All SportsCricketSports Historysports news

क्रिकेट गॉसिप जानेवारी 2023

2023 च्या जानेवारी महिन्यात क्रिकेट खेळासह अन्य खेळांतील काही घटना चर्चेत आल्या होत्या. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीच्या ‘पिच’वर रोहित पवार यांची दमदार ‘एंट्री’ झाली. तर ‘‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून माझी झालेली निवड हा एक विनोदच आहे,’’ असे मत उस्मान ख्वाजा याने व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आले होते.याच महिन्यात बाबर आझमचे काही वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. अशाच काही घटनांनी क्रिकेट गॉसिप चर्चेत आले. 2023 च्या जानेवारी महिन्यातील चर्चेत आलेल्या अशाच काही घटनांवर प्रकाशझोत…

क्रिकेट : 8 जानेवारी 2023

‘एमसीए’च्या पिचवर रोहित पवारांची ‘एंट्री’

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) निवडणुकीच्या ‘पिच’वर रोहित पवार यांची दमदार ‘एंट्री’ झाली. राजकारणात सक्रिय असणाऱ्या रोहित यांनी ‘एमसीए’च्या राजकारणात टाकलेले पहिलेच पाऊल कमालीचे यशस्वी ठरले. त्यांची 8 जानेवारी 2023 रोजी एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शुभेंद्र भांडारकर ‘एमसीए’चे नवे सचिव असतील. राज्याचे माजी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या निरीक्षणाखाली रविवारी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील कार्यालयात ही निवडणूक पार पडली. रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी किरण सामंत, सरचिटणीसपदी शुभेंद्र भांडारकर, सहसचिवपदी संतोष बोबडे, तर खजिनदारपदी संजय बजाज यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यातील किरण सामंत हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सख्खे बंधू असून बोबडे व बजाज हे राष्ट्रवादी काँग्रेसशी निगडित आहेत. भांडारकर हे पुण्यातील माजी क्रिकेटपटू असून, त्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले आहे.

शरद पवारांच्या दोन नातवांमध्ये रंगली निवडणूक

गेली अनेक दशके महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) राजकारणापासून दूर राहिलेल्या शरद पवार यांना आज अखेर आपल्याच दोन नातवांमधील लढत थांबविण्यासाठी मैदानात उतरावे लागले. त्यांच्या प्रयत्नांनंतरही या दोन नातवांमध्ये निवडणूक झालीच. त्यामध्ये रोहित पवार यांनी बाजी मारली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये या संघटनेचे अध्यक्षपदही रोहित पवार यांनी मिळविले. रविवारी एमसीएची निवडणूक गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या स्टेडियममध्ये पार पडली. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या जे. एस. सहारिया यांच्या देखरेखीखाली निवडणूक जाहीर झाल्यापासून या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, याची चर्चा सुरू झाली होती. या वेळेस संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार (शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू) आणि अभिषेक बोके (पवार यांच्या भगिनीचे नातू) यांच्याबरोबरच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनी अर्ज दाखल केले होते. सर्वप्रथम ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे सर्व मंडळी गेली होती. पवार यांनी गेल्या आठवड्यात या संघटनेतील सुमारे चाळीस मतदारांची बैठक घेऊन त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामध्ये अतुल जैन आणि शंतनू सुगवेकर यांना पदाधिकारी करण्याचा कल अनेक मतदारांनी व्यक्त केला होता. दुसऱ्या बाजूला रोहित पवार कोणत्याही परिस्थितीत ही संघटना ताब्यात घेण्यासाठी आग्रही होती. अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर सूत्रे हलली आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यामध्ये लक्ष घातले. त्यानुसार अभिषेक बोके यांनी माघार घ्यावी, असा आदेश दिला गेला. पुढील बोलणी करण्यासाठी जैन आणि सुगवेकर यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क साधला; पण त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला नसल्याचे कळते. अखेर रविवारी सकाळी मतदान पार पडले. त्यामध्ये रोहित पवार आणि मुथा यांना क्लब वर्गातून सर्वाधिक मते मिळवित विजय मिळविला. एकूण चोवीस मतदारांपैकी पवार यांना 22, तर मुथा यांना 21 मते पडली. बोके यांना तीन, तर सुगवेकर यांना दोन मतांवर समाधान मानावे लागले. पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील दोन सदस्यांमध्ये ही निवडणूक होत असल्याने मतदानाच्या वेळेस प्रचंड तणाव होता.

