या किलबिलाटांनी झाड प्रफुल्लित होईल. म्हणूनच पक्ष्याने आपल्या ऊबदार अंड्यांखाली ही अंडी घेतली आहे. प्रियदर्शन यांनी पक्ष्याच्या या विश्वाकडे लक्ष वेधले आहे. अहंकारी धनुर्धारी अर्जुना, तुला हे सगळं दिसलं का नाही. तुला फक्त त्या पक्ष्याचाच डोळा का दिसला.

वे देखते हैं सिर्फ़ चिड़िया

जो उनकी निगाह में महज एक निशाना होती है

अपनी खिंची हुई प्रत्यंचा और अपने तने हुए तीर

और चिड़िया के बीच

महज उनकी अंधी महत्त्वाकांक्षा होती है

अर्जुना, तुला फक्त पक्षीच दिसतो हे किती निर्दयपणाचं लक्षण आहे… तुझ्या दृष्टीने तो पक्षी म्हणजे केवळ तुझं एक लक्ष्य आहे. तुझी शिकार आहे. त्याला स्वतःचं आयुष्य आहे याचं तुझ्या लेखी काहीही महत्त्व नाही. तो पक्षी केवळ तुझं लक्ष्य आणि भक्ष्य. प्रत्यंचा ओढून बाणाचा नेम पक्ष्यावर धरणाऱ्या अर्जुनाच्या या वृत्तीला अर्जुनाची एकाग्रता वगैरे काही नाही, तर ती एक आंधळी महत्त्वाकांक्षा आहे, जी एका निष्पाप जिवाला संपविणारी आहे… म्हणूनच प्रियदर्शन अर्जुनाला अहंकारी धनुर्धारी म्हणतात.

जो नहीं देखती पेड़, डाली, घोंसला, अंडे

जो नहीं देखती चिड़िया की सिहरती हुई देह

जो नहीं देखती उसकी आंख के भीतर नई उड़ानों की अंकुरित होती संभावनाएं

वह नहीं देखती यह सब

क्योंकि उसे पता है कि देखेगी

तो चूक जाएगा वह निशाना

जो उनके वर्षों से अर्जित अभ्यास और कौशल के चरम की तरह आएगा

जो उन्हें इस लायक बनाएगा

कि जीत सकें जीवन का महाभारत

अर्जुन इतका अहंकारी धनुर्धारी झाला आहे, की त्याला तो वृक्ष, त्या फांद्या, ते घरटे, तिची अंडी याच्याशी काहीएक कर्तव्य नाही. फक्त तो डावा डोळा त्याला भेदायचाय, पण याच डोळ्यांमध्ये त्याची सगळी स्वप्ने दडलेली आहेत. उंच भरारी घेण्याची त्याचे लक्ष्य अर्जुनाला अजिबात दिसत नाही. अर्जुन हे मिथक आहे, पण आजही या कथेतून बोध घेतला जात नाही. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर जेव्हा अणुबॉम्ब टाकला, तेव्हा अनेक कोवळ्या जिवांसह पशुपक्ष्यांचा जीव घेतला होता. त्या वेळी अमेरिकेला ही जाणीव नव्हती, की हा नरसंहार किती जणांचे स्वप्न उद्ध्वस्त करेल.. कदाचित आज अमेरिकेला पश्चात्ताप होतही असेल, पण त्याचा उपयोग काय. तेथील अनेक पिढ्या आजही ती वेदना सोसतच आहे… शक्तिशाली होण्याचा हाच अहंकार अर्जुनातही दिसतो. त्याला माहिती आहे, की हा सगळा भावनिक विचार केला तर कदाचित आपला नेम चुकेल. जे कौशल्य आत्मसात करण्यासाठी वर्षानुवर्षे साधना केली ती एका क्षणात धुळीस मिळेल ही खुळचट भावनाही त्यामागे असू शकेल. पण लक्ष्यभेद केला तर मीच तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी वीर असेन, जो आयुष्याचं महाभारत जिंकू शकेन.

दरअसल यह देखने की योग्यता नहीं है

न देखने का कौशल है

जिसकी शिक्षा देते हैं

अंधे धृतराष्ट्रों की नौकरी बजा रहे बूढ़े द्रोण

ताकि अठारह अक्षौहिणी सेनाएं अठारह दिनों तक

लड़ सकें कुरुक्षेत्र में

और एक महाकाव्य रचा जा सके

जिसमें भले कोई न जीत सके

लेकिन चिड़िया को मरना हो

प्रियदर्शन यांनी कवितेतील अखेरच्या ओळींत द्रोणाचार्य आणि धृतराष्ट्राचा समाचार घेतला आहे. अर्जुनाकडे भावनिक दृष्टीची अपेक्षा करणे मूर्खपणाच आहे. कारण त्याचा गुरू आंधळ्या धृतराष्ट्राची चाकरी करणारा म्हातारा द्रोण आहे. कारण द्रोणाकडे एवढे कौशल्य होते तर त्याने कुणाची गुलामी कशाला केली असती… बरे द्रोणाचार्य अस्त्र, शस्त्रनिपूण होते, प्रगाढ ज्ञानी होते. असं असताना द्रोणाचार्य स्वबळावर संपत्ती मिळवू शकले नाहीत. मुलगा अश्वत्थाम्याला दूध देण्याइतपत आपली कुवत नाही याचं शल्य त्यांना होतं. बाप म्हणून मुलासाठी तो द्रवला. म्हणून तो बालपणीचा मित्र राजा द्रुपदाकडे गेला. कारण द्रुपदाने बालपणी त्याला वचन दिलं होतं, की मी राजा झालो तर तुला मी माझं अर्ध राज्य देईन. पण द्रुपदाने द्रोणाचा अपमान केला आणि फुटकी कवडीही दिली नाही. हा द्रोण मग हस्तिनापुराच्या आश्रयाला आला आणि धृतराष्ट्राची चाकरी केली. त्यामागे बदल्याची भावना होती. इथे प्रियदर्शन यांना धृतराष्ट्राची हीच वृत्ती अधोरेखित करायची आहे. जो गुरू बदल्याच्या भावनेतून शिक्षण देतो, त्याच्या शिष्यात अहंकार का नाही येणार… शेवटी द्रोण कौरवांचा सेनापतीच झाला. अशी पात्रे नसतील तर महाकाव्य कसं पूर्ण होईल…? या महाकाव्याच्या रचनेप्रमाणे मग 18 अक्षौहिणी सैन्यातील 18 दिवसांची लढाईही रचायची होती. भलेही या लढाईत कोणी जिंकणार नसेल.. पण पक्ष्याचं मरण अटळ आहे.

Follow on Twitter @kheliyad

‘गुलजार’ मनाचा वेध

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”111″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!