• Latest
  • Trending
शेखर गायकवाड देवराई जंगल

शेखर गायकवाड- नाशिकमध्ये देवराई जंगल निर्माण करणारा अवलिया

December 24, 2021
सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

सोव्हिएत संघ आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील शीतयुद्ध आणि क्रीडा क्षेत्र

May 6, 2022
एलिसन फेलिक्स

‘कोंबडीच्या पायाची…’ एलिसन फेलिक्स

April 26, 2022
शेन वॉर्न

शेन वॉर्न – जादूई फिरकीचा बादशाह

March 8, 2022
रोड मार्श

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रोड मार्श यांचे निधन

March 5, 2022

युक्रेन-रशिया युद्ध आणि क्रीडाविश्व

April 5, 2022
युक्रेन-रशिया युद्ध आणि भारत 

युक्रेन-रशिया युद्ध आणि भारत 

February 28, 2022
रशिया युक्रेन युद्धाची कारणे

रशिया – युक्रेन युद्धाची कारणे काय आहेत?

February 28, 2022
प्रग्नानंध विरुद्ध कार्लसन

प्रग्नानंध विरुद्ध जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्या डावाचा हा व्हिडीओ

February 28, 2022
हंगरगेकर वयचोरी

अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय खेळाडू हंगरगेकर याची वयचोरी?

February 28, 2022

महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा 2022

February 17, 2022
आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

आयपीएल 2022 च्या मोसमासाठी खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

February 28, 2022
19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला

पाचव्यांदा विजेता- 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला

February 12, 2022
Thursday, May 26, 2022
kheliyad
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz
No Result
View All Result
kheliyad
No Result
View All Result

शेखर गायकवाड- नाशिकमध्ये देवराई जंगल निर्माण करणारा अवलिया

पर्यावरणासाठी झपाटून काम करणं म्हणजे काय असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेखर गायकवाड, ज्याने नाशिकमध्ये देवराई जंगल उभं केलं.

Mahesh Pathade by Mahesh Pathade
December 24, 2021
in Environmentalist
5
शेखर गायकवाड देवराई जंगल
Share on FacebookShare on TwitterShare on LinkedinShare on TelegramShare on WhatsappShare on PinterestShare on RedditShare on Email

आई, बायको आयसीयूत होती, तेव्हा हा माणूस ‘देवराई’तल्या झाडांचा जीव वाचवत होता. याला माणसांची नावं लक्षात राहत नाही, पण झाडांची नावं अगदी तोंडपाठ! बरं ही झाडांची माहिती त्यांनी पुस्तकाच्या पानात कुठंही वाचली नाही. त्यांनी आधी झाडांची पानंच वाचली. झाड पाहिलं तरी हा माणूस झाडाची संपूर्ण फॅमिली उद्धृत करेल. पक्ष्यांना इजा झाली तर त्यांच्यावर उपचारासाठी हा तत्पर. पर्यावरण संवर्धनासाठी झपाटून काम करणं म्हणजे काय असतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेखर गायकवाड, ज्याने नाशिकमध्ये देवराई जंगल उभं केलं.

शेखर गायकवाड देवराई जंगल
नाशिक येथील गांधीनगरच्या उद्यानात बांंबूच्या झाडांची काळजी घेताना शेखर गायकवाड.

शेखर गायकवाड देवराई जंगल

नाशिक परिसरात जैवविविधता वाढावी म्हणून शेखर गायकवाड यांनी ‘आपलं पर्यावरण’च्या माध्यमातून हजारो माणसं जोडली आणि लाखो झाडं जगवली. शेखर गायकवाड यांच्या या कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे देवराई, वनराई यांसारख्या उपक्रमातून त्यांनी मृत जंगल जिवंत करण्याची किमया साधली आहे. दर आठवड्याच्या शनिवार, रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच शेखरदादा तुम्हाला ‘देवराई’च्या जंगलात पाणी देताना आढळेल, नाही तर गवत काढताना तरी दिसेल.

शेखरदादांचं हे वृक्षप्रेम आताचं नाही. त्याच्या मुलाचा जन्मही नव्हता त्याच्याही आधीपासून शेखरदादा वृक्षांची भाषा समजून घेतोय. आता त्याचा मुलगा 22 वर्षांचा आहे. बालपणापासून शेखरदादाचं वृक्षांशी अनोखं नातं. सुरुवातीला जिथं झाड दिसेल तिथं त्याला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मग ते महापालिकेने लावलेलं झाड असो वा आपोआप नैसर्गिकरीत्या वाढलेलं झाड असो. गांधीनगर परिसरात रोपं दिसली, की शेखरदादा ती उचलून रस्त्याच्या कडेला लावायचा. पण या उपद्व्यापाचा सुरुवातीला काहीही उपयोग झाला नाही. कारण बकऱ्या ही झाडं चरून जायच्या. त्या वेळी शेखरदादाचं वयही फार काही नव्हतं. तो दहावीला असेल त्या वेळी. पुढे मात्र त्याला अनुभवातून झाडांचं ज्ञान विकसित होत गेलं. शेखरदादा मेकॅनिकल इंजिनीअर. कर्तासवरता झाल्यानंतर त्याने फॅब्रिकेशन वर्कशॉपचा व्यवसाय सुरू केला. मात्र, झाडांवरचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही. उलट ते वाढतच गेलं. शेखरदादा पत्नीसोबत सकाळी वॉकिंगला जायचा. त्याला जाणवलं, की तिथं झाडांना पाणी मिळत नाही. ती कोमेजून जात आहेत. मग हा त्या झाडांना पाणी द्यायचा. पुढे पुढे तर त्यांची पत्नी एकटीच वॉकिंगला जाऊ लागली आणि शेखरदादा झाडांना पाणी देत राहिले. त्यानंतर तर त्यांचा एक शिरस्ताच झाला. सकाळी सहाला टिकाव, फावडे, कुदळ घेऊन शेखर घराबाहेर पडू लागले. सोबतीला काही रोपे असायचीच. मग हे महाशय गांधीनगर परिसरात रोपे लावायचे. सुमारे एक किलोमीटरवरून पाच-पाच लिटरच्या कॅनने त्यांना पाणी घालायचे. रोज त्यांची व्यवस्थित निगा राखायची. अनेक जण त्यांना पाहायचे. हळहळू काही लोकं आवडीने त्यांच्यासोबत येऊ लागली. काही सोबत आली. काहींनी मधेच सोडूनही दिले. म्हणजे लोकं त्यांच्या वेळेनुसार येत गेले. शेखरदादासोबत माणसं दरवेळी वेगवेगळी असायची. शेखरदादाच तेवढा नियमित असायचा.

