All SportsCricketSports Historysports news

आशिया कप टी-20- भारतीय संघ कुठे चुकला?

सप्टेंबर 2022 च्या आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ कुठे चुकला, याचा खरं तर शोध घेणे म्हणजे समुद्रात पडलेली अंगठी शोधण्यासारखं आहे. आशिया कप स्पर्धेतील जेवढे संघ आहेत, त्यांच्यापेक्षा सरस कोणी असेल तर तो भारतीय संघ. तरीही भारतीय संघ स्पर्धेत आव्हान देऊ शकला नाही. सुपर फोरमध्येच भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. पाकिस्तान आणि श्रीलंकेने पराभवाचे धक्के दिल्यानंतर भारतीय संघाचे अवसानच गळाले. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ नेमका कुठे चुकला, याचं एकच उत्तर आहे. ते म्हणजे खेळाडूंची बेफिकिरी. भरवशाच्या फलंदाजांनी टाकलेली नांगी आणि सुमार गोलंदाजी. एकूणच आशिया कप टी-20 स्पर्धेचा आढावा घेतला तर भारतीय संघाच्या दुर्दैवाचे ‘दशा’वतार समजतील…

टीम इंडियाची लढत असली, की आपल्याकडे विराट कोहलीच्या हरपलेल्या फॉर्मची चर्चा हमखास रंगायची. मात्र, 28 ऑगस्ट 2022 रोजी चित्र वेगळे होते. या वेळी चर्चेच्या केंद्रस्थानी विराट कोहली हलकासाच चवीला होता. कारण ही लढत होती कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध. आशिया कप टी-20 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत सर्वाधिक चर्चेची ठरली. अपेक्षेप्रमाणे भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला; मात्र त्यासाठी भारताच्या किती कपाळात आल्या होत्या, ते याचि देही याचि डोळा टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांनाच माहीत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने ही लढत जिंकली तरी गोलंदाजी आणि फलंदाजीतल्या उणिवांनी पुन्हा पेचात टाकले होते. आशिया कप टी-20 स्पर्धेत भारतीय संघ नेमका कुठे चुकला, याचं उत्तर मला वाटतं, या विजयातच गवसायला हवं होतं.

[jnews_element_embedplaylist playlist=”https://www.youtube.com/watch?v=Ow4J5nxJ388″ column_width=”4″]

या लढतीची चर्चा यासाठी होती, की दोन्ही देशांतील राजकीय वातावरणामुळे भारत- पाकिस्तान यांच्यातील मालिका जवळजवळ थांबल्याच आहेत. गेल्या दहा वर्षांत हे संघ एकमेकांविरुद्ध एकही मालिका खेळलेले नाहीत. त्यामुळे आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया कपमध्ये हे संघ समोरासमोर आले की क्रिकेटविश्वासह साऱ्यांचेच लक्ष या लढतीकडे लागते. मात्र, लढतीपूर्वीच चिंता होती, ती विराट कोहलीचं अपयश आणि लोकेश राहुलच्या कामगिरीकडे. कारण 2022 च्या मोसमात राहुलने अद्याप एकाही आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भाग घेतलेला नाही. विराट कोहली याने विंडीज संघासारख्या दुबळ्या माऱ्यापुढे एक अर्धशतक केले होते, तर रोहित शर्माला चांगल्या सुरुवातीला सत्कारणी लावणे जमलेले नाही. अशा नकारात्मक आकडेवारीला विसरून भारतीय संघ पाकिस्तानला सामोरा गेला. विराट कोहलीचा हा शंभरावा टी-20 सामना. अपयशाच्या गर्तेतून बाहेर येत त्याने 34 चेंडूंत 35 धावा करीत किमान फलंदाजीचं दर्शन घडवलं.

