All SportsSports Review

लंगडीलाही आंतरराष्ट्रीय स्वप्ने!

कधी काळी बालपण समृद्ध करणारे खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ पाहत आहेत. लगोरी (लिंगोर्चा), आट्यापाट्यानंतर पारंपरिक खेळांतून आता लंगडीही किती दिवस ‘लंगडी’ राहणार! आता या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी दस्तुरखुद्द खासदार रक्षा खडसे यांनी पुढाकार घेतला आहे. लंगडी फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी शनिवारी त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या नियुक्तीमागची काय आहेत कारणे?

पूर्वी मोजकेच खेळ होते; पण खऱ्या अर्थाने बालपण समृद्ध करून गेले. आज खेळांनी एवढी गर्दी केलीय, की रोज कोणता नवा खेळ येईल याचा नेम राहिला नाही. अर्थात, या खेळांमध्ये विदेशी खेळांचाच भरणा अधिक होता. आता हे चित्र बदलतंय. भारतातल्या पारंपरिक खेळांचीही यात भर पडत आहे. आट्यापाट्या, लगोरीनंतर लंगडीनेही स्पर्धात्मक खेळांमध्ये शिरकाव केला आहे. अजून गोट्या, लपाछपी, शिवापाणी, काचकवड्या, सूरपारंब्या, गज रवारवी (मातीत गज खुपसणे) असे बरेच खेळ रांगेत आहेत. तेही येतीलच यथावकाश. मात्र, सध्या लंगडीबाबत काहीसं औत्सुक्य आहे. लंगडी महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार रक्षा खडसे यांची निवड होणे आणि निवडीनंतर या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा करणे या दोन्ही बाबी किमान खान्देशासाठी तरी कुतूहलाच्या आहेत.

एप्रिलमध्ये महाराष्ट्र सरकारने लंगडीसह अनेक पारंपरिक खेळांना अधिकृत खेळाचा दर्जा दिला आहे. लंगडीचा गेल्या सहा वर्षांतला प्रवास पाहता या खेळाने कमालीची ‘प्रगती’ केली आहे.  महाराष्ट्र लंगडी संघटना आणि भारतीय लंगडी महासंघाची स्थापना २००९ मध्ये झाली. आज हा खेळ २५ राज्यांमध्ये खेळला जात आहे. या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदिगड या राज्यांमध्ये झाल्या आहेत. या खेळाची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१२-१३ मध्ये नेपाळमध्ये झाली. नेपाळ हा देश कोणत्याही खेळाला ‘आंतरराष्ट्रीय’ स्वरूप देण्यासाठी सोपा देश आहे, त्यानंतर भूतानचा नंबर लागतो हे कराटेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांनी सिद्ध केलंच आहे. लंगडीनेही तोच मार्ग अनुसरला. त्यात गैर काही नाही; पण म्हणून त्याला आंतरराष्ट्रीय वलय मिळत नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी देशांची संख्या असणेही आवश्यक आहे. मात्र, लंगडी खेळात नेपाळ, पाकिस्तान, भूतान, म्यानमार आणि थायलंड वगळता एकही देश सहभागी झालेला नाही. राष्ट्रीय संघ जास्त नसल्यानेच या खेळांच्या आतापर्यंत नेपाळ आणि भूतानमध्येच तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत. त्यानंतर या खेळाची याच वर्षी जुलैमध्ये पहिली एशियन चॅम्पियनशिप थायलंडमध्ये झाली. यात भारताच्या मुला-मुलींच्या दोन्ही गटांनी विजेतेपद मिळविले. खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्वाखाली लंगडी महासंघाला इतर देशांमध्ये शिरकाव करण्याची अपेक्षा आहे. ते आव्हानात्मक आहे. कारण अजून तरी या खेळाची रचना पारंपरिक आहे. युरोपसह इतर देशांमध्ये हा खेळ गेला तर कदाचित मॅटवर खेळविण्याचा आग्रह होईल. त्यामुळे मातीत खेळण्याचं या खेळाचं जे सौंदर्य आहे ते कबड्डी, खो-खोसारखंच गमवावं लागेल… अर्थात, लंगडी संघटनेला अजून तरी तसे वाटत नाही. मात्र, मॅटवर जाणार असेल तर त्यालाही आमची तयार असेल असं महाराष्ट्र संघटनेने स्पष्ट केलं आहे.
लंगडी आंतरराष्ट्रीय

विदेशी खेळांपेक्षा बरे

चाळिशीतल्या पिढीचं बालपण पारंपरिक खेळांनीच समृद्ध केलं. मातीत खेळलास तर बघ, असा पालकांचा काळजीयुक्त इशाराही कानी पडायचा. आता याउलट परिस्थिती आहे. मुलांना मातीत खेळण्यासाठी आग्रह धरावा लागतो. टीव्ही, मोबाइलच्या विश्वातून मुले बाहेर पडेनाशी झाली आहेत. दहावी-बारावीत २५ क्रीडागुणांपुरता खेळाचा आधार घेतला जातो. विदेशी खेळांनी तर ते खूपच सोपे केले आहे. त्यामुळे अशा विदेशी खेळांपेक्षा भारतीय पारंपरिक खेळ बरे.

क्रीडागुण सवलतीची मागणी

गेल्या वर्षी २०१३-१४ मध्ये मुंबई विद्यापीठात या खेळाचा समावेश झाला आहे. मराठवाडा आणि सोलापूर विद्यापीठांमध्येही या खेळाच्या समावेशासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात शालेय स्पर्धेतही या खेळाने प्रायोगिक तत्त्वावर समावेश केला आहे. मात्र, क्रीडागुणांची सवलत नाही. ती मिळावी, तसेच या खेळाला नोकरीतही आरक्षण मिळावे यासाठी खासदार खडसे यांचे नेतृत्व कारणी लागण्याची अपेक्षा संघटनेला आहे. लंगडीने महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एमओएमध्ये पारंपरिक खेळाला समाविष्ट करण्याची तरतूद आहे. मग भलेही इंडियन ऑलिम्पिक संघटनेची मान्यत नसेल…! यंदा गुजरात राज्यातील शालेय स्पर्धांमध्ये हा खेळ समाविष्ट झाला आहे.  

नाशिकमध्ये दुसरी शालेय स्पर्धा

पहिली राज्यस्तरीय शालेय स्पर्धा गेल्या वर्षी कल्याणमध्ये झाली, तर यंदा १९ वर्षांखालील वयोगटातील दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये होणार आहे. त्याची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र, मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र, गुजरातमधील शालेय स्पर्धा, आशियाई स्पर्धेचे आयोजन हा लंगडी खेळाचा एकूणच प्रवास थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे आता लंगडी खेळाचाही वर्ल्डकप घेण्याचे नियोजन सुरू आहे. २०१८ किंवा २०२० मध्ये घेऊ, असा विश्वास लंगडी संघटनेला आहे. तत्पूर्वी या खेळाला अन्य देशांमध्ये प्रचार आणि प्रसाराचे दिव्य पार पाडावे लागणार आहे.

लंगडी हा खेळ सर्व खेळांचा पाया आहे. कारण पायाचे स्नायू बळकट असेल तर कोणतेही खेळ सहजपणे खेळता येतात. शालेय खेळात हा खेळ समाविष्ट असला तरी क्रीडागुणांची सवलत, नोकरीत आरक्षण नाही. ते मिळावे, तसेच एमओएची मान्यता मिळण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

चेतन पागवाड, सचिव, महाराष्ट्र लंगडी संघटना

(Maharashtra Times : 7 Sep. 2015)

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”60″]

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!