Environmental

निसर्गभान जपणारे अमित टिल्लू

नाशिक जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गेलात तर कचरा या विषयावरून भांडणाच्या किती तरी एफआयआर दाखल झालेल्या पाहायला मिळतील. या कचऱ्यावरून दोन कुटुंबांमध्ये भारत-पाक सीमेसारखी टोकाची परिस्थिती निर्माण होते. पण एक व्यक्ती अशी आहे, की त्यांचे कचरा या विषयावरून शेजारपाजाऱ्यांशी कमालीचे सलोख्याचे संबंध आहेत. बरं कचरा या विषयावरून मला घंटागाडी आठवली. या माणसाने या घंटागाडीचाही अपमान केला आहे. नाशिकच्या भाषेतच सांगायचं, तर एकदम ‘कचरा’! बघा ना, घंटागाडी येते, पण हा माणूस कचराच देत नाही. हे सत्र गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मग या कचऱ्याचं हा माणूस नेमकं करतो तरी काय? कुतूहल दाटलं ना? हा माणूस आहे अमित टिल्लू, ज्याने कचऱ्याचं छान व्यवस्थापन केलं आहे.

अमित टिल्लू
अमित टिल्लू

मित टिल्लू मूळचे मुंबईचे. म्हणजे बोरिवलीतले. अर्थातच त्यांचं शिक्षणही तिथंच झालं आहे. त्यांनी 2003 मध्ये मुंबईला कायमचा रामराम ठोकला आणि नाशिकमध्ये स्थायिक झाले. थोडक्यात म्हणजे सांगायचं, तर त्यांची बायको नाशिकची. त्यामुळे अमित टिल्लू सासूरवाडीला आले. नाशिकला त्यांनी घर घेतलं होतंच. नाही तर उगाच कुणी म्हणेल, की हे घरजावई झाले की काय…? तर तसं नाही; पण व्यापक अर्थाने म्हणाल तर नाशिककरांसाठी ते घरजावईच आहेत. शेती आणि माती हेच त्यामागचं कारण. परत नाशिककरांना वाटेल, मुंबईकर आहे ना, म्हणजे शेतीची माती करण्यासाठीच आला की काय.. पण तसं नाही. ते शेतीच्या मातीचं सोनं करण्यासाठी आले. आपल्याकडे सध्या काय झालंय, की पर्यावरणात माती महत्त्वाची आहे हे कोणी लक्षातच घेत नाही. उत्पादनक्षम माती असावी, यावर गावगप्पा आपण खूप करतो हो, पण कृतीत काही उतरत नाही, त्याचं काय? थोडक्यात काय, तर कळतं पण वळत नाही. टिल्लूंनी आपल्या कृतीतून पर्यावरणस्नेही जीवनशैली समजून सांगितलीच, पण पर्यावरणाला त्यांनी ‘सहजतेचं’ वळणही दिलं. ही सहजता जगण्यातली.

अमित टिल्लू यांनी 2004 मध्ये पर्यावरण जागृतीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. मुख्यत्वेकरून शेती करावी आणि शेतीच्या अनुषंगाने कमी खर्चात पर्यावरणस्नेही तंत्रे विकसित करावी हा त्यांचा सुरुवातीचा दृष्टिकोन होता. त्या दृष्टीने अमित आणि जुई या टिल्लू दाम्पत्यांचं काम वाखाणण्याजोगं आहे. त्यांची पत्नी जुई बीएस्सी अ‍ॅग्री आहेत. त्यामुळे अमित टिल्लूंचं पर्यावरणस्नेही आयुष्य जुईमुळे सुगंधितच झालं. शेती करताना त्यांच्या लक्षात आलं, की पर्यावरण क्षेत्रातही काम करणं खूपच आवश्यक आहे. तसंही अमित यांचं बालपण निसर्गाशी एकरूप साधणारंच होतं. म्हणजे बचावकार्य असेल किंवा वन्यजीव संरक्षण यात ते मुंबईत लहानपणापासून काम करायचे. कारण ते बोरिवलीला राहायचे. त्यांच्यासमोरच संजय गांधी नॅशनल पार्क होतं. ‘एसजीएनपी’ हे त्याचं संक्षिप्त नाव त्यांच्या ओठांवर इतक्या पटकन आलं, की त्यांचं या उद्यानाशी किती जवळचं नातं आहे हे स्पष्ट होतं. ट्रेकिंग, प्राणी वगैरे त्यांच्या अंगवळणी पडलं होतं.

शेतीमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी ठरवलंच होतं, की जे करायचं ते पर्यावरणस्नेही असावं. म्हणजे आपल्याकडे इतका रासायनिक खतांचा वापर होतोय, की त्यातून बाहेर पडायला कुणी तयार नाही. त्यासाठी मानवाच्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. उगाच पर्यावरणाच्या गप्पा झोडायच्या आणि स्वतःत काडीमात्र बदल करायचा नसेल तर मग हे सगळं पर्यावरणप्रेम वृथा म्हणावं. टिल्लूंना हे मान्य नव्हतं. जे काही करायचं ते स्वतःपासूनच. त्यामुळेच त्यांनी शेतीकडे पर्यावरणस्नेहीच्या भूमिकेतूनच पाहिलं. पूर्णपणे स्थानिक बियाणे, सेंद्रिय खत याकडेच कटाक्ष ठेवला. भात, नागली, वरई, कुळीथ, खुरासणी ही पिकं घेतली. त्यांची पत्नी बीएस्सी अ‍ॅग्रीच असल्याने दोघांनी मिळून तिथल्या परिसराचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या पत्नीचा वनस्पतिशास्त्रात अभ्यास चांगला आहे. त्यामुळे त्यांना तिथल्या स्थानिक वनस्पतींची माहिती मिळणे सोपे गेले. पण त्यांना जाणवलं, की पर्यावरणाची जाण आणि भान अनेकांना अजून आलेलंच नाही. त्यामुळे टिल्लू दाम्पत्याने नंतर थेट पर्यावरण रक्षणासाठीच कंबर कसली.

खरं तर आपल्याला पर्यावरण रक्षण खूप सोपं वाटतं. मुळात टिल्लू यांचा विचार त्यापेक्षाही सोपा आहे. तुम्हाला जर पर्यावरणाविषयी खूपच कळकळ आहे ना, मग तुम्ही काहीच करू नका! तुमच्या भुवया आपसूकच उंचावल्या असतील, पण टिल्लूंच्या मते, खरंच तुम्ही काहीच करू नका. कारण ज्या क्षणी आपण काहीच करत नाही, त्याच क्षणी निसर्गाची गाडी रुळावर आणण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो. कारण आपण एखादी गोष्ट करताना इतकी घाई करतो, की त्याच्यामुळे होणारं नुकसान भयंकर असतं, अशी भीती अमित टिल्लू व्यक्त करतात. ती अनाठायी अजिबात नाही. त्यावर त्यांनी 1972 च्या दुष्काळाचं उदाहरण दिलं. आपल्या देशात जेव्हा दुष्काळ पडला, त्या वेळी आपण अमेरिकेहून मायलो (मिलो) गहू आयात केला होता. या गव्हाबरोबर दोन महत्त्वाची तणं भारतात पसरली. ती तणं म्हणजे काँग्रेस गवत आणि पिवळा धोत्रा (Argemone mexicana). हे काँग्रेस गवत इतकं फोफावलं, की त्यावर उपाय म्हणून कृषी विद्यापीठांनी एक मेक्सिकन किडा शोधला. त्याला मेक्सिकन बीट्ल (zygogramma bicolorata) असं इंग्रजी नाव आहे. उपाय तर शोधला, पण आता या संशोधकांच्या डोक्यात नवा किडा वळवळू लागला, तो म्हणजे आता या मेक्सिकन किड्याला नियंत्रित कसं करायचं? मग त्यावर पुन्हा उपाय शोधावा लागला. पूर्णपणे नीट विचार न करता घाईघाईने पर्यावरणासाठी घेतलेले निर्णय किती धोकादायक असतात, त्याचे हे ज्वलंत उदाहरण.

वृक्षलागवडीवरही ते तेवढ्याच स्पष्टपणे आपले मुद्दे मांडतात. आपण खूप आवडीने, उत्साहाने वृक्षलागवड करीत असतो; पण पर्यावरणाचं भान न ठेवता केलेल्या वृक्षलागवडीचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. आपल्या डोक्यात एकच आहे, की खूप झाडे लावल्याने आपल्याला त्यापासून ऑक्सिजन मिळते, खूप फायदे मिळतात. ही लागवड करतानाही वृक्ष स्थानिक म्हणजे देशी- भारतीय मुळाचे असावेत, असा विचार सांगितला जातो. टिल्लू यांना मुळात देशी-विदेशी हा भेदच मान्य नाही. टिल्लू दाम्पत्य मुळातच पर्यावरणशास्त्रातले असल्याने ते वृक्षांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करतात. म्हणजे वृक्षाचे स्थान काय, ते तुम्ही अस्थानी लावत नाही ना, याचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा, हा त्यांचा आग्रह. कारण वृक्षांना राजकीय सीमारेषा (त्याला ते पॉलिटिकल बाउंड्रीज हा शब्द वापरतात) कळत नाहीत. कारण तुम्ही भारतीय झाड आणि पाकिस्तानी झाड असा भेद करू शकत नाही. कराचीत उगवणारा आंबा आणि अमृतसरमध्ये उगवणारा आंबा यात मूलतः खूप काही फरक नाही. मात्र, कराचीत उगवणारा आंबा आणि कोकणात उगवणारा आंबा किंवा अमृतसरमध्ये उगवणारा आंबा आणि कोकणात उगवणारा आंबा यात मूलभूत फरक नक्कीच आहे. कारण झाडांना राजकीय सीमारेषा नाही, तर भौगोलिक (geographical) सीमारेषाच कळतात. नर्मदेच्या पलीकडे आणि नर्मदेच्या अलीकडे, गोदावरीच्या पलीकडे आणि गोदावरीच्या अलीकडे यातलं त्यांना काहीही समजत नाही. त्यामुळे भारतीय वृक्ष या नावाखाली आपण जो भेद करतो तो मुळी वृथा आहे. हिमालयाच्या पायथ्याशी उगवणारा रुद्राक्ष हा भारतीयच आहे, देशी आहे; पण ते झाड जर नाशिकमध्ये किंवा कुठेही लावलं तर ते भयंकर धोकादायक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वृक्ष अस्थानी लावले जाऊ नये, हे ते अतिशय जोरकसपणे सांगतात.

