Literateurआठवणींचा धांडोळा

पाकिस्तानची जत्रा

स्वप्न स्वप्नच असतात. अगदी मृगतृष्णेसारखी. खरं काहीही नसतं. गावाकडच्या जत्रा पाहिल्यात, पण पाकिस्तानची जत्रा कुणी पाहिलीय का..? मी पाहिलीय-स्वप्नात! लहानपणी राजा-राणीच्या गोष्टी वाचलेल्या, ऐकलेल्या आहेत. गुराख्याला स्वप्न पडतं, तू राजा होशील. आणि काय, तो जागा झाल्यावर तो राजाही होतो. सत्यवादी राजा हरिश्चंद्राचीही गोष्ट ऐकली आहे. त्याने स्वप्नात ज्याला शब्द दिला त्याला तो जागेपणी ‘जागल्या’चेही वाचले आहे; पण या कथांमधील रंगविलेल्या स्वप्नांमध्ये काही तरी सूत्रबद्धता तरी असते. कारण त्या ठरवून निर्मिलेल्या गोष्टी आहेत. मला जी स्वप्ने पडली त्यात सूत्रबद्धता कुठेही नव्हती…

गावाकडची बरीच लोकं घराकडे परतत होती. कुणाच्या हातात फुगे, तर कुणाच्या हाती वेगळ्याच, पण छान छान वस्तू. लोकांमध्ये कमालीचा उत्साह होता. त्याला कारणही तसंच होतं. कारण आज पाकिस्तानची जत्रा होती. मला जत्रेचं भारीच आकर्षण. त्यात पाकिस्तानची जत्रा म्हणजे वेगळंच कुतूहल. काही तरी वेगळी खरेदी करता येईल, नवीन काही तरी पाहायला मिळेल, म्हणून या जत्रेची उत्सुकता कमालीचा दाटली होती. काही लोकं तर पायी पाकिस्तानात जाऊन येत होते. कारण ते फार काही लांब नव्हतं. अगदी सात समुद्र पार करावे वगैरे अजिबात भानगड नव्हती. बरं, महामंडळाने एसट्याही बऱ्याच सोडल्या होत्या. जत्रा म्हंटली, की जादा गाड्या सोडण्याचा एसटी महामंडळाचा ठरलेला पॅटर्न. गाड्याही फुल्ल.

पहिल्यासारखी भीती राहिली नव्हती. नाही तर जिथं पाहावं तिथं अतिरेक्यांची भीती. आता छे… अतिरेक्यांचं काही डोक्यात नव्हतं. पाकिस्तानच्या सीमा सर्वांना खुल्या झाल्या होत्या. हो, पण एक भीती भयंकर होती, ती म्हणजे धर्मांधतेची. एक वेळ दरोडेखोर परवडले, पण धर्मांधांची मला खूप भीती वाटते. त्यात पाकिस्तानची जत्रा. त्यामुळे तिथला कट्टर धर्मांधपणा तेवढाच कडवा होता. आता ही भीती मलाच होती. इतरांना त्याचं सोयरसुतक नव्हतं. जत्रेच्या निमित्तानं किती तरी लोकं पाकिस्तान पाहून येत होते.

मीही निघालो बायको-पोराला घेऊन. आम्ही एसटीत चढलो. गर्दी होती, पण रेटारेटीतही मी जागा पकडलीच. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव. वाह, आता जत्रेत मस्त फिरायचं. पोरगं तर खूपच लहान होतं. त्यामुळे त्याची काळजी मनात दाटली. एकतर पाकिस्तानात जायचं. बायको नि पोरगं सांभाळायचं म्हणजे मोठी जोखीम. इतर लोकं बिंधास्त जाऊन येत होते. काळजी मलाच एकट्याला. एसटी मार्गस्थ झाली. ओबडखाबड रस्त्यांवरून आदळत निघाली एसटी. दाट जंगलाचा भाग मागे टाकत एसटी एके ठिकाणी अचानक थांबली. सगळे उतरले. मी बाहेर पाहिलं तर आजूबाजूला प्रचंड झाडंझुडपे नि तेथे जाणवणारी कमालीची नीरवशांतता. कंडक्टर म्हणाला, चला इथून पुढे आपापल्या सोयीने जायचं. मी गांगरलोच. इथून पुढं जायचं कसं?

