Literateursports news

ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक?

ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक?

इंटरनेट आलं नि जग बदललं. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शिक्षण सक्तीचं झालं. त्यामुळे ऑनलाइन वाचनाला अधिक गती मिळाली. अर्थात, त्याची गरजदेखील वाढली. या वाचनाने जिज्ञासातृप्ती, अनुभववृद्धी, दृष्टिव्यापकता, अध्ययन सखोलता, भावकोश आणि भाषाकोशसमृद्धी यांना कवेत घेत वाङ्मयविकास साधला का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. याच विषयावर खल करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादात सहभागी झाली होती. नाशिक येथे 5 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या या संमेलनात ‘ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक?’ या विषयावर हा परिसंवाद होता. प्रा. डॉ. दिलीप धोंडगे या परिसंवादाचे अध्यक्ष होते. प्रा. डॉ. श्रुतिश्री वडगबाळकर, प्रा. डॉ. विलास साळुंखे, मयूर देवकर, मंदार भदाणे यांचा या परिसंवादात सहभाग होता. ‘ऑनलाइन वाचन तारक की मारक’ यावर या तज्ज्ञांनी काय मते व्यक्त केली, यावर घेतलेला परामर्श…

ऑनलाइन वाचन तारक मारक

ज्येष्ठ लेखिका व कवयित्री प्रा. डॉ. श्रुतिश्री वडगबाळकर


रं तर हा जो विषय आहे, तो कदाचित तीन-चार वर्षांनी निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. कारण आपण बघितलं आहे, की गेल्या दोन वर्षांत (कोरोना काळ) ऑनलाइन वाचन किती वाढलेलं आहे! सध्या एक प्रश्न उपस्थित होतो, ऑनलाइन वाचन तारक की मारक? हा प्रश्न माझ्यानंतरच्या पिढीला, तरुणाईला जर विचारला तर ते म्हणतील, याला काय अर्थ आहे काय? ऑनलाइन वाचन ही आजची काळाची गरज झाली आहे. आता प्रश्न असा पडतो, की वाचन म्हणजे नेमकं काय? वाचन म्हणजे पुस्तकाचं वाचन का? तुमच्या डोळ्यातनं जे जे दिसू शकतं, ज्यामुळे तुम्हाला आकलन होतं त्या सगळ्याचं आपल्याला वाचन करता येतं. माणूससुद्धा वाचता येतो. पुस्तकसुद्धा वाचता येतं. वाचन ही आपली सगळ्यात मोठी गरज आहे. आपण बघितलं आहे, की दोन वर्षांच्या कोरोना काळात आपली ही वाचनभूक खूप मारली गेली आहे. आपल्याला माणसं वाचता आलेली नाहीत, आपल्याला घराबाहेर पडता आलेलं नाही. प्रवास करता आला नाही. कारण परिवर्तन दोनच गोष्टींनी होऊ शकतं- भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं. आपल्याला या काळात ग्रंथालये बंद असल्याने पुस्तकं घरपोच मिळाली नाहीत. अशा वेळेस आपल्या वाचनाची भूक जर कोणी शमवली असेल तर ती ऑनलाइन वाचनामुळे. खरं तर वाचनाचेही खूप प्रकार आहेत. मनातल्या मनात वाचतात, मोठ्याने वाचतात, जाता जाता वाचतात, पुस्तकातही वाचतात. ऑफलाइन वाचन म्हणजे पुस्तक हातात घेणे, प्रवास करणे किंवा भेट देणे. ऑनलाइन वाचन म्हणजे टॅब्लेट, मोबाइल, कम्प्युटर, लॅपटॉप या माध्यमांतून वाचणे. त्याला ऑनलाइन वाचन म्हणता येईल. खरं तर वाचनाची गरज का आहे? आज आपण साहित्य संमेलनाच्या कॅम्पसमध्ये पाहतोय की प्रकाशकांनी केवढी मोठी दुकानं लावली आहेत! किती पुस्तकं लोकांनी बघितली? किती पुस्तकांना लोकांनी स्पर्श केला? हा आनंद किती लोकांनी घेतला, असा जर प्रश्न केला तर फक्त लोकांनी बघितलं आणि बाजूला सरकले. वाचन ही माणसांची खूप मोठी गरज आहे. कारण एखादं पुस्तक माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एखादं पान एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. वाक्य एखाद्याच्या जीवनाचं ध्येय ठरू शकतं. म्हणून असं म्हणतात, की मेंदू तल्लख ठेवायचा असेल तर दोन तास वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे माणसं विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात. कारण जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं, तेच खरं असतं आणि जे तुम्हाला कृती करायला प्रवृत्त करतं तेच खरं वाचन असतं. आज आपण वाचतो; पण आपलं वाचन विचार करायला किती प्रवृत्त करतं, कृती करायला किती प्रवृत्त करतं याचाही विचार करायला हवा.