गेल्या बारा हजार वर्षांपूर्वीपासूनचा नाशिकचा इतिहास बघितला, म्हणजे प्रागैतिहासात डोकावलं तर त्या वेळी नाशिकमध्ये मानवी वस्ती खूपच तुरळक होती. उत्खननातील अहवाल पाहिले तर नाशिक किंवा त्याच्या आसपासचा मोठा परिसर हा कधीच जंगलांचा नव्हता. हा केवळ गवताळ रानांचा होता आणि त्याचमुळे आपल्याकडची जमीन जिकडेतिकडे काळीभोर होती. तेथे दहा-पंधरा फूट गवतं उगवलेली होती.

नाशिकचा जंगलांचा भाग होता वगैरे या खूप उशिरा उभारलेल्या गोष्टी आहेत. मुळात रामायण खरं की खोटं यात आपल्याला पडायचं नाही. ते आपण बाजूला ठेवूया. आपण विज्ञानावर विश्वास ठेवूया. निफाड, सिन्नरमध्ये उत्खननं झाली. जळगाव पट्ट्यापासूनही बरीच उत्खननं झाली. तो मुळात नाशिकचाच भाग आहे. या सगळ्यांमध्ये जे प्राण्यांचे अवशेष मिळाले, त्यावरून नाशिकची भौगोलिक स्थिती स्पष्ट होते. नाशिकमध्ये गेंड्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर मिळाले आहेत. हत्तींचा पूर्वज समजला जाणारा मॅमथ (mammoth) या महाकाय हत्तीचा पूर्ण सांगाडा नाशिकमध्ये आढळला आहे. हा सांगाडा आजही कोलकात्यातील झूलॉजिकल पार्कमध्ये पाहायला मिळतो. आपल्याकडे गेंड्यांचेही अवशेष मिळाले आहेत. जेथे दहा-पंधरा फूट उंच गवत आहे, तेथेच हा प्राणी आढळतो, हे शास्त्रीय माहितीच्या आधारे ते ठामपणे सांगतात. मग आपण जी वृक्षलागवड करीत आहोत, ती अगदीच आंधळेपणाची आहे. कारण आपण जी झाडं लावतो, ती तेथील स्थानिक परिसंस्थेचा नाश करूनच. त्याला संस्था, वन खातेही जबाबदार आहे. ही आंधळी वृक्षलागवड होण्यामागे एकच विश्वास आहे, तो म्हणजे झाडांमुळे हिरवळ होते आणि ऑक्सिजन मिळतो! आता हेही एक मिथकच आहे.

ऑक्सिजन हे झाडांमुळे किंवा जंगलातल्या झाडांमुळे मिळत नाही. पन्नास टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन हा समुद्रातील एकपेशीय वनस्पतींमुळे मिळतो. जर आपण यापुढील काळात समुद्रातील एकपेशीय वनस्पतींचं संरक्षण करू शकलो नाही तर पन्नास टक्के ऑक्सिजन तेथेच वजा होणार आहे आणि आपण हा ऑक्सिजन कशामुळे कमी करतोय, तर देशातील साठ हजारांहून अधिक रसायनांमुळे. ही पूर्णपणे शास्त्रीय माहिती देताना अमित टिल्लू यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता लपत नाही. या रसायनांमध्ये अशा किती तरी वस्तू येतात, जी या भंपक आधुनिक जीवनशैलीने निर्माण केलेली आहेत. या रसायनांमध्ये वापरलेले सिंथेटिक कपडे येतात, डीओड्रंट्स, नायलॉन, रेयॉन पॉलिएस्टर, शिफॉन हे सगळंच येतं. या सगळ्यांचं मूळ पेट्रोलियमशी येतं. याचं रिसायकलिंग करतो, असं म्हणून तुम्ही हात झटकू शकणार नाही. रिसायकलिंग केलं तरी तुम्ही तत्पूर्वीच पर्यावरणाला प्रचंड हानी पोहोचवलेली असते, हे सामान्य माणसाच्या लक्षातही येत नाही. म्हणजे हे जे वापरलेले कपडे आहेत, ते धुतल्यानंतर त्यातून टनावारी मायक्रो फायबर पाण्यात मिसळतं. तेच आपल्या पोटात जातं. त्याला जैववर्धीकरण (biomagnification) म्हणतात. समजा, एका छोट्या माशाच्या पोटात पाच-सात प्लास्टिकचे कण जातात. असे शंभर मासे त्याच्यापेक्षा मोठा मासा खातो. त्यापेक्षा मोठा मासा अशा माशांना खातो. असे मासे मग आपण खातो. ज्या वेळी आपल्या ताटात मासा खायला घेतो तेव्हा या सर्व माशांनी खाल्लेले प्लास्टिकचे बारीक बारीक कण त्याच्या रक्तात शिरलेले असतात आणि तेच आपल्याही पोटात जातात. हे फक्त माशांपुरतंच किंवा मांसाहारापुरतंच मर्यादित नाही, तर ते शाकाहारी आहारामध्येही तितकेच आहे. कारण आपल्या मिठामध्येसुद्धा ते शिरलेले असते. ज्याला आपण नैसर्गिक मीठ म्हणतो, म्हणजे नैसर्गिक मिठागरांमध्ये तयार होणाऱ्या मिठातही हे प्लास्टिक असतं.

