EnvironmentalGreen SoldierRaanwata‌Birds Lover

पक्ष्यांना त्यांचं आकाश देणारी पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी

पक्ष्यांना त्यांचं आकाश देणारी पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी

पक्ष्यांसाठी हा सगळा खटाटोप पाहिला की कौतुक वाटतं. पक्ष्यांची आत्मीयतेने शुश्रूषा करणारी सुखदा तिच्या आईला कधी बाबा आमटे वाटते, तर वडिलांना ती पक्ष्यांची परिचारिका वाटते. कुणाला ती पक्षिमैत्रीण वाटेल, तर कुणाला खगराज्ञी. कुणाला हीच सुखदा गायधनी पक्ष्यांची देवदूत वाटते. सुखदा गायधनी पक्ष्यांची देवदूत तर आहेच, पण ती प्राण्यांचीही तेवढीच आत्मीयतेने काळजी घेते. पक्ष्यांना माणसांसारखं बोलता येत नाही, पण माणसांना या पक्ष्यांची भाषा शिकता नक्की येईल. सुखदा गायधनी अशीच एक नीळावंती आहे, पक्ष्यांची देवदूत आहे, जिला या पक्ष्यांची भाषा समजते. त्यांना काय हवं, काय नको हे ती त्यांच्या सान्निध्यात शिकली आहे. सुखदा गायधनी हिला पक्ष्यांची देवदूत का म्हणावं, हे समजून घ्यायचं असेल तर हा लेख वाचा… 

 


क्षिमैत्रिणीला भेटण्याची उत्कट इच्छा मनी होती. एका छानशा टुमदार बंगल्याच्या गेटजवळ अंदाजानेच दुचाकी पार्क केली आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने लक्ष वेधलं. विविध पक्ष्यांच्या कोलाहलाने जाणवलं, की आपण पत्ता चुकलेलो नाही. गेटमधून आत आल्यावर धक्काच बसला. पाहतो तर काय, एकदोन नव्हे, तर पाच-पाच पिंजरे! या पिंजऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोपट. अरे, ही कसली पक्षिमैत्रीण! नेपथ्यच असं असेल तर संपूर्ण पक्षीप्रेमाचा अंक तर कसा असेल? म्हंटलं, आजचा दिवस वाया गेला!

तेवढ्यात एक तरुणी समोर आली..

“सुखदा गायधनी??” – मी अंदाज घेत म्हणालो.

माझा संभ्रम दूर करीत ती म्हणाली, “हो, मीच.”

“हे पक्षी…???” – मी पिंजऱ्यातल्या पक्ष्यांकडे पाहत म्हणालो.

तेव्हा तिने जे काही पक्ष्यांचं, प्राण्यांचं विश्व उलगडलं तेव्हा पिंजऱ्यांचा उलगडा झाला. ज्या पक्षिमैत्रिणीकडे मी आलो होतो, ते घरच जणू पक्ष्यांचं इस्पितळ होतं, तर जे पिंजरे पाहिले, ते पिंजरे नव्हे, तर पक्षिरुग्णांचे वार्ड होते! इथून खरी सुखदा गायधनी | Sukhada Gaidhani | उलगडत जाते. मग लक्षात आलं, की काही काही नेपथ्यं बुचकळ्यात टाकणारीही असतात. त्यासाठी पुढचा अंक पाहण्याची तयारी ठेवायला हवी. माझ्यासाठी हा ‘सुखदा’ धक्का होता. माझा उत्साह पुन्हा रिचार्ज झाला.

पक्ष्यांना त्याचं आकाश देणारी पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी नावाप्रमाणेच सुखदा आहे. म्हणजे सुख देणारी. ती पक्षी, प्राण्यांनाच जीवदान देत नाही, तर पर्यावरणाची अन्नसाखळीही जपतेय. या प्राणी, पक्ष्यांचं जीवन उलगडायचं असेल तर सुखदाला आधी समजून घ्यावं लागेल.

कुत्र्यामांजरांची, तसेच पक्ष्यांची सुखदाची आवड घरातच जोपासली गेली. लहानपणी तर ती रस्त्यावरून एखादा प्राणी घरी घेऊन यायची. आई तिच्यावर ओरडायची. मग सुखदा परत त्याला त्याच्या विश्वात सोडून यायची. सुखदाचं पदवीचं शिक्षण मुंबईत झालं. सुरुवातीला ती ठाण्यात बहिणीकडे राहत होती. तिच्या बहिणीचं घर संजय गांधी नॅशनल पार्कच्याच मागे होतं. तिथं वन खात्यात मसूरकर होते. ती त्यांच्याशी पक्ष्यांविषयी माहिती विचारायची. तिची आवड पाहूनच ते सुखदाला वेगवेगळ्या पक्ष्यांची माहिती द्यायचे. एकदा किंगफिशर जखमी होऊन पडला होता. सुखदाने त्याला अलगद उचलून मसूरकरांकडे नेलं. तेथून या किंगफिशरची रवानगी डॉक्टरकडे झाली. या उपचारादरम्यान हा पक्षी दोन-तीन दिवस मसूरकरांकडेच होता. रुग्णाला नातेवाईक जसा रोज भेटायला जातो, तशी सुखदा त्याला रोज पाहायला जायची. जेव्हा हा पक्षी ठणठणीत झाला तेव्हा त्याला त्याच्या विश्वात सोडण्याची वेळ आली. मसूरकर म्हणाले, “तू त्याला वाचवलं ना.. मग आता तूच त्याला मोकळ्या आकाशात सोड.” सुखदाला हा अनुभव खूपच वेगळा होता. तिने त्याला आकाशात सोडलं आणि त्याने जी भरारी घेतली ती अनुभवताना सुखदा भारावूनच गेली. तिच्यासाठी या आनंदाची सर कशातच नव्हती. तेव्हा तिला जाणवलं, की आपण जी काही मेहनत घेतो, ती केवळ याच क्षणासाठी. सुखदाच्या आयुष्यातला हा पहिला पक्षी होता, ज्याला सुखदाने त्याचं आकाश दिलं. या घटनेनंतर सुखदा पक्ष्यांच्या प्रेमातच पडली. ती पक्ष्यांची सखी झाली. पक्षिमैत्रीण झाली आणि पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी म्हणूनही ओळखली जाऊ लागली.

पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनीपक्षिविज्ञानातून मिळाली प्रेरणा

पक्ष्यांची आवड जोपासताना त्याला ज्ञानाचा पायाही हवा, म्हणूनच तिने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत  | B‌‌‌ombay Natural History Society | पक्षिविज्ञानाचा | Ornithology | कोर्स केला. त्यातूनच तिला अशी अनेक लोकं भेटली, जी प्राणी, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी वेगळं काही तरी काम करायची. त्यांचं काम पाहून ती प्रभावित झाली. तिलाही वाटलं, की आपणही असंच काही तरी करावं. पदवीचं शिक्षण घेऊन सुखदा नाशिकला परतली तेव्हा तिला पक्षी, प्राण्यांसाठी काम करणारे देविका भागवत, अभिजित महाले भेटले. तिने त्यांचा ग्रुप जॉइन केला. हा ग्रुप म्हणजेच इकोएको | eco echo | पर्यावरणप्रेमींशी परिचय वाढत गेला. त्यातूनच मग ती शरण्या शेट्टींसोबत काम करू लागली. अभिजित महाले इकोएको ग्रुपचे काम करीत होते. हा ग्रुप वैज्ञानिक शोधप्रबंधावर काम करणारा आहे. हा ग्रुप मुंबईचा. या ग्रुपला नाशिकमध्येही काम करायचं होतं. कारण नाशिकमध्येही पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम सुरू होतं. त्यातूनच नाशिकमध्येही या ग्रुपचं ऑफिस सुरू झालं. अभिजित महाले यांचं घरच या ग्रुपचं ऑफिस झालं. कालांतराने या ग्रुपची एक एनजीओ स्थापन झाली. पर्यावरणात काम करताना वन विभागाशी वारंवार संपर्क येत असतो. त्यामुळे ते वन खात्यालाही जाऊन भेटले. हा ग्रुप तसा साप वगैरे पकडायचा. मात्र, हे सगळं करताना त्याची पूर्वकल्पना वन खात्याला द्यायचे. म्हणजे आजही कुठे साप पकडला, सोडला तर त्याची माहिती ते नोंदवून ठेवतात. एकदा २०१५ मध्ये वन खात्याने एक कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेच्या मार्गदर्शक होत्या पक्षिविज्ञानच्या अभ्यासक डॉ. रिना देव. पक्षी कसे हाताळायचे, त्यांचे पुनर्वसन कसे करायचे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यशाळेत इकोएको | eco echo | ग्रुपही सहभागी झाला होता. इथूनच त्यांना पक्ष्यांवरही काम करण्याची ऊर्मी मिळाली. तेही असंतसं नाही, तर शास्त्रशुद्ध. पक्ष्याला सोडताना काय काळजी घ्यायची, त्यांची शुश्रूषा कशी करायची यावर सूत्रबद्ध काम सुरू झालं. मग जिथे जिथे पक्षी अडचणीत असतील, जखमी असतील, तर त्याबाबत पहिल्यांदा इकोएको ग्रुपला माहिती मिळू लागली. हे सगळं करताना त्याची माहिती आधी वन खात्याला दिली जाऊ लागली. मग त्या पक्ष्यावर काय उपचार सुरू आहेत, पक्षी उडू शकत नसेल तर त्याचीही माहिती वन खात्याला दिल्यामुळे पक्ष्यावर अधिकृतपणे काम करणे सोपे झाले. पक्षी उडाला तर त्याचा व्हिडीओ आणि फोटोही वन खात्याकडे पाठवला जाऊ लागला. अशा पद्धतीने गेल्या दोन-तीन वर्षांपासून इकोएको ग्रुप झपाटल्यासारखा काम करू लागला. अर्थातच, या ग्रुपमध्ये सुखदासारखे तळमळीचे सदस्य होते.

