All SportsAutobiographyआठवणींचा धांडोळा

माझ्या मातीचं गायन…!

एकलहरे येथील मोठ्या मैदानावर २३ ते २५ ऑक्टोबर 2015 दरम्यान थाटामाटात क्रीडामहोत्सव झाला. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हा महोत्सव कुणा व्यक्तीसाठी मुळीच नव्हता. होता फक्त त्या मैदानासाठी, ज्या मैदानाने जगणं शिकवलं, लढणं शिकवलं आणि लढता लढता मैत्री करणं शिकवलं…!

क्रीडा स्पर्धा असो वा महोत्सव, असे सोहळे बऱ्याचदा भाऊ, दादा, अण्णांसाठीच घेतले जातात. मोठमोठ्या शहरांमध्ये तर तथाकथित भाऊ, दादांशिवाय स्पर्धा होऊच शकत नाही अशी ‘अडचण’ आणि ‘परिस्थिती’ही आहे! एकलहऱ्यातला क्रीडामहोत्सव मात्र याला अपवाद ठरला. हा महोत्सव मैदानासाठी घेतला. उद्या कदाचित आपण या मैदानावर असू वा नसू, पण एकलहरे येथे ‘एक स्पर्धा मैदान के नाम’ व्हायलाच हवी, म्हणूनच एनटीपीएस स्पोर्टस क्लबने सर्वज्ञ फाऊंडेशनच्या सहकार्याने पाच खेळांचा क्रीडामहोत्सव घेतला आणि बालपण समृद्ध करणाऱ्या मैदानाला महोत्सवातून अनोखा सलाम दिला. मैदाने खेळाची फुफ्फुसे म्हटली जातात. मैदानासाठी स्पर्धा घेणाऱ्या एनटीपीएस क्लबचे म्हणूनच कौतुक वाटते.

डोंगरांच्या कुशीत वसलेल्या एकलहऱ्यात ‘नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन’ने नवी ‘ऊर्जा’ दिली. मग ती मातीचं अस्तित्व टिकविण्याची असो वा संस्कृती जपण्याची असो; पण एकलहऱ्याने मातीशी नातं तुटू दिलं नाही. मैदान, मातीशी दृढ नातं या एकलहरे येथील एनटीपीएसच्या मैदानातून पदोपदी जाणवलं. खरं तर एकलहरे येथील या मैदानाचं नाव शक्तिमान मैदान. औष्णिक वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावरच वीज हातात धारण केलेला शक्तिमानाचा पुतळा आहे. त्यावरूनच या मैदानाचं नाव शक्तिमान मैदान असं झालं. मात्र, या नावाने या मैदानाची ओळख खचितच कुणाला माहीत असेल. या मैदानाला मोठं मैदान म्हणूनच ओळखलं जातं.

या मैदानाची जडणघडण व्हॉलीबॉलपासून सुरू झाली. १९८९ चा तो काळ होता. ‘माझ्या मातीचं गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी, जरा कानोसा देऊन, कधी ऐकशील का?’ असा कवितेतून प्रश्न करणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या हस्ते या मैदानाचं उद््घाटन झालं. बाळू मुरकुटे, नरेश कदम, एस. एस. खैरनार, चंद्रकांत बोरकर अशी खेळाशी नातं जपणारी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी व्हॉलीबॉलपासून मैदानाची खऱ्या अर्थाने मशागत सुरू केली. त्या वेळी कोणताही क्लब नव्हता की संघटना नव्हती. कालांतराने एकलहरे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शंकर वाघ, भागवत दकाते, योगेश नागरे यांनी १९९४ मध्ये हँडबॉलचा खेळ सुरू केला. १९९७-९८ मध्ये सचिन सावळे, सचिन कांबळे, सुनील पदमोर, परशुराम सांगळे यांनीही मग याच मैदानावर बास्केटबॉल सुरू केला. हळूहळू विविध खेळांनी मैदान बहरत गेले आणि मैत्रीचे नातेही दृढ होत गेले. या मैत्रीच्या नात्याचा १९९९ मध्ये एक क्लब झाला. हा क्लब म्हणजेच एनटीपीएस स्पोर्टस क्लब!

क्लबच्या स्थापनेनंतर व्हॉलीबॉल, हँडबॉल, कबड्डी, इनडोअर क्रिकेट, बास्केटबॉल, नेटबॉल, स्विमिंग हे खेळ या मैदानावर रुजले. अगदी नवखा चॉकबॉलही या मैदानावर आला. त्या वेळी मुख्य अभियंता चिटोरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. सचिवपदी बजरंग परदेशी, संघटक मधुकर वाघ, कोशाध्यक्षपदी लाला जाधव त्याचबरोबर खेळनिहाय व्यवस्थापकांचीही नियुक्ती करण्यात आली. व्हॉलीबॉलच्या व्यवस्थापकपदी विनोद राऊत, चॉकबॉल व हँडबॉलसाठी भागवत दकाते, क्रिकेटचे सचिन सातारकर, बास्केटबॉल, नेटबॉलसाठी सचिन सावळे, तर कबड्डीसाठी बजरंग परदेशी यांची निवड झाली. एकूणच मोठं मैदान या नावाला साजेसं क्रीडा व्यवस्थापन आलं.

