All SportsHockeySports Review

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही?

भारताने काही राष्ट्रीय मानके निश्चित केलेली आहेत. या मानकांमध्ये राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय गीत वगैरे वगैरेंचा समावेश आहे. आपण शाळेत शिकलो आहे, की भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, तर आपण पटकन उत्तर देतोहॉकी. पण तुम्हाला धक्का बसेल, की हे अजिबात खरे नाही. तुम्हाला चुकीचे शिकवले जात आहे. भारतात हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही. भारत सरकारने अद्याप कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यताच दिलेली नाही. क्रीडा मंत्रालयाचेच तसे स्पष्टीकरण आहे. या संदर्भात अनेकांनी माहितीच्या अधिकारात क्रीडा मंत्रालयाला हा प्रश्न विचारला आहे आणि या सर्वांना एकच उत्तर मिळाले आहे, ते म्हणजे भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून अद्याप कोणत्याही खेळाला मान्यता नाही.

भारताचा राष्ट्रीय खेळ

नेकांना हे माहिती नाही, की भारताचा राष्ट्रीय खेळ निश्चित नाही. भारतीय हॉकीचे माजी कर्णधार संदीपसिंग यांच्यावर सुरमाहा चित्रपट 2018 रोजी प्रदर्शित झाला आहे. यात संदीपसिंग यांची भूमिका दिलजित दोसांज यांनी साकारली आहे. त्या वेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्वीट करताना पंतप्रधानांना विनंती केली, की ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळात भारताने 8 सुवर्णपदके जिंकली, त्या हॉकीला राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता द्यावी.’ हे ट्वीट वाचल्यानंतर दिलजित दोसांज याला पहिल्यांदा कळलं, की हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही. दिलजितला तर धक्काच बसला. अर्थात, असे अनेक दिलजित आहेत, ज्यांना हे ऐकून धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

जर हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ नसेल तर कोणत्या खेळाला राष्ट्रीय दर्जा द्यायला हवा? यावर अनेकदा वादविवाद झडतात. यात कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन असे अनेक खेळ पुढे आले. पण राष्ट्रीय खेळाचा दर्जा कोणत्या खेळाला मिळावा, यावर कोणाचेही एकमत होऊ शकलेले नाही. असे असले तरी अनेक क्रिकेटपटूंनी क्रिकेटला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्यास नापसंती व्यक्त केली आहे. माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी सांगितले, की ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके हॉकीने जिंकली आहेत. मेजर ध्यानचंद यांनी या भारताचा लौकिक वाढवला आहे. त्यामुळे हॉकीचाच राष्ट्रीय खेळ म्हणून हक्क आहे.” केवळ लोकप्रियतेचा विचार केला, तर आजच्या स्थितीत क्रिकेट सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. त्याची कारणे काहीही असली तरी केवळ लोकप्रियतेच्या निकषावर कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यदाकदाचित उद्या क्रिकेटच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलीच तर राष्ट्रीय खेळ म्हणून त्याची मान्यता काढून घ्यायची का? क्रिकेट ही ब्रिटिशांची देणगी आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रीय खेळाची मान्यता मिळणे योग्य ठरणार नाही. मुळात हॉकीला पर्याय शोधण्यास अनेकांचा विरोध आहे. सध्या देशभरातून मागणी हीच आहे, की हॉकीला राष्ट्रीय खेळाचा अधिकृत दर्जा द्यावा. त्याचे कारण म्हणजे भारताने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली सर्वाधिक सुवर्णपदके.

माहितीच्या अधिकारात यांना मिळाली ही माहिती
ऐश्वर्या पाराशर (आरटीआय कार्यकर्त्या) : ऐश्वर्या पाराशर यांनी राष्ट्रीय खेळाविषयीच नाही, तर सर्वच राष्ट्रीय मानकांविषयी प्रधानमंत्री कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्यांना इतर राष्ट्रीय मानकांची माहिती मिळाली, पण राष्ट्रीय खेळाबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. क्रीडा मंत्रालयाने त्यांना सांगितले, की राष्ट्रीय खेळ निश्चित केलेला नाही.
डॉ. आलोक चांटिया, लखनौ, उत्तर प्रदेश (रीडर, जयनारायण पीजी कॉलेज) : जयनारायण महाविद्यालयाचे रीडर डॉ. आलोक चांटिया यांनीही माहितीच्या अधिकारात 26 मे 2016 रोजी याबाबत माहिती विचारली होती. त्यावर त्यांना 66 दिवसांनी म्हणजे 2 ऑगस्ट 2016 रोजी उत्तर मिळाले, की भारताने अद्याप कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही. असे असले तरी सरकारी दस्तावेजांमध्ये राष्ट्रीय खेळ म्हणून हॉकीचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. त्यावर पुन्हा त्यांनी पत्र पाठवले. त्यावर चांटिया यांना 26 एप्रिल 2017 रोजी क्रीडा मंत्रालयानेही उत्तर पाठवले, की हॉकीला अधिकृतपणे राष्ट्रीय खेळाचा दर्जा नाही.

