वेस्ट इंडीज क्रिकेट आणि राष्ट्रगीत
‘वेस्ट इंडीज’ (West Indies), ज्याला आपण लघुरूपाने ‘विंडीज’ म्हणतो, तो देश नाही. क्रीडाविश्वात वेस्ट इंडीज क्रिकेट संघ म्हणजे वेस्ट इंडीज देशाचा संघ असं आजही बरेच जण म्हणतात. मात्र, वेस्ट इंडीज मुख्यत्वे कॅरेबियन बेटांवरील इंग्लिश बोलणाऱ्या देशांचा समूह. या देशांतील खेळाडूंचे प्रतिनिधित्व करणारे क्षेत्र म्हणजे वेस्ट इंडीज. या संघाचं प्रशासन ‘क्रिकेट वेस्ट इंडीज’ (Cricket West Indies) पाहतं. एकूणच वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इतिहास खूपच गमतीदार आहे…
एकेकाळी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीज संघाचा दरारा होता. आता तो राहिलेला नाही. याची कारणे ‘वेस्ट इंडीज क्रिकेट वर्ल्ड कपसाठी का पात्र ठरला नाही?’ यात आपण पाहिलंच आहे. सध्या 26 नोव्हेंबर 2022 रोजी वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची रँक कसोटीमध्ये आठवी, वनडेमध्ये दहावी, तर टी-२० मध्ये सातवी आहे.
70 ते 90 च्या दशकांत सुवर्णकाळ
1970 च्या मध्यात ते 1990 च्या सुरुवातीच्या काळात वेस्ट इंडीज संघाचा दबदबा होता. वनडे आणि कसोटीमध्ये अव्वल असलेला हा संघ विसाव्या शतकात कमालीचा ढेपाळला. मात्र, 70 ते 90 च्या दशकात गारफिल्ड सोबर्स, लान्स गिब्स, जॉर्ज हेडली, ब्रायन लारा, व्हिव्हियन रिचर्ड्स, क्लाइव्ह लॉइड, माल्कम मार्शल, अल्विन कालिचरण, अँडी रॉबर्ट्स, रोहन कन्हई, फ्रँक वॉरेल, क्लाइड वॉलकॉट, एव्हर्टन वीक्स, कर्लटली अँब्रोज, मायकेल होल्डिंग, कर्टनी वॉल्श, जोएल गार्नर, वेस हॉल यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सहभागी करण्यात आलं आहे. आणखी एक भेदक गोलंदाज आठवतो, तो म्हणजे पॅट्रिक पॅटरसन. ऐंशीच्या दशकात त्याचाही दबदबा होता.
वेस्ट इंडीज दोनदा वर्ल्ड चॅम्पियन
वेस्ट इंडीज संघाने दोन वेळा आयसीसी वनडे विश्वकरंडक (1975, 1979) उंचावला आहे. एवढंच नाही, तर आयसीसी टी-20 वर्ल्ड कपही दोन वेळा (2012, 2016), तर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी एकदा (2004) जिंकली आहे. 1983 मध्ये विंडीजचा तिसरा वन डे वर्ल्ड कप हुकला. अंतिम फेरीत त्याला भारताकडून पराभूत व्हावे लागले. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप (2004), आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी (2006) मध्ये वेस्ट इंडीजने अंतिम फेरी गाठली, मात्र विजेतेपद जिंकण्यात ते अपयशी ठरले. वेस्ट इंडीज संघाचं सातत्य कमालीचं होतं. 1975, 1979, 1983 असा सलग तीन वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावर होता. नंतर हा विक्रम ऑस्ट्रेलियाने मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपची अंतिम फेरी सलग चार वेळा (1996, 1999, 2003, 2007) गाठली. विशेष म्हणजे सलग तीन वेळा वर्ल्ड कपही (1999, 2003, 2007) जिंकला.
वेस्ट इंडीजने 2007 मध्ये वनडे वर्ल्डकप आणि 2010 मध्ये आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपदही भूषवले आहे.
