All SportsCricketSports History

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेविषयी हे माहीत आहे काय?

भारतीय क्रिकेटचा कणा असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला 17 फेब्रुवारी 2022 पासून प्रारंभ होत आहे. करोनाच्या धोक्यामुळे गेल्या मोसमात 2021 मध्ये रणजी स्पर्धा होऊ शकली नव्हती. रणजी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच असा खंड पडला. आता एका वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रणजी स्पर्धा होत आहे. या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेविषयी…

कशी होणार रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा?

यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा कशी होणार, याबाबत उत्सुकता आहे. कारण यंदाची रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. 17 फेब्रुवारी 2022 पासून पहिल्या टप्प्याला प्रारंभ होईल. पहिल्या टप्प्यात साखळी आणि उप-उपांत्यपूर्व लढती रंगतील. उपउपांत्यपूर्व लढती 12 ते 16 मार्च 2022 या कालावधीत होतील. अर्थात, आयपीएलच्या आधी हा टप्पा संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना होईल. हा टप्पा 30 मे ते 26 जून 2022 दरम्यान होणार आहे.

सर्वाधिक रणजी करंडक जिंकणारा संघ कोणता?

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद कोणी पटकावले, याचं उत्तर सर्वांनाच माहीत असेल. मात्र किती वेळा जिंकले, याबाबत अनेकांचा गोंधळ उडेल. रणजी स्पर्धेत मुंबईने सर्वाधिक 41 विजेतिपदे पटकावली आहेत. सन 2015-16 च्या मोसमानंतर मात्र मुंबईला ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकता आलेली नाही.

महाराष्ट्राला 80 वर्षांपासून रणजी करंडकाची हुलकावणी

विदर्भ आणि महाराष्ट्राने प्रत्येकी दोन वेळा रणजी क्रिकेट स्पर्धेची विजेतिपदे पटकावली आहेत. विदर्भाने 2017-18 आणि 2018-19 च्या मोसमात रणजी करंडक उंचावला. महाराष्ट्राने 1939-40 आणि 1940-41 च्या मोसमात ‘रणजी’चे विजेतेपद मिळवले. त्यानंतर 1970-71, 1992-93, 2013-14 मध्ये महाराष्ट्राने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, या तिन्ही वेळा महाराष्ट्राला जेतेपदाने हुलकावणी दिली.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आकडेवारी

12,038
रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम वसीम जाफरच्या नावावर. मुंबई आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व केलेल्या जाफरने 12,038 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ अमोल मुझुमदारने 9,205 धावा केल्या आहेत.
40
रणजी स्पर्धेत सर्वाधिक चाळीस शतकांचा विक्रम वसीम जाफरच्या नावावर.
443
रणजी स्पर्धेतील सर्वोच्च खेळीचा विक्रम भाऊसाहेब निंबाळकर यांच्या नावावर. महाराष्ट्राच्या निंबाळकरांनी 1948-49 च्या मोसमात सौराष्ट्राविरुद्ध नाबाद 443 धावांची खेळी केली होती.
1,415
एका मोसमात रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या नावावर. हैदराबादकडून खेळताना लक्ष्मण यांनी 1999-2000 च्या मोसमात नऊ सामन्यांत 108.84 च्या सरासरीने 1,415 धावा केल्या होत्या. त्यात आठ शतकांचा समावेश होता.
637
रणजी स्पर्धेत पतियाळा, सदर्न पंजाब, दिल्ली आणि हरियामाचे प्रतिनिधित्व करणारे फिरकीपटू राजिंदर गोयल यांनी सर्वाधिक 637 विकेट घेतल्या.
68
रणजी स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक 68 विकेटचा विक्रम बिहारच्या आशुतोष अमनच्या नावावर. त्याने 2018-19 च्या मोसमात ही कामगिरी केली होती.
944
हैदराबादने 1993-94 च्या रणजी स्पर्धेत आंध्रविरुद्ध 6 बाद 944 धावांवर डाव घोषित केला होता. रणजी स्पर्धेतील ही डावातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
21
रणजी स्पर्धेतील संघाची डावातील नीचांकी धावसंख्या. 2010-11च्या मोसमात जयपूरला राजस्थानने हैदराबादचा पहिला डाव अवघ्या 21 धावांत गुंडाळला होता.
594
महाराष्ट्राच्या स्वप्नील गुगळे-अंकित बावणे यांनी 2016-17 च्या रणजी स्पर्धेत दिल्लीविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 594 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती. ही रणजी स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोच्च भागीदारी आहे.

भारतीय क्रिकेट 2022 : संघर्षाचं वर्ष

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!