ऐश्वर्या पाराशर, डॉ. आलोक चांटिया यांनीच नाही, तर देशभरातून अनेकांनी राष्ट्रीय खेळ कोणता, याची माहिती सरकारला विचारली आहे. त्यांनाही उत्तर एकच मिळालं, ते म्हणजे राष्ट्रीय खेळ निश्चित नाही. स्वातंत्र्य उलटून 70 पेक्षा अधिक वर्षे उलटली, तरीही आपण अधिकृत राष्ट्रीय खेळ जाहीर करू शकलेलो नाही. केवढा हा गलथानपणा! जनरेटाही सांगतोय, की राष्ट्रीय खेळ आता निश्चित व्हायला हवा. मात्र, अनेक सरकारे बदलली, अद्याप खेळ निश्चित होत नाही, यापेक्षा दुर्दैव दुसरे नाही.

भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीच का हवा?


अनेक जण ज्या वेळी पर्यायी खेळांचा विचार करतात तेव्हा आश्चर्य वाटते. असा विचार करणे उथळपणाचे ठरेल. कारण भारतीय हॉकीला सामाजिक, राजकीय संदर्भ आहेत. भारत अशा काळापासून हॉकी खेळत होता, ज्या वेळी देश स्वतंत्रही नव्हता. स्वतःचा ध्वज नव्हता. थोडक्यात म्हणजे अधिकृत अस्तित्वच मानलेले नव्हते. ब्रिटिशांनी सत्ता गाजविल्यानंतरही हॉकीने आपलं अस्तित्व टिकवलं. ब्रिटिशांनी भारतात क्रिकेटसह काही खेळ रुजवले असले तरी हॉकी यात कधीही झाकोळला गेला नाही. किंबहुना या हॉकीने भारतीयांमध्ये देशप्रेम अधिक दृढ केले. भारतीय हॉकीची सुरुवात वेळी आजच्यासारखी खेळाडूंकडे सुबत्ता नव्हती. शूज, हॉकी स्टीक, स्पोर्ट ड्रेस वगैरे कोलकात्यापासून सुरू होते. कोलकात्यापासून हा खेळ संघटनात्मकपणे पुढे आला. त्या वेळी आजच्यासारखी खेळाडूंकडे सुबत्ता नव्हती. शूज, हॉकी स्टीक, स्पोर्ट ड्रेस वगैरे काहीही मिळत नव्हते. तो 1928 चा काळ होता. हेच ते वर्ष होते, जिथून हॉकीयुगाची सुरुवात झाली.

26 मे 1928 रोजी भारतीय हॉकी संघ पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला. त्या वेळी भारत खेळांमध्ये इतका मागासलेला होता, की केवळ सहभाग घेणारा देश म्हणूनच भारताकडे पाहिले जात होते. पण 26 मे 1928 रोजी भारताने कमालच केली आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर भारतीय हॉकीने मागे वळून पाहिलेच नाही. हॉकीमध्ये भारताने दबदबा निर्माण केला, ज्यात अमेरिका, जर्मनी, इंग्लंडसारखे देश भारतासमोर टिकाव धरू शकले नाहीत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 1932 ची ऑलिम्पिक स्पर्धा. या स्पर्धेत भारताने यजमान अमेरिकेचा 24-1 असा धुव्वा उडवला. हा हॉकीच्या इतिहासातला भारताचा सर्वांत मोठा विजय, तर अमेरिकेचा सर्वांत मोठा पराभव आहे. तब्बल दोन डझन गोलमध्ये 9 गोल तर रूपसिंह आणि मेजर ध्यानचंद यांचे होते.1936 ची बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धाही याच दोन भावांनी गाजवली आणि भारताने आणखी एक सुवर्णपदक जिंकले. या वेळी भारताने जर्मनीची शिकार केली. दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धाच काय, अन्य स्पर्धाही खंडित झाल्या. बर्लिन ऑलिम्पिकनंतर तब्बल आठ वर्षे एकही स्पर्धा झाली नाही. आठ वर्षांनंतर पुन्हा ऑलिम्पिकने पुनरागमन केले. या मोठ्या कालावधीनंतरही भारतीय हॉकीचं कौशल्य तसुभरही कमी झालेलं नव्हतं. मात्र, इतर देशांनीही या खेळात कमालीची सुधारणा केली होती. त्याचा प्रत्यय 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये आला. 1936 पूर्वी ज्या पद्धतीने भारतीय हॉकी संघ एकहाती विजय मिळवत होता, तसे या वेळी घडले नाही. भारताला पहिल्यांदा सुवर्णपदकासाठी झुंजावे लागले.