शेखरदादाची वृक्षलागवड मोहीम आता गावभर पसरली होती. काही भागांत झाडं लावायची तर तिथल्या नगरसेवकाला मान देऊन ट्री गार्डची उपलब्ध करून देण्यास ते सांगायचे. पण सहजपणे काम होईल ती महापालिका कसली? त्यांना फोन केला तर पलीकडून उत्तर यायचं, आज माणूस आला नाही, माणूस आहे तर गाडीत डिझेलच नाही, कधी तर गाडीच बिघडली, ड्रायव्हरच नाही. म्हणजे केवळ दोन झाडं लावायची असली तरी त्याला महिनामहिना लागायचा. त्यापेक्षा आपणच का झाड लावू शकत नाही? झाडांविषयीची तळमळ आपल्याला आहे, तर ते आपणच करायला काय हरकत आहे? तेव्हापासून शेखरदादा गाडीत टिकाव, फावडे, कुदळ घेऊनच फिरतात आणि हवी तशी झाडं लावून घेतात. महापालिकेकड़ून एकच महत्त्वाची मदत व्हायची, ती म्हणजे ट्री गार्डची. एखादे चांगले झाड असेल तर ते घ्यायचे किंवा मनासारखे झाड उपलब्ध होत नसेल तर ते स्वखर्चाने खरेदी करून आणायचे. शेखरदादाचं हे काम मोबाइल नव्हते तेव्हापासूनचं.

झाडं लावण्याचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. शेखरदादाला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले. अनेक टोमणेही सहन करावे लागले. नंतर मात्र लोकांना त्यांचं हे काम आवडू लागलं. अनेक तरुण त्यांच्यासोबत येऊ लागले. मग आज कुठे झाडं लावायची, याचे नियोजन होऊ लागले. जेवढी लोकं येतील त्यांच्यासह शेखरदादांची वृक्षलागवड मोहीम सुरू झाली. मुलं म्हणू लागली, की आता आपल्या या ग्रुपला छानसं नाव ठेवू. कुणी म्हणालं, निसर्गराजा ठेवू, तर कुणी आणखी वेगळंच नाव सांगायचा. अखेर आपलं पर्यावरण हे नाव ठरलं. आता हा आपलं पर्यावरणाचा परिवार झाडांइतकाच बहरत आहे.

देवराई जंगल उभारण्यासाठी शेखर गायकवाड यांची जागेची शोधाशोध


शेखरदादा मेकॅनिकल इंजिनीअर. त्याला झाडांचं ज्ञान आलं कुठून? ज्या नर्सरीत तो जायचा तिथे झाडांची माहिती विचारायचा. सामाजिक वनीकरणच्या नर्सरीत गेला, की त्यांच्याकडून माहिती घ्यायचा. हळूहळू तो झाडांना ओळखू लागला नि झाडं त्याला. शेखरदादा या कामात इतका व्यस्त झाला, की आवड असूनही त्याला वाचायला वेळ मिळाला नाही. म्हणजे त्याने पुस्तकाची पानं वाचली नसली तरी झाडांची पानं मात्र दिवसरात्र वाचली. त्याला जर तुम्ही सांगितलं, ना या झाडाचं अमुक नाव आहे, तर ते त्याच्या डोक्यात कायमचं स्टोअर होईल, पण तुम्ही त्याला एखाद्या माणसाचं नाव विचाराल तर ते त्याच्या अजिबात लक्षात राहणार नाही. हळूहळू झाडांचं ज्ञान वाढत गेलं आणि त्यातूनच त्याला जाणवलं, की आपल्याला पर्यावरणपूरक झाडांचीच खरी गरज आहे. कारण जिकडेतिकडे गुलमोहर दिसत होता. बऱ्याच नर्सरींमध्ये पर्यावरणपूरक झाडंच नसायची. त्यावरून त्यांना एक जाणवलं, की लोकांमध्ये झाडांबाबत बरंच अज्ञान आहे. काही लोकांना झाडांची आवड तर खूप आहे, पण त्यांच्याकडे जागा नाही. मग आपण जर अशा लोकांना एकत्र करून एखाद्या वनाची निर्मिती केली तर? त्या वेळी सोबत 50-60 तरुणांचा ग्रुप सोबत होता. मग आम्ही ठरवायचो, की उद्या तपोवनात झाडं लावायची. सकाळी सगळे तपोवनात जमले आणि तिथे तीनशे-साडेतीनशे झाडांच्या लागवडीची मोहीम अवघ्या तासाभरात फत्तेही झाली. साधारण वर्षभर ही मोहीम सुरू राहिली. मग शेखरदादांना लक्षात आलं, की ही पर्यावरण संवर्धनाची एक चळवळ उभी राहिली आहे. इथे शेखर गायकवाड यांच्या डोक्यात देवराई जंगल निर्मितीची कल्पना आली. त्यांनी ही कल्पना मुलांना सांगितली. मुलांनीही या नव्या मोहिमेत आनंदाने सहभागी होण्याचे निश्चित केले. जंगलच वसवायचं तर त्यासाठी जागा हवी. मग या जागेची शोधाशोध सुरू झाली.

काही लोकं म्हणाली, वेडा आहेस का? एवढी जागा कोण देईल? शेखरदादाने लोकांकडं दुर्लक्ष केलं. अशातच वन विभागाच्या एका बैठकीचं निमंत्रण शेखरदादाला आलं. ही बैठक होती वृक्षतोडीसंदर्भात. मुख्य वनसंरक्षकांच्या अखत्यारीत असलेल्या अधिकाऱ्यांची ती बैठक होती. त्या वेळी पर्यावरणप्रेमींनाही बोलावलं जायचं. बैठक आटोपल्यानंतर शेखरदादा अधिकाऱ्यांना भेटले आणि म्हणाले, की मला वन विकसित करायचं आहे. मला अशी जागा मिळू शकेल का? तिथं माळवे नावाचे अधिकारी होते. ते म्हणाले, मिळेल ना.. पण त्यासाठी सीएफना विचारावं लागेल. बरेच हेलपाटे मारल्यानंतर सीएफ भेटले. हे सीएफ होते अरविंद पाटील. त्यांनी शेखरदादाची संकल्पना समजून घेतली आणि लगेच म्हणाले, चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी डीएफओंना भेटावं लागेल. नोव्हेंबर-डिसेंबरपासून मार्चपर्यंत त्यांनी डीएफओंकडे चकरा मारल्या. शेखरदादा रोज तीन वाजता डीएफओ मॅडमना भेटायचा. त्या म्हणायच्या, ठीक आहे. मी बघते ते कसं देता येईल आणि निघून जायच्या. दुसरीकडे आपलं पर्यावरण ग्रुपमध्येही बैठक घेऊन नियोजन ठरायचे. या सगळ्या बैठकी वांझोट्याच ठरतील की काय, अशी शेखरदादालाच शंका यायची. कारण डीएफओ बाई झाडं लावण्यासाठी परवानगीच देईना. शेखरदादा रोज दुपारी तीन वाजता वन खात्याच्या कार्यालयात जायचे आणि सायंकाळी पाचला परतायचे. जवळजवळ तीन महिने ते एवढेच करायचे.

