मनाचा थरकाप उडविणारी स्लीपिंग ब्यूटी! (पूर्वार्ध)
Sleeping-Beauty-Part-1 |
मला हे नाही माहिती, की एव्हरेस्टला गवसणी घालण्याचं स्वप्न का उराशी बाळगलं जातं? मला हेही नाही माहिती, की या एव्हरेस्टला गवसणी घालूनही गिर्यारोहक नेमकी काय सिद्ध करू पाहत आहेत?
या सर्व प्रश्नांचं उत्तर साहस हे एकमेव असेल तर मी ख्रिस्तोफर कोलंबसच्या सागरी सफरींसमोर नतमस्तक होईन.. ज्याच्यामुळे अमेरिकी बेटांचा शोध लागला. पण काहीही असो, कधी कधी ग्रीन बुटाची हेलावणारी कहाणी ऐकली, की या साहसाच्या पलीकडेही काही तरी आहे, असं उगीच वाटत राहतं.
अर्थात, ग्रीन बुटाची काळीज हेलावणारी कहाणी इथेच संपत नाही, तर स्लीपिंग ब्यूटी ती आणखी पुढे नेत काळीज चिरत जाते… 1996 मध्ये सेवांग पलजोरच्या चिरशांतीने हा महाकाय पर्वत द्रवला नाही आणि त्याच्या दोनच वर्षांनी स्लीपिंग ब्यूटीच्या करुण मृत्यूनेही हा पर्वत कधी थरारला नाही…
म्हणूनच या पर्वताच्या कुशीत दडलेली ही स्लीपिंग ब्यूटी सतत अस्वस्थ करीत राहते… कोण ही स्लीपिंग ब्यूटी, “Sleeping Beauty” जिचा शेवट मन सुन्न करून गेला..?
ही कहाणी आहे ख्रिस्तोफर कोलंबसनेच शोधलेल्या एका अमेरिकी बेटावरची. प्रशांत महासागराने वेढलेल्या हवाई संयुक्त राज्यातली ही कहाणी आहे, ज्यांचा एकही क्षण सागराची गाज ऐकल्याशिवाय जात नाही.
या राज्याची राजधानी होनोलुलू. या होनोलुलू शहरात अशा धाडसी सुंदरीचा जन्म झाला, जी एव्हरेस्टच्या इतिहासात अजरामर ठरली. ही धाडसी सुंदरी आहे फ्रॅन्सिस अर्सेंटिएव.
फ्रॅन्सिसचं जगणं एका कोशापुरतं मर्यादित कधीच नव्हतं. त्यामागे तिचे वडील जॉन यार्ब्रो John Yarbro | आणि मरिना गॅरेट Marina Garrett | यांची प्रेरणा होती. कारण फ्रॅन्सिस जेव्हा सहा वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांनी ‘कोलोरॅडो माउंटेन’ला Colorado Mountains | गवसणी घातली होती.
कोलोरॅडोला ‘५८ फोर्टिनर्स’ 58 fourteeners | म्हंटलं जातं. कारण १४ हजार फुटांपेक्षा अधिक ५८ शिखरं एकट्या कोलोरॅडोत आहेत. त्यापैकी एक शिखर फ्रॅन्सिसच्या वडिलांनी सर केलं. त्या वेळी चिमुकल्या फ्रॅन्सिसला या कामगिरीचं फारसं अप्रूप वाटलं नसेलही, पण जेव्हा तिला समजू लागलं, तसं तिला एक कुतुहूल दाटलंच असेल, की डॅडने एवढा मोठा डोंगर कसा सर केला असेल!
अर्थात, वडिलांच्या या साहसाने ती फारशी प्रेरित झाली नाही… यार्ब्रो कुटुंबात ती सामान्य मुलींसारखीच वावरली. सागराची गाज ऐकूनही ती कोलंबसासारखी त्याला आव्हान द्यायला कधी गेली नाही.
एका सामान्य मुलीसारखं तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिच्या शाळेचं नाव होतं दि अमेरिकन स्कूल. स्वित्झर्लंड आणि इटलीच्या सीमेवरील माँटॅग्नोला Montagnola | येथे ही निवासी शाळा आहे.
