जपान सुमो कुस्ती (Sumo Wrestling) नेमकी काय आहे, हे तुम्ही पहिल्या भागात पाहिलेच आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे माझ्या ब्लॉग वाचकांचे मनस्वी आभार. अनेकांनी दुसरा भाग लवकर प्रकाशित करण्याची मागणी नव्हे, आग्रहच धरला. अर्थात, तो आम्ही यथावकाश प्रसिद्ध करणारच होतो. मात्र, वाचकांच्या हट्टामुळे तो दोन दिवस आधीच प्रकाशित करीत आहोत. सुमो कुस्ती प्रथा, परंपरेत अडकली असली तरी भ्रष्टाचाराने ती काहीशी काळवंडली आहे. त्यावर टाकलेला प्रकाशझोत…

सुमो कुस्तीत ‘मॅच फिक्सिंग’ची कीड
पहिलवानाला घसघशीत पगार मिळतो. मुळातच हा खेळ वर्गीकरण संरचनेतला आहे असं म्हंटलं तर ते चूक ठरणार नाही. म्हणजे अव्वल मानांकित पहिलवानाला घसघशीत वेतनाचा लाभ मिळतो. त्यामुळे मानांकन श्रेणीतील तळातल्या पहिलवानांना अव्वल मानांकन यादीत स्थान मिळविण्याच्या अभिलाषेतूनच सुमो कुस्तीत (Sumo Wrestling) ‘मॅच फिक्सिंग’ची कीड लागली. मॅच फिक्सिंगलाच जपानी भाषेत ‘याओचो’ असं म्हणतात. जपान सुमो संघटनेने या प्रकरणाचं वारंवार खंडन केलं होतं. मात्र, कोर्टानेच या आरोपांना पुष्टी दिल्याने अखेर संघटनेलाही ते मान्य करावं लागलं. मोबाइलवरील मेसेजवरून पोलिसांनी तपास केला असता अनेक सामने फिक्स असल्याचे निष्पन्न झाले. २०११ मध्ये हे प्रकरण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. यात १४ पहिलवान आणि काही स्टेबल मास्टर (प्रशिक्षक) यांचा या प्रकरणात समावेश होता. तपासात हेही उघड झालं, की यात काही पहिलवानांनी पैसेही घेतले होते. परिणामी, जपान सुमो संघटनेच्या संचालकांनी विशेष बैठक घेऊन ओसाकामधील मार्च २०११ ची १५ दिवसांची स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. सुमोच्या इतिहासात १९४६ नंतर म्हणजे तब्बल ६५ वर्षांनी प्रथमच स्पर्धा रद्द करण्याची नामुष्की संघटनेवर ओढवली. तब्बल १४ पहिलवानांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना सुमोतून सक्तीची निवृत्ती देण्यात आली. सुमोमध्ये मानाचा निवृत्ती सोहळा करायचा असला तरी त्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागते. मात्र, सक्तीच्या निवृत्तीची लाजिरवाणी पात्रता या मल्लांनी स्वतःहून सिद्ध केली. जपान सुमो संघटनेच्या चौकशी पॅनलने सांगितले, की मे २०११ मधील मॅच फिक्सिंग इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरली आहे, की त्याचा शोध घेणे अवघड आहे. याच प्रकरणात एसए कोकुराय या पहिलवानावरही मॅच फिक्सिंगचे आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, कोर्टाने त्याच्यावरील आरोप निराधार असल्याचे ठरवले. हा अगदी अलीकडचा म्हणजे २०१३ चा निर्णय होता. पुढे २०१३ मध्ये त्याला अव्वल विभागाची स्पर्धा खेळण्याचीही मुभा देण्यात आली.