क्रिकेट : 9 जानेवारी 2023

‘मी मालिकावीर, हा एक विनोद’

सिडनी : ‘‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून माझी झालेली निवड हा एक विनोदच आहे,’’ असे मत डेव्हिड वॉर्नरने केल्याचा दावा ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने केला. या पुरस्कारासाठी ट्रॅव्हिस हेड आणि पॅट कमिन्स यांच्याऐवजी वॉर्नरला पसंती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटींच्या मालिकेत 2-0 असे यश मिळवले. वॉर्नरने दुसऱ्या कसोटीत द्विशतक केले होते. मात्र, ही खेळी सोडल्यास त्याचा फारसा प्रभाव पडला नव्हता. ‘हा पुरस्कार मला देणे हा एक विनोदच आहे. हे असेच घडत असते, असे वॉर्नरने मला सांगितले होते. दुसऱ्या कसोटीत वॉर्नरने द्विशतक केले. दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत दोनशे धावाही करता आल्या नाहीत. वॉर्नरला त्या खेळीसाठी हा पुरस्कार देणे योग्यच नव्हते. वॉर्नरचेही हेच मत होते,’ असे उस्मान ख्वाजाने मुलाखतीत सांगितले. हेड आणि वॉर्नरने या मालिकेत समान 213 धावा केल्या. मात्र, हेडच्या खेळी 92, 0, 51 आणि 70 अशा होत्या. त्याने दोन्ही कसोटींच्या पहिल्या डावात केलेल्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने वर्चस्व घेतले होते. कमिन्सने या मालिकेत एकूण दहा फलंदाज केले होते.

क्रिकेट : 12 जानेवारी 2023

निषेध! ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नाही…

मेलबर्न : अफगाणिस्तानातील महिलांवरील निर्बंधांत तालिबानकडून वाढ करण्यात आल्याने ऑस्ट्रेलियाने निषेध म्हणून अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला. येत्या मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान यांच्यात यूएई येथे मालिका रंगणार होती. अन् ही मालिका आयसीसी सुपर लीगच्या अंतर्गत आयोजित होणार होती. ऑस्ट्रेलिया सरकार तसेच संबंधित वरिष्ठांचे सल्ले घेऊन अन् चर्चेनंतरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेण्य़ाचा निर्णय घेतला.
‘तालिबानने महिला-मुलींवरील निर्बंध वाढविले आहेत. यामुळे त्यांचे शिक्षण, रोजगार, बागेतील फेरफटका, जिम अशा गोष्टींवरच परिणाम झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कायमच जगभरातील महिला आणि पुरुषांच्या क्रीडाविकासाचे समर्थन केले आहे. त्यामुळे तालिबानच्या अशा वागण्याचा निषेध करत आम्ही अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली’, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानातील महिलांची विद्यापीठे आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये जाण्यावर निर्बंध आणले आहेत.
आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व लाभलेला अफगाणिस्तान हा असा एकमेव देश आहे, ज्यांचा महिला संघ नाही. ज्यामुळे येत्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही अफगाणिस्तानचा संघ नाही. आयसीसी बोर्डाच्या पुढील बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे आयसीसीचे सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील सध्याचा घटनाक्रम चिंताजन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दृष्टिक्षेप

  • या मालिकेत भाग न घेतल्याने ऑस्ट्रेलियालाला ३० गुण गमवावे लागतील. जे अफगाणिस्तानला बहाल करण्यात येतील.
  • मात्र याचा ऑस्ट्रेलियाला फार फरक पडणार नाही; कारण त्यांनी याआधी भारतात रंगणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये प्रवेश मिळवला आहे.

