All SportsCricket

या कारणांमुळे दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध जिंकला

इंग्लंड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिका जिंकणारा भारतीय संघ आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेला, आक्रमक खेळाडूंनी सजलेला. दक्षिण आफ्रिकेत मात्र हा संघ गलितगात्र झालेला पाहताना विश्वासच बसत नव्हता. या उलट दक्षिण आफ्रिकेची अवस्था. प्रशासकीय संकटांनी घेरलेला, स्टार खेळाडूंची निवृत्ती आणि वर्णद्वेषाच्या आरोपांमुळे 2021 हे वर्ष आफ्रिकेसाठी कोरोनापेक्षा भयंकर गेलं. घरच्या समस्यांनीच बेजार झालेला आफ्रिकन क्रिकेट संघ अस्तित्वासाठीच मैदानावर होता. भारत अस्तित्वापेक्षा प्रतिष्ठेसाठी लढत होता. या द्वंद्वात दक्षिण आफ्रिका जिंकला. असा जिंकला, की भारताचे न दिसलेले कच्चे दुवे समोर आले.

दक्षिण आफ्रिका जिंकला

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात केएल राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ‘किंकर्तव्यविमूढ’सारखा दिसणारा प्रभारी कर्णधार, उतरणीला लागलेली काही सीनिअर खेळाडूंची कारकीर्द आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तीच ती पारंपरिक शैली… दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौऱ्यात भारताची कामगिरी थोडक्यात अशी सांगता येईल. यावर बरंच मंथन होईल. अनेक प्रश्नांनाही सामोरे जावे लागेल. जेव्हा दक्षिण आफ्रिका दौरा निश्चित झाला, तेव्हाच त्याला नाट लागली. कसोटी कर्णधार विराट कोहलीची बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी वाद याच वेळी उफाळून आले. सगळंच काही आलबेल नव्हतं. कदाचित काही उणिवा झाकल्याही गेल्या असत्या. कारण पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियात हवेत गेली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर तसंही प्रभारी के. एल. राहुलला करण्यासारखं काही नव्हतं. एक वेलसेटल टीम पॅकेज त्याला आयतं मिळालं होतं.

आता कोहली जरी सांगत नसला तरी तो एक गोष्ट नाकारू शकत नाही, ती म्हणजे एक क्रिकेटपटू म्हणून तो सर्वांत कठीण परिस्थितीतून जात आहे. तीनपैकी दोन प्रकारांतून (कसोटी, टी-२०) त्याने कर्णधारपद सोडलं आहे, तर वन-डेमधून त्याला कर्णधारपदावरून काढलं आहे. कोहली उत्तम फलंदाज आहे. जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंशी त्याची तुलना होते. वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाही त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात 79 धावा केल्या. वन-डे मालिकेतही त्याने अर्धशतके ठोकली. मात्र, का कोण जाणे, या फलंदाजीत ती मजा नव्हती, ज्यावर क्रिकेटप्रेमी फिदा व्हायचे.

तीन दलांचा सेनापती म्हणून वावरलेला विराट कोहली आतून कुठे तरी दुखावला. आक्रमकता त्याच्या स्वभावातच आहे. मात्र, ही आक्रमकता केपटाउनमध्ये दिशाहीन झाल्याचे पाहायला मिळाले. केपटाउनच्या कसोटी सामन्यात डीआरएस प्रणालीचा एक निर्णय विरोधात गेल्याने त्याने नाराजी व्यक्त केली. यामुळे भारताची पुनरागमनाची संधीही धूसर झाली.

दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट मालिका गमावल्यानंतर कोहलीने कर्णधारपदावर पाणी सोडले. मात्र, त्याचा वारसदार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते, त्या के. एल. राहुलला प्रभाव पाडता आला नाही.

गंमत पाहा, के. एल. राहुलचं नाव जेव्हा कसोटी कर्णधारपदासाठी सुचवण्यात आलं, तेव्हा बीसीसीआयमध्येच एकवाक्यता नव्हती. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तर प्रतिप्रश्न केला, ‘‘के. एल. राहुल कोणत्या बाजूने कर्णधार वाटतो?’’ या अधिकाऱ्याला प्रश्न विचारला होता, की रोहित तंदुरुस्त नसल्याने राहुलला कसोटी कर्णधार केलं जाऊ शकतं का? या प्रश्नावर अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया बोलकी होती.

असं म्हंटलं जातंय, की प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कर्णधार म्हणून राहुलमध्ये दीर्घकालीन पर्याय दिसतोय. याच कारणामुळे द्रविड यांनी त्याच्या पाठीशी आहेत. राहुल द्रविड केएल राहुलविषयी म्हणतात, ‘‘त्याने त्याचं काम उत्तम केलं आहे. कर्णधार म्हणजे आपल्या खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीला पुढे आणणं आहे. वनडे क्रिकेट संघात संतुलनाची उणीव जाणवते. राहुल काळानुरूप शिकेल.’’