अमित टिल्लू देतात धोक्याचे संकेत

निसर्गाची हानी केली की निसर्गही तुमच्यावर सूड उगवतो हे वाक्य आपण सांगतो. पण त्याचा समोरच्या व्यक्तीवर फारसा परिणाम होत नाही. अमित टिल्लू हेच वेगळ्या शब्दांत उदाहरणासह सांगतात. आपण नाशिकमध्ये फेकलेली प्लास्टिकची पिशवी नासर्डीतून (एकेकाळची नंदिनी नदी) गोदावरीत जाते. गोदावरीतून बंगालच्या उपसागरात जाते. तेथील मिठागरांमध्ये जे वाळलेलं मीठ आपल्याकडे येतं तेच प्लास्टिक आपल्या पोटात जातं. जे आपण निसर्गाला देतो, तेच निसर्गाकडून आपल्याला साभार परत मिळतं. त्यामुळे हे सगळे बाउन्सबॅक होणारे घटक आहेत. आपल्याला एटीएममध्ये रिसीट मिळते, मॉलमध्ये गेले की छापील रिसीट मिळते, बसचं तिकीटही छापीलच मिळतं. मुळात तो कागद काय आहे, तर थर्मल पेपर आहे. याला उष्णता मिळाली, की त्यावरची अक्षरं आपल्या बोटावर उमटतात. त्यात जे केमिकल असतं, त्याचं नाव आहे बिसफिनॉल ए (bisphenol A). सोप्या भाषेत सांगायचं, तर बीपीए. हे बीपीए तुमच्या शरीरात स्कीनमधून दाखल होतं. म्हणजे न खाताही तुमच्या शरीरात हा हानिकारक घटक पोहोचतो. थोडीशी जरी उष्णता मिळाली तरी तो तुमच्या हातावर पेंट होतो. बीपीए हा मेडिकलच्या केसेसमध्ये शंभर टक्के कर्करोग प्रवृत्त करणारा घटक म्हणून जाहीर केलेला आहे. हा झाला केवळ एका घटकाचा परिणाम. आपल्या रोजच्या अन्नातून, रोजच्या वापरातील वस्तूंमधून रोज आठ ते दहा हजार रसायनं आपल्या पोटात जात असतात. भारतात जन्मलेल्या प्रत्येक मुलाच्या नाळेमध्ये सहजगत्या 200 ते 300 हॅझार्डस केमिकल सापडलेली आहेत. आईच्या दुधात नियमित वेगवेगळी केमिकल्स सापडलेली आहेत, जी बाळाला त्रासदायक ठरू शकतात. यावर पर्याय एकच तो म्हणजे जीवनशैली बदलणं. दुसरा उपाय नाही. शॉर्टकट तर अजिबातच नाही. अमित टिल्लू हे सांगताना धोक्याचे संकेत वारंवार देत असतात.

प्लास्टिकवर पर्याय शोधा

अमित टिल्लू यांच्या मते, केवळ प्लास्टिकच नाही, तर सर्वच गोष्टींवर पर्याय शोधणं आता गरजेचं आहे. त्यामध्ये टूथपेस्ट, साबण, वेगवेगळ्या प्रकारची रसायनं असतील तर ती आपल्याला टाळावीच लागतील; अन्यथा तुमच्या इच्छेशिवाय ही सगळी रसायनं नकळत माशांना खायला मिळत आहे. आज जो मध मिळतो तोही शुद्ध नाही. पेटीतल्या मधमाश्यांना रोगराई होऊ नये म्हणून जी औषधे दिली जातात, तीच अँटिबायोटिक्स तुम्हाला ताप, सर्दी आल्यानंतर, इन्फेक्शन झाल्यानंतर दिली जातात. त्याच्यामुळे तुम्ही ती अँटिबायोटिक्स रोज कणाकणाने का होईना तुम्ही खात आहात. ज्या वेळेला तुम्हाला ताप येतो त्यावेळेला डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राइब करतात, तेव्हा तुमच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नाही. कारण तुम्ही ती अँटिबायोटिक्स रोज खात असल्याने तुमच्या शरीरात त्या अँटिबायोटिक्सची रोगप्रतिकारक शक्ती तयार झालेली असते. त्यामुळे नाइलाजास्तव डॉक्टर तुम्हाला अधिक पॉवरफुल औषधं लिहून देत असतात. तुम्हाला ताप येतो; पण त्याचं मूळ तुम्हाला माहीत नाही. ना डेंग्यू आहे, ना मलेरिया, ना फ्लू आहे. हे कशामुळे होतं, तर या सगळ्या बाबींमुळे होतं.