क्रिकेट : 13 जानेवारी 2023

बिन्नींविरुद्धची तक्रार फेटाळली

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याविरुद्धची परस्परविरोधी हितसंबंधांची तक्रार बोर्डाचे नितिमत्ता अधिकारी निवृत्त न्यायाधीश विनीत सरण यांनी फेटाळली. त्याच वेळी आपल्या तक्रारीतील एकाही मुद्द्याची माहिती कोणासही देऊ नका, असेही बजावले.
मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी ही तक्रार केली होती. बिन्नी यांची सून मयांती लँगर बिन्नी या स्टार स्पोर्ट्सच्या अँकर आहेत. त्यामुळे परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमाचा भंग होतो, अशी तक्रार गुप्ता यांनी केली होती. स्टार स्पोर्ट्सकडे भारतातील आंतरराष्ट्रीय; तसेच देशांतर्गत सामन्याच्या प्रक्षेपणाचे हक्क आहेत, याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले होते. बिन्नी यांच्या सूचनेचा स्टार स्पोर्ट्सच्या मार्केटिंग किंवा व्यवस्थापनात सहभाग नाही. त्या केवळ सामन्यांच्या वेळी चर्चा घडवून आणत आहेत. स्टार स्पोर्ट्सला देण्यात आलेल्या प्रक्षेपण हक्कांबाबत कोणताही वाद नाही, याकडे सरण यांनी लक्ष वेधले. त्यांनी बीसीसीआयच्या कार्यकारिणीचे माजी सदस्य गुप्ता यांना तक्रारीतील कोणताही भाग समाजमाध्यमांवर प्रसारीत करू नये, असेही बजावले आहे.

क्रिकेट : 17 जानेवारी 2023

बाबरचा व्हिडिओ लीक

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सोमवार संध्याकाळपासून ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. त्याला कारण म्हणजे त्याचे काही वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. एका इन्स्टाग्राम यूझरने बाबरसोबतचे काही फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल केले आहेत. या महिलेसोबत बाबरचे संबंध असल्याची चर्चा आहे. अर्थात, याबाबत अधिकृत काहीच स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते या अफवा असून, काहींनी बाबरला सोशल मीडियावर पाठिंबाही दर्शविला आहे.

क्रिकेट : 21 जानेवारी 2023

केदारबाबत ‘एमसीए’चे मौन

पुणे : सामना सोडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित पवार यांना भेटायला गेलेल्या केदार जाधववर कारवाई करण्याची मागणी होत असून, या प्रकाराबाबत ‘एमसीए’ने मौन बाळगले आहे. गहुंज्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये १० ते १३ जानेवारीदरम्यान महाराष्ट्र आणि तमिळनाडू यांच्यात रणजी सामना झाला होता. त्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केदार जाधवने कौटुंबिक कारण देऊन मैदान सोडले होते. त्या दिवशी केदार सायंकाळी साडेचारच्या सुमारास पीवायसी येथे ‘एमसीए’चे अध्यक्ष रोहित पवार यांना भेटायला आला होता. या वेळी झालेल्या बैठकीतही तो होता. या वेळी काढलेले फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सामना मध्येच सोडून येण्याच्या केदारच्या वर्तनाबद्दल क्रिकेटवर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या संदर्भात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) आणि ‘एमसीए’कडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना सुरू असताना वैद्यकीय कारणास्तव किंवा आपत्कालीन परिस्थितीत मैदान-स्टेडियम सोडून जाता येते. मात्र, त्यासाठी पंच, सामनाधिकारी आणि बीसीसीआयच्या अँटी करप्शन ऑफिसरची परवानगी घ्यावी लागते. खेळाडू खोटे कारण देऊन गेला असल्यास त्याच्यावर ‘लेव्हल थ्री’ची कारवाई होऊ शकते. यासाठी पंच, सामनाधिकारी आणि अँटी करप्शन ऑफिसर यांचे अहवाल महत्त्वाचे असतात. या तिघांच्या अहवालात साम्य असल्यास कारवाई होते. यात एक वर्षाची बंदी किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा सामना शुल्काचा दंड केला जातो. हे सर्व सामनाधिकाऱ्यावर अवलंबून असते. दरम्यान, या संदर्भात सामनाधिकारी गौरव वशिष्ठ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. या संदर्भात ‘एमसीए’चे सचिव शुभेंद्र भांडारकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत अध्यक्षांशी बोलावे असे सांगितले. मात्र, अध्यक्ष रोहित पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