वेस्ट इंडीज संघातील खेळाडू या देशांचं प्रतिनिधित्व करतात…
सार्वभौम राज्ये
- अँटिग्वा अँड बारबुडा, बार्बाडोस, डोमिनिका, ग्रेनेडा, गयाना, जमैका, सेंट किट्स अँड नेव्हिस, नेव्हिस, सेंट किट्स, सेंट लुसिया, सेंट विन्सेंट अँड द ग्रेनेडिन्स, त्रिनिदाद अँड टोबॅगो. (लीवर्ड आयलँड क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधित्व करणारे सेंट किट्स आणि नेव्हिस हे स्वतंत्र प्रदेश आहेत)
नेदरलँड्स देशाचे घटकराज्य
- सिंट मार्टेन
इंग्लंडचे प्रदेश
- अँग्विला
- ब्रिटिश व्हर्जिन आयलँड
- मॉटेसराट
अमेरिकेचा प्रदेश
- अमेरिका व्हर्जिन आयलँड
कोणकोणत्या संघटना क्रिकेट वेस्ट इंडीजशी संलग्न आहेत?
- क्रिकेट वेस्ट इंडीज ही प्रमुख संघटना असून, तिला सहा क्रिकेट संघटना संलग्न आहेत. त्यात बार्बाडोस, गयाना, जमैका, लीवर्ड आयलँड्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, विंडवार्ड आयलँड्स या संघटनांचा समावेश आहे.
- लीवर्ड आयलँड्स क्रिकेट संघटना (Leeward Islands Cricket Association) विविध लहान प्रदेशांपासून तयार झाली आहे. यापैकी दोन सार्वभौम राज्यांच्या तीन संघटना (अँटिग्वा आणि बार्बाडोस, सेंट किट्स, नेव्हिस), इंग्लंडचे तीन प्रदेश (अँग्विला, दि ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स आणि माँटेसराट), आणि अमेरिकेच्या प्रदेशाचा (अमेरिका व्हर्जिन आयलँड्स) समावेश आहे.
- विंडवार्ड आयलँड्स क्रिकेट नियामक मंडळ चार सार्वभौम राज्यांपासून तयार झालं आहे. या चार सार्वभौम राज्यांमध्ये (डोमिनिका, ग्रेनेडा, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि दि ग्रेनेडिन्स यांचा समावेश आहे.
एकूणच वेस्ट इंडीज क्रिकेट संघ वेगवेगळ्या कॅरेबियन बेटांवरील देशांचा आहे. या सगळ्या देशांचे संघ वेस्ट इंडीज प्रथम श्रेणी आणि विभागीय चार दिवसीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. चार दिवसीय स्पर्धा बुस्टा कप, शेल शील्ड, कॅरिब बीअर कप अशा नावांनी घेतल्या जातात. वेस्ट इंडीज संघात समाविष्ट होण्यापूर्वी हे सर्व देश आपापल्या बेटांवर खेळून वॉर्मअप होतात. नंतर वेस्ट इंडीज संघाकडून खेळतात. अशी एकूण वेस्ट इंडीज क्रिकेट संघाची रचना आहे. वेस्ट इंडीज संघातील देशांची लोकसंख्या पाहिली तर ती अवघी साठ लाख आहे.