पुढे लुईसविले विद्यापीठातून University of Louisville | तिने पदवीचं शिक्षण घेतलं आणि फिनिक्समधील Phoenix | बिझनेस मॅनेजमेंट स्कूलमधून मास्टर डीग्री घेतली. पुढे तिने कोलोरॅडो प्रांतातील टेलुराइड Telluride | येथे तिने ८० च्या दशकात अकौंटंट म्हणून नोकरी केली.
इथपर्यंतच्या तिच्या जीवनप्रवासात म्हणजे वयाच्या तिशीपर्यंत तिचा गिरिभ्रमणाशी कुठेही संपर्क आला नाही.
मात्र, १९९२ मध्ये वयाच्या ३४ व्या वर्षी सर्गेई अर्सेंटिएव याच्याशी ती विवाहबद्ध झाली आणि “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा…” अशी कोलंबसाच्या थाटात ती पर्वतांना ललकारू लागली. त्याचं कारण म्हणजे तिचा नवरा सर्गेई.
तो एक सराईत गिर्यारोहक होता. रशियातील सर्वांत उंच अशा पाच शिखरांवर चढाई करणारा सर्गेई गिर्यारोहकांमध्ये “स्लो लेपर्ड” (हिमबिबळ्या) या नावाने प्रसिद्ध होता.
या आवडीतूनच फ्रॅन्सिसही त्याच्यासोबत धाडसी अभियानात सहभागी होऊ लागली. या दोघांनी रशियन शिखरांनाही गवसणी घातली. यातलं पहिलं शिखर होतं ५८०० मीटर उंच.
या अर्सेंटिएव दाम्पत्याने देनाली Denali | माऊंटेन शिखरही लीलया काबीज केलं. साधंसुधं नाही, तर समुद्रसपाटीपासून तब्बल २० हजार ३१० फूट उंच हे शिखर होतं.
पुढे दक्षिण रशियातलं एल्ब्रस Mountain Elbrus | हे शिखर सर करताना फ्रॅन्सिसने एक विक्रम नोंदवला. तो म्हणजे शिखरापासून पायथ्यापर्यंत तिने चक्क स्कीइंग skiing | केलं!
म्हणजे तब्बल ६,१९० मीटरचा पर्वत ती केवळ स्कीद्वारे खाली आली. अशी कामगिरी करणारी ती अमेरिकेतली पहिली महिला ठरली. सिकंदराच्या थाटात तिने पूर्व आणि पश्चिमेतली शिखरेही जिंकली.
अशी एकापाठोपाठ एक शिखरं यशस्वीपणे सर केल्यानंतर फ्रॅन्सिसला आव्हान देणारं एकच शिखर उरलं होतं, ते म्हणजे माउंट एव्हरेस्ट.
तिने माउंट एव्हरेस्टला आव्हान दिलं. तसेही माउंट एव्हरेस्ट बरेच जण सर करतात, पण अर्सेंटिएव दाम्पत्याला इतिहास रचायचा होता. त्यामुळे सामान्यांसारखा विचार करणारं हे दाम्पत्य मुळीच नव्हतं.
त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला, जो ऐकल्यानेच मनाचा थरकाप उडेल. तो म्हणजे ऑक्सिजनशिवाय एव्हरेस्टला गवसणी घालणे! वयाच्या चाळिसाव्या वर्षी फ्रॅन्सिसने घेतलेला हा सर्वांत धाडसी आणि धक्कादायक निर्णय होता.
सर्गेई आणि फ्रॅन्सिसने हा निर्णय घेतलास तेव्हा त्यांना ११ वर्षांचा मुलगा होता! पॉल डीस्टेफॅनो-अर्सेंटिएव Paul Distefano | असं त्याचं नाव. त्याला एव्हरेस्ट माहीत नव्हतं, पण उंचावर जाणं किती भीतिदायक असतं हे चांगलंच ठाऊक होतं.
