धावांची तू भुकेली रे मिताली…
धावांची तू भुकेली रे मिताली…
भारतीय महिला क्रिकेट संघाची (Women Cricket India) कर्णधार मिताली राज (Mithali Raj) अजूनही धावांची भुकेली आहे. त्याचं कारण म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत तिने 86 चेंडूंत साकारलेली ७५ धावांची अर्धशतकी खेळी. या कामगिरीने ती क्रिकेटच्या सर्व प्रारूपांमध्ये सर्वाधिक धावा करणारी एकमेव महिला खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ वर्षांचा अनुभव असलेली भारतीय खेळाडू मिताली न उलगडलेलं कोडं आहे. वयाच्या 38 व्या वर्षीही तिची धावांची भूक संपलेली नाही… हेच यावरून सिद्ध होतं. मितालीही म्हणते, की माझी धावांची भूक अजूनही तशीच आहे, जेवढी 22 वर्षांपूर्वी होती. पुढच्या वर्षी (2022) न्यूझीलंडमध्ये वनडे विश्वकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत फलंदाजी आणखी उंचीवर घेऊन जाण्याचा तिचा प्रयत्न असेल.
‘‘माझ्यात अजूनही तो जोश आहे. मैदनावर उतरून भारताला सामना जिंकून देण्याची ती उमेद आहे. माझ्या फलंदाजीचा विचार करता, मला वाटते, की अजूनही यात सुधारणेची गरज आहे. यावर मी कामही करीत आहे. काही अशा गोष्टी आहेत, ज्या मी फलंदाजीशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.’’
भारतीय महिला क्रिकेट आणि मिताली हे एक समीकरणच झालं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. अखेरच्या तिसऱ्या वनडे क्रिकेट सामन्यात मितालीने इंग्लंडविरुद्ध 75 धावांची दमदार अर्धशतकी खेळी साकारली. अवघ्या 86 चेंडूंत तिने केलेल्या 75 धावांमुळे भारताने इंग्लंडला चार गडी राखून पराभूत केले. या कामगिरीने मितालीने नवा विक्रम रचला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारांत सर्वाधिक धावा बनविणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू (Women Cricket) ठरली आहे.
मितालीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात आयर्लंडविरुद्धच्या सामन्यापासून झाली. मिल्टन केयन्समध्ये 26 जून 1999 रोजी ती हा पहिला सामना खेळला होता. मिताली म्हणते, ‘‘ज्या पद्धतीने मी या क्रिकेट प्रवासात पुढे जात आहे, तो सोपा मुळीच नाही. या प्रवासात स्वत:च्या काही परीक्षा आणि आव्हाने होती. मला नेहमी वाटतं, की या परीक्षांचा काही तरी उद्देश असतो.’’
मिताली म्हणते, ‘‘अशीही एक वेळ आली होती की वाटलं, आता खूप झालं. मात्र, काही तरी होतं की मी खेळत राहिले. आता मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्षे झाली आहेत. मात्र धावांची भूक अजूनही कमी झालेली नाही.”
मितालीने आभासी संवाद कार्यक्रमात सांगितले, ‘‘माझ्यात अजूनही तो जोश आहे. मैदानावर उतरून भारताला सामना जिंकून देण्याची ती उमेद आहे. माझ्या फलंदाजीचा विचार करता, मला वाटते, की अजूनही यात सुधारणेची गरज आहे. यावर मी कामही करीत आहे. काही अशा गोष्टी आहेत, ज्या मी फलंदाजीशी जोडण्याचा प्रयत्न करीत आहे.’’
मितालीने 2019 मध्येच टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तिने यापूर्वीच संकेत दिले आहेत, की न्यूझीलंडमधील वर्ल्डकप माझ्या कारकिर्दीतला अखेरचा असेल. न्यूझीलंडमध्ये चार मार्च ते तीन एप्रिल 2022 दरम्यान महिला विश्व कप होणार आहे.