आता ‘क्रिकेट वेस्ट इंडीज’चे सदस्यदेश पाहूया…
- बार्बाडोस क्रिकेट संघटना (बीसीए)
- गयाना क्रिकेट बोर्ड (जीसीबी)
- जमैका क्रिकेट संघटना (जेसीए)
- लीवर्ड आयलँड्स क्रिकेट संघटना (एलआयसीए) : अँग्विला क्रिकेट संघटना, अँटिग्वा, बार्बुडा क्रिकेट संघटना, माँटेसराट क्रिकेट संघटना, नेव्हिस क्रिकेट संघटना, सेंट किट्स क्रिकेट संघटना, सिंट मार्टेन क्रिकेट संघटना, यूएस व्हर्जिन आयलँड्स क्रिकेट संघटना
- त्रिनिदाद अँड टोबॅगो क्रिके बोर्ड (टीटीसीबी)
- विंडवार्ड आयलँड्स क्रिकेट बोर्ड ऑफ कंट्रोल (डब्लूआयसीबीसी) : डोमिनिका क्रिकेट संघटना, ग्रेनेडा क्रिकेट संघटना, सेंट लुसिया क्रिकेट संघटना, सेंट व्हिन्सेंट अँड दि ग्रेनेडिन्स क्रिकेट संघटना.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इतिहास
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या इतिहासाचा प्रारंभ 1890 च्या दशकापासून सुरू झाला. त्यानंतर 36 वर्षांनी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्समध्ये (आयसीसी) समाविष्ट झाला. आयसीसीचं नाव त्या वेळी म्हणजे 1909 ते 1965 या कालावधीत ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ (Imperial Cricket Conference) असं होतं. 1965 नंतर ‘इम्पेरियल’ऐवजी ‘इंटरनॅशनल’ (International Cricket Conference) असा बदल करण्यात आला. 1928 मध्ये पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर वेस्ट इंडीजला कसोटीचा दर्जा देण्यात आला. 1930 च्या दशकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांचं प्रतिनिधित्व केलं. नंतर वेस्ट इंडीज फेडरेशन प्लस ब्रिटश गयाना असं नाव झालं.
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ राष्ट्रगीत का गात नाही?
वेस्ट इंडीज हा देश नाही. कॅरेबियन बेटांवरील अनेक देशांचा संघ म्हणजे वेस्ट इंडीज. त्यामुळे कोणत्याही एका देशाचं राष्ट्रगीत या संघाला म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांनी एक गीत स्वीकारलेलं आहे. हेच वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. हे गीत पुढे दिलं आहे.
प्रदीर्घ दहा वर्षांपर्यंत
सत्ता गाजवली या क्रिकेटविश्वावर
आता या सत्तेचा शेवट दिसतोय टप्प्यावर
पण इथं खाली
फक्त हे चिलखत दुभंगत आहे
पुरेसं आहे, एक मित्र गमावण्यासाठी पुरेसं आहे
काही जुने सेनापती निवृत्त होत आहेत
आणि धावा आता पूर्वीसारख्या निघत नाहीत
पण जेव्हा ‘टुसेंट्स’ जातो तेव्हा ‘डेसालाइन्स’ येतो
आम्ही हरलो जरी लढाई, तरी आम्ही युद्ध जिंकू
रॅली… रॅली… विंडीजभोवती रॅली
आता आणि कायमसाठी
रॅली… विंडीजभोवती रॅली
नाही बोलायचे नाही
लवकरच वाहतील धावा जसं खळाळतं वारि
खूप साऱ्या आनंदसरी आणूया मुलामुलींच्या दारी
म्हणा, की आम्ही पुन्हा उठणार आहोत जसा तप्त अग्निकल्लोळ आसमंतात
तेजोमय जसा भास्कर, जाणून आहोत आपण, आम्ही नेऊ त्याच्याही उन्नत
रॅली… रॅली… विंडीजभोवती रॅली
आता आणि कायमसाठी
रॅली… विंडीजभोवती रॅली
तळातला एकच मार्ग अन् योद्धा धारातिर्थी
युद्धाच्या धगीत कोसळे मायकेल होल्डिंग
“मायकेलला बरेच आधी जायला हवं होतं”
मी ऐकलं एका संतप्त बांधवाला ओरडताना
कॅरेबियन माणूस, तो, तो, तो आहे आमच्या त्रासाचं मूळ
संघर्ष आणि भ्रमाच्या या लहानशा मंचावर
बेटांच्या रूपात वेस्ट इंडीजची ओळख अधिक अधोरेखित
आम्ही पूर्वीपासून जाणून आहोत, आम्हाला इथं आणलं कुणी
आणि कोणी निर्माण केला हा भ्रम
म्हणूनच झोळी पसरतोय मी, कृपया आपल्या लोकांसमोर झोळी पसरतोय
आता ते आमचं सौंदर्य विरूप करण्यासाठी आणताहेत निर्बंध आणि कायदे
पण अखेरीस आमचाच विजय होईल
हे फक्त क्रिकेटपुरतं नाही, ही चर्चा जातेय सीमेपल्याड
ते अपयशी ठरले याची खात्री करणे अवलंबून आहे तुमच्या नि माझ्यावर
लवकरच आपल्याला निवडावी लागेल एक भूमिका अन्यथा हरवून जावं लागेल ढिगाऱ्यात
दुभंगलेल्या विश्वाला आता संपलीय बेटांची गरज
कुणाच्या दयेवर अवलंबून राहण्यासाठी तुम्ही काय शापित आहात?