ना साबण, ना फ्लोअर क्लीनर

यावर एकच आहे, तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. टिल्लूंची ही सांगण्याची पद्धत इतकी मुद्देसूद आणि उदाहरणांसह असते, की वाटतं, आजच प्लास्टिक घरातून काढून फेकून द्याव्यात. घरामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक, केमिकल येऊ देऊ नये हे ते वारंवार सांगत असता. टिल्लू यांच्या घरात कोणीही साबण वापरत नाही. कुठल्याही प्रकारचे सुगंधी द्रव वापरत नाहीत. कुठलाही फ्लोअर क्लीनर मिळणार नाही. ना हार्पिक, ना इतर कोणतंही रसायन. कारण त्यांना त्याची गरजच लागत नाही. निसर्गतःच आपल्याला प्रतिकारशक्ती मिळालेली आहे. इंग्लिशमध्ये टर्म आहे- हायजीन हायपोथेसिस (hygiene hypothesis). म्हणजे जे लोक अतिरेकी स्वच्छता बाळगतात, तेच लोक आजारी पडतात. कारण हे लोक स्वतःची प्रतिकारशक्तीच गमावून बसलेले असतात.

टिल्लू यांचा निसर्गभान मंडळाचा एक गट कार्यरत आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी एक पर्यावरणपूरक लाइफस्टाइलचा तीन-साडेतीन महिन्यांचा कोर्स घेतला होता. पुढच्या वर्षी हा कोर्स सहा महिन्यांचा घेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल विभागातर्फे नाशिकमध्ये हा कोर्स ते घेणार आहेत. हेतू हाच, की लोकांना समजावं, की तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे. तुमच्या कळत-नकळत वागत आहात, हे माहीत तरी आहे का? अनेकांना  कल्पनाच नाही, की तुम्ही हे काय करताय. तुम्ही स्वतःचीच नाही, तर पर्यावरणाची हानी करीत आहात हा इथे महत्त्वाचा भाग आहे.

अमित टिल्लू यांचा फोकस विज्ञान आणि पर्यावरणाची लिंक करणं हादेखील आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी पुस्तकातलं विज्ञान शिकतो, पण ते आपल्या रोजच्या जीवनाशी जोडायचं कसं हा भाग मुलांना माहीत नाही. टिल्लू यांच्या ग्रुपने हे लिंक करण्याचं काम आपल्या शिरावर घेतलं आहे. जर असं नाही केलं तर जसं आपण वागत आलो आहोत, तसंच मुलंपण वागत राहतील, ही त्यांची भीती रास्त आहे. टिल्लू परिवार पर्यावरणीय मूल्यांकनाचा प्रभाव (environmently assesment impact) यावरही काम करतो. ते वैतरणावर काम करीत होते. वैतरणा जिकडे समुद्राला मिळते, म्हणजे डहाणू, पालघर परिसरामध्ये, तेथे मोठ्य़ा प्रमाणावर मत्स्यपालनाचं कार्यक्रम केला जातो. यात वेगवेगळ्या जातीच्या माशांना जगवलं जातं. त्यांना वेगवेगळी औषधं घातली जातात आणि दरवर्षी पुराच्या पाण्यात त्या मोठ्या तलावांतील पाणी वाहून घेऊन जातं. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहांमधून, खाड्यांच्या रूपातून वाहून येणारं जे पाणी आहे, ते रोखलं जातं. किती संवेदनशील असतो समुद्र! अमित टिल्लू यांचे पर्यावरणावरील हे विचार थक्क करणारे आहेत.

खारफुटी जंगलं वाचवा

जैतापूरच्या अ‍ॅटोमिक प्रकल्पाला विरोध का केला जातोय, तर त्याचा खारफुटीच्या जंगलांना धोका आहे. खारफुटीची जंगलं तुम्हाला केवळ पुरापासून, प्रवाहांपासून वाचवत नाहीत, तर ती माशांची नर्सरीही आहेत. ती माशांच्या प्रजननाचीही स्थानं आहेत. त्यात जर असंतुलन निर्माण झालं तर मासे अंडीच घालणार नाहीत. जर हे घडलं तर किनारपट्टीवरील असलेला लाखो लोकांचा नव्हे, तर कोटीवर लोकांचा रोजगार बुडेल! त्यामुळे जैतापूर प्रकल्पाला विरोध केला पाहिजे. पर्यावरणाचा ऱ्हास तिकडेच काय, आपण नाशिककरही तेच करतोय. समुद्राचा विचार सोडून द्या. इथल्या नद्यांचं काय होतंय? त्यात राजकीय हित आहेत. आर्थिक हितं आहेत, हे आपल्यालाही माहीत आहे. अमित टिल्लू याची ही उद्विग्नता या व्यवस्थेवरच नाही, तर लोकांच्या प्रवृत्तीवरही व्यक्त होते.