विरोट कोहलीच्या 99 टी-20 सामन्यांवर एक नजर

  • कसोटी, वनडे आणि टी-20 या तीन प्रकारांत शंभर सामने खेळणारा विराट कोहली हा पहिला भारतीय
  • 99 टी-20 सामन्यांत विराटच्या 3,308 धावा, सरासरी 50.12. सर्वोत्तम 94, स्ट्राइक रेट 137.66
  • टी-20 मध्ये पन्नासपेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजात विराट दुसरा. चार शतके केलेल्या रोहितच्या 50 पेक्षा जास्त धावा 31 वेळा
  • विराटची पहिली टी-20 झिम्बाब्वेविरुद्ध 2010 मध्ये; पहिल्या सामन्यात 21 चेंडूंत 26 धावा करताना 64 धावांची मोलाची भागीदारी, भारताचा विजय
  • टी-20 मध्ये विराटची 30 अर्धशतके, पण एकही शतक नाही
  • टी-20 मधील सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत रोहित शर्मा (3,487) आणि मार्टिन गुप्टील (3,497) यांच्यापाठोपाठ तिसरा
  • टी-20 मधील एक हजार धावा 27 डावांत, तर दोन हजार धावा 56 डावांत. 68 डावांत 2,500 धावांचा टप्पा पार
  • विराट टी-20 मध्ये 12 वेळा सामनावीर. जागतिक क्रमवारीत अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (13) अव्वल
  • 2012 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटच्या पाच सामन्यात 185 धावा, सरासरी 46.25. 2014, तसेच 2016 च्या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
  • 2014 च्या स्पर्धेत 106.33 च्या सरासरीने 319 धावा, चार अर्धशतके. भारताचा अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध पराभव
  • 2016 च्या स्पर्धेत विराटच्या 136.50 च्या सरासरीने 273 धावा. पाचपैकी तीन डावांत अर्धशतके
  • 2016 या कॅलेंडर वर्षात विराटच्या 15 टी-20 सामन्यांत 106.43 च्या सरासरीने 641 धावा. 13 पैकी सात डावांत अर्धशतके
  • 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीच्या तीन डावांत मिळून 68 धावा.
  • विराटने नेतृत्व केलेल्या 50 टी-20 लढतीत भारताचे 30 विजय, 16 पराभव.
  • आंतरराष्ट्रीय शतकानंतरच्या 27 टी-20 लढतीत विराटच्या 42.90 च्या सरासरीने 858 धावा. त्यात आठ अर्धशतके
  • 2022 मधील चार टी-20 सामन्यांत विराटच्या 20.25 च्या सरासरीने 81 धावा.

हाँगकाँगविरुद्ध गोलंदाजी ठीकठाकच

सूर्यकुमार यादव याने 26 चेंडूंत 68, तर विराट कोहली याने 44 चेंडूंत 59 धावांची नाबाद खेळी साकारत भारतीय संघाला हाँगकाँगविरुद्ध 40 धावांनी विजय मिळवून दिला. आशिया कप टी-20 स्पर्धेतील भारतीय संघाचा हा दुसरा विजय. 31 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवच्याच खेळीचे कौतुक अधिक झाले. या खेळीचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडत आहेत, अशी प्रतिक्रिया दस्तूरखुद्द भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केली. मात्र, हाँगकाँग संघाविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी उंचावणे यात विशेष काही नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 192 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर हाँगकाँगने 5 बाद 152 धावापर्यंतच मजल मारू शकला. मात्र, एक उणीव अधोरेखित झाली. ती म्हणजे गोलंदाजीतले अपयश. रोहित शर्मा म्हणालाही, की हाँगकाँगविरुद्ध अधिक चांगला मारा करता आला असता. म्हणजेच काय, तर भारतीय संघ व्यवस्थापनाला हाँगकाँगचा डाव झटपट संपवण्यात अपयश आले, हे नक्कीच सलत होते. भारतीय संघ हाँगकाँगविरुद्ध आशिया कपमध्ये जिंकला असला तरी तो नेमका कुठे चुकला, याचं उत्तर पुन्हा गोलंदाजीतील ठीकठाक कामगिरी हेच असेल.

दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध भारतीय संघाची ठळक कामगिरी

  • विराट कोहलीचे 31 वे अर्धशतक. रोहित शर्माच्या 31 वेळा पन्नासहून अधिक धावा करण्याच्या कामगिरीशी बरोबरी
  • विराटची 31 अर्धशतके 94 डावांत, तर रोहितची 126 डावांत
  • विराट कोहली, तसेच रोहित शर्मा सोडल्यास कोणाही फलंदाजांची आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 30 अर्धशतके नाहीत
  • रोहितचे नेतृत्त्वाच्या 37 पैकी 31 टी-20 सामन्यांत विजय. यशाची टक्केवारी 83.78 टक्के
  • विराटच्या नेतृत्वाच्या 50 टी-20 लढतीत भारताचे 30 विजय. यशाची टक्केवारी 64.58 टक्के
  • धोनी अजूनही टी-20 मधील सर्वांत यशस्वी कर्णधार. 72 पैकी 41 सामन्यांत विजय; पण यशाची टक्केवारी 59.28%
  • रोहितच्या टी-20 सामन्यात साडेतीन हजार धावा पूर्ण. त्याच्या 134 सामन्यात 3,520 धावा
  • टी-20 मधील सर्वाधिक धावांच्या क्रमवारीत रोहित अव्वल. मार्टिन गप्टील (3,497) दुसऱ्या, तर कोहली (3,402) तिसरा
  • रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीस खेळताना 12 हजार धावा पूर्ण. ही कामगिरी करणारा दुसरा फलंदाज. यापूर्वी सचिन तेंडुलकर.