लक्षात ठेवा, छोटीशी किल्लीही उघडू शकते शक्तिशाली दरवाजा
- गीतकार : डेव्हिड रुडर
- अनुवाद : महेश पठाडे
हा विंडीजच्या मूळ इंग्रजी राष्ट्रगीताचा मराठीत अनुवाद केला आहे. तुम्हाला हा अनुवाद कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. असो.
जेव्हा हे राष्ट्रगीत सुरू होतं, तेव्हा त्याची सुरुवात गौरवशाली ओळींनी होते. त्या वेळी वेस्ट इंडीज एकामागोमाग मालिका जिंकत होता. प्रतिस्पर्धी संघांनी विंडीजसमोर अक्षरश: नांगी टाकली होती. मात्र, हे राष्ट्रगीत ऐकताना प्रत्येक कॅरेबियनच्या डोळ्यांत पाणी तरळतं. विशेषत: जेव्हा “काही जुने सेनापती निवृत्त होत आहेत आणि धावा आता पूर्वीसारख्या निघत नाहीत” या ओळी उद्धरतात तेव्हा अनेकांना भावना अनावर होतात.
विंडीजचं राष्ट्रगीत मूळ हैतीच्या डेव्हिड रुडर या गायकाच्या एका अल्बममधून घेण्यात आलं आहे. त्याने 1988 मध्ये हे गीत रिलीज केलं होतं. त्यामुळे टुसेंट्स आणि डेसालाइन्स यांचा उल्लेख या गीतात येतो. डेसालाइन्स मूळ आफ्रिकन आणि हैती देशाचे सेनानी होते. त्यामुळे या दोन्ही सेनानींचा विंडीजशी काय संबंध, असा प्रश्न पडला असेल तर त्याचं हे उत्तर.
मायकेल होल्डिंगचा उल्लेख या गीतात आवर्जून आहे. मात्र, मायकेल होल्डिंगचा उल्लेख करण्यामागचा हेतू काय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण बरेच दिग्गज खेळाडू विंडीजच्या क्रिकेटला सर्वोच्च स्थानावर घेऊन गेले आहेत. त्यांचा उल्लेख का नाही? होल्डिंगचाच का? कारण हे गीत जेव्हा विंडीजने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं, तेव्हा मायकेल होल्डिंगच्या क्रिकेट कारकिर्दीचा अखेरचा टप्पा सुरू होता. कॅरेबियन पत्रकारांच्या मते, 80 च्या दशकात होल्डिंग 250 विकेटचं लक्ष्य साध्य करण्यासाठी कमालीचा संघर्ष करताना दिसत होता. तो क्षमतेपेक्षा खूपच सुमार गोलंदाजी करीत होता. कदाचित यामुळेच मायकेल होल्डिंगचा उल्लेख असेल. मात्र, होल्डिंगचंच नाव का घेतलं किंवा गरज होती का, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.
हैतीवर फ्रेंचांची सत्ता असताना टुसेंट्स लौवर्चर या सेनापतीने क्रांतीचे रणशिंग फुंकले. त्याने फ्रेंचांवर नियंत्रण मिळवलं, पण फ्रान्सपासून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्याचं विसरला. नंतर हैतीला डेसालाइन्स या आफ्रिकी राजाने स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणून या राष्ट्रगीतात ‘टुसेंट्सनंतर डेसालाइन्स येतो…’ असं म्हंटलं आहे. एकदा लढाई हरली तरी पुन्हा जिंकण्याची उमेद घेऊन येणारा असतोच.. असा या ओळीचा अर्थ आहे.