ते काहीही असो, भारतासमोर तशाही इतक्या मोठ्या समस्या नव्हत्या. मात्र, भारत अशा संघाकडून पराभूत झाला, जो संघ अंतर्गत समस्यांनीच गलितगात्र झालेला होता. दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकावर वर्णद्वेषाचे आरोप लागले. एवढेच नाही, तर हा संघ दोन वर्षांपूर्वी निर्बंधाच्याही गर्तेत सापडला होता. अशा संघाविरुद्ध भारतीय संघ निडरपणे मात्र खेळू शकला नाही. कोणतीही रणनीती दिसली नाही, खेळाडूंतही ताळमेळ दिसला नाही.

रहाणेचं संघातलं अस्तित्व पुन्हा धोक्यात

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकले. त्या वेळी केवढे कौतुक! याच रहाणेला डिसेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाबाहेर ठेवण्यात आले होते. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध चमकल्यानंतर रहाणेच्या खेळीवर गावस्कर म्हणाले होते, ‘कधी कधी काही खेळाडूंना वगळण्याबाबत आपण खूप घाई करतो.’ मुळात गावस्करांची ही प्रतिक्रियाच घाईची वाटली. गौतम गंभीरने मात्र याउलट प्रतिक्रिया दिली होती. तो स्पष्टच म्हणाला, “रहाणेची कामगिरी चांगली झाली असली तरी त्याला वगळायला हवे.” याचा प्रत्यय पुढे आला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात चमकलेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा नंतर फारशी छाप पाडू शकले नाहीत. दोघेही सहा डावांत 200 धावाही करू शकले नाहीत. चेतेश्वरचं माहीत नाही, पण अजिंक्य रहाणेची कारकीर्द आफ्रिका दौऱ्यातच संपुष्टात आल्यात जमा आहे. या दोघांमुळे हनुमा विहारीसारखा खेळाडू दीर्घकाळापासून प्रतीक्षायादीत राहिला हे मात्र खरं.

भारताची गोलंदाजी अपवाद वगळता नेहमीच लकवाग्रस्त राहिली आहे. इशांत शर्माला वारंवार का संघात घेतलं जातं, याचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही. त्याची कामगिरी एकदाही नजरेत भरली नाही. तरीही तो संघात दिसतोच. हे समजायला आफ्रिकेचा दौरा करावा लागला की काय समजत नाही. इशांत शर्माला संघाबाहेर ठेवण्यात आलं. याचा अर्थ संघ व्यवस्थापनालाही त्याच्यावर भरवसा राहिलेला नाही, हे स्पष्ट होतं.

आता इशांत शर्मा नाही म्हंटल्यावर उरतं कोण, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. या दोघांवरच टीम इंडिया अवलंबून आहे. आर. अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी तर साफ निराशा केली. आयपीएलमध्ये धडाक्यात खेळणारा श्रेयस अय्यर आखूड टप्प्याचा चेंडू खेळू शकत नाही. आफ्रिका दौऱ्यात त्याच्या या उणिवा उघड्या पडल्या.

दक्षिण आफ्रिका कसा जिंकला?

भारताच्या पराभवाची कारणं भारताच्या बाजूने विचार करण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. दीर्घकाळापासून दक्षिण आफ्रिका अशा अवस्थेतून जात होता, ज्यातून उभं राहणं कठीण होतं. अशा स्थितीतही दक्षिण आफ्रिका कसा जिंकला, हा प्रश्न आहेच. हा तोच दक्षिण आफ्रिका आहे, जो ऑस्ट्रेलियानंतर सर्वोत्तम संघ समजला जात होता. भारताविरुद्धच्या विजयामुळे त्याला पूर्वीचं वैभव मिळण्याची आशा पल्लवित झाली नसेल तरच नवल. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनाही असंच वाटत असेल.

प्रशासकीय संकट, स्टार खेळाडूंची निवृत्ती आणि वर्णद्वेषाच्या आरोपांमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट गेल्या 24 महिन्यांपासून संघर्ष करीत होता. या संघर्षाचं फलित म्हणजे भारताविरुद्धचा विजय. आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-1 आणि वनडे मालिकेत 3-0 असे पराभूत केले.

दक्षिण आफ्रिका कसा जिंकला, यावर मार्क बाउचर यांची प्रतिक्रिया पुरेशी आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या प्रवासाविषयी चर्चा केली. आम्ही 3-0 अशाच विजयाची अपेक्षा केली होती. आम्ही खूपच कठीण काळ पाहिला आहे. तो सरल्यानंतरच चांगल्या कामगिरीची जबाबदारी आणखी वाढते.’’