ऑनलाइन वाचनाशिवाय आता पर्याय नाही


आपण मोबाइलमधूनही वाचतो. मला तर असं वाटतंय, की अलीकडे वाचन खूप वाढलंय. एक मेसेज आला किंवा एखादी पोस्ट आली, तर मला वाटतं, ती जवळजवळ सगळ्यांनी वाचलेली असते. कारण ती पोस्ट आपल्याला दहा जणांच्या ग्रुपवर तरी परत परत वाचायला मिळते. ती फक्त मोबाइलवरच येत नाही, तर फेसबुकवर येते, ती ब्लॉगवर येते, इन्स्टाग्रामवर येते. म्हणजे अनेक प्रकारे ती तुमच्यासमोर येऊ शकते. ती पोस्ट तुम्ही व्हॉट्सअॅपवर जर टाळली तर ती फेसबुक, ब्लॉगवर पाहायला मिळते. आता प्रश्न असा आहे, की ऑनलाइन वाचन ही वाङ्मयीन विकासाला तारक की मारक? प्रश्न हा नाही, की ऑनलाइन वाचन चांगलं की वाईट? तरुणाईसाठी चांगलंच आहे. कोरोनाच्या काळात सहा वर्षाच्या मुलालाही मोबाइलवर अभ्यासच करावा लागतो. पण साठच्या दशकातील पिढीची लोकं म्हणतील, ऑनलाइन वाचन चांगलं नाही. डोळे खराब होतात. अहो, पुस्तक हातात घेऊन वाचणे किती चांगलं आहे! त्याचा स्पर्श असेल, नव्या-जुन्या पानांचा गंध असेल, लेखकाची स्वाक्षरी असेल, त्याच्यावर मी केलेल्या खुणा असतील… किती आनंद आहे पुस्तकात!  पुस्तकाचा स्पर्श हासुद्धा आनंदाचा भाग असू शकतो, हे आम्ही सांगू शकतो. म्हणून ऑनलाइन वाचन चांगलं नाही आणि ऑफलाइन वाचनच चांगलं. माझ्या भावाला विचारलं, तर ऑनलाइन वाचन म्हणजे लाइटचा दिवा आणि ऑफलाइन वाचन म्हणजे देवघरातली समई. ही आमची पिढी म्हणते. मला वाटतं, भविष्याचा विचार केला तर ऑनलाइन वाचन ही काळाची गरज ठरलेली आहे. आज तुम्ही बघा, की ऑनलाइन वाचनामुळे वाचकांची संख्या वाढलेली आहे. निश्चितपणे. प्रश्न हा आहे, की ते काय वाचतात? पण ते वाचताहेत. या ऑनलाइन वाचनाशिवाय आपल्याला आता पर्याय राहिलेला नाही. आजचं जग हे गतिमान आहे. आजचं जग हे संघर्षाचं, स्पर्धेचं जग आहे. फक्त स्पर्धा, संघर्षच नाही, तर आजच्या पिढीला स्पेशलायझेशन पाहिजे. वेगळं काही असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. हे वेगळं काय, याचं ज्ञान समृद्ध असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तुमच्याकडे भरपूर काही असलं पाहिजे. याच्यामुळे तुमचं वेगळेपण तुम्हाला सिद्ध करावं लागेल. म्हणून आपल्याला ऑनलाइन वाचनाची गरज निर्माण झालेली आहे.

