All Sportschessआठवणींचा धांडोळा

सोमाणी आठवांच्या घरात पोहोचलाय…

स्त, मनमौजी बुद्धिबळपटू प्रवीण सोमाणी आपल्यातून अचानक निघून गेले… यावर विश्वासच बसत नाही. एक चांगला अनुभवी बुद्धिबळपटू गेला. मी त्यांचा ज्येष्ठ खेळाडू असा शब्दप्रयोग चुकूनही करणार नाही. कारण हा माणूस ज्येष्ठासारखा कधी वावरलाच नाही. गेल्याच महिन्यात त्यांनी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत प्रौढ गटाचे (2000 फिडे रेटिंगखालील) बक्षीस जिंकले. ज्येष्ठपणाची हीच तेवढी जाणीव करून देणारी घटना. मी त्यांच्याशी प्रॅक्टिस करायचो तेव्हा ते मला छान टिप्स द्यायचे.
चार वर्षांपूर्वी जळगाव सोडल्यानंतर प्रवीण सोमाणी नंतर कधी भेटलेच नाहीत. कधी तरी नाशिकमध्ये आले होते तेव्हा ते भेटले होते. मद्यपान ही या माणसाची एक खोड होती. मी त्याला व्यसन म्हणणार नाही. पिल्यानंतर हा माणूस कोणालाही जुमानत नव्हता. त्यामुळे त्यांनी अनेकांना दुखावलंही होतं. सकाळी पुन्हा नॉर्मल. फटकळपणा तसाही त्याच्यात होताच.
मला आठवतंय, आम्ही जळगावात संडे चेस अॅकॅडमी सुरू केली होती. त्यात मी, प्रवीण ठाकरे, संजय पाटील आणि प्रवीण सोमाणी असे चौघेच शिलेदार. या अॅकॅडमीच्या माध्यमातून आम्ही बाहेती महाविद्यालयात पहिली स्पर्धा घेतली. दोनशे रुपये प्रवेश शुल्क ठेवले होते. तब्बल 250 पेक्षा अधिक खेळाडूंचा प्रतिसाद लाभला. प्रवेश शुल्क जमा करताना सोमाणींना हुरूप यायचा. मी त्यांना म्हंटलं, सोमाणी सर, तुम्ही स्पर्धेत खेळू नका. आयोजकांचं काम स्पर्धेवर लक्ष ठेवणं आहे… पण त्यांनी ऐकलं नाही. मी खेळेनच.
स्पर्धेत त्यांचा तेजस तायडेविरुद्ध डाव सुरू होता. जवळपास निम्मा डाव झाल्यानंतर सोमाणींना कळलं, की पटावर आपला एक घोडाच नाही..
डाव सुरू असताना ते ओरडलेच, अरे माझा घोडा कुठे गेला… सगळे हसले.
तेजस तायडे म्हणाला, अहो, मी मारला. पण खरं ते नव्हतंच. सोमाणींचा घोडा सोंगट्या मांडल्यापासूनच नव्हता. ते त्यांना कळलं नाही… मी आयोजक आणि पंच या दोन्ही भूमिकेत होतो. सोबतीला अनुभवी पंच प्रवीण ठाकरेही होताच. बुद्धिबळात अशा केसेसमध्ये निर्णय देताना, खेळाडूने डाव लिहिलेला असणे महत्त्वाचे असते. त्यांनी तो लिहिलेला नव्हता.
प्रवीण ठाकरे म्हणाला, सोमाणी, डाव कंटिन्यू करा. तुमचं घोडं मेलंय.
संजय पाटील म्हणाला, सोमाणी सर, तुम्ही पोरांना घोडं कसं चालवायचं ते शिकवता… आणि तुम्हाला तुमचं घोडं सांभाळता येत नाही… पुन्हा हशा…
सोमाणी संतापला. तेजस तायडेकडे बोट करीत ते अहिराणी लहेजात म्हणाले, यानंच माझं घोडं गायब करी देलं… मी घोड्याशिवाय खेळणार नाही…
पण या किश्श्याने आम्ही पोट धरून हसलो. नियमाप्रमाणे आम्हाला सोमाणींना कोणतीही सूट देणे चुकीचे होते. सोमाणीही ऐकायला तयार नव्हते. शेवटी सोमाणी डाव सोडूनच निघून गेले. नंतर सोमाणी आलेच नाहीत. आमचा जीव टांगणीला लागला… कारण सर्वांची फी त्यांच्याकडे. अखेर रात्री एका बारमधून त्यांनी आम्हाला फोन केला. पिल्यानंतर सोमाणी कोणाचा राहत नाही याचीही प्रचीती आली… मी सकाळमध्ये होतो. त्या वेळी बातमीत या किश्श्याची चौकट टाकली. सोमाणींचा घोडा गेला कुठे… बातमी गावभर गाजली. सोमाणींनीही वाचली… पण त्यांना त्याचं काहीही विशेष वाटलं नाही. 
[jnews_block_27 first_title=”हेही वाचा…” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_post=”671,4308″]
सोमाणी बक्षीस जिंकल्यानंतर ते घरी कधी घेऊन जात नव्हते. ते बक्षीस बारमध्ये सेलिब्रेट करायचे. सोमाणी नावाचं रसायनच अजब होतं. बुद्धिबळ प्रशिक्षण हेच त्यांचं स्वतःसाठी उदरनिर्वाहाचं साधन. नाही म्हणायला त्यांचं एक दुकान होतं. ते सौ. सोमाणी पाहायच्या. बाकी फारशी आमदनी नाही. असं असलं तरी त्यांनी आपल्या दोन मुलींचं लग्न छान, झोकात केलं…
नंतर जैन स्पोर्टस अॅकॅडमीत प्रशिक्षक म्हणून त्यांना काहीसं स्थैर्य मिळालं. पण हा माणूस मला कधीही टेन्शनमध्ये पाहायला मिळाला नाही. एकदम हरफन मौला होता. पण पक्का मारवाडी. अगदी पाच- पाच मिनिटांचे प्रॅक्टिस गेम खेळायचे असले तरी पैशांवरच खेळायचा. विनर्स टू स्टे असा त्याचा नियम. आता पूर्वीसारखी रंगत प्रॅक्टिस गेममध्ये येणार नाही… कारण आता नेहमीचा विनर्स सोमाणी नसेल. 

अजूनही वाटतं, सोमाणी गेले नाहीत…असेल कुठे तरी. बुद्धिबळात आठव्या घरात प्यादी पोहोचली, की वजीर जिवंत होतो. सोमाणी मात्र अशा घरात पोहोचले जेथून ते परत कधीच येणार नाहीत… एक मात्र खरं आहे… तो आठवांच्या (म्हणजे आठवणींच्या) घरात पोहोचलाय…आमच्या काळजात कायम जिवंत राहण्यासाठी…
[jnews_block_9 first_title=”Solve the puzzle” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”82″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!