होय, मी यशवंत!
नाशिक येथील यशवंत व्यायामशाळा यंदा शतकमहोत्सवी वर्ष साजरं करीत आहे. व्यायामशाळेत कधी पार्किंग करण्याचा घाट घातला गेला, तर कधी मुदतवाढीसाठी सरकारी पायऱ्या झिजवल्या गेल्या… नाशिकच्या क्रीडाप्रेमींना ऊर्जा देणाऱ्या या व्यायामशाळेने अनेक स्थित्यंतरं पाहिली… व्यथा, वेदनांचे पट उलगडून सांगणारे यशवंत व्यायामशाळेचे हे आत्मकथन…
देवमामलेदार यशवंत महाराज पटांगण… गोदेच्या कुशीतलं माझं हे जन्मठिकाण. कधी झुळझुळ, कधी खळखळाट… गोदेचा तो सहवासच किती मंजूळ नि मधूर होता! धुक्याची दुलई पांघरलेल्या वातावरणातील तो पापभिरू घंटानाद, मंत्रोच्चाराचे ते ध्वनी… किती प्रसन्न वाटायचं! आता गोदेचे हे मंजूळ स्वर कानी पडत नाहीत. पडतात ते कानठळ्या बसविणारे कर्कश्श हॉर्न! जाऊ द्या… गोदा काय नि महात्मा गांधी रस्ता काय… दोन्ही माझ्यासाठी सारखेच… सतत प्रवाही! फरक तेवढा सूर आणि स्वरांचा आहे… कर्कश्श हॉर्नने तसेही माझे कान बधिर होत चालले आहे…
एक आत्मिक समाधान कायम आहे. ते म्हणजे माझी अवस्था जिमसारखी कधी झाली नाही. अजून तरी कुणी मला ‘यशवंत जिम’ अशी शिवी हासडलेली नाही! मी यशवंत व्यायामशाळाच राहिलो. ही त्या तीन गुरुवर्यांचीच कृपा म्हणावी. कृष्णाजी बळवंत महाबळ, त्रिंबकराव मामा देशपांडे, रंगनाथ कृष्ण यार्दी या त्रिमूर्तींना माझा सलाम. त्यांच्यामुळेच आज मी शतकमहोत्सव साजरा करतोय.
मला कधी कधी बलोपासकांची गंमत वाटते. पूर्वी बलोपासना मनापासून व्हायची. त्या वेळी बलोपासना सिक्स पॅक, एट पॅकमध्ये कधी विभागलेली नव्हतीच. हौदातल्या कुस्त्या विचारूच नका… आताही व्हतात. सॉरी होतात. काय आहे, की इथं मला बरीच ’शब्दसंपदा’ मिळाली. आता दुचाक्यांना बाइक म्हणतात. पूर्वी मला फटफट्या शब्द कधी तरी ऐकायला मिळायचा. सुंदर चेहरा असो वा नसो, पण त्याला थोबाड असंही म्हणतात हे इथंच कळलं. लय भारी हा तर जुन्या नाशिककरांचा परवलीचा शब्द आहे. माझ्या जन्मापासून हा शब्द ऐकत आलोय. आता पिक्चरमुळे तो ‘लई’च गाजलाय… काही प्रशिक्षकांची भाषा तर त्याहून भन्नाट. बरंच शिकलो इथं… छानछौकीतली प्रमाणबद्ध मराठीही आणि अस्सल गावरान शिव्या हासडतानाही त्यातलं मनापासूनचं प्रेम व्यक्त करणारी निर्मळ भाषाही. जाऊद्या ‘शब्दसौष्ठत्व’ नंतर कधी तरी.. पुष्ट शरीरयष्टीसाठी मी इथं शतकापासून उभा आहे. अनेक पावसाळे पाहिले. (अवकाळी तर वेगळेच!!) पण एक खंत मला सातत्याने आहे, ती म्हणजे इथं माझ्या हक्कावर नाना शंका घेतल्या. किती यातना होतात या देहाला! आधी नव्हतं रे बाबांनो असं काही.