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने उणिवा उघड

भारत विरुद्ध पाकिस्तान 4 सप्टेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले होते. इथे भारताला उणिवांवर काम करण्याची संधी होती. ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची नामी संधी होती. मात्र, चुकांतून बोध घेण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि हातातला सामना पाकिस्तानने हिरावून घेतला. म्हणजे भारताने फलंदाजीत कमावलेलं सगळं गोलंदाजीपायी गमावलं. पाकिस्तानला जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार होती. दबाव पाकिस्तानी फलंदाजांवर होता. कारण धावांचा पाठलाग त्यांना करायचा होता. धावा आणि चेंडूंतील अंतरही बऱ्यापैकी होतं. इथं भारतीय गोलंदाजीचा मारा प्रभावी हवा होता. मात्र, तसं घडलं नाही. इथे भारताने सामना गमावला आणि भारताची नाव दोलायमान झाली. ज्या हाँगकाँगविरुद्ध भारताने 40 धावांनी विजय मिळवला होता, त्याच हाँगकाँगला पाकिस्तानने दीडशेहून अधिक धावांनी पराभूत केले होते. इथंच भारताने आत्मपरीक्षण करण्याची गरज होती. आशिया कप टी-२० स्पर्धेत भारतीय संघ नेमका कुठे चुकला, याचं उत्तर नव्याने सांगण्याची गरज नाही. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही याच दुखण्यावर बोट ठेवले. “आमचे गोलंदाज जास्त वलंयाकित नसतील; पण ते त्यांची जबाबदारी नक्कीच चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. ते यश मिळवत आहेत आणि तेच महत्त्वाचे आहे,’’ अशी भारतीय गोलंदाजांमध्ये त्यांनी हवा भरली खरी; पण उसने अवसान आणून सामने जिंकता येत नाहीत, हे नवे सांगण्याची गरज नाही. द्रविड यांनी सांगितले, की ‘पाकिस्तानच्या गोलंदाजांनी नक्कीच चांगली कामगिरी केली हे मी मान्य करतो. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत; पण आमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून त्या संघाला 147 धावांत रोखले होते. काही गोलंदाज ताशी 145 किमी, 147 किमी वेगाने गोलंदाजी करतात. हे आकडे लक्षात राहतात; पण गोलंदाजीचे पृथकरण जास्त महत्त्वाचे असते. तुम्ही ताशी 135 किमी, 145 किमी किंवा 125 किमी वेगाने गोलंदाजी करता हे महत्त्वाचे नाही. तुमचा चेंडू किती स्विंग होतो हेही जास्त महत्त्वाचे नाही. तुम्ही शेवटी निकाल काय देता हे महत्त्वाचे आहे.’ द्रविड पुढे म्हणाले, की आपल्या वेगवान गोलंदाजांचे पृथकरणही चांगले होते. पाकिस्तानच्या गोलंदाजांचे मलाही कौतुक आहे; पण आपली गोलंदाजीही त्याच तोडीची आहे. ती आपल्याला यश मिळवून देत आहे. हे सर्व सांगताना एक शब्द सतत माझ्या जिभेवर येत आहे; पण तो मी टाळत आहे, असेही द्रविड यांनी हसत हसत सांगितले. आशिया कप टी-20 स्पर्धेत भारतीय संघ नेमका कुठे चुकला, याचं उत्तर द्रविड यांच्या शेवटच्या वाक्यात आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील ठळक घडामोडी

  • विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 32 वे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे पाकविरुद्धचे चौथे अर्धशतक ठरले.
  • पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यांत चार अर्धशतके करणारा विराट कोहली पहिला भारतीय ठरला.
  • रोहित शर्मा-लोकेश राहुलने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 14 व्यांदा पन्नासहून अधिक धावांची भागीदारी रचली. आंतरराष्ट्रीय टी-20 स्पर्धेत सर्वाधिक भागीदारीचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला. या जोडीने पॉल स्टर्लिंग-केविन ओब्रायनला (13) मागे टाकले.
  • रोहितने पाकिस्तानविरुद्ध दोन षटकार ठोकले. आशिया कपमध्ये कर्णधार रोहितचे आता एकूण 17 षटकार. आशिया कपमधील कर्णधारांच्या सर्वाधिक षटकारांमध्ये रोहित अव्वल. महेंद्रसिंह धोनीपेक्षा (16) सरस.