या दरम्यान शेखरदादा आरएफओ गायकवाड यांनाही भेटले. त्यांना शेखरदादाची कल्पना आवडली आणि त्यांनी वन खात्याच्या काही जागा दाखवल्या. त्यापैकी सातपूरजवळची फाशीच्या डोंगरावरची जागा शेखरदादाला पसंत पडली. प्रश्न होता, ही जागा झाडं लावण्यासाठी कशी मिळेल याचा. डीएफओ बाईंना भेटलं तर त्यांनी, जंगलाची जागा अशी कशी देता येईल तुम्हाला, असं म्हणून शेखरदादाची संकल्पना जवळजवळ धुडकावूनच लावली. आता जागा काही मिळणार नाही हे शेखरदादाला कळून चुकलं. खूप स्वप्नं रंगवली होती आणि ती प्रत्यक्षात उतरणार नाही, याचं दुःख कमालीचं व्यथित करणारं होतं.

महापालिकेच्याही मालकीची दोन एकर जागा होती. त्या जागेसाठीही त्यांनी पत्र लिहिलं होतं. वन विभागाने नाहीच दिली तर हीच एकमेव जागा शेवटची आशा होती. 7 एप्रिल 2015 ची सकाळ शेखरदादासाठी आशेची किरणं घेऊन आली. सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांचा मोबाइल खणखणला. तो वन खात्याकडून आला होता. पलीकडून निरोप आला, की तुम्हाला साहेबांनी बोलावलंय. काय कोण जाणे, शेखरदादाला जाणवलं, की आपल्याला आज परवानगी मिळणार आहे. शेखरदादा तडक वन विभागाच्या कार्यालयात पोहोचले. सीएफ म्हणाले, तुम्हाला पाहिजे काय? शेखरदादा म्हणाले, मला वनमहोत्सवात झाडं लावण्यासाठी परवानगीपत्र हवंय. तोंडी परवानगी नकोय. कारण मला कोणी विचारलं तर केवळ तोंडी परवानगीवर कोण विश्वास ठेवेल? कारण मी जी काही थोडीफार झाडं लावतो, त्यावर मी खर्च करू शकतो, पण वननिर्मितीसाठी मला खर्च मोठा लागणार आहे. तो मी एकटा नाही पेलू शकणार. त्यासाठी मला देणगी मिळाली तर मी काम सुरू करू शकेन. त्यासाठी मला लेखी परवानगीची गरज आहे. त्यासाठी मला एवढीच ओळ लिहून द्या, की वन विभाग व आपलं पर्यावरणतर्फे 5 जून 2015 रोजी वनमहोत्सवात झाडं लावण्यासाठी परवानगी देत आहे. सीएफने लगेच पत्र लिहून शेखरदादाच्या हातात ठेवलं. त्या वेळी शेखरदादाच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दातीत होता.

देवराई जंगल
नाशिकच्या देवराईमधील काटेसावरसह अनेक जंगली झाडे बहरली आहेत.

‘देवराई’ निर्मितीचे डोहाळे

मग आपलं पर्यावरण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित झाले. पहिली बैठक वन खात्याच्या उंटवाडीतील कार्यालयाच्या हॉलमध्ये झाली. आपलं पर्यावरणच्या सदस्यांनी तो हॉल गच्च भरला. तेवढीच लोकं हॉलबाहेरही होती. ते अधिकारी अवाक् झाले. कारण आठदहा लोकांपेक्षा अधिक लोकं त्यांनी इथं कधी पाहिलीच नव्हती. ते अधिकारी म्हणाले, या हॉलच्या इतिहासात पहिल्यांदा आम्ही एवढी गर्दी पाहत आहोत. ग्रुपचा उत्साह दुणावलेला पाहून शेखरदादा हरखून गेले. इथूनच सुरू झाले शेखर गायकवाड यांना देवराई जंगल निर्मितीचे डोहाळे. शेखरदादांनी क्रेडाईचे त्या वेळचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांची भेट घेतली. ग्रुपमधलेच रमेश अय्यर यांचीही या वेळी मदत झाली. काही प्रश्न चुटकीसरशी मार्गी लागले. सात एप्रिलला परवानगी मिळाली. दोन महिन्यांनी म्हणजेच पाच जून रोजी झाडे लावायची आहेत. हातात वेळ तर खूपच कमी आणि काम खूप आहे. कारण त्यांना अशा जंगलात काम करायचे होते, ते जवळजवळ मृत झाले होते. या जंगलात पक्षी फारसे नव्हते. कावळे यायचे. कारण तिथे चखना पडलेला असायचा. झाडं फारशी नव्हतीच. कारण ग्लिरिसीडियाखाली (उंदीरमारी झाड) कोणतंही झाड टिकत नव्हतं. त्यामुळे रोपे आणणे, खड्डे खोदणे हे सगळंच कसं होणार हा प्रश्न होताच. या वेळी बेळगाव ढग्याचे सरपंच दत्तू ढगे हे मदतीला धावून आले. त्यांनी शेखरदादाला धीर दिला. ते म्हणाले खड्डे खोदण्यासाठी आपल्याकडे टीम आहे. त्यांनी लगेच त्यांची टीम बोलावून घेतली. तब्बल दहा हजार पाचशे खड्डे खोदण्यात आले. प्रत्येक खड्ड्याला क्रमांक दिले. प्रत्येक खड्ड्याजवळ रोप ठेवण्यात आले. ही सगळी व्यवस्था आदल्या दिवशी सज्ज ठेवण्यात आली. लोकांना दोन दिवस आधीच सांगण्यात आले होते, की रोपे लावण्यासाठी प्रत्येकाने पाच लिटर पाण्याची कॅन सोबत आणावी. मनोज टिबरीवाल यांच्या मदतीमुळे पाइपलाइनही करण्यात आली होती. तत्कालीन महापालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पाच हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या व चार टन खत दिलं. काही संस्थांनी तर नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मदत केली. या वृक्षलागवडीची मोहीम शहरभर पसरली होती. प्रसारमाध्यमांमुळेही या मोहिमेची उत्सुकता ताणली गेली होती. कारण नाशिककरांसाठी दहा हजारावर झाडे लावण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. काहींनी तर लग्नपत्रिकेत या मोहिमेची माहिती देऊन लोकांना आवाहन केले होते.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तर या मोहिमेच्या चर्चेची काहीही माहिती नव्हती. ते म्हणायचे, कशाला एवढं करताय? लोकं येतील का? काहींनी तर हा शुद्ध वेडेपणा ठरवला. ते म्हणायचे, काही कोणी येणार नाही. शेवटी हे आपल्यालाच करावं लागणार आहे. वन कर्मचाऱ्यांमधली चर्चा एक वेळ समजू शकेल, पण पक्षी अभ्यासक बिश्वरूप राहा यांनीही म्हंटलं, की पागल हो गया है, ग्लिरिसीडिया के नीचे पेड कभी आयेगा क्या? हा विरोधाचा सूर एकीकडे ऐकायला मिळत असताना काहींनी तर या मोहिमेतच खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वन विभागावरच दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही याला जागा दिलीच कशी? वन विभागाच्या जागेत खड्डे खोदणे हाच मुळी गुन्हा आहे. अशा प्रकारे परवानगी देऊन तुमच्या नोकरीवरच गदा येईल. तुमची नोकरी जाईल, अशा प्रकारचं गर्भित इशारा देणारं पत्रच काहींनी सीएफ अरविंद पाटलांना लिहिलं.

