श्रीलंकेचा सलामीचा आक्रमक फलंदाज दनुष्का गुणातिलक (Danushka Gunathilaka) याने मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी या तीस वर्षीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) 8 जानेवारी 2022 रोजी ही माहिती दिली.
एसएलसीने सांगितले, की दनिष्का गुणातिलक (Danushka Gunathilaka) आता मर्यादित षटकांच्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करेल.
जैवसुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणातिलक, कुसाल मेंडिस आणि निरोशन डिकवेला यांच्यावर एक वर्षासाठी प्रतिबंध घातले होते. हे प्रतिबंध हटविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दनुष्का गुणातिलक याने निवृत्तीचा निर्णय घेतला. यापूर्वी फलंदाज भानुका राजपक्षा यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
मी सर्व बाजूने विचार करूनच निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे गुणातिलक याने स्पष्ट केले. गुणातिलक 2018 पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्याने आठ कसोटी सामन्यांत दोन अर्धशतकांसह 299 धावा केल्या आहेत. यात त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 61 आहे.
गुणातिलक याची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी आहे. त्याने 44 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत 36.19 च्या सरासरीने 1,520 धावा केल्या आहेत. याशिवाय 30 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 121.62 च्या स्ट्राइक रेटने 568 धावा केल्या आहेत.
गेल्या वर्षी श्रीलंका संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्या दरम्यान जैवसुरक्षित वातावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणातिलक, मेंडिस आणि डिकवेला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एक वर्षाची बंदी घातली होती. या बंदीच्या कारवाईत स्थानिक क्रिकेटमधून सहा महिन्यांचे निलंबन आणि सुमारे 50 हजार डॉलर दंडाचाही समावेश होता.
गुणातिलक याला शिस्तभंगामुळे कारवाईचा सामना करावा लागला होता. आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर 2015 च्या अखेरीस गुणातिलक याला श्रीलंका क्रिकेट समितीने तीन वेळा निलंबित केले आहे.
श्रीलंकेचा सलामीवीर दनुष्का गुणातिलक कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
Follow on Twitter @kheliyad