All SportsOther sports

दुखापतींमुळे त्रस्त झालेली स्वप्ना बर्मन घेणार निवृत्ती

पाठीचं दुखणं तिची पाठ सोडत नाही. या दुखापतीमुळेच आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती स्वप्ना बर्मन हिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीची औपचारिक घोषणा ती काही दिवसांतच करणार आहे. उत्तर पूर्व फ्रंटियर रेल्वेची खेळाडू असलेली स्वप्ना बर्मन हिने वारंगल येथे 60 व्या राष्ट्रीय ओपन अॅथलेटिक्स स्पर्धेत उंच उडीत सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतरच्या अवघ्या चोवीस तासांत तिने निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला.

स्वप्ना म्हणाली, ‘‘माझं शरीर आता आणखी सहन करू शकणार नाही. मी मानसिक रूपाने खूपच त्रासले आहे. ही व्याधी सहन करण्यापलीकडची आहे.’’

स्वप्ना म्हणाली, ‘‘मी थोडीशी गोंधळलेली आहे. मात्र, 80-90 टक्के निवृत्तीचा निर्णय घेण्याची मानसिकता झाली आहे. कोलकात्यात पोहोचल्यानंतर मी ‘मोठी’ घोषणा करीन’’

स्वप्नाने आपल्या आवडत्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भाग घेतला नाही. ती म्हणाली, ‘‘मी तशीही इथे कोणत्याच स्पर्धेत भाग घेऊ इच्छित नव्हते. मात्र, रेल्वेत असल्याने मला स्पर्धेत भाग घ्यावा लागला.’’

जाकार्ता येथे 2018 मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी स्वप्ना बर्मन पहिलीच भारतीय हेप्टॅथलॉन खेळाडू आहे. यानंतर स्वप्नाला सातत्याने दुखापतींनी पढाडले. दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असलेल्या स्वप्नाने 2019 मध्ये दोहा येथे आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. हीच तिची अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरली.

कोविड-19 महामारी आणि ‘लॉकडाउन’मुळे स्वप्ना 2020 मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही. 2021 मध्ये तिने टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्याचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. मात्र, पुन्हा दुखापत आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं. स्वप्नाने यंदा फक्त फेडरेशन कप आणि काही राष्ट्रीय ओपन अॅथलेटिक्स स्पर्धेतच भाग घेतला.

स्वप्ना बर्मन म्हणाली, ‘‘असं वाटतं, की काही गोष्टी माझ्या नशिबातच नव्हत्या. मी त्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, दुखापतींमुळे बराच संघर्ष करावा लागल्याने काहीही मिळवू शकले नाही.’’

तज्ज्ञांनी दिलेला सल्ल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यास स्वप्नाने विलंब केला. तिने रिहॅबिलिटेशनवर अधिक विश्वास ठेवला. मात्र, त्यामुळे तिला फारसा आराम मिळू शकला नाही. आता तिला शस्त्रक्रिया टाळणे शक्य नाही. स्वप्नाने भावूक होऊन म्हणाली, ‘‘अखेर मला शस्त्रक्रिया करावीच लागणार आहे. या स्पर्धेदरम्यानही मी पाठीच्या दुखण्याने त्रस्त होते. ’’

जलपैगुडी (पश्चिम बंगाल) येथील स्वप्ना गेल्या वर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिच्या घरावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. तिच्यावर अवैध पद्धतीने लाकडे असल्याचा आरोप होता. त्या वेळी स्थानिक रहिवाशांनी बर्मन परिवाराचा विरोधही केला होता. त्यावर स्वप्ना म्हणाली, ‘‘लोकांना माझ्या कामगिरीचा हेवा वाटतो. माझ्या आईला खूप त्रास सहन करावा लागत आहे. मी हे आणखी सहन करू शकत नाही. मला माझ्या परिवारासोबत राहावे लागेल. या समस्येशी मलाच सामना करावा लागेल.’’

[jnews_hero_7 include_category=”60″ sort_by=”oldest”]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!