अरविंद पाटील यांनी मात्र शेखरदादाला धीर दिला. ते म्हणाले, की काळजी करायची नाही. तू तुझं काम सुरू ठेव. अखेर 5 जून 2016 ची सकाळ उजाडली. सकाळी सात ते सायंकाळी पाच अशी वेळ निश्चित करण्यात आली होती. कारण सर्वांनाच वेळ मिळेल असं नाही. त्यामुळे सायंकाळी पाच-सहाची वेळ निश्चित करण्यात आली होती. सकाळी पाहतो, तर अनेक लोक पाच लिटरची कॅन घेऊन उभे होते. लोकांची प्रचंड गर्दी. बघता बघता दुपारी तीनपर्यंत साडेदहा हजार झाडं लावूनही झाली. आणखी पाचशे झाडं केवळ लोकांच्या आग्रहास्तव लावण्यात आली. मग तिथेच जाहीर करून टाकलं, कोणी येवो अथवा न येवो, तीन वर्षांपर्यंत ही झाडं आपल्याला सांभाळायची आहे. तेव्हापासून आजतागायत शेखरदादाचा शिरस्ता मोडलेला नाही. दर शनिवार, रविवारी तो सकाळी साडेसातला ‘देवराई’च्या झाडांना पाणी घालण्यापासून गवत काढण्यापर्यंत सगळी कामं करीत असतो. अगदी आई, पत्नी आयसीयूमध्ये होती, तेव्हा शेखरदादा ‘देवराई’ची झाडं जगविण्यासाठी धडपडत होता. त्याचा एकही शनिवार, रविवार टळत नाही. कारण जो विश्वास लोकांनी दाखवला होता, त्याला कुठेही तडा जाऊ द्यायचा नव्हता.

एकदा तर त्यांच्या हाताला चीर पडली होती. सोळा टाके पडले होते. तरी दुसऱ्या दिवशी शेखरदादा ‘देवराई’त होता. नातेवाइकाचा साखरपुडा असो, लग्न असो वा वाढदिवस. शेखरदादाने ते सगळं टाळलं, पण ‘देवराई’ला जाणं सोडलं नाही. आता त्याच्या नातेवाइकांनाही कळून चुकलंय. त्यामुळे तेही आता मनात कोणतीही किल्मिषं ठेवत नाहीत. आता चार वर्षे झाली आहेत. झाडंही चांगली बहरली आहेत. शेखर गायकवाड यांचं देवराई जंगल निर्मितीचं स्वप्न सत्यात आलं होतं.

देवराई म्हणजे काय
शेखर गायकवाड यांच्या प्रयत्नातून वृक्षलतांनी बहरलेलं नाशिकमधील देवराई जंगल. या जंगलात झाडांच्या दीडशेपेक्षा अधिक प्रजाती आहेत.

‘देवराई’ म्हणजे काय?

पूर्वी गावांजवळ घनदाट झाडे असायची किंवा राखलेलं जंगल असायचं, ते म्हणजेच ‘देवराई’. जिथं झाडांना त्यांच्या मनासारखं वाढता येतं, मनुष्याचा हस्तक्षेप कमी असतो, ते म्हणजे ‘देवराई’. जिथं देवाचा अधिवास मानतात, ती  ‘देवराई’. तिथं विविध प्रजातींचे कीटक, फुलपाखरं, पक्षी सुखेनैव नांदतात ती ‘देवराई’. जंगल निर्मितीची ही संकल्पना डोक्यात ठेवूनच शेखर गायकवाड यांनी ‘देवराई’ प्रोजेक्ट यशस्वी केला. हा प्रकल्प सातपूरजवळील फाशीच्या डोंगरावर आहे. मुळात याला फाशीचा डोंगर का म्हणतात, याचंही अनेकांना कुतूहल आहे. मात्र, या नावामागे खूप मोठा इतिहास नाही. असं म्हणतात, की ब्रिटिश राजवटीत तिथे लोकांना फाशी दिली जायची. म्हणून त्याला फाशीचा डोंगर म्हंटला जातो. पण याला कोणताही आधार नाही. त्याचं खरं कारण वेगळंच आहे. तेथे एक गुराखी होता. त्याने एका महिलेवर अत्याचार केला म्हणून तेथील ग्रामस्थांनी त्याला या डोंगरावर फाशी दिली होती. या डोंगराला वेगळं असं नाव नव्हतंच. त्यामुळे कुणाला विचारलं, कुठं गेला होता रे, तर समोरचा अगदी सहजपणे म्हणायचा, फाशीच्या डोंगरावर. तेव्हापासून याला फाशीचा डोंगर असंच नाव पडलं. ही माहिती आसपासच्या जुन्या जाणकारांनीच दिली आहे. आता हे नाव विस्मरणात चाललं आहे. कदाचित फाशीचा डोंगर कोणता, हे सांगण्यासाठी ‘देवराई’चं नाव घ्यावं लागेल.