सुरुवातीच्या सामन्यांत भारताने नेहमीप्रमाणेच धडाकेबाज खेळ करीत स्वतःवर एकही गोल होऊ दिले नाही, पण भारताने 38 गोल करीत आपले इरादे स्पष्ट केले. उपउपांत्य फेरीत मात्र भारताचा जर्मनीविरुद्ध कस लागला. भारतीय संघाचे नेतृत्व बलबीरसिंगकडे होते. हा सामना जिंकला खरा, पण आव्हान तर पुढे होते. समोर होता पाकिस्तान. स्वातंत्र्यापूर्वी अखंड भारत खेळत होता. त्या वेळी पाकिस्तान अस्तित्त्वातच नव्हता. फाळणीनंतर पाकिस्तानचा जन्म झाल्याने भारतीय हॉकी संघ विभागला गेला. काही खेळाडू पाकिस्तानात गेले. त्यामुळे या फायनलविषयी कमालीची उत्सुकता होती. मात्र, भारतीय खेळाडूंनी अपराजित राहण्याची परंपरा कायम राखत पाकिस्तानवर विजय मिळवला. मात्र 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने भारताचा विजयी वारू रोखला. भारताला अंतिम फेरीत 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला आणि पाकिस्तानने पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकले. भारताने 1964 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हा हिशेब चुकता केला. पाकिस्तानला पराभूत करीत पुन्हा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर नाव कोरले.

भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाला ओहोटी

आता भारताला कडव्या लढतींना सामोरे जावे लागत होते. भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाला ओहोटी लागली. 1968 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये त्याचा प्रत्यय आला. भारत प्रथमच अंतिम फेरीत नव्हता. अर्थात, कांस्यपदकाने किमान लाज राखली. भारत आणि पाकिस्तानसारख्या दोन्ही देशांची सद्दी संपत आली. 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकनंतर तर दोन्ही देश सुवर्णपदकाच्या शर्यतीतूनच बाद झाले. भारताला रौप्य, तर पाकिस्तानला तिसरे स्थान मिळाले. यामुळे भारतीय हॉकीची लोकप्रियताही घटली. हॉकीचे पतन सुरू असताना त्यावर जे उपाय करायला हवे होते, ते झालेच नाहीत. मोठ्या कालावधीनंतर भारताने केवळ 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले. त्यानंतर 1998 मधील एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकले. सुवर्णयुगानंतर भारताचे हेच एकमेव उत्तम प्रदर्शन ठरले. त्यानंतर सांघिक कामगिरी फारशी उंचावली नाही, जी मेजर ध्यानचंद, रूपसिंह, बलबीरसिंग यांनी भारताला मिळवून दिली होती. मात्र, काही उत्तम खेळाडू भारतीय हॉकीने दिले. त्यात अजितपाल सिंह, व्ही. भास्करन, गोविंदा, अशोक कुमार, मुहम्मस शाहीद, जफ़र इकबाल, परगटसिंग, मुकेश कुमार, धनराज पिल्ले या खेळाडूंची शैली भारतीयांना भावली. त्यांच्या खेळाने हॉकी खेळ पुन्हा चर्चेत आला. भारताने हॉकीचे सुवर्णयुग पुन्हा आणण्याच्या दृष्टीने काही प्रयत्नही केले.

नवी दिल्लीत एअर इंडिया अ‍ॅकॅडमी, झारखंडमधील रांची येथे खेल अकादमी, ओडिशातील रूरकेला येथील स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अकादमी स्थापन करीत हॉकीला चालना दिली आहे. यामुळे भविष्यात हॉकी पुन्हा भरारी घेईल, असा आशावाद ठेवायला हरकत नाही. हॉकीची ही वाटचाल पाहिल्यानंतर वाटते, की राष्ट्रीय खेळाचा दर्जा हॉकीलाच मिळायला हवा. कामगिरी उंचावण्यात भारतीय हॉकी मागे पडली असेलही, पण भारताच्या क्रीडा इतिहासात हॉकी खेळाचा लौकिक विसरणे शक्य नाही. म्हणूनच हा खेळ अधिकृतपणे राष्ट्रीय खेळ नसला तरी त्याने प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीय खेळ म्हणूनच स्थान मिळवले आहे. आशा आहे, की या खेळाला लवकरच राष्ट्रीय खेळ म्हणून अधिकृत मान्यता मिळेल.

असा आहे हॉकीचा प्रवास…

Facebook page kheliyad

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ include_category=”hockey,60″]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!