भारताने विजयाचा धडाका लावला होता, तर आफ्रिकेला विजयाची आस होती. एक जण भरल्यापोटी लढत होता, तर दुसरा भुकेसाठी लढत होता. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत हाच तो मोठा फरक होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कामचलावू कर्णधार नव्हता. आफ्रिकेकडे असा कर्णधार होता ज्याला विजयाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. तेम्बा बावुमा त्याचं नाव. संघर्षामुळे संघात इतका एकोपा होता, की सिंसाडा मागालासारखा ओव्हरवेट खेळाडूही सरस कामगिरी करून गेला. दक्षिण आफ्रिका का जिंकला, तर त्यामागे उत्तम नेतृत्व, अस्तित्वासाठी सांघिक भावना प्रबळ आणि पुन्हा उभं राहण्यासाठी आत्मविश्वास ही कारणे होती.

मालिका जिंकल्याने आफ्रिकेला उभारी

आफ्रिका संघाचे प्रशिक्षक मार्क बाउचर वर्णद्वेषाच्या आरोपांचा सामना करीत आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगावरून सुनावणीही सुरू आहे. वनडे क्रिकेट मालिकेत निर्भेळ यश मिळवत दक्षिण आफ्रिका जिंकला, तेव्हा सर्वाधिक आनंद मार्क बाउचरच्या चेहऱ्यावर दिसला. माजी यष्टिरक्षक बाउचर यांच्या कारकिर्दीतला हा सर्वांत मोठा विजय आहे का? कदाचित याचं उत्तर हो असेल. मात्र, बाउचर यांनी यावर कोणतंही उत्तर जाहीरपणे दिलेलं नाही. बाउचर म्हणाले, ‘‘मी याचं उत्तर देऊ शकत नाही. कामगिरी चांगली झाली आहे. दीर्घकाळापासून आम्ही अनेक बदल पाहिले. आता त्यातून बाहेर आलो आहे. त्यासाठी अशाच विजयाची आम्हाला गरज होती. कोरोना काळात आम्ही अनेक नवे प्रयोग केले आणि अनेक खेळाडूंना संधी दिली. त्याचे फळ आता मिळत आहे.’’

तेम्बा बावुमा याच्या नेतृत्वाला चार चाँद

दक्षिण आफ्रिका जिंकला

आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्यासमोर तर मोठे आव्हान होते. तो अशा संघाचा कर्णधार होता, ज्या संघाकडून किमान अपेक्षा होत्या. कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्याला ड्रेसिंग रूममध्ये वातावरण चांगलं ठेवणं आवश्यक होतं. हेच मोठं आव्हान होतं. कारण दक्षिण आफ्रिका क्रिकेट मैदानाबाहेर अनेक वादांनी घेरलेला होता. प्रशासकीय संकट त्यापैकीच एक. त्यामुळे संघात आत्मविश्वास भरण्यासाठी मालिकेत भारतावर विजय मिळविण्याची गरज होती.भारतीय संघाचा दौरा सुरू होण्यापूर्वीच प्रशिक्षक मार्क बाउचरसह काही मोठी नावं होती, ज्यांच्यावर वर्णद्वेषाचे आरोप ठेवण्यात आले होते.

वनडे मालिकेत भारताला क्लीन स्विप दिल्यानंतर बावुमा माध्यमांना सामोरा गेला. गेल्या वर्षी मार्च 2021 मध्ये त्याच्या हातात कर्णधारपदाची धुरा आली. आणि वर्षभरात त्याच्या संघाने भारतासारख्या दिग्गज संघाला पराभूत केले. बावुमा 22 मार्च 2022 रोजी म्हणाला, ‘‘मला नाही वाटत संघाचं कर्णधारपदाची धुरा वाहणं सोपं आहे. संघ आणि संघटना या दोघांवर बऱ्याच उलटसुलट चर्चा होत होत्या. या चर्चेचं सावट ड्रेसिंग रूममध्ये पडू नये म्हणून वातावरण हलकं ठेवून आत्मविश्वासाने मैदानावर उतरणं आवश्यक होतं. माझ्यासाठी तरी हेच मोठं आव्हान होतं.’’ सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्माणच्या अहवालात संघाचे प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू मार्क बाउचर यांच्यावर वर्णभेदाचा आरोप होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला. मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यात बावुमाने शतक झळकावले. एवढेच नाही तर कुशल नेतृत्व केलं.