मल्लांचा जुगार आणि गुन्हेगारी टोळीशीही संबंध
जुगार, गुन्हेगारी टोळीशी संबंध काही मल्लांचा जुगार आणि गुन्हेगारी टोळीशीही संबंध असल्याचे समोर आल्याने अवघे सुमोविश्व हादरले. माकुची विभागाचा पहिलवान झेकी कोटोमित्सुकी आणि स्टेबल मास्टर ओटाके यांना बेसबॉल स्पर्धेवर सट्टा लावताना एका जुगार अड्ड्यावर पकडण्यात आले. झेकी सुमो कुस्तीतील चॅम्पियनशिप जिंकलेला पहिलवान आहे, तसेच इतर आठ स्पर्धांमध्ये तो उपविजेता राहिला आहे. त्याने कारकिर्दीत १३ ‘सँशो’ जिंकली आहेत. ‘सँशो’ म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल दिली जाणारी तीन बक्षिसे. सुमोच्या इतिहासात केवळ पाच पहिलवानांनी एकाच स्पर्धेत तीन ‘सँशो’ जिंकल्या आहेत. त्यापैकी झेकी एक आहे. सुमोमध्ये सर्वोच्च विभागांमध्ये दुस-या क्रमांकाचे जे स्थान आहे, त्याला ‘ओझेकी’ म्हणतात. हे विभाग म्हणजे दर्जा. झेकीने सर्वोत्तम कामगिरीद्वारे २००७ मध्ये या विभागात स्थान मिळवले होते. स्टेबल मास्टर ओटाके हा ७० च्या दशकातील प्रसिद्ध पहिलवान होता. नंतर तो स्टेबल मास्टर म्हणजेच प्रशिक्षक झाला. तर असे हे सुमोतील नावाजलेले झेकी आणि ओकाटे दोघेही जुगार खेळताना सापडावे हे अत्यंत धक्कादायक होतं. विशेष म्हणजे ही घटना ४ जुले २०१० मधील. याच महिन्यात जपान सुमो संघटनेने दोन स्टेबल मास्टरांना पदावनत केले आणि १८ पहिलवानांवर जुलै २०१० मधील स्पर्धेवर बंदी घातली.
हेही वाचा… सुमो कुस्तीचा इतिहास
या घोषणेच्या दोन महिन्यांपूर्वीच जपानच्या गुन्हेगारी जगतातील सर्वांत मोठे रॅकेट असलेली यामागुची-गुमी नावाची कुविख्यात टोळी महागड्या ५० खुर्च्यांवर बसलेली पाहायला मिळाली होती. त्या वेळी या स्पर्धेचे देशभरात टीव्हीवरून प्रसारण सुरू होते. एखाद्या कुविख्यात टोळीने सुमो
कुस्ती पाहायला वेळ काढावा, याला सुमोची क्रेझ म्हणावी की पहिलवानांचे या टोळीशी काही तरी संबंध आहेत, असे तर्कवितर्क सुमोप्रेमींमध्ये निर्माण झाले. एखादी टोळी एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धेसाठी येणे हे सुमोच्या पारदर्शकतेला तडा देणारं होतं. या टोळीचा बॉस मात्र जेलमध्ये होता. सुमोची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा असेल तर सर्व स्पोर्टस चॅनलवर याचि देही याचि डोळा पाहण्याची नामी संधी असते. त्याचमुळे काही तज्ज्ञांनी असंही मत व्यक्त केलं होतं, की ही टोळी जेलमधील आपल्या बॉसला खूश करण्याच्या उद्देशानेच आले होते. कारण बॉस जेलमध्ये ही स्पर्धा पाहत असेल तर त्याला आपले सहकारीही या स्पर्धेच्या निमित्ताने पाहता येणार होते! मात्र यामुळे पहिलवान आणि गुन्हेगारांतील घनिष्ठ संबंध असल्याचे सातत्याने आरोप होत राहिले. त्यामुळे लोकांचा इंटरेस्टही कमी होत होता, शिवाय प्रायोजकांतही कमालीची घट झाली.
प्रशिक्षण की छळछावणी?