मी स्वतःलाच कधी कधी तपासून पाहतो वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून. मैदानं तुकड्या तुकड्यांतून बहरत गेली. स्वतःला चाचपून पाहण्याची माझी सवय जुनीच. गंमत वाटते स्वतःला चाचपण्याची. पण मला कोणी तरी सांगा ना, मला उपरेपणाची जाणीव कोण करून देतंय? मी तुमचाच आहे ना? खरं खरं सांगा ना? मग कशाला माझ्यासाठी सह्यांची मोहीम सुरू करता? माझी खोटी समजूत काढू नका. खरं सांगा, इथं वाहनतळ करायचा होता ना? म्हणजे तुम्ही मला तात्पुरतं इथं आणलं होतं का? किती वेदना होतात! तुमच्या पुष्ट बाहूंसाठी, मी अवकाळीही झेलतोय. तुमच्यामुळेच मी इथे शतकापासून उभा आहे. पण जेव्हा मला कळलं, की मी ‘भाडेतत्त्वावर’ आहे, तेव्हा किती वेदना झाल्या असतील! एखाद्या अनाथ मुलाला वाढवल्यानंतर त्या मुलाला खऱ्या आईवडिलांची उणीवही कधी भासू दिली जात नाही. पण जेव्हा त्याला कळतं, की आपले खरे आईवडील या जगातच नाहीत, आपण अनाथ आहोत, हे कळल्यावर त्याला किती यातना होतील! किंबहुना तशाच वेदना मला झाल्यात रे बाबांनो! इथं पार्किंग करायचंय म्हणे. धन्य रे तुमची. मारुतीराया, हीच का रे तुझी सोबत?
यशवंत महाराज पटांगणावर होतो तेव्हा असं कधी घडलं नाही. गोदामाईच्या कुशीत मी किती छान राहत होतो! तिथं भलेही माझा हक्क नसेल; पण गोदामाई तर माझी हक्काची होती. मला आठवतंय, १९३९ मध्ये ती मला कायमची घेऊन गेली होती. गोदामाई तर एकदाच घेऊन गेली होती. इथं कृत्रिम वाहनांच्या वाहत्या रस्त्याने तर पदोपदी जीव घेतला. वाहनतळासाठी आसूसलेला बाहेरचा तो कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज माझ्या जिवावर उठेल, असं कधी वाटलं नव्हतं मला!
‘‘ऑक्टोपससारखा झाला शहराचा विस्तार
रस्ते चौपदरी झाले, माणसं एकपदरी…
तेव्हा अंधारात माणूस ओळखला जाई
आता हायमास्टही उपयोगाचा नाही
कुठं हरवलं ते शहर?’’
अरुण काळेंची ही कविता कधी तरी एकदा ऐकली होती. त्यातल्या या ओळी आजही मला तुम्हाला विचाराव्याशा वाटतात… या अस्थिरतेचा कंटाळा आलाय. आता जीवदान मिळालंय ३० वर्षांचं. किती वर्ष मी हे तुकड्या तुकड्यांचं जीवदान मिळवू? आता तुम्ही म्हणाल, अस्तित्व कुणालाच नसतं. सुगंधाला असतं का, त्या वाऱ्याला असतं का? तुम्ही माणसं म्हणजे शब्दांचे खेळ करतात रे नुसते! अरे मीही शिकलो रे तुमच्यात राहून. मला सांगा, हे तुमच्या डोक्यावर जे दिसतंय ते आकाश काय आहे? मला सांगा, तुम्ही जिथे उभे आहात ते काय आहे? हे मैदान तुम्हाला उभं राहण्याचं बळ देतंय. हे आकाश सांगतंय, तुम्हाला अजूनही उंची गाठायचीय. ती संपलेली नाही! माझं अस्तित्व या आकाशासारखं, या मातीच्या मैदानासारखं आहे. निसर्ग त्याचे अस्तित्व वारंवार दाखवत आहे. शब्दांचे, त्या निर्जीव कागदपत्रांचे खेळ करण्यापेक्षा तुम्ही मैदानावर खेळा. नुसते खेळूच नका, तर मैदानं, व्यायामशाळा जपण्यासाठी खेळा! लक्षात ठेवा, कितीही सिमेंटची आवरणं घाला, पण माती नष्ट होत नाही रे… हे सांगा त्या सरकारी अधिकाऱ्यांना, जे या शहराचं आरोग्य केंद्र हिरावू पाहताहेत.