पक्ष्यांची देवदूत सुखदा गायधनी

सुखदा तशीही २०११ पासून प्राण्यांवर काम करीतच होती. दोन वर्षांपूर्वी सावरकरनगरमध्ये बिबट्या आला होता, त्या वेळी त्याला पकडण्यासाठी इकोएको ग्रुपचेच | eco echo | सदस्य जाळी घेऊन आघाडीवर होते. सुखदा पक्षी, प्राण्यांबाबत फारच हळवी आहे. पतंग उडवणाऱ्यांचा तिने तिटकारा केला नाही, पण त्या मांजामुळे जो पक्ष्यांना त्रास होतो, जखमी होतात, त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. ती म्हणते, “यात पक्ष्यांचा काय दोष?” अशाच एका नायलॉन मांजात अडकलेल्या एका कोकिळेची तिने सुटका केली. मांजामुळे तिची चोचच तुटून गेली. एका पायाचं बोट कापलं गेलं, तर अनेक ठिकाणी मांजामुळे जखमा झालेल्या होत्या. मांजातून सुटका करताना तिने जी झटापट केली होती, त्यात तिला भयंकर इजा झाल्या होत्या. सुखदा म्हणते, की मानवाच्या एका चुकीमुळे कोकिळेचं आयुष्यच उद््ध्वस्त झालं. या नायलॉन मांजामुळे तिचं आकाश कायमचं हिरावून घेतलं. या घटनेने सुखदा प्रचंड अस्वस्थ झाली. मग अशा पक्ष्यांची सुखदा गायधनी देवदूत बनली. सुखदाकडे अशाच काही जखमी पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. तिच्याकडे एक पक्षी असा आहे, की त्याला आठदहा वर्षे पिंजऱ्यात ठेवल्याने तो जवळपास वेडापिसाच झाला होता. त्याचं नैसर्गिक जगणंच हिरावून घेतलेलं होतं. त्यामुळे एका पोपटाने तर स्वत:चीच पिसं उपटून घेतली. जणू या जगण्यात काय अर्थ, जिथं मला माझं स्वत:चं आकाश नाही! हिरव्या देहाचा हा सुंदर पक्षी पिसंहीन झाल्याने उघडाबोडका झाला होता. उडण्याची क्षमताही गमावून बसला. पक्ष्यांना आत्महत्या करता येत नाही, अन्यथा त्याने पिंजऱ्यातच गळफास घेतला असता! हौसेने पक्षी पिंजऱ्यात ठेवणाऱ्यांकडून किती भयंकर अत्याचार पक्ष्यांवर होतात, हे जेव्हा सुखदा दाखवते तेव्हा मनात चर्रर्र होतं. सुखदाने त्याच्यावर आता उपचार सुरू केले असून, त्याच्या शरीरावर हिरवे पिसं येऊ लागली आहेत. थोडक्यात, सुखदामुळे त्याच्या आयुष्यात पुन्हा हिरवे रंग भरू लागले आहेत. त्याच्या शरीरावर पूर्ण पिसं आल्याशिवाय त्याला सोडता येणार नाही. म्हणूनच वन खात्याने हा पक्षी सुखदाकडे सोपविला. तिच्याकडे कोकिळही होता. तो आता दुसऱ्या पक्षिमित्राकडे शिफ्ट केला आहे. सुखदाचं घर म्हणजे पक्ष्यांची शाळा आहे. सकाळी आणि सायंकाळी तर बुलबुलसह विविध पक्ष्यांची तिच्या अंगणात छान मैफल जमते. त्यासाठीच तिने अंगणात चेरी, टोमॅटो, विविध भाज्या लावल्या आहेत. त्यावर हे पक्षी यथेच्छ ताव मारतात. तिने पक्ष्यांना खाद्य मिळेल अशीच देशी झाडेही लावली आहेत. कढीपत्त्याच्या झाडावर सायंकाळी कोकिळेचे कुजन कानी पडते. या कढीपत्त्याच्याच झाडावर फळं खाण्यासाठी वटवाघळासह अन्य पक्षीही येतात. सन बर्ड्स तर खूप येतात.

पोपटासारखीच अवस्था एका घारीलाही सोसावी लागली होती. सुखदाने ती एका साधूकडून ताब्यात घेतली होती. या घारीनेही तिची पिसं अशी उपटून घेतली होती. जवळपास सव्वा वर्ष सुखदाकडे तिचा मुक्काम होता. ती अंगणात मुक्तपणे बागडायची. पाळीव कुत्र्यांचीही या पक्ष्यांशी गट्टी जमली होती. प्राणी, पक्ष्यांची काळजी घेतली, की ते तुम्हाला खूप छान प्रतिसाद देतात, याचा अनुभव सुखदाला एव्हाना जाणवू लागला होता. घारीचा अनुभव तर सुखदासाठी सुखदच होता. त्या घारीची जुनी पिसं झडून नवीन पिसं यायला तब्बल सव्वा वर्ष लागलं. या सव्वा वर्षाच्या काळात सुखदा आणि त्या घारीचं नातं अतूट नातं निर्माण झालं होतं. एक क्षण आला, की आता घार ठणठणीत झाली आहे. आता तिला तिचं मोकळं आकाश देण्याची वेळ आली तेव्हा तिला ज्या पांडवलेण्याजवळ ताब्यात घेतलं होतं, तिथंच तिला मुक्त करण्यासाठी सुखदा तिला घेऊन गेली. पिंजऱ्यातून तिला बाहेर काढलं; पण ती पटकन सुखदाच्या खांद्यावरच जाऊन बसली. ती जायलाच तयार होईना. काहीशी भावनावश झाली होती. अखेर सुखदाने तिला हातात घेऊन फेकलं आणि मग तिने जी आकाशात भरारी घेतली. पुन्हा तिने मागे वळून पाहिलंच नाही.

पक्ष्यांना वाचवणे हा सुखदाचा आत्मिक आनंद आहे. अगदी हृदयापासून ती हे काम करीत आहे; पण हे करताना तिलाही तिचं खासगी आयुष्य आहे, हे समजून घेण्याची मानसिकता लोकांमध्ये नाही. गंभीर जखमेमुळे बेजार झालेल्या पक्ष्याला वाचविण्यासाठी जेव्हा तिला फोन येतो, तेव्हा ती हातातलं काम टाकून मदतीला धावते. कधी कधी काय होतं, की तेथे पोहोचायला वेळही लागतो. लोकं मग उलट त्यांनाच बोलतात, तुम्हाला लवकर येता येत नाही का? हेच का तुमचं पक्षीप्रेम! एखादा पक्षी मृत झाला तर तुमच्यामुळेच पक्षी गेला वगैरे वगैरे. हे ऐकलं, की सुखदाला वेदना होतात. हा तिचा फुलटाइम जॉब नसला तरी तिने पक्ष्यांसाठी जो वसा घेतला आहे त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. मुळात पैशांसाठी ती हे काम करीतच नाही. उलट पदरचे पैसे मोडून तिने हे काम आनंदाने स्वीकारले आहे. काही वेळा लगेच घटनास्थळी पोहोचणे शक्य होतही नाही. अशा वेळी सुखदा पर्यायी व्यवस्था करते आणि शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करते.

जखमी पक्ष्यांना वाचवण्यासाठी तिने खास पिंजरे बनवून घेतले आहेत. हे सगळे पिंजरे पक्षीरुग्णांनी फुल्ल आहेत. त्यामुळे आणखी एखाद्या जखमी पक्ष्याला सांभाळायचे असेल तर त्याला ठेवायचे कुठे हाच मोठा प्रश्न असतो. त्यातूनही ती काही तरी मार्ग काढते. कारण त्या पक्ष्याला वाऱ्यावर सोडणं तिच्या स्वभावात बसत नाही. काही वेळा ती लोकांनाच सांगते, की माझा एक पिंजरा रिकामा होईपर्यंत तुम्ही पक्ष्याची काळजी घ्या. त्याची काळजी कशी घ्यायची, याचे मार्गदर्शन मी तुम्हाला करीन; पण सगळीच माणसं संवेदनशील असतातच असं नाही. त्यामुळे स्पष्टपणे नकार देणारी अनेक माणसंही तिने पाहिली आहेत.

पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी तिला पशुवैद्यक संजय गायकवाड यांची खूप मदत होते. ते जर नसतील तर पॉलिक्लिनिकमधून तिला मदत होते. यापैकी कोणीही नसेल तर मग खूप अडचण येते. इकोएको ग्रुपच मुळी गायकवाडांवर अवलंबून आहे. त्यांची बदली सध्या जळगावात आहे. अशा वेळी मोठ्या पक्ष्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची उणीव तिला प्रकर्षाने जाणवते. अनेकदा असेही होते, की गायकवाड जर जळगावात असेल तर आपत्कालीन स्थितीत त्यांना जखमी पक्ष्याचे फोटो पाठवून त्यांच्याकडून उपचार लिहून घेतात. त्याप्रमाणे पक्ष्यांवर उपचार केले जातात. त्यामुळे सध्या तरी पॉलिक्लिनिक आणि संजय गायकवाड यांच्यावरच प्राणी, पक्ष्यांवरील उपचाराची मदार आहे. इतर खासगी डॉक्टर आहेत, पण ते कुत्र्या-मांजरांवर म्हणजे पाळीव प्राण्यांवरच उपचार करतात. अगदीच गंभीर केस असेल तर ते डॉ. रिना देव यांच्याशी संपर्क साधतात. पक्ष्यांना दुसरीकडे उपचारासाठी घेऊन जाता येत नाही. कारण त्याला वन खात्याची परवानगी लागते. इको एको ग्रुपच्या नावाखाली अशा पक्ष्यांची वाहतूक करता येत नाही.

पक्ष्यांची निरंतर सेवा करणारी सुखदा

पक्ष्यांवर उपचार करणं, त्यांचा त्रास समजून घेणं अवघड आहे. कारण नेमका काय त्रास होतो हे ते सांगू शकत नाहीत. त्यासाठी त्यांच्या भावविश्वात जाऊनच समजून घ्यावं लागतं. सुखदाला हे छान जमलं आहे. पक्ष्यांचं रोजचं वागणं कसं आहे, हे सुखदाला आता सहज कळतं. त्यात बदल झाला, की सुखदाला जाणवतं, की पक्ष्याला काही तरी त्रास आहे. तिच्याकडे एक राघू, तर तीन मैना आहेत. त्यातील एका मैनेला श्वास घेण्यास अडचण येत होती. ती तोंडाने श्वास घेतल्याचं सुखदाला जाणवलं. एरवी कुणालाही या मैनेची वेदना समजून घेता येणार नाही किंवा ती लक्षातही येणार नाही; पण सुखदाला तिची वेदना कळली. श्वास घेताना त्या मैनेच्या चोचीतून वेगळा आवाज येत होता. सुखदाने फक्त आवाज ऐकला नाही, तर त्या आवाजामागची वेदना ऐकली. माणसांचे जसे पाय सुजतात, तसेच पक्ष्यांचेही सुजतात. पक्ष्यांच्या पंजाची पकड घट्ट असते. कुठेही फांदीवर बसताना पक्षी आपल्या पंजाच्या साह्याने बसतो. फांदीसारख्या नैसर्गिक जागांवर ही पकड जर त्यांना मिळाली नाही तर त्यांचे पाय सुजतात, खालून काळे पडतात. सुखदाला बारीकसारीक अशा सगळ्याच गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. पक्ष्यांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी त्यांची पिसे नव्याने येतात. जुनी पिसे झडून जातात. नखांचंही तसंच आहे. म्हणायला गेलं तर ही खूप छोटी गोष्ट आहे, पण त्यामागचं गांभीर्य डोंगराएवढं मोठं आहे. चोचीचा रंग फिकट झाला किंवा त्यात काही बदल होत असेल तर या पक्ष्याला काही तरी होतंय, हे लगेच तिच्या लक्षात येतं. तिच्याकडे जे पक्षी पिंजऱ्यात ठेवलेले आहेत, ते कोणी तरी पाळलेले होते, तर काही जखमी अवस्थेत होते. अशा पक्ष्यांची सुटका केल्यानंतर त्यांचा मुक्काम सुखदाच्याच घरी असतो. एक प्रकारे तिचं घर पक्ष्यांचं रुग्णालयच म्हणायला हवं. पिंजरे | Bird’s cage | म्हणजे या पक्ष्यांचा वार्ड.

लोकं पक्षी पाळतात, तेव्हा त्यांची नकळतपणे किती हेळसांड करतात, त्यांचा नैसर्गिक आहार कसा बदलून टाकतात, याचा अनुभवही सुखदाला या निमित्ताने आला. तिच्याकडे असे पक्षी आहेत, ज्यांना वरणभात खाऊ घातला जात होता. एक पक्षी असा आहे, की तो ‘मिरिंडा’ ज्यूस प्यायचा. कारण त्याला ज्यांनी पाळलं होतं, त्यांनी तशी सवयच लावली होती. एक पक्षी तर मक्याशिवाय दुसरं काहीही खात नव्हता. सुखदाने अशा हौशी माणसांच्या तावडीतून या पक्ष्यांची सुटका केली तेव्हा तिला आधी या पक्ष्यांच्या कृत्रिम सवयी बदलाव्या लागल्या आणि त्यांचा नैसर्गिक आहार देण्यास सुरुवात केली. मिश्र धान्य, फळे, भाज्या, त्याचबरोबर वेगवेगळे पोषक घटकही त्यांना दिले. बरं हे तेवढं सोपंही नाही. तिच्याकडे वेगवेगळ्या आजारांचे पक्षी आहेत. त्यांचा आहारही वेगवेगळाच द्यावा लागणार. त्यामुळे कोणाला काय द्यायचं नि काय नाही, याचीही काळजी सुखदाला घ्यावी लागते.