म्हणूनच किकवी धरणाला विरोध

अमित टिल्लू दाम्पत्य साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल (South Asia Network on Dams, Rivers and People) या संस्थेसोबत काम करीत होतं. नाशिककरांना पाणीपुरवठा करणारं जे गंगापूर धरण आहे ते 50 टक्के गाळाने भरलेलं आहे.  येत्या तीस वर्षांत नाशिकची लोकसंख्या प्रचंड वाढेल. त्यासाठी आणखी पाण्याची गरज लागेल. त्यामुळे भविष्यकालीन योजना म्हणून किकवी नावाचं धरण बांधण्यात येत आहे. त्याला तर्क काय दिला गेला, तर त्या किकवी धरणासाठी लागणारा खर्च 800 कोटी रुपये आहे. (हा आकडा पाचसात वर्षांपूर्वीचा आहे. आता तो किती फुगला असेल त्याचा अंदाज न बांधलेला बरा) जर गंगापूर धरणाचा 50 टक्के गाळ काढण्यासाठी जो खर्च लागणार होता तो आहे 1200 कोटी रुपये. त्यामुळे गंगापूर धरणाचा गाळ काढण्यापेक्षा आपण वेगळंच धरण का बांधू नये, असा विचार समोर आला. कारण गाळ काढणं आणि नवं धरण बांधणं यातील खर्चातला फरक बाजूला ठेवला तरी यातील काँट्रॅक्ट आणि राजकिय हितं मोठ्या प्रमाणावर जपली जातात. पण त्यासाठी किती तरी हेक्टर्स जंगलांची जमीन बुडिताखाली जाणार आहे. त्यामुळे त्याचा ईएआय (environmently assesment impact) बघितला तर त्यात नमूद केलं होतं, की त्यात कुठल्याही प्रकारचा मार्जारकुलीन प्राणी अजिबात राहत नाही. ही कायदेशीर कागदपत्रे आहेत. ती मिळू शकतात. नाशिकमध्ये दरवर्षी दोनचार वेळा बिबट्या येतो, दरवर्षी जळगाव पट्ट्यात वाघ दिसण्याच्या आवई उठतात, दरवर्षी वेगळ्या प्रकारची हरणं, कोल्हे दिसतात, त्या सर्वांची वैविध्यता त्र्यंबकेश्वर परिसराच्या पट्ट्यात आहे. त्या सर्वांची नोंद वन विभागात आहे. तरीसुद्धा आपण म्हणतो, इथे काहीही मिळत नाही. इथं खुरटं जंगल आहे. हे तोडल्याने पर्यावरणाचा काहीही फरक पडणार नाही. हे अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. ईएआयसारखा अभ्यास केल्यानंतर,  मग साउथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल ही संस्था कोर्टात गेली. या धरणाला स्थगिती मिळाली. हे कशामुळे घडतं, तर निसर्गभान नसल्यामुळे. त्यामुळे हे भांडणाचे विषय होऊन जातात.

माहीत असतानाही का तोडायची झाडं?

मागच्या कुंभमेळ्याच्या वेळी त्र्यंबकेश्वरमध्ये झाडं तोडली गेली. प्रगती करायची असेल तर काही झाडं तोडावी लागतात हे मान्य आहे. एखाद्या झाडाने कोणाचा तरी जीव जात असेल तर ते झाडं तोडावं लागेल. मात्र, जर तुमच्या नगररचनेत, विकास योजनेत तुम्हाला माहीत आहे, की मला दहा वर्षांनी एवढी दोन हजार झाडं तोडावी लागणार आहेत, तर तुम्ही दोन हजार झाडं आताच का लावली नाहीत? टिल्लूंना इथं आक्षेप आहे.

