All SportsBoxingsports news

खेलो इंडिया : कुणाल, उमर, देविकाला सुवर्ण

‘खेलो इंडिया’तील बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र शनिवारी, 4 फेब्रुवारी 2023 रोजी दुसऱ्या स्थानावर होता. देविका घोरपडे, कुणाल घोरपडे आणि उमर अन्वर शेख या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ‘खेलो इंडिया’तील बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णयश मिळविले. बॉक्सिंग स्पर्धा मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये सुरू आहे.

मुलींच्या ५२ किलो वजनगटात युवा गटातील जगज्जेत्या देविकाने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक मिळवले. तिने अंतिम लढतीत यजमान मध्य प्रदेशच्या काफी कुमारीला पराभूत केले. मुलांच्या ४८ किलो गटात आक्रमकता आणि भक्कम बचावाच्या जोरावर उमरने पंजाबच्या गोपीकुमारला सहज हरवले आणि सुवर्णपदक पटकावले, तर ७१ किलो वजनगटात कुणाल घोरपडे याने हरयाणाच्या साहील चौहान याच्यावर मात केली.

मुलींच्या ६० किलो गटात पुण्याच्याच वैष्णवी वाघमारेला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. देविका, कुणाल, उमर आणि वैष्णवी हे चौघेही पुण्यात ऑलिम्पियन मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. मुंबईच्या उस्मान अन्सारीला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ५१ किलो गटाच्या अंतिम लढतीत मणिपूरच्या मांडेगबमने उस्मानला हरवले.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=iUqtfIA4ygU” column_width=”4″]

रिलेमध्ये महाराष्ट्राची सरशी

खेलो इंडिया स्पर्धेत अॅथलेटिक्समधील मुलींच्या 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली. रिया पाटील, ईशिका इंगळे, गौरवी नाईक आणि ईशा रामटेके यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाने 49.07 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. दिल्लीला रौप्य, तर ओडिशाला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. मुलांमध्ये महाराष्ट्राला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या संघात महेश जाधव, संदीप गोंड,, ऋषीप्रसाद देसाई आणि सार्थक शेलार यांचा समावेश होता. मुलींच्या 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कोल्हापूरच्या सृष्टी रेडेकरने रौप्य पदक मिळवले. सृष्टीने 10 मिनिटे व 8.08 सेकंद वेळ नोंदवली. मुलांच्या 110 मी. अडथळा शर्यतीत कोल्हापूरच्या सार्थक शेलारने 13.82 सेकंद वेळेसह रौप्यपदक, तर क्रीडा प्रबोधिनीच्या संदीप गोंडने 13.95 सेकंद वेळेसह ब्राँझ पदक मि‌ळवले.

आर्यन, संयुक्ताला रौप्य पदक

ग्वाल्हेरला सुरू असलेल्या खेलो इंडिया जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ठाण्याच्या सारा राऊळ हिने सुवर्ण पदक पटकावले. ‘आर्टिस्टिक’मधील ऑल राउंडमध्ये साराने 39.334 गुणांसह हे यश मिळवले. सारा ठाण्यात महेंद्र बाभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. मुलांमध्ये ठाण्याच्या आर्यन दंवडे याने व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याने 13.12 गुणांसह हे यश मिळ‌वले. मुंबईच्याच सार्थक राऊळ याने 12.68 गुणांसह रौप्य पदक मिळ‌वले. तत्पूर्वी, आर्यनने फ्लोअर एक्सरसाइजमध्ये 12.033 गुणांसह रौप्य पदक, तर महाराष्ट्राच्याच मनन कोठारी याने 11.633 गुणांसह ब्राँझ पदक मिळवले. ऑल राउंडमध्ये आर्यनला ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय ऱ्हिदमिकमध्ये महाराष्ट्राच्या संयुक्ता काळे हिने रौप्य पदक मिळवले. मुलींच्या ऑल राउंडमध्ये संयुक्ताने 95.25 गुणांसह हे यश मिळवले. जम्मू- काश्मीरच्या मुस्कानने सुवर्णपदक मिळवले.

सायकलिंगमध्ये संज्ञाला रौप्य

सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मुंबईतील संज्ञा कोकाटे हिने रौप्य, तर कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने ब्राँझ पदक मिळवले. ट्रॅक इव्हेंटमध्ये महाराष्ट्राने आतापर्यंत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन ब्राँझ पदके पटकावली आहेत.

पदकतक्ता

राज्य सुवर्ण  रौप्य ब्राँझ
हरियाणा 21 12 11
महाराष्ट्र 20 25 19
मध्य प्रदेश 18 12 14
राजस्थान 09 04 08
ओडिशा 09 04 07

(4 फेब्रुवारी 2023 पर्यंतची स्थिती)

खेलो इंडिया

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_filter_category=”64″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!