पक्ष्यांच्या सान्निध्यात राहून सुखदाला पक्ष्यांची भाषा आता छान समजू लागली आहे. जसजसा तुम्ही पक्ष्यांसोबत वेळ घालवाल, तसतशी त्यांची भाषा तुम्हाला समजू लागते, असं सुखदा सहजपणे सांगते. एक राघू एकटाच बडबडत होता, म्हणजे तो हॅप्पी आहे. पक्षी तणावात असेल तर त्यांचे आवाज वेगळे असतात. सुखदा पक्षिविज्ञान शिकलेली असल्याने तिला त्यातलं किमान ज्ञान आहे. तिने या पक्ष्यांच्या एक्सरसाइजसाठी काही प्रयोगही केले आहेत. काही छोटे छोटे चेंडू वगैरे खेळणी ती या पक्ष्यांना खेळायला देते. त्यांना तिच्या खोलीत खेळायला मोकळे सोडते. पोपटांना कुरतडायला आवडतं. त्याप्रमाणे ती त्यांना खेळणे देते. मग ती खेळणी एक तर कुरतडतील किंवा त्यांच्याशी खेळत तरी राहतील. त्यातून त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम बनते. हे सगळं करताना सुखदा त्यांना अजिबात हाताळत नाही. ती त्यांच्या जवळही जात नाही. त्यांना माणसाळायचं नाही हे तिने कटाक्षाने पाळलं आहे. कारण या पक्ष्यांना एक दिवस तिला मोकळ्या आकाशात सोडायचं आहे. त्यातली एक मैना आहे, जिला उडताच येत नाही. त्यामुळे ती संपूर्ण आयुष्य सुखदासोबतच घालवणार आहे. उर्वरित तिन्ही पक्ष्यांना त्यांचं मोकळं आकाश परत मिळवून द्यायचं आहे. तिच्याकडे पंचरंगी पोपट आहे, ज्याला इंग्रजीत प्लम हेडेड पोपट | Plum Headed Parrot | असं म्हंटलं जातं. या रंगाचे पोपट मादी गटात मोडतात, तर जो नर असतो त्याचं डोकं पूर्ण लाल असतं. ही पंचरंगी मैना सुखदाकडे जुलै २०१८ मध्ये आली. त्या वेळी ती अवघ्या सव्वा-दीड वर्षाची आहे. ती आता छान उडते. त्यामुळे तिला तिचं आकाश देण्याची घटिका समीप आली आहे. दोन-तीन महिन्यांत ती तिला सोडून देणार आहे. हा लेख होईपर्यंत ही पंचरंगी मैना आकाशात मुक्त विहार करीत असेल. पक्ष्यांची देवदूत झालेली सुखदा गायधनी याच सुखद आयुष्याच्या शोधात असते.

गिधाडाचे वाचवले प्राण

पक्ष्यांच्या दुनियेत वावरलेल्या सुखदाला काही पक्ष्यांच्या आठवणी आजही मनात रुंजी घालतात. मार्च २०१८ मधली ही गोष्ट आहे. तिने त्र्यंबकेश्वरहून एक गिधाड | Vulture | घरी आणलं होतं. त्याला डिहायड्रेशनचा त्रास असल्याने त्याने पूर्णपणे मान टाकली होती. या गिधाडाला तिने घरी आणलं. गिधाड प्रजातीचं अस्तित्व गंभीर धोकादायक | Critically Endangered | स्थितीत असल्याने तुम्ही याच्यावर घरीच उपचार करा, असं वन खात्याने सांगितलं. आता त्याला ठेवायचं कुठं, तर सुखदाने त्याची रवानगी तिच्याच ऐसपैस बाथरूममध्ये केली. कारण पंख फैलावले तर तो खूप मोठी जागा व्यापतो. सुखदाचं बाथरूमही मोठं असल्याने त्याच्यासाठी तीच जागा उत्तम होती. जवळपास आठवडाभर ते गिधाड सुखदाकडे मुक्कामी होतं. तिचे सगळे मित्र त्याला खाऊ घालायला यायचे. त्याची सगळी शुश्रूषा सुखदासह तिचे मित्र करायचे. सुरुवातीचे दोन दिवस या गिधाडाने त्यांना कोणतीही इजा केली नाही. जे काही उपचार केले जायचे त्याला ते छान प्रतिसाद द्यायचे. तिसऱ्या दिवशी ते जसजसं बरं व्हायला लागलं, तसतशा त्याच्या हालचाली वाढू लागल्या. गिधाडावर लक्ष ठेवण्यासाठी सुखदाने बाथरूममध्ये कॅमेरा फिट केला होता. तो उड्या मारायचा, पंख पसरायचा, उडण्याचा प्रयत्न करायचा. एवढं अवाढव्य गिधाड हाताळायचं जोखमीचंच होतं; पण सुखदा व तिच्या मित्रांना असे पक्षी हाताळण्याची एव्हाना सवय झाली होती. अशा मोठ्या पक्ष्यांना हाताळताना त्याचे तोंड सॉक्स किंवा रुमालाने झाकायचे. त्याला दिसलं नाही की तो शांत राहतो. अंधारात ठेवलं, की त्यांचा तणाव कमी होतो. बहुतांश पक्षी तणावानेच प्राण सोडतात. त्यामुळे डोळे झाकणे हा त्यांचा तणाव कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. मग त्याला हाताळणे सोपे जाते. पक्ष्यांना सांभाळताना सुखदाला अशा अनेक गोष्टींची माहिती झाली होती. गिधाडाच्या सगळ्या हालचाली तिने कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. पूर्णपणे ठणठणीत झालेलं हे गिधाड  | Vulture | जेथून पकडलं, तेथे सोडल्यानंतर ते इतकं अप्रतिम उडालं, की ती भावना सुखदा शब्दांत सांगूच शकत नव्हती. सुखदासाठी हा अनुभव खूपच वेगळा होता. तसं त्यांनी गेल्या वर्षी तीन गिधाडं वाचवली आहेत. दोन गिधाडं तर वन खात्यातच ठेवली होती. असे मोठे पक्षी सोडायचे असतील तर वन खात्याचा कर्मचारी सोबत आवश्यक असतो.