क्रिकेट : 23 जानेवारी 2023

भिन्न कर्णधारांबाबत माहिती नाही : द्रविड

इंदूर : ‘भिन्न प्रकारच्या क्रिकेटसाठी भिन्न कर्णधारांच्या नियुक्तीबाबत आपणास काहीही माहिती नाही,’ असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले.
टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्यानंतरच्या सर्व टी-२० लढतींत हार्दिक पंड्याने भारताचे नेतृत्व केले आहे, तर वन-डे लढतींत रोहित शर्मा कर्णधार आहे. रोहित, विराट कोहली; तसेच लोकेश राहुल यांची भविष्यात टी-२० क्रिकेट लढतींसाठी निवड होणार नसल्याची चर्चा आहे.  ‘भारताने भिन्न कर्णधारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतल्याबाबत मला काहीही माहिती नाही. याबाबत निवड समितीस विचारणे योग्य होईल. माझ्या माहितीनुसार तरी असा कोणताही निर्णय झालेला नाही,’ असे द्रविड यांनी सांगितले.  दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारतीय खेळाडूंनी ३१ जानेवारीपासून होणाऱ्या रणजी करंडकच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणे योग्य होईल, अशी सूचना होत आहे. मात्र, द्रविड यांनी संघाची पूर्वतयारी महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्याच वेळी अंतिम संघात नसलेल्या खेळाडूंना रणजी स्पर्धेसाठी मुक्त करण्याचा विचार नक्कीच होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

क्रिकेट : 25 जानेवारी 2023

फक्त बाराच वनडे खेळलो ते बघा आधी!

इंदूर : ‘रोहित शर्माचे तीन वर्षांनंतर शतक’, अशी माहिती देणाऱ्या प्रक्षेपणकर्त्यांवर (क्रीडा वाहिनी) भारताचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच बरसला आहे. ‘अशी माहिती देणे एकांगी असून हा अर्धवट माहिती देण्याचाच प्रकार आहे. तीन वर्षांत मी शतक केले नाही असे म्हणणाऱ्यांनी या कालावधीत मी किती वनडे खेळलो तेदेखील सांगावे. या संपूर्ण कालावधीत मी फक्त १२ (खरा आकडा १७) वनडे खेळलो आहे’, असे रोहितने ठणकावून सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने कारकिर्दीतील ३०वे वनडे शतक ठोकले. जानेवारी २०२०नंतर रोहितने शतक केले. आकडेवारीचा हिशेब करता तज्ज्ञांच्या म्हणण्यात चूक नाही. मात्र यातून अर्धवट चित्र दिसते असे रोहितचे म्हणणे आहे. ‘तीन वर्षे खूपच जास्त होतात नाही का… अहो मी या दरम्यान वनडे क्रिकेट खूप कमी खेळलो आहे हे तरी लक्षात घ्या! प्रसारणकर्त्यांनी योग्य माहिती द्यायला हवी. तुम्ही पत्रकारही (पत्रकार परिषदेस उपस्थित पत्रकार) हे जाणता की मी गेल्या तीन वर्षांत खूपच कमी वनडे क्रिकेट खेळलो आहे. २०२०मध्ये तर आपण सगळेच करोनामुळे घरी बसलो होतो. क्रिकेट खेळले गेले नाही. त्यानंतर दुखापतीमुळे मी वनडे मालिकांना मुकलो. मी कसोटी क्रिकेट जास्त खेळलो’, याकडे रोहितने लक्ष वेधले.

1 फेब्रुवारी 2023

ड्रेसिंग रूममधील वर्णद्वेषी शेरेबाजी टाळा

‘क्रिकेटमध्ये आता वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, वंशाचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये एकत्र येत असतात. अशा वेळी त्यांच्या भावना दुखावतील, असे वर्तवणूक टाळायला हवे. गमतीतही खेळाडूंना आपल्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली जात आहे, असे वाटायला नको,’ अशी विनंती इंग्लंडचे माजी कर्णधार ॲँड्र्यू स्ट्रॉस यांनी सर्व क्रिकेटपटूंना केली आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेला अझीम रफीक क्रिकेटपटू एका दशकापासून कौंटी क्रिकेटमध्ये यॉर्कशायर संघाकडून खेळत होता. त्याने ब्रिटनच्या ‘डिजिटल, कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट्स’ विभागाला नोव्हेंबर २०२१मध्ये सांगितले होते, की सहकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. त्यामुळे आपल्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. या पार्श्वभूमीवर लॉर्ड्सवर झालेल्या मेरेलिबोर्न क्रिकेट क्लबमधील भाषणात स्ट्रॉस म्हणाले, ‘लीग निमित्ताने आता वेगवेगळ्या राष्ट्रीय संघाचे खेळाडू एकत्र येत असतात. या खेळाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येत असतो. हे सर्व जण वेगवेगळ्या संस्कृती, धर्म, वंशाचे असतात. तेव्हा ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे असायला हवे. गमतीतही कोणाच्या भावना दुखावतील अशी शेरेबाजी व्हायला नको. कारण प्रसारमाध्यमांच्या नजरा आपल्याकडे नेहमी असतात. चाहत्यांचे आपण आदर्श असतो. तेव्हा कुठलेही चुकीचे कृत्य आपल्याकडून घडू नये. खेळ भावनेच्या विरुद्ध वागू नये.’

