Hand Of God- ‘हँड ऑफ गॉड’ देणार ३० लाख डॉलर!
दिएगो मॅराडोनाचा ‘हँड ऑफ गॉड’ (Hand of God) कोणीही विसरणार नाही. 1986 चा फिफा वर्ल्डकपमधील घडलेली ही घटना 36 वर्षांनंतरही तितकीच जिवंत आणि ताजी आहे. आताही ही घटना आठवण्याचं कारण म्हणजे या हँड ऑफ गॉडच्या फुटबॉलचा लिलाव होणार आहे.
वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत दिएगो मॅराडोनाचा ‘हँड ऑफ गॉड’ (Hand of God) गोल वैध ठरवणाऱ्या रेफरींना लवकरच 30 लाख डॉलरची कमाई होण्याची शक्यता आहे. मॅराडोनाने ज्या चेंडूवर हा गोल केला, त्याचा लिलाव करण्याचा निर्णय रेफरींनी घेतला आहे.
मॅराडोनाने 1986 च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चेंडू हाताने मारून गोल केला होता. इंग्लंडने यावर जोरदार टीका केल्यावर मॅराडोनाने त्यास ‘हँड ऑफ गॉड’ असे नाव दिले होते. हा गोल होणारा चेंडू त्या सामन्यातील मुख्य रेफरी अली बिन नासेर यांच्याकडे होता. आता त्यांनी या चेंडूचा लिलाव करण्याचे ठरवले आहे.
ब्रिटनमध्ये 16 नोव्हेंबर 2022 रोजी या चेंडूचा लिलाव होईल. यानंतर चारच दिवसांनी कतारमध्ये वर्ल्ड कप फुटबॉल सुरू होणार आहे. या चेंडूबाबत कमालीचे औत्सुक्य आहे. त्यामुळे त्याला लिलावात 27 लाख ते 33 लाख अमेरिकन डॉलर किंमत लाभेल, असा अंदाज लिलाव करणार असलेल्या ग्रॅहम बड ऑक्शन्सनी व्यक्त केला. ‘हँड ऑफ गॉड’ गोल करताना मॅराडोनाने परिधान केलेल्या जर्सीला 93 लाख डॉलर लाभले होते. त्या वेळीही ही क्रीडा साहित्यास लिलावात लाभलेली सर्वांत मोठी रक्कम होती. मात्र, ऑगस्टमध्ये 1952 मधील मिकि मँटल बेसबॉल कार्डला 1 कोटी 26 लाख डॉलर मिळाले होते.
काय घडले होते…?
इंग्लंडविरुद्धच्या लढतीत मॅराडोनाने गोलक्षेत्रात चेंडू हेडर करण्यासाठी उडी मारली; पण त्या वेळी त्याने चेंडू हाताने ‘पंच’ केला होता. इंग्लंडने रेफरी अली बिन नासेर यांच्याकडे दाद मागितली. मात्र, अर्जेंटिनास गोल देण्यात आला. त्यानंतर मॅराडोनाने चेंडू डोक्याच्या मदतीने; तसेच ‘हँड ऑफ गॉड’चा वापर करून गोलमध्ये गेला होता, अशी टिप्पणी केली होती. या गोलच्या वादात मॅराडोनाने चार मिनिटानंतर केलेला अप्रतिम गोल झाकोळला गेला होता. त्या वेळी त्याने 68 मीटर धाव घेताना इंग्लंड बचावपटूंना चकवले आणि अर्जेंटिनास 2-0 असे आघाडीवर नेले होते. या गोलची शतकातील सर्वोत्तम गोल म्हणून निवड झाली. अर्जेंटिनाने ही लढत 2-1 अशी जिंकली; पण अजूनही इंग्लंडचे पाठीराखे त्या वेळी आपण ‘हँड ऑफ गॉड’मुळेच हरलो, असा दावा करतात.