वर्षानुवर्षे अनेक प्रजातींतील पक्ष्यांची काळजी घेण्याचा सुखदाला अनुभव आहे. त्यातूनच तिचा या पक्ष्यांशी संवाद सातत्याने सुरू असतो; पण ती एक गोष्ट प्रकर्षाने टाळते, ते म्हणजे त्यांच्याशी गरजेपुरताच संपर्क ठेवते. तिच्याकडे एक पक्षी असाही आहे, ज्याला दुपारी मोकळं सोडलं, की सायंकाळी त्याला झोपायला लागतं. त्याची झोपण्याची वेळ झाली की तो स्वत:च पिंजऱ्यात जाऊन झोपतो. त्याला पकडून पिंजऱ्यात ठेवण्याची गरज पडत नाही. कारण तो कायम पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला त्या पिंजऱ्याची सवयच जडली आहे. त्याच्या आधीच्या मालकाने त्याच्यावर केलेला हा एक अत्याचारच म्हणावा लागेल. कारण त्याच्या नैसर्गिक सवयी तो पक्षी विसरला होता आणि त्याला माणसांच्या सवयी लागल्या होत्या.

एक पक्षीण आहे, जिला थंडीचा खूप त्रास झाला होता. ती जखडून गेल्याने पिंजऱ्यातच पडली होती. त्यावर सुखदाने हिटर किंवा शंभर वॉटचे बल्ब लावून उष्णता निर्माण केली. थंड पडलेल्या पायांना गरम पाण्याच्या बाटलीने शेक देत ती या पक्ष्यांची काळजी घेते. गेल्या वर्षी बुलबुलचे एक पिलू आलं होतं, त्यालाही असाच त्रास झाला होता. तेव्हा तिने हेच प्रयोग त्या पिलावर केले होते. ती अगदीच नवजात पिलं होती. अंड्यातून बाहेर आल्या आल्या तिने या पिलांचे संरक्षण करण्यासाठी घरी आणले होते. तीन दिवस ती छान राहिली. मात्र, तिच्याकडे तापमान नियंत्रित करण्याचं हिटर नसल्याने ती पिलं कडाक्याच्या थंडीत मृत्युमुखी पडली. तिला त्याचं खूप दुःख झालं होतं. ती म्हणते, “मी या पक्ष्यांकडून खूप काही शिकत आहे; पण त्या शिकण्यातून एखाद्या पिलाचा जीव नको जायला. मी शिकेन दुसऱ्याचं पाहून; पण त्या पक्ष्याच्या जिवावर बेतायला नको.” हे तिचं वाक्य तिचं संवेदनशील मन उलगडतं.

खूपच गंभीर आजार असलेल्या पक्ष्यांचा मृत्यू होतो. असे पक्षी उपचारांनाही प्रतिसाद देत नाहीत. तिच्याकडे असंच एक गंभीर आजारी घुबड आलं होतं. त्याला विषबाधा झालेली होती. त्याने असा उंदीर खाल्ला होता, ज्या उंदरावर कोणी तरी विषप्रयोग केला होता. थोडक्यात म्हणजे उंदीर मारण्याचं औषध त्याने खाल्लं असेल आणि असा उंदीर या घुबडाने खाल्ला. अशी अनेक घुबडं सुखदाने जवळून पाहिली आहेत. विषबाधेमुळे त्या घुबडाची खूप काळजी घ्यावी लागली. मात्र, तो काळ दिवाळीचा होता. बाहेर जसजसे फटाके वाजायचे, तसतसं हे घुबड घाबरून पिंजऱ्यातच पडायचं. तिने त्याच्यावर चादर टाकून पाहिली, बॉक्समध्ये ठेवून पाहिलं, जेणेकरून त्याची फटाक्यांच्या आवाजातून सुटका होईल; पण काहीही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्या पक्ष्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला. अनेकांना दिवाळी आणि मकरसंक्रांतीचा सण आवडत असेल; पण हेच सण पक्ष्यांच्या जिवावर उठणारे आहेत. नेमक्या याच कारणामुळे सुखदाला हे दोन्ही सण अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच ती फटाके वाजवून दिवाळी अजिबात साजरी करीत नाही. फटाक्यांनी तर खूप पक्षी मरतात. अशा वेळी सुखदाकडे पक्षी उपचारासाठी असतील तर त्यांना सांभाळताना खूप अडचणी येतात.

लोकांमध्ये पक्ष्यांविषयी प्रचंड अंधश्रद्धा आहे. विशेषतः घुबडांविषयी तर प्रचंड! सुखदाला तर हे अनुभव पदोपदी येतात. एकदा एक घुबड | Owl | रहिवासी भागात आलं होतं. घुबडांचं वैशिष्ट्य असं आहे, की ते दिवसा झोपतात आणि रात्री ते सक्रिय राहतात. दिवसा हे घुबड कुठं तरी बसलेलं असताना कावळ्यांच्या त्रासाने ते खाली पडलं. ते एका बाईने पाहिलं. तिला वाटलं, हे घुबड आजारी तर नाही? पण ते फक्त बसलेलं होतं. दिवसा ते एकाच जागेवर स्तब्ध होतात. फारशा हालचाली करीत नाहीत. त्या बाईला यातलं काहीही माहिती नव्हतं. तिने त्याच्यावर हळदीकुंकू वाहून त्याचं औक्षण केलं आणि त्याचे फोटो इकोएको ग्रुपला पाठवले! सुखदाकडे घुबड | Owl | असेल तर काही जण त्याचं पीस मागतात. हे पीस देवघरात ठेवल्याने बरकत येते, अशीही एक अंधश्रद्धा | Superstition | आहे. कारण काय, तर घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. त्यामुळे व्यापारी लोक या घुबडाचं पीस मागतात. त्याच्यामुळे म्हणे, पैसे वाढतात! सुखदाला तर अशी लोकं खूप भेटतात. सुखदा अशा लोकांना निक्षून सांगते, अजिबात मिळणार नाही. कारण या लोकांना पीस दिलं तर एक प्रकारे अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे.