तसा रस्ता साधारणच होता.. थोडासा डांबरी, काही ठिकाणी उखडलेला. मी तिथं कोणाला तरी विचारलं, भाऊ पाकिस्तानला कसं जायचं कसं? त्याने आपलं हाताने खूण करीत कसं जायचं ते सांगितलं. आता मला भीतीने घेरलं. मी बायकोला म्हंटलं, तू इथेच थांब. सोन्याला सांभाळ. मीच जाऊन येतो. पाकिस्तानात जायचं म्हणजे खायचं काम नाही. मग मी एकटाच निघालो पायी पायी. काही वेळाने वेगाने धावणाऱ्या गाड्या, रस्ते लागले. अल्लाह…ची बांग कानी पडली. तेवढ्यात एक टिपिकल मोठी दाढी असलेला अगदी ओसामा बिन लादेनसारखा एक माणूस जाताना दिसला. जागोजागी मशिदी दिसत होत्या. त्यातून सुवासिक धूर बाहेर पडत होता. मनाने लगेच ताडलं, हेच की हो पाकिस्तान! आता जिथंतिथं हिरवंहिरवं. मशिदींचे घुमट दूरपर्यंत दिसत होतं. म्हंटलं, या लोकांनी कुठे तरी मंदिर ठेवलं की नाही… मी आपला बापुडा उगाच मंदिराचा कळस कुठे दिसतो का म्हणून चौफेर नजर फिरवली. पण छे..! कुठेही कळस दिसला नाही. जिकडेतिकडे फक्त घुमटच. त्यामुळे कळस असण्याची तर सूतराम शक्यता नव्हती.

सहज चालता चालता मी एके ठिकाणी थबकलो. अहो, तिथं काँग्रेसची संग्रहालयासारखी वास्तू होती. तिथं मला थोडीशी वर्दळ जाणवली. मी त्या संग्रहालयात गेलो आणि तेथील वस्तू पाहून विशेष वाटलं. नवरंग तेलाच्या मोठ्या मोठ्या बाटल्या होत्या. राहुल गांधींचे फोटो होते. मी चकित झालो. कारण हिंदूंची खूण ठेवलेली ही एकमेव वास्तू मला वाटली, जेथे अनेक हिंदूंनी काँग्रेसमध्ये योगदान दिल्याच्या खुणा होत्या. म्हणजे त्या खुणा तशा कुठेही दिसत नव्हत्या, पण काय कोण जाणे, ते जाणवल्याची भावना मला सारखी होत होती. ते गृहीत धरूनच मी एकेक वस्तू न्याहाळू लागलो. माझी नजर एके ठिकाणी खिळली. मला एका लाकडी कपाटावर नवरंग तेलाच्या लहान-मोठ्या बाटल्या दिसल्या. लालसर रंगातले त्यातले तेल पारदर्शी काचेतून ठळकपणे दिसत होते. ते तेल पाहून माझ्या डोळ्यांसमोर अमिताभ बच्चनची जाहिरात तरळून गेली. मी हे तेल वापरलेलं असल्याने या तेलाविषयी मला प्रचंड आकर्षण होतं. जगातली सर्वांत आयुर्वेदिक आणि अस्सल हीच एकमेव वस्तू आहे, असा मला ठाम विश्वास वाटला. म्हणून मी छोट्या बाटलीची किंमत विचारली. स्वस्त होती.

तिथला माणूस म्हणाला, ”अहो मोठी वस्तू घ्या, स्वस्त आहे.”

मी म्हंटलं, ”हो, खूपच स्वस्त आहे.”

