All SportsOther sports

क्रीडा बजटने खेळाडूंना काय दिले? What the sports budget gave to the players?

2021 च्या क्रीडा बजटने खेळाडूंना काय दिले?

2021 च्या क्रीडा बजटने खेळाडूंना काय दिले? What the sports budget gave to the players? | यंदाचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते.

मिशन ऑलिम्पिकचे स्वप्न पाहणाऱ्या भारतासाठी यंदाचा अर्थसंकल्प नीरसच ठरला आहे. खेलो इंडियाच्या रूपाने मिशन ऑलिम्पिकची मुहूर्तमेढ एकीकडे रोवली जात असली तरी क्रीडा क्षेत्राला निधी देताना नेहमीच आखडता हात घेतला जात आहे. त्याचं प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे जाणवले.

केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सीतारामन यांनी 2 फेब्रुवारी 2020 रोजी अर्थसंकल्प सादर केला. यात क्रीडा क्षेत्रासाठी 2,596.14 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद तोकडी तर आहेच, मात्र गेल्या वर्षीच्या बजटपेक्षा 8.16 टक्के म्हणजेच 230.78 कोटींनी कमी आहे. यामागे करोना इफेक्ट मानला जात असला तरी क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक उद्योगांनाही यामुळे फटका बसण्याची चिन्हे आहेत.

2020 मध्ये संपूर्ण विश्वाला करोनाने विळखा घातला. आता लस आली असली तरी करोनाचे थैमान थांबलेले नाही. त्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांवर गंडांतर आले. याचाच परिणाम क्रीडा बजटवर (Sports Budget) झाला आहे.

संसदेत सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने 2021-22 साठी क्रीडा क्षेत्रासाठी 2,596.14 कोटींची तरतूद केली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील बजटपेक्षा ही तरतूद तब्बल 230.78 कोटी रुपयांनी कमी आहे.

क्रीडा क्षेत्रासाठी गेल्या वर्षी 2826.92 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र, हे बजट नंतर घटवण्यात येऊन 1800.15 कोटी करण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी जरी 2596.14 कोटींची तरतूद दिसत असली तरी ती नंतर घटवण्यात येणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही.

करोना महामारीमुळे टोकियो ऑलिम्पिक स्थगित झाली. त्याचा फटका खेळाडूंना बसलाच, शिवाय स्थानिक स्पर्धांवरही या महामारीमुळे गंडांतर आले. स्थानिक स्पर्धा तर झाल्या नाहीच, शिवाय परदेशात सराव किंवा स्पर्धाही होऊ शकलेल्या नाहीत. परदेशात सरावासाठी, तसेच स्पर्धांसाठी खेळाडूंचा संपूर्ण खर्च क्रीडा मंत्रालय करतो.

क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की गेल्या वर्षी अर्थसंकल्पात क्रीडा विकासासाठी 2826.92 कोटी रुपये दिले होते. नंतर ही तरतूद घटवून 1800.15 कोटी केली. त्यामागचे कारण म्हणजे करोना महामारी, ज्यामुळे स्पर्धाच होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे पायाभूत सुविधा भक्कम करताच आल्या नाहीत.

खेळाडूंचे नुकसान

खेलो इंडियासाठी (Khelo India) 2020-21 च्या अर्थसंकल्पात 890.42 कोटींची तरतूद करण्यात आली होती. सुधारित बजटमध्ये हीच तरतूद 328.77 कोटी करण्यात आली. 2021-22 मध्ये आता ही तरतूद वाढवून 657.71 कोटी करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी 245 कोटींची तरतूद करण्यात आली होती. नंतर सुधारित बजटमध्ये हीच तरतूद घटविण्यात आली आणि ती 132 कोटी रुपये करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात ती वाढवून 280 कोटी रुपये करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी 25 कोटी रुपये देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 2020- 21 च्या अर्थसंकल्पात 7.23 कोटी रुपये होती.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (SAI) यंदाच्या बजटमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली आहे. साईला यंदा 660.41 कोटी रुपये मिळणार आहेत 2020- 21 च्या बजटमध्ये 500 कोटी रुपये होते. नंतर त्यात वाढ करून 612.21 कोटी रुपये करण्यात आली.

खेळाडूंसाठी बजटमध्ये यंदा फारसा दिलासा मिळालेला नाही. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या बजटमध्ये 53 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ती 70 कोटी रुपये होती. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या साईच्या (SAI) स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी 75 कोटींवरून 30 कोटी रुपये करण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांत क्रीडा मंत्रालयाला अर्थसंकल्पातून काय मिळाले?

क्रीडा क्षेत्रावर अर्थसंकल्पात नेहमीच काही ना काही घोषणा होतात. मात्र, खेळव्यतिरिक्त इतर कोणी त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. गेल्या पाच वर्षांत अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदींवर टाकलेला प्रकाशझोत….

  • २०१६ ते २०२० पर्यंत क्रीडा कोट्यात बऱ्याच भरीव तरतुदी झाल्या आहेत. विशेषत: खेलो इंडिया कार्यक्रमाला जास्त फायदा झाल्याचं पाहायला मिळतं.

  • २०१६ मध्ये ९७.५२ कोटींचा स्पोर्टस कोटा होता. हा कोटा २०२० पर्यंत ८९०.९२ कोटीपर्यंत पोहोचला.

  • भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघासाठी (एनएसएफ) अर्थसंकल्पात किंचितशी वाढ झाली. मात्र, गेल्या पाच वर्षांत खेलो इंडिया कार्यक्रमात जेवढी वाढ पाहायला मिळते तेवढी इतर स्पोर्टस कोट्यात पाहायला मिळालेली नाही.

  • भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात गेल्या पाच वर्षांत ९२ कोटींची वाढ झाली आहे.

  • २०१५ पासून २०२१ पर्यंत साइच्या बजटमध्ये किंचित वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये बजट ४०७.९६ कोटी रुपये होते. २०१५ ते २०२१ दरम्यान ५०० कोटींची तरतूद करण्यात आली होती.

  • एनएसएफच्या मागील पाच वर्षांत बजटवर एक नजर टाकली तर क्रीडा कोट्यात कपातच पाहायला मिळाली आहे. २०१७-१८ मध्ये २७७.६८ कोटींचे बजट होते, तर २०१६ मध्ये ३५९.४० कोटी होते.
[jnews_block_9 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”77,80,62,89″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!