दिग्गज संघांचे नाते या मैदानाशी

एनटीपीएसच्या मोठ्या मैदानावर अनेक मोठ्या स्पर्धांच्या आठवणी आहेत. याच मैदानावर व्हॉलीबॉलच्या दोन राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या आहेत. नाशिकच्या इतिहासात प्रथमच वेस्टर्न रेल्वे, आरसीएफसारखे दिग्गज संघ या मैदानावर खेळले आहेत. एनटीपीएस काँट्रॅक्टर असोसिएशनचे निवृत्ती चाफळकर यांच्या नेतृत्वाखाली २०१० मध्ये १४ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघाची निवड चाचणी आणि महाराष्ट्र संघाचे सराव शिबिरही याच मैदानावर झाले. या मैदानाशी बिटको कॉलेजचेही अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. या कॉलेजच्या यजमानपदाखाली झालेल्या महाविद्यालयीन व्हॉलीबॉल, हँडबॉल स्पर्धाही या मैदानाने अनुभवल्या आहेत. २००७ ते २००९ अशी सलग तीन वर्षे या मैदानावर पुरुष व महिला व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा झाली आहे. एकलहरे येथील शक्तिमान मैदान अशा अनेक घटनांचं साक्षीदार आहे.

सध्या मैदानावर आजही व्हॉलीबॉलचा न चुकता सराव सुरू आहे. मैदानावर २५ ते ३० व्हॉलीबॉलपटू रोज हजेरी लावतात. कबड्डीच्या सरावासाठी ३० ते ३५ खेळाडू असतात. बास्केटबॉलचा सराव काहीसा मंदावला आहे. कारण एनटीपीएसच्या वसाहतीतील कुटुंबे इतरत्र स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे खेळाडूही घटत आहेत. प्रशिक्षक सचिन साळवे सध्या नाशिक रोडला आयएसपीच्या कोर्टवर सराव घेत आहेत. त्यामुळे खेळाडूही तिकडेच वळले आहेत.

एकलहऱ्याचं नावलौकिक मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये सिद्धार्थ परदेशी, आदिनाथ गवळी, स्नेहल परदेशी यांचं अग्रक्रमाने नाव घ्यावं लागेल. सिद्धार्थ डायव्हिंग प्रकारातील खेळाडू. यंदा बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत त्याने दोन गोल्ड व एक ब्राँझ मेडल मिळवलं. गेल्या वर्षी तो स्कॉटलंडमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतही सहभागी झाला होता. पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करताना त्याने अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर तीन गोल्ड मेडल मिळवून दिले होते.

कबड्डीपटू आदिनाथ गवळीच्या खेळाने महाराष्ट्र संघाला तब्बल २८ वर्षांनंतर अमरावतीतील राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाले होते. एअर इंडियात नोकरी करणाऱ्या आदिनाथची निवड प्रो कबड्डीत बेंगलुरू बुल्स संघात झाली. गरिबीवर मात करून उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या आदिनाथने एकलहऱ्याचेच नव्हे, तर नाशिक जिल्ह्याचा लौकिक वाढवला.

महिलांच्या कुस्तीला बळ देणाऱ्या स्नेहल परदेशीचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. तब्बल दहा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचा अनुभव असलेल्या स्नेहलने महिला कुस्ती समृद्ध केली. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळविणारी ती जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू आहे.

मोठ्या मैदानावर ज्यांनी खेळाडूंची जडणघडण केली ते कबड्डीचे बजरंग परदेशी, व्हॉलीबॉलचे मनोज म्हस्के, हँडबॉलचे बंडू जमधडे, बास्केटबॉलचे सचिन साळवे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. याच मैदानावर इनडोअर क्रिकेटही सुरू झालं होतं. २००० मध्ये या खेळाची क्रेझ होती. टी-२० मुळे ती ओसरली. त्यामुळे हा खेळ जवळजवळ बंदच आहे.

महोत्सवातून मैदानाला सलाम!

ज्या मैदानाने घडवले, शिकवले, त्या मैदानाचे ऋण क्रीडामहोत्सवातून फेडावे, अशी कल्पना एनटीपीएस स्पोर्टसच्या मनात घोळत होती. सर्वज्ञ फाऊंडेशनचे अध्यक्ष शंकरशेठ धनवटे, तसेच विशाल संगमनेरे यांच्या सहकार्याने अखेर क्लबने हा क्रीडामहोत्सव ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेतला. हा महोत्सव के‍वळ मैदानासाठीच नव्हता, तर त्या ९० च्या दशकातील मैदानावरील उत्साह, जल्लोष, आनंदाने विलसणाऱ्या निखळ हास्यासाठी होता. मैदानावरील क्रीडाज्योत तेवत ठेवणाऱ्या त्या धुरिणांच्या योगदानासाठी हा महोत्सव होता. मैदानाला दिलेला हा आगळावेगला सलाम विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यान् पिढ्यांना ऊर्जा देत राहील…!

 

या मैदानातून घडलेले विद्यापीठ व राष्ट्रीय खेळाडू

  • व्हॉलीबॉल ः शेखर गायकवाड, तुषार परदेशी, मनोज म्हस्के, आसीम खान पठाण, फारूक शेख, योगेश चौधरी.
  • बास्केटबॉल ः तौफिक खान, प्रणील दळवी, सुनील पदमोर, राहुल साळवे
  • नेटबॉल ः कपिल काळे, स्वप्नील पाटील, नितीन देवरे
  • कबड्डी ः निवृत्ती जगताप, विलास जगताप, बाळा मडके, सचिन होलीन, इजाज शेख, आकाश इंगळे, आनंद खताळ, आदिनाथ गवळी (प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी झालेला खेळाडू)
  • हँडबॉल ः आकाश आडके, योगेश वानखेडे, संतोष दराडे, सतीश सोनवणे, राकेश देवरे, दीपक आव्हाड, गणेश दकाते.
  • इनडोअर क्रिकेट ः सचिन सातारकर, पंकज भडांगे, विशाल पाटील, नितीन मुंडे, मच्छिंद्र घोडेराव
(Maharashtra Times , Nashik : 2 Nov. 2015)
[jnews_hero_9 post_offset=”2″ include_category=”112″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!