ऑनलाइन वाचनामुळे संदर्भ मिळणे झाले सोपे


आता खरंच ऑनलाइन वाचनामुळे स्थैर्य, शांतता, समाधान, आत्मिक समाधान मिळतंय का, हाही एक प्रश्न आहे. पण नुसतं माहिती मिळवणं खरं ज्ञान नाहीये. ऑनलाइन वाचनाने मात्र सगळ्यांना तारलंय. तुम्ही नुसतं मागच्या दोन वर्षांच्या कोरोना काळाचा विचार करा, खरोखरच आपण बघतोय, जर मोबाइल नसते, व्हॉट्सअॅप नसते, फेसबुक नसतं तर आपल्याला घराबंदी आली असती. काय आपली अवस्था झाली असती! यामुळे आपण एकमेकांच्या संपर्कात आलो. ऑनलाइन भेटलो. निदान एकमेकांना डोळ्यांना तरी दिसलो. यामुळे आपल्याला एक दिलासा, मानसिक आधार मिळाला. परदेशात किती तरी ऑनलाइनचे अॅप आहेत! किंडल आहे, गुगल प्ले आहे. ई-बुक आहे. परदेशातसुद्धा ऑनलाइन वाचन फार चांगलं आहे, असं म्हणायचं नाहीये. त्याचे डोळ्यावर परिणाम होईल. सारखं सारखं स्क्रीनवर बघणं योग्य नाही; पण ऑनलाइन वाचनाचे अनेक लोकांना चांगले फायदेसुद्धा झाले आहेत. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली. त्यातील काही खरेदी केली. ती इतकी जड झाली, की दुसरीकडे ठेवायला जागाच राहिली नाही. मग ती घेऊन मला एका ठिकाणी बसावं लागलं. तीच जर माझ्या मोबाइलमध्ये असती तर प्रवासात असेल किंवा कुठेही मी सहजरीत्या वाचू शकले असते. मला जर लेखनाचा फाँट बारीक वाटत असेल तर तो मोठा करूनही वाचता येईल. म्हणजे मला ही पुस्तकं केव्हाही वाचता येऊ शकेल. खर्चही कमी होतो. छापील पुस्तकांच्या किमती जास्त असतात. ऑनलाइन पुस्तकांमुळे अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. कागद वापरला जात नाही. पर्यावरणाचं रक्षण होतं. पण ऑनलाइन वाचनाचा सगळ्यात मोठा फायदा जर असेल तर संदर्भ सहजपणे मिळतात. कोरोना काळाने आपल्याला कितीतरी छळलं. त्या वेळी सगळी ग्रंथालये बंद. मी ओळखीने काही पुस्तकं मागवली; पण सगळेच संदर्भ त्यातून मिळेना. मग मी ऑनलाइनवर विषय टाकला तर त्याच्याशी संबंधित सगळीच माहिती मिळाली.

आता मी प्रवासात असताना एक 82 वर्षीय ज्येष्ठाने मला फोन केला. त्यांचा साधा फोन. ते म्हणाले, “आधी मला सांग, ‘कठीण समयी कोण कामास येतो’ याच्या आधीची ओळ सांग.” मी म्हटले, “थांबा, पाच मिनिटांनी मी फोन करते.” मी गुगलवर माहिती घेतली तेव्हा मला पटकन माहिती मिळाली.

“तदितर खग भेणे वेगळाले पळाले।
उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।।
स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।
कठिण समय येता कोण कामास येतो।।”

हा जो ऑनलाइनचा फंडा आहे, की एखाद्या संदर्भामध्ये तुम्हाला एखादी गोष्टी पाहिजे असेल तर ती सहजपणे मिळू शकते. आपल्याला वाचन करायचं असेल, आपल्याला अभ्यास करायचा असेल तर संदर्भग्रंथ शोधण्यामध्ये जो वेळ वाया जातो तो जात नाही. म्हणून ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारकच म्हणावे लागेल.

वाङ्मय विकास म्हणजे काय?


आता वाङ्मय विकास म्हणजे काय, तर ते वाङ्मय जास्तीत जास्त लोकांनी वाचलं पाहिजे. त्या वाङ्मयावर समीक्षा झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे हा प्रश्न आहेच, पण किमान जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं, ते लोकांनी वाचणं ही गोष्टसुद्धा सहज शक्य झाली आहे. वाचनाला आणि लेखनाला त्यामुळे नेमकेपणा येत आलेला आहे. एका नोबेल पुरस्कार विजेत्या फ्रेंच साहित्यिकाची माहिती विश्वकोशाने मागवली. आपल्याला माहिती आहे, की फ्रेंच साहित्यिकाची इंग्रजीतली नावेसुद्धा वेगळी असतात. मला ती माहिती कुठे सापडेना. शेवटी मी गुगलवर गेले. त्यांनी मला इंग्रजीतली सर्व माहिती दिली. तरी मी ट्रान्सलेटमध्ये गेले आणि मराठीत सर्व भाषांतर मला मिळालं. अर्थात ती मराठी वेगळी होती. तरीसुद्धा मला त्याच्यातला बराच आराखडा, आढावा घेता आला. हे केवळ आणि केवळ ऑनलाइन वाचनामुळेच शक्य झालं आहे. अशी अनेक कारणं आहेत. काळ वेगळाही धावतो आहे. शहरं बदलताहेत.  घरं लहान झाली आहेत. आपल्याकडे जागा नाहीये. त्यामुळे आपल्याला भविष्यात ऑनलाइन वाचनच करावे लागणार आहे. तसं लेखनाच्या दृष्टीने फार सोपं झालेलं आहे. आज आपण सगळे जण व्हाइस मेसेज करतो किंवा कम्प्युटरवर भरभर टाइप करतो. म्हणजे एखादी गोष्ट पटकन दुसऱ्यांकडे जाऊ शकते.  अगदी अलीकडे मी एक कादंबरी लिहिली. ती प्रकाशकाकडे पाठवली. त्याने मला काही सूचना करतो. ते तुम्ही मला पाठवा. मी त्या सूचनांवर लगेच ई-मेल केला. ऑनलाइन माध्यम नसतं तर यालाच आठ-दहा दिवस गेले असते. हा जो वेळ वाचतो, ते सगळं ऑनलाइनमुळेच शक्य होतंय. संस्कृती जर टिकवायची असेल तर हे वाचन वाढलं पाहिजे. अर्थात, तसं वाचनही चांगलं असलं पाहिजे. लेखनही चांगलं असलं पाहिजे.