फ्रॅन्सिस आणि सर्गेईने मात्र आपल्या चिमुकल्याची समजूत काढली आणि मोहिमेच्या तयारीला लागले. ते अशा मोहिमेवर निघाले होते, जेथे आठ हजार मीटरवर ऑक्सिजन नाहीच, शिवाय हाडे गोठविणारे उणे ४० पेक्षा कमी तापमान.
त्यात फ्रॅन्सिस ना सर्गेईसारखी निष्णात गिर्यारोहक होती, ना त्याच्यासारखी प्रचंड साहसी.
१९९८ ची ती रात्र चिमुकला पॉल झोपू शकला नाही. नंतर कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही. मात्र, रात्री अचानक दचकून उठला. त्याला अनामिक भीतीने ग्रासले होते. त्याने आईला मोठ्याने आवाज दिला…
फ्रॅन्सिस त्याच्याजवळ आली आणि त्याला आपल्या कुशीत घेत विचारले, काय झालं बाळा?
त्याने आईकडे पाहिलं नि म्हणाला, मी स्वप्न पाहिलं. त्यात दोन गिर्यारोहक पर्वतावर अडकले. त्यांना समुद्राच्या बर्फांनी वेढले होते. त्या बर्फातून ते बाहेर पडूच शकले नाहीत…
या स्वप्नाचा अर्थ त्या चिमुकल्या पॉलला उमगला नाही. नेमकी अशा वेळी हे दुःस्वप्न पडलं ज्या वेळी त्याच्या आईवडिलांनी एव्हरेस्टची मोहीम आखली होती…. आईने भेदरलेल्या पॉलला शांत केले.
फ्रॅन्सिस आणि सर्गेई या अर्सेंटिएव दाम्पत्याच्या एव्हरेस्ट मोहिमेचा हा थरार १७ मे १९९८ रोजी सुरू झाला. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे दोघे पोहोचले. इथूनच खरी मोहीम सुरू होते.
रशियन शिखरांचा अनुभव असलेल्या या दाम्पत्याने दिवसभरात उत्तर ध्रुवापर्यंतचं ७७०० मीटर म्हणजे तब्बल २५ हजार २६३ फूट अंतर पूर्ण केलं. ही ऊर्जा थक्क करणारी होती.
त्यांच्यासोबत इतर २१ गिर्यारोहकही होते. १९ मे १९९८ रोजी म्हणजे दोनच दिवसांत त्यांनी ८२०० मीटरचं अंतर कापलं. ते आता कॅम्प ६ वर जाऊन पोहोचले. सर्गेईने रेडिओद्वारे ही शुभवार्ता सांगितली, की आता आम्ही उत्तम आहोत आणि २० मेच्या मध्यरात्री एक वाजता शिखराच्या दिशेने कूच करू.
रात्रीच्या नीरव शांततेत आठ हजारावरील उंचीवरून शिखराकडे निघालेल्या या दाम्पत्याने पहिला टप्पा गाठला नाही तोच त्यांचा हेडलॅम्प बंद पडला.
त्यामुळे ते कॅम्प ६ वर माघारी परतले. २१ मे रोजी पुन्हा चढाई सुरू केली; पण काही कारणास्तव ५० ते १०० मीटरवरून त्यांना पुन्हा कॅम्प ६ वर परतावं लागलं. शिखराकडे कूच करूनही दोन वेळा माघारी परतावे लागणे हेच काही तरी संकेत देत होते.
दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर २२ मे रोजी पुन्हा चढाईला सुरुवात केली. ऑक्सिजनशिवाय चढाईचा प्रयत्न करणे म्हणजे मृत्यूची परीक्षा पाहण्यासारखं होतं.
सुरुवातीला जी ऊर्जा होती ती क्षीण होत चालली. असे असले तरी ऑक्सिजनशिवाय चढाई करण्याच्या मनसुब्यांपासून फ्रॅन्सिस ढळली नाही. ते दोघेही हळूहळू पुढे चालत राहिले आणि एका धोकादायक वळणावर येऊन ठेपले.
