Cricket

बीसीसीआय तोडणार का चिनी कंपनीशी करार?

ध्या गलवान खोऱ्यातील भारत-चीन सीमेवरून दोन्ही देशांतील संबंध प्रचंड ताणले आहेत. भारतात चिनी वस्तूंवर बहिष्काराचे सत्र सुरू आहे, तसेच भारत सरकारनेही काही चिनी अॅपवर बंदी घातली आहे. या सगळ्या घडामोडींत आयपीएलचे टायटल प्रायोजक विवो कंपनीविरुद्ध भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI | अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही (BCCI china contract). विवो ही मूळ चिनी कंपनी आहे. या कंपनीविरुद्धचा करार मोडण्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारण करार संपुष्टात आणला तर त्याचा फायदा ‘विवो’लाच होण्याची शक्यता आहे. नुकसान मात्र बीसीसीआयला सोसावे लागेल. त्यामुळे बीसीसीआय या कंपनीशी करार संपुष्टात आणण्याची शक्यता कमीच असल्याचे बोलले जात आहे. (BCCI china contract)

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की जर करार संपुष्टात आणला तर कराराच्या नियमानुसार ‘विवो’ला घसघशीत नुकसानभरपाई अदा करावी लागेल. त्यामुळे बीसीसीआय या चिनी मोबाइल कंपनीशी करार संपुष्टात आणण्यास मुळीच धजावणार नाहीत. याबाबत बीसीसीआय नेमका काय निर्णय घेईल हे बैठकीनंतरच स्पष्ट होईल. मात्र, ही बैठक केव्हा होईल, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पूर्व लडाखमध्ये १५ जून रोजी झालेल्या हिंसक झटापटीनंतर केंद्र सरकारने वादग्रस्त टिकटॉकसह चीनच्या ५९ अॅपवर बंदी घातली आहे. बीसीसीआयने १५ जूनच्या या घटनेनंतर लगेच सांगितले, की आयपीएल प्रायोजकांबाबतही लवकरच समीक्षा केली जाईल. आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘आम्हाला अद्याप टी-20 विश्व कप, एशिया कपबाबत माहिती नाही. या स्पर्धा कधी होतील याचा कार्यक्रम अद्याप निश्चित नाही. त्यामुळे आयपीएलबाबत बैठक कशी घ्यावी हा प्रश्नच आहे. मात्र, प्रायोजकांच्या बाबतीत चर्चा करण्याची गरज आहे. अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही.’’

एक मात्र स्पष्ट आहे, की बीसीसीआयला प्रायोजकांबाबत समीक्षा करता येणार आहे. म्हणजे कराराच्या सर्व नियमांची पडताळणी करता येऊ शकेल. मात्र, करार संपुष्टात आणण्याचा नियम ‘विवो’साठी फायदेशीर ठरत असेल तर बीसीसीआय दरवर्षी मिळणाऱ्या ४४० कोटींच्या निधीवर पाणी सोडणार नाही. त्यामुळे हा करार तेव्हाच संपुष्टात आणणे सोपे राहील जेव्हा कराराची मुदत संपेल किंवा ‘विवो’ स्वतःहून करारातून बाहेर पडली तर बीसीसीआयचा सुंठेवाचून खोकला जाईल. तसे होईल याची कोणतीही शाश्वती नाही.

सध्या तरी काही पदाधिकाऱ्यांना असं वाटत आहे, की जोपर्यंत ‘विवो’ मागे हटत नाही तोपर्यंत कराराचा सन्मान करायला हवा. मुळात हा करार २०२२ मध्ये संपणार आहे. तोपर्यंत तरी बीसीसीआय करारासोबतच राहील हे स्पष्ट आहे. जर करार संपुष्टात आणला तर बीसीसीआयला ‘विवो’ला नुकसानभरपाई मोजावी लागणार आहे. अडचण ही आहे, की बीसीसीआयला कमी कालावधीत एवढ्या मोठ्या रकमेचा प्रायोजक मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण कोरोना महामारीमुळे जगाची अर्थव्यवस्थाच डळमळीत झाली आहे. ऐन वेळी कोण देणार यांना प्रायोजकत्व?