चूक करताय, पण तो इन्फॉर्म चॉइस हवा

एकूणच पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी स्वतःपासूनच सुरुवात करावी. उद्या सकाळी उठल्यानंतर तुमच्या मनात हा प्रश्न पडायला हवा, की मी जी कृती करणार आहे त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे का? सगळंच रोखणं शक्य नाही, काही ठिकाणी तडजोड स्वीकाराव लागते. ते अपरिहार्य आहे. पण या तडजोडीची किमान जाण असावी. म्हणजे त्याचं परिमार्जन आपल्याला कुठे तरी पुढे करता येईल, हे सांगताना टिल्लू यांनी त्यांचं स्वतःचं एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, की मी जे घर घेतलं ते रेडिमेड आहे. मला माहीत आहे, की माझ्या घराच्या भिंतीवर जो डिस्टेंम्पर रंग आहे, त्यात हानिकारक केमिकल आहे. हा रंग हवेवाटे माझ्या नाकात जाणार आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. कारण पुढच्या वेळी मी रंग देईन तेव्हा तो पर्यावरणपूरकच असेल. मी ज्या चुका केल्या आहेत त्या मी पुढे सुधारण्याचा प्रयत्न करीन. आज कोणीच परिपूर्ण नाही, पण पुढचं पाऊल टाकताना मी या चुका परत करणार नाही. जुई नेहमी म्हणते, तुमच्याकडे इन्फॉर्म चॉइस हवाय. जे मी हे करतोय, त्याचे परिणाम मला माहीत आहे. मी दारू, सिगारेट पितोय. त्याचे परिणाम मला माहीत आहे. मग तू पी. हा तुझा चॉइस आहे. त्याला त्यांची पत्नी इन्फॉर्म चॉइस म्हणते.

त्यांच्याकडे सरकारची वीज नावालाच

टिल्लू कुटुंब जी वीज वापरत आहेत, ती पूर्णपणे सोलरवर आहे. ते सरकारची वीज विकत घेत नाहीत. म्हणजे कनेक्शन आहे. सोलरवर जास्त वीजनिर्मिती झाली, की ते ती नॅचरल ग्रीडमधून विकून टाकतात. ज्या वेळी त्यांना गरज लागते तेव्हा तीच वीज ते महावितरणकडून विकत घेतात. त्यांच्या आसपास जो कचरा पडतो, त्यापासून ते बायोचार बनवतात.

काय आहे बायोचार?

बायोचारचा उपयोग फक्त शेतीसाठीच नाही, तर त्याचा उपयोग इंधन म्हणूनही करता येतो.

सध्या संपूर्ण भारतात, जगात जी जमिनींमध्ये अडचण निर्माण झाली आहे, ज्यात सगळेच संशोधक डोके घालून बसली आहे, ती डोकेदुखी म्हणजे डीप्लेशन ऑरगॅनिक कार्बन (DEPLETION ORGANIC CARBON). मराठीत सांगायचे  म्हणजे घटणारा सेंद्रिय कर्म. जमिनीतलं कार्बनचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर वेगाने घटतंय, की ते जर घटत राहिलं तर एकही धान उगवणार नाही. कारण नुसत्या रासायनिक खतांवर शेती करणं खूप कठीण आहे. त्यामुळे जमिनीत कार्बन वाढणे खूप गरजेचं असतं. कार्बन वाढल्यामुळे सूक्ष्म जिवांचे प्रमाण वाढते. सूक्ष्म जिवांचे प्रमाण वाढल्यानंतर जमिनीतल्या अन्नद्रव्यांचं वहन वाढतं आणि वहन वाढलं, की जमिनीला किंवा झाडाला अन्नांश चांगल्या प्रकारे शोषता येतात. आपण सगळे जंतूंपासूनच बनलेलो आहोत. आपणही जंतूच आहोत. दुसरं काहीही नाहीये.. तुमच्या-माझ्यामध्ये जंतूंचं वजन तीनचार किलो आहे. म्हणजे 70 किलो तुमचं वजन असेल तर त्यापैकी तीनचार किलो जंतूच आहेत तुमच्या पोटात. यातले जंतू चुकून जरी कमी झाले तर तुम्ही मराल; अन्यथा तुम्हाला याकुल्टसारखी (Yakult) प्रोबायोटिक्स खावे लागतील. कारण तुमच्या शरीरातील जंतूंचं प्रमाण ढासळलेलं आहे. जंतू अत्यावश्यक असतात. ते मातीमध्ये असतात, शरीरात असतात. सगळीकडे असतात. जमिनीमध्ये जंतूंचं प्रमाण इतकं घटलंय, की तुम्हाला ते वाढविण्यासाठी कृत्रिमरीत्या टाकावेही लागतील किंवा ते तुम्हाला असं वातावरण निर्माण करावं लागेल, की ज्यामुळे ते वाढतील. ते दोनच गोष्टींमुळे वाढेल- एक तर जमिनीतला हुमस (humus) वाढवणं आणि कार्बन वाढवणं. कार्बन वाढवण्यासाठी काय पर्याय आहे, तर तो म्हणजे बायोचार (BIOCHAR).  बायो म्हणजे जैविक आणि चार म्हणजे कोळसा. थोडक्यात म्हणजे या बायोमासचा- मग ते पानं असतील, फुलं असतील, गवत असेल, काटक्या असतील, नारळाच्या शेंड्या असतील, कवट्या असतील इ. जे जळू शकतं, पुरू शकतं, त्याचा कोळशामध्ये रूपांतर करणं आणि ते जमिनीत वापर करणं गरजेचं आहे. ते इतकं शाश्वत आहे, की मध्यम जमिनीत तुम्ही दर हेक्टरी (हे प्रमाण जमिनीनुसार बदलूही शकतं) दोन टर्म कोळसा वापरला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला एकदाच कोळसा वापरावा लागतो. परत कधीही कोळसा वापरावा लागत नाही. कारण कोळसा हा सछिद्र असतो. त्यात पाणी साचतं. पाण्याबरोबर तो वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांचं आधारस्थान असतो.