काय होते प्रकरण?

३१ वर्षीय फिरकी गोलंदाज अझीम रफीक २००८ पासून यॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्लबकडून खेळत होता. तो १५ आणि १९ वर्षांखालील इंग्लंड संघाचा कर्णधारही होता. त्याने यॉर्कशायरचेही नेतृत्व केले आहे. २०१८ पर्यंत तो यॉर्कशायरकडून खेळत होता. यानंतर सप्टेंबर २०२०मध्ये त्याने सहकारी आपल्याविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी करीत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. चौकशीअंती त्याचे अनेक आरोप खरे असल्याचे आढळून आले होते. त्या वेळी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका झाली होती. हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चांगलेच गाजले होते.

2 फेब्रुवारी 2023

लक्ष्य सेन माझा हिरो

v

नवी दिल्ली : ‘लक्ष्य सेन हा बॅडमिंटनमधील माझा नवा हिरो आहे. यापूर्वी केवळ प्रकाश पदुकोण होते,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केले आहे. प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीत नवोदित खेळाडूंची गावस्कर यांनी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. गावस्कर नुकतेच बेंगळुरू येथे आले होते. त्या वेळी त्यांनी नेहमीप्रमाणे बॅडमिंटन अकादमीस भेट दिली. क्रिकेटप्रमाणेच बॅडमिंटनही त्यांचा आवडता खेळ आहे. त्यांनी एक तास बॅडमिंटनपटूंसह संवाद साधला, असे पदुकोण अकादमीचे संचालक विमलकुमार यांनी सांगितले. गावस्कर यांनी लक्ष्य सेन याच्यासह असलेले छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. त्यासोबत लक्ष्य सेन हा माझा नवा बॅडमिंटन हिरो असल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी पदुकोण हे कायम माझे हिरो आहेत, हेही सांगितले. गावस्कर यांनी पदुकोण यांची कायम भारतातील सर्वोत्तम क्रीडापटूत गणना केली आहे. गावस्कर यांनी केलेली शाबासकी ऐकून खूपच छान वाटले. काय बोलावे ते सुचत नाही, असे लक्ष्य सेनने सांगितले.  गावस्कर हे थॉमस कप विजयाबद्दल खूप बोलले. त्या वेळी मला भारताच्या १९८३ मधील जागतिक विजेतेपदाची आठवण झाली. या स्पर्धेत भारतीय संघास कोणीही विजेतेपदाच्या शर्यतीत धरले नव्हते, हेच थॉमस कप स्पर्धेत आमच्याबाबत होते, असेही लक्ष्यने सांगितले.

4 फेब्रुवारी 2023

अयोग्य खेळपट्ट्या? मला नाही पटत…

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका तोंडावर आली असताना भारतातील खेळपट्ट्यांवर शेरेबाजी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टिरक्षक इयन हिली यांनी गेल्या शुक्रवारीच भारताच्या खेळपट्ट्यांना ‘अयोग्य’ म्हटले होते. ज्याला भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.  भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे (बीसीसीआय) कायमच फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार केल्या जातात, ज्याचा फायदा उठवत टीम इंडिया सहज कसोटी जिंकते. भारताचे हे ‘डावपेच’ अयोग्य असल्याचे हिली यांनी म्हटले होते. यावर राइट यांनी रोखठोक भूमिका मांडत हिली यांना सुनावले. कोणताही यजमान देश हा किमान कसोटी मालिकांसाठी तरी आपल्याला हव्यातशा पोषक खेळपट्ट्या तयार करत असतो. अन् ते सहाजिकच आहे, असे राइट म्हणतात.

काय म्हणाले हीली?