केवळ मॅच फिक्सिंग किंवा गुन्हेगारांशी संबंध यामुळेच सुमो खेळावरील विश्वास डळमळीत होत होता असं अजिबात नाही, तर त्याला आणखीही काही कारणे होती. त्यापैकी एक कारण म्हणजे प्रचंड यातनामयी प्रशिक्षण! अनेक वर्षांपासून सुमो स्टेबल (प्रशिक्षक) नवोदित खेळाडूंचा योजनाबद्ध रीतीने शारीरिक छळ करीत असल्याचे समोर आले आहे. याच छळामुळे २००७ मध्ये एका १७ वर्षीय नवोदित मल्लाचा बळी गेल्याने अवघ्या सुमोविश्वात खळबळ उडाली होती. हे प्रकरण इतके गाजले होते, की दस्तुरखुद्द जपानच्या पंतप्रधानांना दखल घ्यावी लागली होती. स्टेबल मास्टर माध्यमांशी बोलताना कठीण प्रशिक्षण सत्राबद्दल मोठ्या अभिमानाने सांगायचे, की आम्ही चूक करणाच्या मुलांना ‘शिनाई’चा (जपानी लाकडी शस्त्र. याचा वापर मार्शल आर्टमध्येही केला जातो.) ‘प्रसाद’ देतो, तसेच अवजड वजन घेऊन आम्ही त्यांना एका रांगेत तासन् तास उभं करतो. थोडक्यात, कुस्ती म्हणजे नुसतं खायचं काम नाही, असंच त्या प्रशिक्षकाला सुचवायचं होतं. २००७ मध्ये मात्र या यातनामयी प्रशिक्षणाचा काळा चेहरा समोर आला. टोकिसुकाझे केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या टाकाशी सैटो या १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात मोठ्या बिअरच्या बाटलीने प्रशिक्षक जुनिची यामामोटो याने प्रहार केला, तसेच एका पहिलवानाकडून त्याला शारीरिक यातना दिल्या. यात सैटोचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी फेब्रुवारी २००८ मध्ये स्टेबल मास्टर आणि तीन इतर पहिलवानांना अटक करण्यात आली. जपानचे तत्कालीन पंतप्रधान यासुओ फुकुडो यांनी याची गांभीर्याने दखल घेत, जपान सुमो संघटनेला लक्ष घालण्याची सूचना केली व पुन्हा अशी घटना घडायला नको, असेही सुनावले. मे २००९ मध्ये यामामोटोला सहा वर्षांची शिक्षा झाली.
महिला आणि सुमो
सुमो संघटनेने आता बदलायला हवे
ओहता यांनी उदरामतवादी ‘आशी’ वृत्तपत्रातील एका लेखात आपले मत स्पष्टपणे मांडले. त्यांनी नमूद केले, की कट्टर रुढीवादी सुमो संघटनेने आता बदलायला हवे. सुमो कुस्ती सर्वांना खुली केली पाहिजे. संघटनेने लिंगभेद टाळायला हवा. आपण सर्वच एक आहोत. त्यात महिला की पुरुष हे अजिबात महत्त्वाचे नाही. कट्टर रुढीवादी प्रथांचे पालन करणाऱ्या सुमो संघटनेच्या पचनी उदारमतवादी विचारांचा कोणताही परिणाम झाला नाही. ज्या सुमो पहिलवानांनी यश मिळवलं त्यामागे त्यांच्या पत्नी होत्याच. मात्र संघटनेचं म्हणणं आहे, की सुमो हे पुरुषांचंच विश्व आहे. शतकानुशतके ही परंपरा आम्ही जपत आलो आहोत. यात बदल केल्यास तो पूर्वजांचा अनादर ठरेल! ही आताची घटना नाही. १८ व्या शतकाच्या सुरुवातीला जपानमध्ये काही ठिकाणी महिला सुमो कुस्तीगीरही होत्या. शहरांमध्ये त्यांचा ब-याचदा वेश्यालयांशी संबंध होता. असं असलं तरी जपानमध्ये सुमो महिलांची शिंतो धर्मसंस्कारातील भूमिका तितकीच मोलाची राहिली आहे. काही वर्षांनी सुमो महिलांच्या स्पर्धा मर्यादित राहिल्या. परिणामी, महिला सुमो कुस्तीगिरांचे प्रदर्शन बहुतांश जपानी लोकांना फारसं रुचलेलं नाही. नंतरच्या काळात तर त्यांच्यासाठी सुमोचे दरवाजे कायमचे बंद झाले.
विद्यापीठात मात्र महिलांचा शिरकाव
जपान सुमो असोसिएशनने (जेएसए) महिलांना नाकारले असले तरी जपानमधील विद्यापीठांमध्ये हा खेळ महिलांसाठी खुला आहे. मात्र, जपान सुमो असोसिएशनमध्ये महिलांना निषिद्धच मानले जात आहे. मंगोलियातही महिला पहिलवान आहेत. मात्र, जपानमध्ये प्रथा-परंपरेच्या जोखडामुळे महिलांना सुमोमध्ये कोणतेही स्थान नाही. त्यावर अनेकदा चर्चा झडतात. अनेक वृत्तपत्रांतून त्यावर प्रकाशझोत टाकला जातो. मात्र ‘जेएसए’ परंपरेच्या आड कोणतीही तडजोड करायला तयार नाही.
सुमो कुस्ती विषयी विस्तृत माहिती दिली आहे.खुप छान.
thank you so much