श्रीलंकेविरुद्धही तेच ते तेच ते…

भारताच्या आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या आशेला धक्का बसला. सलामीवीर पाथूम निसांका आणि कुशल मेंडिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर श्रीलंकेने भारतीय संघावर सहा विकेटनी मात केली. ‘सुपर फोर’मधील भारताचा हा दुसरा पराभव ठरला. गेल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली होती. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये 6 सप्टेंबर 2022 रोजी हा सामना झाला. पाकिस्तानविरुद्धचा पराभव विसरून श्रीलंकेविरुद्ध नव्या जोशात लढण्याची भारतीय संघाकडून अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप टी-20 स्पर्धेतील ‘सुपर फोर’ लढतीत आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, त्याचा फायदा घेण्यात त्याच्या सहकाऱ्यांना अपयश आले. पहिल्या दहा षटकांत दहा धावांची गती राखलेल्या भारतीय फलंदाजांना रोहित परतल्यावर 46 चेंडूंत 63 धावाच करता आल्या. याला काय म्हणावे? आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ फलंदाजीत ढेपाळला, हे तर स्पष्ट आहे. मात्र, एखाद्या सामन्यात फलंदाजांनी कमावलं, तर गोलंदाजांनी गमावल, तर एखाद्या सामन्यात फलंदाजांची हाराकिरी… म्हणजेच सातत्याचा अभाव हेही या स्पर्धेतलं भारतीय संघाबाबतचं सर्वांत मोठं कारण म्हणावं लागेल.

टी-20 सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू

8 वेळा रोहित शर्मा 5 वेळा के. एल. राहुल 4 वेळा विराट कोहली

हे माहीत आहे काय?

  • आशिया कप स्पर्धेत विराट प्रथमच शून्यावर बाद
  • आशिया कपमध्ये 1000 धावा करणारा रोहित शर्मा पहिलाच भारतीय

विराटचा शतकी धडाका

आशिया कप भारतीय संघ

  • विराटचे टी-20 सामन्यातील सर्वांत वेगवान शतक
  • अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ६१ चेंडूंत नाबाद १२२, तर २०१६ च्या आयपीएलमध्ये बेंगळुरूकडून खेळताना ५० चेंडूंत ११३ धावा. ही कामगिरी पंजाबविरुद्ध.
  • विराटने टी-20 मधील भारताची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. यापूर्वी रोहित शर्मा (११८- वि. श्रीलंका, इंदूर २०१७)
  • विराटचे ७१वे आंतरराष्ट्रीय शतक, सर्वाधिक शतकांच्या क्रमवारीत रिकी पाँटिंगसह संयुक्त दुसरा. सचिन तेंडुलकर (१००) अव्वल स्थानी
  • विराटने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यातील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. यापूर्वी एल. राईट (नाबाद ९९ – कोलंबो, २०१२)
  • अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध कोहलीच्या ३३ चेंडूंत ५४ धावा. टी-20 सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध कोहलीच्या या सर्वाधिक धावा
  • अमीरातीमधील टी-20 लढतीत कोहलीच्या सर्वाधिक धावा. यापूर्वी महंमद शाहझाद (नाबाद ११८ – वि. झिम्बाब्वे, शारजा १० जानेवारी २०१६)
  • भारताने आशिया कप टी-20 मध्ये पहिल्यांदाच दोनशेपेक्षा जास्त धावा
  • टी-20 मध्ये शतक करणारा विराट सर्वाधिक वयाचा फलंदाज. विराटचे वय ३३ वर्षे ३०७ दिवस. यापूर्वी सूर्यकुमार यादव (३१ वर्षे २९९ दिवस)

विराटच्या शतकातील अंतर

70 वे शतक 71 वे शतक
23 नोव्हेंबर 2019 8 सप्टेंबर 2022
  • टी-20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केलेला लोकेश राहुल हा भारताचा दहावा कर्णधार
  • यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैनी, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या
  • विराटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील साडेतीन हजार धावा पूर्ण. ही कामगिरी केलेला दुसरा फलंदाज. यापूर्वी रोहित शर्मा. रोहितच्या १३६ सामन्यात ३ हजार ६२० धावा
  • विराटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आता ३ हजार ५८४ धावा. एका शतकासह ३२ अर्धशतके. सरासरी ५१.९४
  • विराटचे टी-20 मधील षटकारांचेही शतक पूर्ण, हा टप्पा गाठणारा एकंदरीत दहावा, तर दुसरा भारतीय
  • विराटचे टी-20 मध्ये आता १०४ षटकार, सर्वाधिक षटकाराच्या क्रमवारीत मार्टिन गुप्तील (१७२) अव्वल, तर रोहित शर्मा (१७१). ख्रिस गेल (१२४), इऑन मॉर्गन (१२०) आणि अॅरॉन फिंच (११७) यांच्याकडूनही ही कामगिरी