सुखदाचे वडील सतीश गायधनी तिला प्रोत्साहन देतात; पण कधी कधी त्यांच्या मनाला पटत नाही. त्यांना वाटतं, की सुखदा ही तिच्या जिवापेक्षा जास्त करते. कारण सुखदाकडे आधी चार कुत्री होती. त्यात अधुनमधून येणारे पक्षी, मधेच कधी तरी गिधाडासारखे अनाहूत पाहुणे, या सगळ्यांचं करायचं म्हणजे सोपं काम मुळीच नाही. एक प्रकारे तान्हुलं मूल सांभाळण्याइतकी त्यांची काळजी घ्यावी लागते. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी सुखदाने का घ्यावी, असा प्रश्न त्यांनाही पडतो.

कधी कधी सुखदाला तिचे वडील व्यावहारिक प्रश्न विचारतात- “तू जे काही हे करते त्याला किती खर्च येतो. तुझ्या या तीन कुत्र्यांनाच खाऊ घालण्यासाठी तुला सरासरी किती खर्च येतो?”

या प्रश्नामागे वडिलांचा रोख होता, की हे सगळं करूनही तुला त्यातून काय मिळतं? जर काहीही मिळत नाही तर उगाच जिवाचे हाल कशासाठी करून घ्यायचे? बस, एवढंच वडिलांना सांगायचं होतं.

सुखदा हा रोख साफ दुर्लक्षित करते आणि वडिलांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच ती त्यापुढेही जाऊन निरागसपणे म्हणते, “नाही अजून एवढंच नाही, आजूबाजूची पाच-सहा कुत्रीही आहेत, त्यांनाही मी खाऊ घालते..!!!”

वडील म्हणतात, “बरं, ही सगळ्या कुत्र्यांसह तुला सरासरी किती खर्च येतो?

वडिलांचा व्यावहारिक प्रश्न तिच्या डोक्यावरून जातो. तेव्हा तिचे वडील म्हणतात, “या सगळ्यांवर महिन्याला सरासरी आठ-दहा हजार रुपये खर्च येतो. यात औषधे, जाण्या-येण्याचा खर्च वेगळाच. त्यासाठी वेळही द्यायचा. सुखदाचा स्वभाव चांगला आहे. तिला कोणीही सांगितलं, की अमुक ठिकाणी पक्ष्याला वाचवायचं आहे, तर सुखदा ते टाळत नाही; पण हे कुठपर्यंत करायचं, त्यालाही काही मर्यादा आहेत की नाही?” तिच्या वडिलांचा हा प्रश्न पुन्हा उरतोच.

सुखदाचं यावरही निरागस उत्तर- “खर्च येत असला तरी आमच्या संस्थेचं 80 जी सर्टिफिकेट अजून आलेलं नाही. ते आलं, की आम्हाला सीएसआर फंडातून निधी देण्यास कंपन्या तयार आहेत. एकदा तो आला, की आम्हाला या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणखी चांगल्या सुविधा देता येतील. आता आमच्याकडे 80 जी सर्टिफिकेट नसल्याने आम्हाला पक्ष्यांसाठी लागणारा निधी मिळत नाही.”

येवल्यातील गवताळ जंगलाला दिली संजीवनी

सुखदाने येवल्यात मे २०१९ मध्ये इको एको ग्रुपच्या वॉटर फॉर वाइल्ड लाइफ | Water for Wild Life | प्रोजेक्टवर काम केलं आहे. हा प्रोजेक्ट इको एको ग्रुपच्या पंखात बळ देणारा ठरला आहे. येवल्यात काळविटांचं अभयारण्य आहे. तिथं दरवर्षी पाणी नाही म्हणून बहुतांश काळविटांचा | Black Buck | मृत्यू व्हायचा. गवताळ जंगल असल्याने तेथे केवळ काळवीटच नाही, तर तरस आणि इतर बरेच पक्षीही आहेत. यावर काय उपाय करता येईल, यावर इकोएको ग्रुपने तिथल्या आरएफओशी संपर्क साधला. मग योजना ठरली. ग्रुपने प्रत्येक सदस्याकडून एक हजार रुपयांप्रमाणे पैसे गोळा केले. अशी एकूण ३० हजार रुपयांची वर्गणी जमली. त्यातून त्यांनी सहा टँकरची व्यवस्था केली. अभयारण्यातील जे कृत्रिम तलाव आहेत, त्यात टँकरचे पाणी ओतायचं. सुरुवातीला सुखदासह इको एको ग्रुपच्या सदस्यांनी स्वतः तेथे हजर राहून पाणी भरलं. एवढंच नाही, तर रात्री तेथे कॅमेरेही लावले. हेतू हाच, की या प्रयोगाने वन्यजिवांना कसा फायदा होतो, याचं निरीक्षण करता येईल. आनंदाची बाब म्हणजे, अनेक प्राणी, पक्ष्यांना त्या पाण्याचा उपयोग झाल्याचे कॅमेऱ्याने टिपले. इकोएको ग्रुपने त्याची एक फिल्म बनवली. ही फिल्म लोकांना दाखवून आवाहन केलं, की तुम्हीही यात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे वन्यजीव वाचतील. हा प्रयोग यशस्वी झाला आणि लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी ‘इको एको’च्या या प्रोजेक्टला मदत केल्याने तब्बल आठ लाखांचा निधी जमला. यातून फायदा असा झाला, की पावसाळ्यापर्यंत नियमित टँकरने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. याच निधीतून त्यांनी आणखी दहा-बारा कृत्रिम तलाव तयार केले. पहिल्या पावसाच्या सरीपर्यंत रोज दोन टँकरद्वारे दोन तलाव भरत होते. त्याचा परिणाम असा झाला, की वर्षभरात एकाही काळविटाला पाण्याअभावी जीव गमवावा लागला नाही. तरस, कोल्हे, पक्ष्यांचेही फूटेज इको एको eco echo | ग्रुपने टिपले. ग्रुपच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेऊन वन खात्याने त्यांना ट्रॉफी देऊन गौरविले. सुखदाच्या ग्रुपचा हा गौरव त्यांचा हौसला बुलंद करणारा ठरला. 