नाशिकमध्ये कोणत्याही द्राक्षबागायतदारांकडे गेला तर त्यांना विचारा, ओसी (organic carbon) किती आहे रे तुझा? अनेकांना यातलं काहीही माहीत नसतं. ज्यांना माहीत असतं, ते म्हणतात 0.6 असेल कदाचित. मूलतः जो बेंचमार्क आहे तो 1.0 चा. म्हणजे एक टक्का. टिल्लू संपूर्णपणे सेंद्रिय शेती करीत असल्याने त्यांनी बायोचारचा प्रभावी उपयोग केला असून, त्यांच्या जमिनीचा ओसी आहे, 2.5 टक्के! त्यामुळेच त्यांना सेंद्रिय उत्पादन घेणं खूप सोपं होतंय. कारण त्यांच्या शेतजमिनीत मुबलक जिवाणू आहेत. बायोचारचा उपयोग फक्त शेतीसाठीच नाही, तर त्याचा उपयोग इंधन म्हणूनही करता येतो.

एक दिवस तुम्ही सिलिंडरमुक्त व्हाल…

महापालिकेने एक नियम काढला आहे, कचरा उघड्यावर जाळता कामा नये. मग लोकं काय करतात, तर तो चोरून तरी जाळतात किंवा घंटागाडीत तरी टाकतात. नंतर तो डंपिंग ग्राउंडवर पडला की त्याचं नंतर काय होतं माहीत नाही. त्यामुळे जिथे जिथे मोकळ्या जागा आहेत, तिथे पडणारा जो पालापाचोळा आहे, त्याचं जर कोळशात रूपांतर केलं तर जमिनी सुपीक बनतील. कोळसा बनविण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. टिल्लू स्वतः ही प्रक्रिया एका पिंपात करतात. पालापाचोळा जाळताना तो ऑक्सिजनच्या गैरहजेरीत जाळणं महत्त्वाचं आहे. तसं केलं, की त्या वस्तूचा कोळसा होतो. या कोळशाच्या जळण्याची व्हॅल्यू इतकी जास्त आहे, की टिल्लू कुटुंबाचा रोजचा दालभात या कोळशावरच होतो. हाच कोळसा जो टिल्लू यांच्या अंगणात पडलेल्या पालापाचोळ्यापासून तयार झाला आहे. कारण त्यांच्याकडे मोठी झाडं लावायला जागाच नाही. त्यामुळे शेजारपाजारची जी मोठी नारळाची झाडं आहेत, त्यांच्या पडलेल्या झावळ्या, नारळाच्या शेंड्या यावर जो कोळसा तयार होतो त्यावरच टिल्लू कुटुंबाचा स्वयंपाक सहजपणे होतो. त्यामुळे कचरा अंगणात पडतो म्हणून टिल्लू कुटुंब भांडण अजिबात करत नाही, उलट त्यांना आनंदच होतो. झाड न लावता त्यांना फायदा होतोय. ज्या कूकरमध्ये ते डाळभात शिजवतात, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती एक सराई कूकिंग प्रणाली म्हणून पुण्यातील एका संस्थेने विकसित केली आहे. ग्रामीण भागात या प्रणालीचा उपयोग होतो. टिल्लू यांनी या कूकिंग प्रणालीचा नाशिकसारख्या शहरात परिणामकारक उपयोग केला आहे. असो, पण टिल्लू यांची सेंद्रिय कोळसानिर्मितीची प्रक्रिया भन्नाटच आहे. त्यांचा तर दावा आहे, की नाशिकमधील बायोमास गोळा केला तर नाशिककरांना सिलिंडरची गरजच भासणार नाही. हा कोळसा नाशिकमध्ये कुठेही विकत मिळत नाही. कुठे मिळतो किंवा नाही याचं टिल्लूंना काहीही देणंघेणं नाही. कारण ते स्वतःच त्याची निर्मिती करीत आहेत.

पर्यावरणपूरक जीवनशैली तुम्ही आम्हीही अंगीकारू शकतो. त्यासाठी तुम्हाला आधी टिल्लू व्हावं लागेल. ते म्हणतात, जमिनीतला ऑरगॅनिक कार्बन (ओसी) कमी होत चालला आहे, तसा आपल्या मनातलाही ओसी घटत आहे. आपल्या मनात पर्यावरण जागवायचे असेल, तर पोषक जंतू, म्हणजेच जागरूकतेचे किडे सतत वळवळायला हवे. म्हणजे पर्यावरण किमान जपलं असं म्हणता येईल… नाही का?

जगातील ही सर्वांत दुर्मिळ वनस्पती आढळते फक्त अंजनेरी पर्वतावर!

Facebook page kheliyad

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”1635″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!