नाशिकचं देवराई जंगल विकसित करताना शेखर गायकवाड यांच्यासमोर जैवविविधता (biodiversity) टिकविण्याचं लक्ष्य होते. उगाच मिळेल ती झाडं लावायची नव्हती. त्यामुळे त्यांनी अनेक झाडं परतही केली. वर्षभरानंतर झाडं बहरली, पण गवतही बरंच वाढलं होतं. हे गवत काढण्यासाठी ग्रास कटरची गरज होती. एलआयसीने टप्प्याटप्प्याने दोन ग्रास कटर दिले, तर एक सिक्युरिटी केबिन बांधून दिली. आणखी दोन ग्रास कटरही काही पर्यावरणप्रेमींच्या मदतीने मिळाली. एक नाशिकमधीलच एका कुटुंबाने दिले, तर दुसरे लंडनमधील मराठी मंडळाने भेट दिले. अशा पद्धतीने मदत मिळत गेली. सध्या 80 हजाराच्या आसपास खर्च येतो. विवंचना उभ्या राहतात कधी कधी, पण मार्गही सापडतो. वर्षभरात ‘देवराई’ची वनश्री बहरली. मृत जंगल जिवंत केल्याने शेखरदादाला आत्मविश्वास मिळाला. वन विभागाने आता स्वतःहून विचारलं. त्यांनी वनराईची जागा दाखवली. 2016 मध्ये या वनराईतही सहा हजार झाडं लावण्यात आली. खरं तर वनराईचं जंगल ‘देवराई’च्या पाच पट. सुमारे ५०० एकर! शेखरदादाला कोणी प्रश्नही करेल, की ‘देवराई’त 11 हजार झाडं लावली, वनराईत सहा हजारच का? शेखरदादाला एक जाणीव होती, की आपल्याला दोन प्रोजेक्ट सांभाळणे सोपे नाही.

पहिल्या वाढदिवसाचं अनोखं सेलिब्रेशन

शेखरदादाचा ‘देवराई’च्या उपक्रमाची दणदणीत सुरुवात तर झाली, पण या झाडांच्या संगोपनाचं काय, अशी शंका लोकंच उपस्थित करू लागले. मग जिथं जिथं शेखरदादा गेले तिथं तिथं लोकं विचारायची, मग झाडं जगली का? लोकांचा हा प्रश्नही काही चूक नव्हता. कारण यापूर्वी काही आरंभशूर झाडं तर लावतात, पण नंतर ती कोमेजलेलीच नजरेला पडली आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी शेखरदादांनी 2017 मध्ये ‘देवराई’तल्या 11 हजार झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी लोकांना फक्त पाणी घेऊन येण्याचे आवाहन केले. तसं पाहिलं तर ‘देवराई’त पाण्याची व्यवस्था आहे. तरीही पाणी का घेऊन यायचं? 5 जून 2015 रोजी ‘देवराई’त झाडं लावतानाही हा प्रश्न उपस्थित झाला होता. यामागे शेखरदादाचा स्वच्छ हेतू होता, की लोकांना सगळं आयतंमायतं नको. त्यांनीही काही तरी कष्ट घ्यायला हवेत. त्यामुळे लोकंही आता कुठेही झाड लावताना सोबत पाच लिटरची पाण्याची कॅन सोबत घेऊनच जातात. ‘देवराई’पासूनच लोकांना ही सवय जडली आहे.

वाढदिवसासाठी लोकांना पाच लिटरची कॅन आणि गांडूळ खतही घेऊन यायला सांगितलं. त्यामुळे लोकांमध्ये आता झाडांच्या वाढदिवसाची उत्सुकता लागली. प्रत्येकाला वाटलं, केक तर कापायचा नसेल ना? हॅप्पी बर्थ डे टू यू… वगैरे म्हणायचं का? पण तसं अजिबात नव्हतं. शेखरदादाने झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याचं आधीच ठरवलं होतं. त्यांनी प्रत्येक झाड फुलांनी सजवलं होतं. वाढदिवसासाठी पूजेसाठी गुरूजींना बोलावलं होतं. तब्बल दोन हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली.

शेखरदादाने सर्वांना सांगितलं, की प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह आवडेल त्या झाडाजवळ बसा. गुरूजींनी वृक्षाची स्तुती करायची. तू आहेस म्हणून आम्ही आहोत, अशी झाडांप्रती कृतज्ञता म्हणून स्तुती करण्यात आली. पूजा करताना कुणीही अगरबत्ती लावायची नाही, असंही निक्षून सांगण्यात आलं. झाडांना ओवाळण्यासाठी जसं पूजेेचं ताट करतो, तसंच इथंही केलं. पण हे पूजेचं ताट थोडंसं वेगळं होतं. पंचामृतात गोमूत्र, शेण, गूळ आदींचा समावेश होता, तर प्रसाद म्हणून गांडूळ खत. अशा पद्धतीनं पहिला वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाने लोकांना विश्वास दिला, की केवळ झाडं लावलीच नाहीत, तर ती जगवलीही. हा झाला पहिला वाढदिवस, पण दुसऱ्या वाढदिवसाला काय करायचं? शेखरदादाने नवी संकल्पना आणली, ती म्हणजे पर्यावरण शाळेचा उपक्रम.

पर्यावरणशाळा उपक्रम शेखरदादा आधीपासूनच घेत होता. पण झाडांच्या दुसऱ्या वाढदिवसाला हीच संकल्पना त्याने आणली. ज्यांना झाडांविषयी आवड आहे, त्यांना हरसूल, पेठसारख्या आदिवासी भागात घेऊन जायचं. तिथं जे वैद्य किंवा जुनेजाणते वृद्ध आदिवासी होते, त्यांना शेखरदादाने आधीच आपली संकल्पना सांगितली होती. या जाणकार आदिवासींनी फक्त झाडांची माहिती सांगायची. जसं सहदेवी वगैरे झाडांची माहिती आदिवासींकडूनच मिळाली. ती कोणत्याही पुस्तकात नाही. ही पर्यावरण शाळा घेण्यामागे दोनच उद्देश होते, ते म्हणजे लोकांना झाडं, गवत यांची माहिती मिळावी आणि आदिवासी भागातील लोकांना रोजगार मिळावा. म्हणजे आदिवासी लोकांनी झाडांची माहिती दिल्यानंतर प्रत्येकाने त्यांना 50-50 रुपये शुल्क म्हणून द्यावे. त्यामुळे त्यांना दीड तासात पाचशे-सहाशे रुपये मिळायचे. आदिवासी लोकांना जाणवेल, की यातूनही आपल्याला उपजीविका मिळेल, तसेच पर्यावरण संवर्धनही घडेल. आदिवासी मुळातच इतका प्रामाणिक आणि लाजरा. याचे काय पैसे घ्यायचे? ते नाही म्हणायचे. अर्थात, त्यांना पैसे किंवा काही तरी वस्तू भेटस्वरूपात दिल्या जाऊ लागल्या. हा उपक्रम दोन वर्षे राबविण्यात आला.