टीम इंडियाच्या मधल्या फळीचे अपयश

भारतीय संघाच्या पराभवावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाच्या असमतोलावर बोट ठेवलं. एकदिवसीय क्रिकेट टीममध्ये संतुलनाचा अभाव आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजासारखे अष्टपैलू खेळाडूंची उणीव जाणवली.तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून 3-0 असा लाजीरवाणा पराभव भारताला स्वीकारावा लागला. त्यामुळे द्रविड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती होणं स्वाभाविक होतं. गोलंदाजी आणि फलंदाजीत भारतीय संघाने साफ निराशा केली. केएल राहुलचं कर्णधारपद आणि वेंकटेश अय्यर याला वरच्या फळीत न उतरवणं या दोन चुकांवर बरीच टीका होत आहे. द्रविडला वाटतं, की ‘‘संघाची लय संतुलनावर अवलंबून असते. प्रामाणिकपणे पाहिलं, तर जे खेळाडू संघाला संतुलन देतात, असे खेळाडू सहाव्या, सातव्या, आठव्या क्रमांकासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.’’ द्रविडचा इशारा हार्दिक पंड्या, जडेजाकडे होता. हे दोन्ही खेळाडू तंदुरुस्ती नसल्याने संघाबाहेर होते.

द्रविड म्हणाले, ‘‘असे खेळाडू जेव्हा संघात येतील तेव्हा संघ खोलवर मजबूत होईल. यामुळे आपल्याला वेगळ्या पद्धतीने खेळण्याची संधीही मिळेल.’’

भारताच्या पराभवातलं एक कारण म्हणजे नेतृत्वाचा अभाव. त्यामुळे के. एल. राहुलच्या कर्णधारपदावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र द्रविड यांनी त्याची पाठराखण केली आहे. द्रविड म्हणाले, लोकांना कळायला हवं, की तो उपलब्ध संघासाठी जे सर्वोत्तम करू शकत होता, ते त्याने केलं. पराभव झाल्यानंतर कर्णधाराला दोष देणं सोपं असतं. काळानुरूप तो अधिक चांगली कामगिरी करील.

वन-डेतील लाजीरवाण्या पराभवाचं कारण म्हणजे दिशाहीन फलंदाजी. विसाव्या ते 40 व्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजी दिशाहीन पाहायला मिळाली. दोन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 290 च्या आसपास धावा केल्या. या दोन्ही सामन्यांत भारत 30 व्या षटकानंतर लक्ष्य साधण्याच्या स्थितीत होता. मात्र, चुकीचे फटके आणि निर्णायक टप्प्यात हुशारीने खेळू शकलो नाही, असे द्रविड म्हणाले. मात्र यात कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नाही. मात्र त्याचा रोख मधल्या फळीकडे होता. म्हणजे श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत. मधल्या फळीतल्या फलंदाजांना अनेक संधी दिल्यानंतर त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा द्रविड यांना होती. तुम्ही चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करीत असाल तर तुम्हाला संघाची गरज काय आहे, हे लक्षात यायला हवं. श्रेयस तर तिन्ही सामन्यांत झटपट बाद झाला. द्रविडने त्याला सल्ला दिला. ते म्हणाले, वेंकटेशने मधल्या फळीशी सुसंगत व्हायला हवं. वेंकटेशने सहाव्या गोलंदाजाचा पर्याय म्हणून तयार राहायला हवं. वेंकटेश, हार्दिक किंवा जडेजा, जेव्हा हे संघात पुनरागमन करतील तेव्हा अनेक पर्याय उपलब्ध होतील. काहीही असो, दक्षिण आफ्रिका दौऱ्याने भारताचे डोळे खाडकन उघडले. 2023 चा विश्व कपपूर्वी टीम इंडियाला जास्तीत जास्त वनडे खेळावे लागतील.

कोरोना असतानाही टीम इंडियाचा दौरा कौतुकास्पद

दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट निदेशक ग्रॅमी स्मिथ यांचा या मालिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दोघांचं कौतुक केलं. कोरोना महामारीत दक्षिण आफ्रिकेने यशस्वीपणे मालिकेचे यजमानपद भूषवणे आणि अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंनी दौरा करणे कौतुकास्पदच म्हणावं लागेल. कारण कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा (ओमायक्रॉन) पहिला रुग्ण याच दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. तरीही बीसीसीआयने आफ्रिका दौरा रद्द केला नाही. अनिश्चिततेच्या अशा प्रसंगात टीम इंडियाने विश्वास दाखवणे खरोखर कौतुकास्पद आहे. हा आदर्श इतरांनी घ्यावा, असा टोला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड बोर्डाचं नाव न घेता लगावला. ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे दक्षिण आफ्रिकेचा तीन कसोटी मालिकेचा दौरा स्थगित केला होता. इंग्लंडनेही डिसेंबर 2020 मध्ये बायो बबलमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने मर्यादित षटकांची मालिका अर्धवट सोडत मायदेशी परतला होता. भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवल्याने दक्षिण आफ्रिकेला प्रसारण अधिकारातून रक्कम मिळणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेटची स्थिती सुधारेल, हेही नसे थोडके.

Follow on Facebook Page kheliyad

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला आशा पुन्हा परतण्याची…

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!