पुस्तकांचा खप कमी झालाय का?


आता जर प्रकाशकांना विचारलं तर तुमची किती पुस्तकं विकली गेली? कुणीही प्रकाशक सांगू शकणार नाही, की माझी सगळीच्या सगळी पुस्तकं विकली गेली. पुस्तकांची संख्या कमी झाली आहे वाचनाची. आपण इतर गोष्टींवर खूप खर्च करतो. मात्र 600 रुपयांचं एखादं पुस्तक घ्यायचं म्हंटलं, तर फार महाग वाटतं. त्यामुळे आपल्याकडे पुस्तकांचाही खप कमी झालाय की काय? दर्जेदार पुस्तकांची संख्या कमी झालीय. मला जुनी साहित्य संमेलने आठवताहेत. फक्त लेखकांना बघायला रसिकांची गर्दी व्हायची. आता लोक येताहेत, फोटो काढतायत आणि निघून जाताहेत. पण बघायला येणाऱ्यांची संख्या खूपच कमी झालीय. याला कारण म्हणजे लेखक व्हॉट्सअॅप, फेसबुक अशी कुठेना कुठे तरी दिसतायत. लेखकांविषयी जी क्रेझ होती ती आता कमी झालीय. याला कारण म्हणजे आपलं वाचनच कमी झालंय. आजच्या पिढीला कोणतं वाचन आवडतं, तर रिअॅलिस्टिक! वास्तववादी. अनुभवावर आधारित. तुम्ही अनुभव घ्या, तो लिहा आणि मग आम्हाला वाचायला द्या. आत्मचरित्र, चरित्र, रोमँटिक, काल्पनिक आता लोकांना नको वाटतं. चांगल्या संस्कृतीवर, संस्कारावर आधारित पोस्ट असतील तर त्या आवडीने वाचल्या जातात. ऑनलाइन वाचन हे वाङ्मयीन विकासाला तारकच ठरतंय. आता येणारी पिढी ही ऑनलाइनच अभ्यासणारी आहे. सगळी पुस्तकं मोबाइलवरच येत आहेत. ते आईवडिलांनीही स्वीकारलं आहे. एकवेळ अशी होती, की मोबाइलला हात लावू नको, असं म्हणणारे आईवडीलच मुलांना मोबाइल देत आहेत. आता मोबाइल हातात दिल्याशिवाय मुलांचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. ऑनलाइन वाचन करणं, ऑनलाइन अभ्यास करणं, ऑनलाइन परीक्षा देणं हे सगळं या पिढीने स्वीकारलं आहे. आणि ६०-७० च्या पिढीनेही स्वीकारलं आहे. ऑनलाइन ही काळाची गरज आहे. भविष्यात चांगलं साहित्य या ऑनलाइनच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे. त्यातून आवड निर्माण होईल. मी एक कार्टून बघितलं होतं कुठे तरी. एक मुलगा पुस्तक वाचतोय आणि सगळे त्याचा फोटो काढताय. हातात मोबाइल असताना पुस्तक कोण वाचतंय? म्हणजे दुर्मिळच गोष्ट झालीय. ऑनलाइन वाचन करावंच. कारण माणसाला नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान शिकावंसं वाटतंय. इतरांचं जीवन समजून घ्यावंसं वाटतंय. अनुभव कामी यावेसे वाटताय. याला पर्याय आहे ऑनलाइन वाचन. माझ्या दृष्टीने वाङ्मयाच्या विकासाला ऑनलाइन माध्यम कधीच मारक ठरू शकणार नाही. त्याचा उपयोग भविष्यात सर्वांनाच होऊ शकणार आहे.

ऑनलाइन वाचन-e-book

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”111″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!