‘देवराई’त 2018 मध्ये वेलींचीही लागवड केली आहे. आपल्याला जेवणाच्या ताटात जसं वरणभात, भाजी, चटणी, पोळी असा चौरस आहार लागतो, तसंच पर्यावरणाचंही एक ताट आहे. त्यात वृक्ष, वेली, झुडपे अशी वेगवेगळी झाडे असणे आवश्यक आहे, तरच जंगल सक्षम होईल. त्यामुळे दहा ते बारा एकरमध्ये 46-47 प्रजातीतल्या हजार वेलींची लागवड करण्यात आली आहे. साधारणपणे बोगनवेली नर्सरीत मिळतात, पण जंगलातल्या वेली कोणी ठेवत नाहीत. त्यामुळे जंगली वेली मिळवणे हेही एक आव्हानच होते. पुणे, दापोलीसह अनेक नर्सरींमधून अशा वेली गोळा केल्या आणि त्या ‘देवराई’त लावल्या. तसंच झुडपांचंही. दोन एकरमध्ये पाचशे झुडपांचीही लागवड करण्यात आली आहे. या झुडपांचा शोध घेता घेता नेपती झुडपाचंही बियाणं मिळालं. उष्ण भाग असल्याने तेथे उष्ण कटिबंधातल्याच वनस्पती, वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे काही वनस्पती सडल्या. त्याची भरपाईही करण्यात आली आहे. देवराई जंगल निर्मितीसाठी लागणारी वृक्षवेलींची संपदा शेखर गायकवाड यांनी अशा प्रकारे समृद्ध केली.

सर्वांत जास्त आयुष्य चिंचेच्या झाडाचं

वनराईत झाडांच्या 170 प्रजाती लावल्या आहेत. त्यात वड, पिंपळ, चिंच आदी झाडे आहेत. एरवी आपण पाहतो, की जंगलात बुंध्याचा प्रचंड घेर असलेली झाडे असतात, तशा प्रजातीतलीही झाडे वनराई आणि ‘देवराई’त लावलेली आहेत. सर्वांत जास्त आयुष्य असलेलं झाड म्हणजे चिंच. प्रत्येकाला वाटतं, की वडच दीर्घायुषी आहे. पण तसं नाही. चिंच स्वतःच्या खोडावर तग धरणारं सर्वांत दीर्घायुषी झाड आहे. याचं स्पष्टीकरण देताना शेखरदादा म्हणतो, की वडाचं खोड कालांतराने कुजून जातं. ते दीर्घायुषी केव्हा होतं, जेव्हा त्याच्या पारंब्या जमिनीत जातात तेव्हाच. त्यातून वडाला पोषक तत्त्व मिळतात. असा वड एक-दीड एकरात पसरलेला पाहायला मिळतो. चिंचेची झाडं मात्र 700-800 वर्षांपासून या धर्तीवर पाहायला मिळतात. शेखरदादाला काही बुजूर्ग भेटतात तेव्हा ते माहिती देतात तेव्हा झाडाच्या वयाचा अंदाज येतो. एखादा नव्वदीतला माणूस म्हणतो, अमुक झाड माझ्या लहानपणापासून आहे, जे माझ्या आजोबा- पणजोबांपासून आहे. यावरून शेखरदादाला झाडांविषयीची किमान जाण आलेली आहे. वडाला पारंब्या नसतील तर ते पावसापाण्यात एकवेळेस कोलमडून पडतं, पण चिंचेचं झाड कधीच कोसळलेलं पाहायला मिळणार नाही. शेखरदादाचा दावा आहे, की पावसाळ्यात किंवा वादळवाऱ्यात कुठंही चिंचेचं झाड कोलमडून पडलेलं दाखवा. सर्वांत चिवट झाड म्हणून चिंचेच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे. शेखरदादाच्या या समृद्ध वृक्षलागवडीची ख्याती अनेक कंपन्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यापैकीच एक म्हणजे आयुर्वेदातली आयुष कंपनी. त्यांचं 50 जणांचं पथकही वृक्षलागवडीसाठी येणार आहे.

वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, जे पर्यावरणाचा, झाडांच अभ्यास करण्यासाठी लांब लाब जातात, त्यांना अभ्यासासाठी नाशिकमध्येच वनस्पतींची मुबलक माहिती मिळावी यासाठी जंगल ट्रेल उपक्रम करण्याची शेखरदादाची योजना आहे. जंगलात पायवाट निर्माण करून तेथे विद्यार्थी अभ्यास करतील, तसेच जंगलातच वॉचिंग टॉवर तयार करण्यात येणार आहे. तेथून अभ्यासक पक्षीनिरीक्षण करू शकतील. या जंगलातच 60 ते 70 प्रजातींचा अधिवास राहू शकेल असं पोषक वातावरण देवराईत निर्माण करण्यात येणार आहे. शेखर गायकवाड यांच्या कल्पनेतलं देवराई जंगल आता दृष्टिपथात येत आहे.