हा अतिशय कठीण प्रसंग होता, की त्यांना पुन्हा ८००० मीटरवर माघारी फिरावं लागलं. सोबत ऑक्सिजनची बाटली तर अजिबातच नव्हती. त्यामुळे रात्री मुक्काम करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.
धोक्याचा हा तिसरा संकेत होता. तरीही हे दाम्पत्य ध्येयापासून तसुभरही विचलित झालं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी शिखराच्या दिशेने कूच केलं. पण दोघांनाही काय माहीत, की पुढे काय वाढून ठेवलंय?
या मोहिमेदरम्यान सायंकाळी या दाम्पत्याची अचानक ताटातूट झाली. एखाद्या गर्दीत ताटातूट होणे एक वेळ समजू शकते, पण ही ताटातूट होती आठ हजार मीटर उंचीवर! सर्गेई काळजीत पडला.
त्याने परतणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाकडे चौकशी केली. तो फोटो दाखवायचा, वर्णन करायचा. पण सगळ्यांनीच सांगितलं, आम्हाला माहीत नाही. त्याची अस्वस्थता वाढत गेली. अखेर त्याने शिखराचा विचार सोडला आणि फ्रॅन्सिसचा शोध सुरू केला.
त्याला ही जाणीव होती, की एव्हरेस्टचा प्रवास प्रचंड धोकादायक आहे. त्यात फ्रॅन्सिसने ऑक्सिजनशिवाय चढाईचा निर्णय घेतल्याने तो भेदरलाच. कदाचित तिचं बरंवाईट तर झालं नसेल ना? नाना विचारांनी तो अस्वस्थ होत होता. त्याने फ्रॅन्सिससाठी ऑक्सिजन आणि काही औषधे सोबत घेतली.
पुढे काय झालं, हे कुणालाही माहीत नाही. सर्गेईला नंतर कुणीच पाहिलं नाही. या दाम्पत्याच्या मोहिमेचं कारुण्य असं, की पती सर्गेई जो तिच्या शोधासाठी बाहेर पडला होता, त्याचा मृतदेह तब्बल वर्षभरानंतर सापडला.
‘मॅलोरी अँड आयर्विन’ Mallory and Irvine | या मोहिमेतील एक सदस्य जेक नॉर्टन Jake Norton | याला सर्गेईचा मृतदेह आढळला. आपली लाडकी पत्नी फ्रँन्सिस हिच्या शोधात निघालेला सर्गेई पर्वताच्या ज्या बाजूने तोंड आहे, तेथेच उंच डोंगरावरून तो कोसळला.
मग फ्रॅन्सिसचं पुढे काय झालं?
दक्षिण आफ्रिकेच्या कॅथी ओडाउडने Cathy O’Dowd फ्रॅन्सिसला अखेरचं पाहिलं. तिला नंतर कळलं, की एका उझबेकिस्तान टीमनेही तिला पाहिलं होतं, जी टीम शिखरापासून अवघ्या शंभर मीटरवर होती.
मात्र, फ्रॅन्सिस ऑक्सिजनअभावी अर्धमेली झालेली होती आणि तिला शीतदंशही frostbite | झालेला होता. तिच्या हालचाली कमालीच्या मंदावल्या होत्या. कॅथी आणि तिच्या मित्रांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला.
तिला शक्य तेवढे खाली आणण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्याकडे जेवढा ऑक्सिजन होता त्याच्या मदतीने त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले. नंतर ही टीम अक्षरश: गलितगात्र झाली.
अखेर या टीमने प्रयत्न सोडले. अंगाचा थरकाप उडेल, पण जेव्हा या टीमने प्रयत्न सोडून दिले, त्या वेळी फ्रॅन्सिस जिवंत होती…! मग तिला मरणाच्या दारात का सोडलं?
फ्रॅन्सिसला शेवटचं पाहणारी महिला होती कॅथी ओडाउड. तिने काय पाहिलं, त्या अखेरच्या तासांत कॅथी ओडाउडला कोणती धक्कादायक माहिती कळली… वाचा या प्रकरणाच्या उत्तरार्धात…
Comments 6