राज्य सरकारने २९ ऑगस्ट २०१४ रोजी मला जीवदान दिलंय खरं, पण तीस वर्षांनंतरही तुम्ही पुन्हा स्वाक्षरी मोहीम राबवणार का? तुमच्या अनेक पिढ्या पाहिल्यात रे मी. माझ्यासाठी झटणारी जुनी माणसं आहेत, तशी नवीन पिढीही आहे. कदाचित ती पुढेही असेल; पण आता नाही रे तुमच्या निष्ठेची परीक्षा घ्यावीशी वाटत. माझ्यासाठी तुम्ही सरकारकडे किती वेळा झुकणार? किती विनंती, आर्जवे करणार? माझं महत्त्व किती वेळा सांगणार? मला माहीत नाही का, २६ मार्च २००७ रोजी तुम्ही मंत्रालयात पत्र दिलं होतं. त्या वेळी नारायण राणे महसूलमंत्री होते. अरे त्या माणसाने मला लगेच ३० वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा शेरा दिला होता. आठवतंय मला. या माणसाचा केवढा माझ्यावर विश्वास! अरे पण जेथे मी राहतो, तेथल्याच जिल्हा प्रशासनाकडून माझ्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येत नव्हता. यापेक्षा वाईट दुसरं नसेल! जाऊ द्या.. नको तो विषय पुन्हा.
अरेरे! तुम्ही तर सरकारच्या जाचक नियमांत अडकलेले. तुम्हाला सांगून तरी काय उपयोग? माझी व्यथा त्या मारुतीरायाला कळो. पण त्यालाही कधी समजेल ते तोच जाणो! तो बघा कसा बसलाय. त्याच्या चेहऱ्यावर आहेत का कसले भाव? किती वेगवेगळ्या रूपात तो माझ्याभोवती राहिला; पण नुसताच पाहतो माझ्याकडे. अरे बाबा, आता तरी ऊठ रे. तुझीही तऱ्हा न्यारीच आहे म्हणा. आधी तू माझ्याजवळ दुतोंड्या होता, आता एकतोंड्या झालास.
मारुतीराया, आठवतंय ना तुला? की हेही मीच सांगू? अरे बाबा, देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या मंदिराजवळ आपण आधी राहायचो ना? म्हणजे १९१७ ते १९३९ दरम्यानचा तो काळ. माझ्याजवळ तुझी दुतोंड्या अवतारातली साडेसात फुटी दगडी मूर्ती होती. किती बलदंड होतास रे तू! पण तुझी मूर्ती भंगली आणि मग तुला मूर्तिकार नथुराम भोईर यांनी नव्याने घडवलं. चांगला ११ फुटी उभारला तुला! अर्थात, त्याआधी मूर्तिकार शंकरराव परदेशींनीही तुझ्यावर मेहनत घेतली होती. अरे, पण तुझ्याआधी माझं ठिकाण बदललं. मी आलो महात्मा गांधी रस्त्यावर आणि तू जाऊन बसला गोदेच्या जवळ. गोदेला पूर आला, की लोकं तुझ्याकडे पाहून मोजतात पुराची तीव्रता. मारुतीराया, पण आता तू जो माझ्याजवळ बसलेला आहेस ना, तो देखणा आहेस. दुतोंड्यासारखा अवाढव्य नाही घडवलं हे एक बरं झालं. नाही तर काय? तू माझ्या बलोपासकासारखा दिसला तर प्रेरणा मिळेल ना? तू म्हणजे बलोपासकांचं श्रद्धास्थान. अगदी त्यांच्यासारखाच. तुझी बलदंड देखणी देहयष्टी कोणासारखी आहे माहितीये का तुला? माझ्याकडे येणाऱ्या एका बलोपासकाच्या देहयष्टीवरून तुला आकार दिला. दुभाषे त्याचं आडनाव. तो मूळचा धुळ्याचा होता. म्हणजे त्या अर्थाने माझा संबंध खान्देशाशीही आहे बरं!
हे मारुतीराया, तुला तरी माझ्या व्यथा कळतात ना? तूच बघ रे काही तरी. नाशिकच्या या माझ्या बलोपासकांसाठी ऊठ. मला यातून मुक्त कर. खूप झालं. ‘यशवंत’ हे नाव माझ्या बलोपासकांमुळे फळास आलं. त्यांना यशवंत, कीर्तिवंत, बलवंत कर… पण तुझ्या या यशवंताला हक्काचा श्वास घेऊ दे रे… गोदेसारखा निरंतर प्रवाही राहू दे रे…
(Maharashtra Times : 7 March 2016)
[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#1e73be” header_line_color=”#1e73be” include_category=”60″]