शेखरदादाच्या य़ा वृक्षचळवळीत सगळे प्रकल्प झाले. कॉलनी रोड, महामार्ग, नदीकाठ, खुले भूखंड, शहरालगतचं जंगल आदी ठिकाणे त्यांनी वृक्षलतांनी विकसित केली आहेत. पळसे ते सिन्नर आणि पांढुर्ली ते सिन्नर, जत्रा हॉटेल ते सोग्रस फाटा या महामार्गांवर त्यांनी वड, पिंपळ, चिंच, कदंब आदी झाडं लावली आहेत. ही झाडं जगवतानाही त्यांनी लोकसहभाग जपला. म्हणजे रस्त्यावरील हॉटेल, टपऱ्या, पंक्चरची दुकानं या लोकांना भेटून त्यांना समजून सांगायचे, की या रस्त्याच्या कडेला आम्ही झाड लावत आहोत, ते तुम्ही सांभाळणार का? तेही तयार व्हायचे. अशा पद्धतीने शेखरदादांच्या टीमने तब्बल तीन हजार झाडं लावली आहेत. ही लोकांच्या भरवशावर झाडं लावली आहेत. त्यापैकी 500 जरी जगली तरी आपण जिंकलो, ही शेखरदादाची भावना खूप काही सांगून जाते. शेखरदादाचे हे उपक्रम सयाजी शिंदेंनाही भावले. ते म्हणाले, शेखरदादा, “मला तुझ्यामुळे चांगली संकल्पना मिळाली. आता मी वृक्षारोपणाला नाही, तर झाडांच्या वाढदिवसालाच जाईन. आता मी लोकांना सांगेन, की तुम्ही झाडं लावा आणि त्याच्या वाढदिवसाला मला बोलवा.”

लाल मातीची तस्करी रोखली

त्र्यंबकेश्वरसह काही भागातून लाल मातीची बाहेर नेली जात असल्याचे सर्रास पाहायला मिळते. काही ठिकाणी डोंगर पोखरून ही माती नेली जाते. कुंड्यांमधील लाल मातीसाठी जमिनी उद्ध्वस्त होत होत्या. यावर चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन लाल मातीसाठी किती उत्खननं सुरू आहेत, याचं निवेदन करून ते तत्कालीन आमदार वसंत गिते यांना दिलं. त्यांनी पंचतारांकित प्रश्न उपस्थित केला. त्याचा परिणाम असा झाला, की या लाल मातीवर बंदी आणण्यात आली. शेखरदादाने तपोवनात सव्वा कोटीचा जो घाट केला त्याविरुद्धही आवाज उठवला होता. रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंत पूजाविधी, स्नान केलं जातं. मात्र, गोदाघाट तपोवनापर्यंत करण्यात आला. ते अत्यंत चुकीचं होतं. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, खासदारांपर्यंत निवेदनं दिली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर हा गोदाघाट अस्तित्वात आलाच.

शेखर गायकवाड देवराई जंगल
वड, पिंपळाच्या अनेक प्रजातींनी बहरलेले नाशिककरांसाठी वृक्ष परिचय केंद्र झाले आहे.

असं उद्यान शोधून सापडणार नाही…

नाशिकमध्ये कोणत्याही मोकळ्या मैदानावर विकसित केलेलं उद्यान पाहिलं, की त्यांना उद्यान म्हणावं की नाही, हा प्रश्न पडतो. शहरात काही अपवाद वगळली तर असं एकही उद्यान नाही, जिथं धार्मिक स्थळं उभी केली नसतील. झाडं कमी आणि धार्मिक स्थळाचाच विकास अधिक, अशी परिस्थिती आहे. राज्य सरकारने या मोकळ्या जागा कशासाठी सोडलेल्या असतात, याची माहितीच अनेकांना नाही. परिसरात हवा खेळती राहावी म्हणून अशा जागा मोकळ्या सोडलेल्या असतात. तेथे झाडं लावावीत, मुलांना मोकळे खेळता यावे यासाठी या उद्यानांचा उपयोग होतो. दुर्दैवाने असं वातावरण अभावानेच आढळतं. शेखर गायकवाड यांनी 16-17 वर्षांपूर्वी गांधीनगरमध्ये महापालिकेचं एक उद्यान विकसित केलं आहे. या उद्यानाला त्यांनी वृक्ष परिचय केंद्र असं नाव दिलं आहे. वैविध्यपूर्ण झाडांनी बहरलेलं असं हे उद्यान संपूर्ण नाशिकमध्ये शोधून सापडणार नाही. या उद्यानाची निर्मितीही सोपी नव्हती. सुरुवातीला इथं महापालिकेने 22 लाखांचं उद्यान विकसित करण्याचा घाट घातला होता. शेखरदादा म्हणाले, असं काही करू नका. मी विकसित करतो. मग महापालिकेकडून शेखरदादाने ही ओबडखाबड जागा सपाट करून घेतली.

सुरुवातीची दोन वर्षे तर त्यांना एकेक किलोमीटरवरून पाणी आणून झाडं जगवावी लागली. त्यांचा उद्देश हाच होता, की हे उद्यान वृक्षपरिचय केंद्र व्हावं. शहरातल्या विद्यार्थ्यांना बाहेर कुुठेही जाऊन झाडांची माहिती घेण्याची गरज पडू नये, त्यांना शहरातच ते सगळं उपलब्ध व्हावं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. कोणते झाड इमारतीत लावणे योग्य आहे, कोणत्या झाडाला खुल्या भूखंडाची गरज आहे हे मुलांना समजलं तरी पर्यावरण जपण्यास मोठी मदत होईल. आज तो हेतू साध्य झाला आहे. कारण या उद्यानात इतकी वैविध्यपूर्ण झाडं आहेत, की इतर शहरातील लोकं ही झाडं पाहण्यासाठी नाशिकमध्ये येतात. भोरसाल नावाचं दुर्मिळ झाड या उद्यानात पाहायला मिळतं. कृष्ण वडसह वडाच्या किती तरी प्रजाती या उद्यानात आहेत. चेंडूसारखे लाल लहान फळं असलेली शिवलिंगी वेल, डंबिया, पांगारा, काकड, सहदेवी, व्हेरिगेटेड भेंडी, करमळ, पळस, कहांडळ, अजान, हिरवा चाफा, नांद्रुक, अळीव, मोह अशी किती तरी झाडं पाहिली की मन हरखून जातं. प्रत्येक झाडाचा वेगळा रुबाब येथे पाहायला मिळतो.