पेटीएम (यात अलीबाबाची गुंतवणूक आहे) किंवा ड्रीम इलेव्हन, बायजू आणि स्विगी (यात चिनी व्हिडिओ गेम कंपनी असलेल्या ‘टेनसेंट’ची गुंतवणूक आहे) या कंपन्यांबाबत बीसीसीआयला कोणतीही चिंता नाही. कारण या सर्व भारतीय कंपन्या आहेत. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर १९ जून २०२० रोजी नमूद केले होते, की ‘‘सीमेवर झालेल्या झटापटीत आपले वीर जवान शहीद झाले आहेत. याची गंभीर दखल घेत आयपीएल संचालन परिषद विविध प्रायोजकांच्या कराराची समीक्षा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेईल.’’

आता या पोस्टला जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. अद्याप एकही बैठक होऊ शकलेली नाही. संचालन परिषदेच्या एका सदस्याने ट्विट पाहिल्यानंतर आयपीएलचे चेअरमन (ब्रजेश पटेल) आणि सीईओशी (राहुल जोहरी) चर्चाही केली होती. मात्र, अद्याप बैठकीबाबत बीसीसीआयने कोणतीही सूचना केलेली नाही. कदाचित टी-२० विश्वकप स्पर्धा स्थगित झाली तर बीसीसीआय मोठी बैठक घेण्याची शक्यता आहे.

आयपीएलबाबत बीसीसीआय प्रचंड आशावादी आहे. मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यास एकाच शहरात स्पर्धा घेण्याचा पर्यायही बीसीसीआयसमोर आहे. मात्र, ऑक्टोबरपर्यंत आयपीएल आयोजित होऊ शकेल हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, मुंबईतच आयपीएल होण्याबाबतची शक्यता अधिक आहे. वानखेडे, ब्रेबॉर्न आणि नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर यापूर्वी आयपीएलचे सामने झाले आहेत. त्यामुळे या स्टेडियमवर सोयी-सुविधा देणेही सोपे होऊ शकेल. अर्थात, हे सगळे आडाखे आहेत. प्रत्यक्षात बीसीसीआय कोणता निर्णय घेते हे बैठकीनंतरच स्पष्ट होईल.

बैठक केव्हा होऊ शकेल..?

बीसीसीआय आयपीएलवर बैठक घेण्यास उत्सुक आहे, पण घाईघाईत कोणत्याही मुद्द्यावर ते लगेच बैठक घेऊ शकणार नाही. ते सर्वस्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वकप स्पर्धा घेण्याचे नियोजित होते. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच सध्या भयंकर आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे टी-२० विश्वकप स्पर्धा घेण्यास ते असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांनी आयसीसीला तशी कल्पनाही दिली आहे. ऑस्ट्रेलियाने स्पर्धेचे यजमानपद स्पष्टपणे नाकारले आहे. आता ही स्पर्धा स्थगित करायची की दुसऱ्या देशाला यजमानपद द्यायचे, यावर आयसीसीने निर्णय घेतलेला नाही. निर्णय घेण्यास वेळकाढूपणा का होतोय, यावर बीसीसीआयने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हेतुपुरस्सर आयसीसी निर्णय घेत नसल्याची भावना बीसीसीआयमध्ये बळावत आहे. बीसीसीआयचा एकही पदाधिकारी उघडपणे यावर बोलत नाही. यामागे काळजीवाहू कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांचेच कारस्थान असल्याचा आरोप दबक्या आवाजात होत होता. आता तेही कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाल्याने पुढे काय, हा प्रश्न आहेच. त्यामुळे जोपर्यंत आयसीसी टी-20 विश्वकप स्पर्धेबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत बीसीसीआयला आयपीएलचा कार्यक्रम आखता येणार नाही. त्यामुळेच बीसीसीआयची आयपीएलबाबतची बैठक लांबत आहे.

आयपीएलबाबत या अडचणी

  • टी-20 विश्वकप निश्चित नसल्याने बीसीसीआयला आयपीएलचा कार्यक्रम आखणे अशक्य
  • आर्थिक संकटामुळे ऑस्ट्रेलियाचा टी-20 विश्वकप स्पर्धा घेण्यास नकार
  • विवो कंपनी आयपीएलसाठी दरवर्षी 440 कोटी रुपये बीसीसीआयला देते
  • जर विवो कंपनीशी करार मोडल्यास बीसीसीआयला नुकसानभरपाई द्यावी लागेल
  • विवो कंपनीशी करार मोडायचा असेल तर नवा प्रायोजक तातडीने मिळणे अशक्य
  • कोरोना महामारीमुळे आयपीएलबाबत अनिश्चिततेचे मळभ गडद
  • आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने परदेशी खेळाडूंचे भारतात येणे सध्या तरी शक्य नाही

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!