मागील अडीच वर्षात मी खूप काही शिकलो आहे. दोन महिन्यांनी मी ३४ वर्षांचा होईल. भूतकाळात जे काही झाले त्याबद्दल मी आक्रमक सेलिब्रेशन केले. या सगळ्या काळात पत्नी अनुष्का माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. हे शतक तिला आणि माझी मुलगी वामिकाला समर्पित करतो. सहा आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्यानंतर मी अजिबात उतविळ नव्हतो. मला विश्रांतीची नितांत गरज होती, हे मला जाणवले.
– विराट कोहली, भारताचा फलंदाज

कोहली माझ्यापेक्षा सरस फलंदाज : गांगुली

‘विराट कोहलीचे कौशल्य माझ्यापेक्षा सरस आहे,’ अशा शब्दांत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीचे कौतुक केले. त्याच वेळी गांगुली यांनी आम्ही दोघेही आक्रमक कर्णधार होतो. मात्र, आमच्या नेतृत्व कौशल्याची तुलना करणे चुकीचे होईल, असे गांगुलींनी सांगितले. ‘माझ्या आणि कोहलीच्या नेतृत्वाची तुलना करणे चुकीचे होईल. आमच्या कौशल्याची तुलना आपण करू शकतो. तो नक्कीच माझ्यापेक्षा चांगला फलंदाज आहे,’ असे गांगुली यांनी सांगितले. कोहलीने आशिया कप टी-20 स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत शतक करून हजारहून अधिक दिवसांचा आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ संपवला. ‘आम्ही भिन्न सहकाऱ्यांसह खेळलो. दोघेही भरपूर सामने खेळलो. मी माझ्या पिढीतील सहकाऱ्यांसह खेळलो. तो अजूनही खेळत आहे आणि खेळत राहील. तो नक्कीच माझ्यापेक्षा जास्त सामने खेळणार आहे. सध्या मी त्याच्यापेक्षा जास्त सामने खेळलो आहे. तो यात मला नक्कीच मागे टाकणार. तो चांगलाच बहरात आहे,’ असे गांगुली यांनी सांगितले. क्रिकेट सध्या खूपच थकवणारे झाले आहे. करोनामुळे जास्तच खडतर झाले आहे. विलगीकरणाचे आव्हान जास्तच आहे. अर्थात, यातून मिळणारे फायदेही चांगले आहेत, असे भारताच्या माजी कर्णधार गांगुलींनी नमूद केले. ‘माझी आणि कोहलीची भेटच झालेली नाही. तो खूपच प्रवास करीत आहे. प्रत्येकाच्या खेळाचे विश्लेषण होत असते. नाव बदलतात; पण घडत तेच असते. अर्थात कोणाबद्दल काय लिहिलेले असते, हे मला माहिती नाही; कारण मी फारसे वाचत नाही. हॉटेलमध्ये असतो, त्या वेळी माझ्या रूममध्ये वर्तमानपत्र नको, अशी स्पष्ट सूचना देतो. समाजमाध्यमे आहेतच. मात्र, त्यातून मार्ग कसा काढायचा हे खेळाडू जाणतात,’ असेही गांगुली म्हणाले. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ नेमका कुठे चुकला, यापेक्षाही विराट कोहलीची खेळी किती सरस होती, यावर सुरस चर्चा रंगली. म्हणजे हा खेळ अजूनही व्यक्तिकेंद्रितच आहे, हे स्पष्टच आहे. मात्र सांघिक कामगिरीचे काय, ती कुठे उंचावली?

प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चांगले दिवस असतात; तसेच वाईटही. दडपण कधी जास्त असते तर कधी खूप जास्त. मात्र, याकडे एक संधी म्हणून बघायला हवे. क्रिकेट आता अधिक वेगवान झाले आहे. त्यातील चौकार-षटकार वाढले आहेत. त्याचबरोबर आता जास्त चेंडू सोडलेही जात नाहीत. खेळ खूपच बदलला आहे.
– सौरव गांगुली, बीसीसीआयचे अध्यक्ष

आशिया कप स्पर्धेचे सर्व निकाल इथे पाहा…

पाचव्यांदा विजेता- 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्डकप भारताने असा जिंकला

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”65″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!