प्रकाश आमटेंच्या हस्ते लावलेला कहांडळ वृक्षही या उद्यानात डौलाने उभा असलेला पाहिला, की वाटतं, प्रकाश आमटे या झाडाजवळच अदृश्य रूपाने उभे आहेत. सहदेवी ही पावसाळी वनस्पतीही पाहायला मिळते. अजान झाडाविषयी एक आख्यायिका ऐकायला मिळाली. असं म्हणतात, की ज्ञानेश्वर माऊलींच्या हातात एक काठी होती. ती त्यांनी रोवली. कालांतराने ती काठी फुलली आणि एक डोईदार वृक्ष झाला. हा वृक्ष म्हणजेच अजान. या झाडाचा औषधी गुणधर्म तर आहेच, शिवाय या झाडाखाली बसून ध्यानधारणा किंवा अभ्यास केला तर मस्तिष्क एकाग्र होते. पुढे हिरव्या चाफ्याला आलेली हिरवीगार द्राक्षांसारखी फळं पाहत असताना शेखरदादा म्हणाले, फूल शोधून दाखवा बरं.. मी बराच वेळ झाड न्याहाळलं, पण फूल काही दिसेना. अखेर एक फूल मोठ्या मुश्किलीने गवसलं. काहीसं हिरवट पिवळसर हे फूल पानांमध्ये इतकं दडून बसलेलं होतं, की कुणाच्याही लक्षात येणार नाही. पण शेखरदादाला ते इतकं परिचयाचं झालं, की त्यांनी मला आणखी वेगवेगळ्या ठिकाणी फुलं दाखवली. किती छान सुगंध या फुलांचा!

सोनचाफा मी पाहिला होता, पण हिरवा चाफा पहिल्यांदाच पाहत होतो. याच हिरव्या चाफ्याजवळ सुलतान चाफाही पहिल्यांदाच न्याहाळत होतो. अवघ्या आठ वर्षांचं हे झाड, पण सुगंधामध्ये हा खरोखर सुलतानच म्हंटला जातो. हा सुलतानी सुगंध घ्यायचा असेल तर अजून थोडी वाट पाहावी लागेल. फार नाही अजून सात वर्षे! कारण हा सुलतानी सुगंध पंधरा वर्षांनंतरच मिळतो. शेखरदादाच्या कृपेने या सुलतानी चाफ्याची उणीपुरी आठ वर्षे केव्हाच सरली आहेत. सुलतानाला कुर्निसात करून आम्ही सीताअशोक झाडाकडे आलो. असं म्हणतात, की अशोकवाटिकेत जी झाडं होती, त्यापैकी एक म्हणजे सीताअशोक. या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांना जे आजार होतात त्यावर उपाय या सीताअशोक झाडात आहेत. या उद्यानात कुचला नावाचं एक औषधी झाड आहे. त्याच्या औषधी गुणाने ऊर्जा मिळते. मात्र, या झाडाची पानं इतकी विषारी असतात, की एखाद्या बकरीने ती खाल्ली तर तिचा मृत्यू होऊ शकतो. हे उद्यान म्हणजे ‘देवराई’ची पहिली पायरी होती. याच उद्यानाने शेखरदादाला वृक्षांची खरी ओळख करून दिली, असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. मग पटतं, की या उद्यानाला वृक्षपरिचय केंद्रच म्हणायला हवं.

शहरात ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या केवळ झाडांसाठीच असाव्यात. तेथे कोणतेही समाजमंदिर नको, ही शेखरदादाची परखड भूमिका हे उद्यान पाहिलं, की मनोमन पटते. घरामध्ये पूजा होत नाही आणि ही लोकं मंदिरं बांधायला निघालीत, असा संतापही शेखरदादा या लोकांच्या बेगडी भक्तीवर व्यक्त करतो. शेखरदादाच्या मते, इथं निसर्गमंदिरच व्हावं. वृक्षपरिचय केंद्राच्या या उद्यानाने खरोखर निसर्गमंदिराची प्रचीती आली. या निसर्गमंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, इथं घंटा नाय तर तंटा नाय… म्हणजे अन्य मंदिरांप्रमाणे कृत्रिम घंटानाद कानी पडत नाही. पडतो तो पक्ष्यांचा किलबिलाट. असं निसर्गमंदिर उभं करायचं असेल, तर त्याला शेखरदादासारखी 16-17 वर्षांची दृढ तपश्चर्याच हवी.

शेखर गायकवाड यांच्याविषयी महाराष्ट्र टाइम्समधील लेख

पर्यावरणातील अशाच काही अवलियांविषयी….

Read more at:

अजित बर्जे जीवनशैली
Environmental

अजित बर्जे यांची जीवनशैली… आनंदी जीवनाची ‘कारवेल’

August 31, 2021
शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट
Environmental

शतार्ची : खासगी जंगलातली सार्वजनिक गोष्ट

August 31, 2021
पर्यावरणपुरुष : श्रीकांत नावरेकर
Environmental

पर्यावरणपुरुष : श्रीकांत नावरेकर

December 14, 2021
पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी
Birds friend

पक्ष्यांना त्यांचं आकाश देणारी पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी

December 8, 2021
गौतम भटेवरा
Eco-Friendly Lifestyle

गौतम भटेवरा यांच्या घरातल्या कचऱ्याचं होतं सोनं…!

December 15, 2021
अंजनेरी दुर्मिळ वनस्पती
Environmental

जगातील ही सर्वांत दुर्मिळ वनस्पती आढळते फक्त अंजनेरी पर्वतावर!

December 26, 2021

Share this:

  • Twitter
  • Facebook
Tags: देवराई म्हणजे कायनाशिक देवराईफाशीचा डोंगरशेखर गायकवाड देवराई जंगल
Mahesh Pathade

Mahesh Pathade

Next Post
रहस्यमयी गाव पक्षी आत्महत्या

रहस्यमयी गाव, जेथे पक्षी करतात आत्महत्या

Comments 5

  1. सज्जा पर सब्जी says:
    2 years ago

    खूप छान लिहिलंय…

    Reply
  2. Unknown says:
    2 years ago

    धन्यवाद…

    Reply
  3. Unknown says:
    2 years ago

    धन्यवाद ,आपल्याला आपण घेतलेल्या अथक परीश्रमा बद्दल

    Reply
  4. Pingback: जगातील ही सर्वांत दुर्मिळ वनस्पती आढळते फक्त अंजनेरीवर! - kheliyad
  5. Pingback: जगातील सर्वात मोठे जंगल कोणते? - kheliyad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube Pinterest Tumblr Instagram LinkedIn Telegram

______________________________

U-19 Cricket World cup

आयपीएल 2022 च्या मोसमात खेळाडूंवरील रकमा ऐकाल तर डोळे विस्फारतील

  1. Sports Quiz
  2. Inspirational Story
  3. अजबगजब खेळ
  4. kheliyad Chess Puzzle
  5. Tennis

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

No Result
View All Result
  • Home
  • Cricket
  • All Sports
  • Inspirational story
  • Online Chess Puzzle
  • Raanwata
  • Video
  • sports quiz

© 2020 Kheliyad Copyright © 2020 Website The "kheliyad" is not responsible for the content of external sites.

error: Content is protected !!