‘भारताचा संघ चांगलाच आहे; पण त्यांच्या फिरकी गोलंदाजांची मला तरी दहशत वगैरे वाटत नाही. बीसीसीआय फिरकीला पोषक खेळपट्ट्या तयार करते अन् तिथेच हे फिरकीपटू विकेट काढतात. गेल्या मालिकेतही भारताने तसेच केले फिरकी गोलंदाजांच्या प्रेमातच असलेली खेळपट्टी तयार केली. जे भयंकर आणि अयोग्य आहे. अशा खेळपट्टीवर कसोटीच्या पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहते. अशा खेळपट्ट्यांचा फायदा फक्त भारताच्या क्रिकेटपटूंनाच होतो’, अशी टीका इयन हीली यांनी केली होती.  मिचेल स्टार्क पहिल्या कसोटीतही उपलब्ध नसेल, तर भारत ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकेल, असे भाकीतही हीली यांनी व्यक्त केले. ‘पाटा खेळपट्ट्यांमध्ये वावगे असे काही नाही. जिथे फलंदाजांना वाव मिळतो आणि गोलंदाजांना अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. मात्र भारत कायमच फिरकी गोलंदाजांच्या अनुषंगाने खेळपट्ट्या खडवितो’, असेही हीली सांगतात.

जॉन राइट यांचे असे प्रत्युत्तर

‘मुळात हीलीची टीकाच अयोग्य आहे. असे डावपेच वापरणेच मला चुकीचे वाटत नाही. प्रत्येक यजमान संघ आपल्या संघाला अनुसरून खेळपट्ट्या तयार करतो. कसोटी क्रिकेटची हीच तर गंमत आहे. पाहुण्या संघाने यजमानांच्या घरात जाऊन त्यांना नमविणे कायम मोठे लक्षण मानले जाते. ते याच कारणामुळे! तेव्हा प्रतिस्पर्ध्याचे मैदान आपल्या खेळाच्या जोरावर जिंकून दाखवा’, असे खणखणीत प्रत्युत्तर भारताचे माजी प्रशिक्षक राइट यांनी दिले आहे. भारताच्या आजी, माजी खेळाडूंनीही याआधी अशा टीकांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्हीदेखील परदेशातील वेगवान गोलंदाजांना साजेशा चेंडूला उसळी देणाऱ्या खेळपट्ट्यांवर न तक्रार करता खेळलो आणि जिंकलो आहोत, असा सूर भारताच्या खेळाडूंनी लावला आहे.

4 फेब्रुवारी 2023

ग्रेग चॅपेल म्हणतात, यावेळी टीम इंडिया दुबळी!

मेलबर्न : महत्त्वाच्या मालिकांआधी आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्यास चिथावणी देणारी वक्तव्य करायची ऑस्ट्रेलियाची जुनी खोड. ज्यास ही मंडळी ‘माइंडगेम’ असे म्हणतात. सध्या संघात असणाऱ्या खेळाडूंसह माजी जाणते ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील या ‘माइंडगेम’मध्ये उतरतात. आताही तसाच माहोल आहे. ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेसाठी भारतात आला आहे अन् माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी भारताला थेट ‘दुबळा’ म्हणून हिणवले आहे! यष्टिरक्षक, फलंदाज ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे महत्त्वाचे खेळाडू जायबंदी असल्याने भारतीय क्रिकेट संघ ‘दुबळा’ झाला आहे, असे ग्रेग चॅपेल यांना वाटते. मोटार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला असून त्याला शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले आहे. यामुळे यंदाच्या मोसमातील बऱ्याच स्पर्धांवर त्याला पाणी साडावे लागणार आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठदुखीमुळे हैराण असून या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरलेला नाही. य़ामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गावस्कर-बॉर्डर करंडकाच्या पहिल्या दोन कसोटींत बुमराहचा विचार झालेला नाही. ‘ही मालिका जिंकण्याची ऑस्ट्रेलियाला संधी आहे. गेल्या काही मोसमांत भारतीय क्रिकेट संघ प्रथमच घरच्या मैदानावर दुबळा वाटतो आहे. ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा (आता फिट आहे), जसप्रीत बुमराह असे हुकमी खेळाडू जायबंदी आहेत. यामुळे टीम इंडिया पूर्णपणे विराट कोहलीवर अवलंबून असेल. हा संघ एकखांबी तंबू झाला आहे’, ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रातील स्तंभलेखनाद्वारे चॅपेल यांनी हे विचार मांडले आहेत.

Follow Facebook Page

Twitter

Youtube

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ header_filter_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!