मी ती वस्तू घेण्याची उत्सुकता दाखवलीही, तेवढ्यात तो माणूस म्हणाला, ”एवढीच बाटली आहे. ती विकणार नाही आम्ही.”

मी चकित झालो. हा माणूस एवढ्यात मला ती वस्तू घेण्यासाठी प्रोत्साहित करीत होता आणि आता लगेच पलटला. जाऊद्या. नाही तरी मला नकोच होती ही वस्तू. मी पैसे काढण्यासाठी खिशात खोचलेला हात तसाच रिकामा बाहेर काढला. तेवढ्यात धांदल उडाल्यासारखा ‘मटा’तला एक सहकारी धावत एका टेबलजवळ आला. त्याची देहबोली तर अशी काही होती, की काय करू नि काय नको…

मी म्हंटलं, ”काय झालं?”

”अरे श्यामक दावर गेले.”

मी गोंधळलो. माझ्यातलाही पत्रकार अचानक जागा झाला. मीही उगाच धावपळ करू लागलो. अरे, आता काय करू, कशी बातमी मिळवू? असे विचार घोळत असतानाच अचानक तिथे किरण काळे आले. ते म्हणाले, ”अरे, काय करतो, याने लिहिलेलं बघ.”

मी लगेच शेजारच्या पत्रकाराला म्हंटलं, ”अरे पाहू रे काय काय झालं ते. मी पटापट लिहून घेतो.” त्याने बातमीचा कागद दाखवला. कागदावर बरंच काही लिहिलेलं होतं. मला सगळंच काही नको होतं. नेमकी घटना काय घडली हे हवं होतं. बातमी त्याच्यासारखी नकोच होती. पण त्याच्या बातमीत मला काहीही विशेष संदर्भ दिसले नाहीत. माझ्या एकच लक्षात राहिलं.. ते म्हणजे, श्यामक दावर यांचं निधन!

माझा गोंधळ वाढला, काय करू, कोणाशी बोलू, कोण माहिती देईल अशा नाना प्रश्नांनी काहूर माजलं. माझा गोंधळ वाढत होता. माझ्या डोक्यात एकच, श्यामक दावर गेले कसे, त्यांचे संदर्भ काय असतील एवढेच.

तेवढ्यात बायकोने आवाज दिला, अहो उठा..! ऑफिसला जायचंय ना! दुपारचे सव्वातीन वाजले… मी ताडकन् उठलो. भानावर आलो आणि एक सुस्कारा सोडला. बरं झालं, बातमी खोटी होती! बिचारा श्यामक दावर. उदंड आयुष्य लाभो त्याला.

डोळ्यांवर झोपेची धुंदी कायम होती. बायकोला म्हंटलं, किती वाजले… शनिवार वाजला? माझी असंबद्ध बडबड ऐकून ती म्हणाली, काय??? शनिवार वाजला? अहो सव्वातीन झाले! मी झटकन उठलो नि बेसिनमध्ये जाऊन तोंडावर पाणी मारलं… मग भानावर आलो. नंतर माझं मलाच विचित्र वाटलं. काय हे स्वप्न, ज्यात किती असंबद्ध गोष्टी होत्या. पाकिस्तानची जत्रा??? काही तरीच. ते किरण काळे, ज्यांनी कधीच वृत्तपत्र क्षेत्रातून निवृत्ती घेतली होती. ते नवरंग तेल, ज्याचा काँग्रेसशी काय संबंध? तो सहकारी, अचानक कसा तिथं उपटला? आणि मी कशाला उगाच बातमी मिळवण्यासाठी धावत होतो. धत्… काही तरीच हे स्वप्न…! चूळ भरली आणि घाईघाईने कपडे घालत ऑफिसकडे निमूटपणे निघालो… एक मात्र समाधान देणारं होतं… ते म्हणजे श्यामक दावर सुखरूप होते. दावर साहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो…

ऑफिसला निघालो, तरी डोळ्यांवर झोपेची धुंदी कायम होती.

[jnews_block_9 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”112″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!