मिताली 38 वर्षांची आहे. मात्र, अजूनही तिच्या खेळात पूर्वीसारखाच जोश आहे. फलंदाज म्हणून वावरत असतानाच ती खेळाडूंना मार्गदर्शनही करते. ती म्हणते, ‘‘माझ्यासाठी फलंदाजी नेहमीच महत्त्वाच्या भूमिकेत राहिली आहे. ही अशी भूमिका आहे, जी काही वर्षांपूर्वी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. वैयक्तिक फलंदाजीच्या जबाबदारीबरोबरच डाव सांभाळण्याची जबाबदारीही यात आहे.’’
मितालीने आशाही व्यक्त केली, की उपकर्णधार आणि टी20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर लवकरच फॉर्मात येईल. ती म्हणाली, ‘‘अशा प्रसंगाला कोणत्याही खेळाडूला सामोरं जावं लागू शकतं. अनेकदा तुम्ही फॉर्मात नसतात. मात्र, एका संघाच्या रूपाने तुम्ही त्या खेळाडूला साथ देणे आवश्यक आहे. आम्ही जाणतो, की तिने स्वत:च्या हिमतीवर आमच्यासाठी सामने जिंकले आहेत. आता तिला भारतीय संघाच्या समर्थनाची गरज आहे.’’
Women cricket India Mithali | मितालीने 3 जुलै 2021 रोजी अर्धशतक झळकावत तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला. इतर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीव्यतिरिक्त मितालीच्या स्ट्राइक रेटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रमुख परिषदेच्या सदस्या शांता रंगास्वामी यांना ही टीका अयोग्य वाटते.
शांता रंगास्वामी म्हणाल्या, ‘‘स्ट्राइक रेट तेव्हाच महत्त्वाचा असतो, जेव्हा सर्व जण उत्तम फलंदाजी करतात. तीन जुलै 2021 चा सामना वगळता संपूर्ण मालिकेत मुश्किलीने तिला इतर फलंदाजांनी साथ दिली असेल. जर ती नसती तर संघाला 200 धावांपर्यंत पोहोचण्यासाठीही संघर्ष करावा लागला असता.’’
Women cricket India Mithali | भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीवर शांता म्हणाल्या, अष्टपैलू दीप्ती शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. पहिल्या सामन्यात पूनम राऊत आणि इतर दोन सामन्यांत जेमिमा रॉड्रिग्स या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरली होती. मात्र, त्या प्रभावहीन ठरल्या.
शांता म्हणाल्या, ‘‘त्या अजून तरुण आहेत. लवकरच धावा बनवू शकतील. पूनम राऊतनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, जर त्यांना वाटते, की तिसऱ्या नंबरवर बदल आवश्यक आहे, तर दीप्ती उत्तम पर्याय ठरू शकते.
मितालीचे विक्रम तिचा दर्जा सांगतो… : लिसा स्थळेकर
फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मिताली राजचं (Mithali Raj) कौतुक ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकर यांनीही केलं. मिताली 3 जुलै 20201 रोजी सलग चौथे अर्धशतक झळकावले. Women cricket India Mithali | स्थळेकर यांनी ‘क्रिकबज’वर सांगितले, ‘‘वास्तविक दिवसाची सुरुवात स्टार खेळाडू मिताली होती. तिने आम्हाला दाखवलं, की अखेर का तिने विक्रम मोडीत काढणे सुरू ठेवले आहे… ही कामगिरीच तिचा दर्जा सिद्ध करते.’’
स्थळेकर म्हणाल्या, ‘‘ती लक्ष्याचा पाठलाग उत्तम पद्धतीने करते. भारत जेव्हा पहिल्यांदा फलंदाजी करतो, तेव्हा मिताली डावाची सुरुवात करताना जोखीम घेताना दिसत नाही. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना ती जोखीम घेते. कारण ती लक्ष्य ओळखते.’’ Women cricket India Mithali | स्थळेकर म्हणतात, ‘‘तिला गोलंदाजी करताना तुम्ही तिला बरेच वांझोटे चेंडू टाकू शकतात. मात्र, त्यानंतर ती तुमच्या डोक्यावरून थेट फटका लगावते. ती इतक्या सहजतेने असे करते, की थक्क व्हायला होतं. म्हणून कधी कधी मला प्रश्न पडतो, की ती बराच वेळ असा का नाही करीत. मात्र तिची विक्रमी कामगिरी पाहता, यात हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही.’’