पक्ष्यांची, प्राण्यांची देवदूत बनली सुखदा गायधनी

‘इकोएको’ने आता नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे, तो म्हणजे रस्ते अपघातात मृत्यू | Roadkill Wild Animals | होणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद घेऊन त्यांच्या बचावासाठी कार्य करणे. त्यासाठी त्यांनी नाशिक- त्र्यंबकेश्वर, नाशिक- सिन्नर हे मार्ग निवडले. या मार्गांवर कोणत्या मोसमात कोणत्या वन्यप्राण्यांचा अपघाती मृत्यू होतो, याची माहिती त्यांनी गोळा केली. त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्या. २०१७ ते २०१९ दरम्यान या मोहिमेत तब्बल साडेपाचशे वन्यजिवांना अपघातात जीव गमवावा लागल्याचे समोर आले. केवळ याच दोन मार्गांवरची ही आकडेवारी आहे. इतर मार्गांवरील स्थिती काय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी! सर्वाधिक मृत्यू सापांचे होत असल्याचेही त्यांना आढळले. हा सर्व्हे करताना त्यांनी या मार्गांवर कॅमेरे लावले होते. त्यात त्यांनी तीन-चार मादी तरसांच्या वर्तनशैलीचाही अभ्यास केला. दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्या तरसांवर ते अभ्यास करीत होते, ते सर्व रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले. एक मादी तरस गर्भवती असतानाच रस्ते अपघाताची बळी ठरली. म्हणजे एका तरसाचा जीव गेला नाही, तर तिच्या पोटात असलेल्या जिवांचाही यात बळी गेला. एक पिढीच या अपघाताने संपून गेली. यात कुत्र्यांचा विषय तर स्वतंत्र आहे; पण इतर जे वन्यजीव आहेत, त्यांचा मृत्यू गंभीर आहे. एका मादी सरड्याचाही असाच मृत्यू झाला, जिच्या पोटात अंडी होती. हे सगळंच चित्र अंगावर शहारे आणणारं आहे. मादी सर्पाचीही शोकांतिका अशाच रस्ते अपघातातून पुढे आली. ती मृत्युमुखी पडली त्या वेळी तिच्या पोटात १५ अंडी होती. त्यातील सहा अंडी इकोएको ग्रुपने वाचवली. त्यातून पिलंही बाहेर आली. ही सगळी माहिती केवळ कॅमेऱ्याच्याच आधारावर घेतली असं नाही, तर सुरुवातीला रात्री दहा-अकराला हे सर्व सदस्य या रस्त्यांवर फिरायचे. मध्यरात्री दोन-तीनपर्यंत माहिती घ्यायचे. हे ऐकायला सोपं वाटतं; पण प्रत्यक्षात ते राबवणं सोपं नाही. कारण एवढ्या रात्री सुखदाही सहभागी असायची. सुखदाच्या बोलण्यातून या मोहिमेची तीव्रता मनाला भिडते. त्र्यंबकेश्वरच्या वन खात्याकडूनही त्यांना माहिती मिळायची. त्यावर उपाययोजना म्हणून पहिल्या टप्प्यात या रस्त्यांवर फलक लावण्यात येणार आहेत. कोणत्या ठिकाणी कोणत्या प्राण्यांचा मृत्यू जास्त होतो, कोणत्या वेळेत कोणते प्राणी रस्त्यावर येतात, याची सगळी माहिती ग्रुपने गोळा केल्याने त्याच्या आधारावर असे सावधगिरीचे फलक वाचून तरी वाहनचालक वाहने हळू चालवतील, अशी ग्रुपला अपेक्षा आहे. पक्ष्यांची, प्राण्यांची देवदूत झालेली सुखदा गायधनी जेव्हा फिल्डवर काम करते तेव्हा ते कल्पनेपेक्षाही अवघड आहे. यात घरच्यांच्या जिवाला लागलेला घोर वेगळाच.

वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचा | Wildlife Trust Of India | रॅपिड अॅक्शन | Rapid Action | नावाचा एक प्रोजेक्ट आहे. छोट्या छोट्या शहरांत ज्या एनजीओ वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करतात त्यांना ते निधी देतात. उदाहरणार्थ, प्राण्यांची सुटका करणे, त्यासाठी लागणारे साहित्य यासाठी ते हा निधी देतात. सध्या इकोएको ग्रुप वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया | Wildlife Trust Of India | अंतर्गत सप्टेंबर २०१९ पासून ‘रॅपिड अॅक्शन प्रोजेक्ट’वर | Rapid Action Project | काम करीत आहे. रस्ते अपघातातील वन्यप्राण्यांच्या मृत्यूवर ‘इकोएको’ने राबविलेला उपक्रम वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाला | Wildlife Trust Of India | सादर केला आहे. हाच प्रोजेक्ट वन विभागालाही सादर करण्यात आला आहे. यातून या ग्रुपला पूर्ण निधी मिळेलच असे नाही; पण जो निधी मिळेल त्यातून या ग्रुपचं काम सुरू होईल. लोकांना आधी आपण काय काम करतोय, हे आधी दाखवावं लागेल. त्यातून लोकंही या उपक्रमात सहभाग नोंदवतील. जसं ‘वॉटर फॉर वाइल्डलाइफ’वर  | Water for WildLife | काम केलं, तसाच प्रतिसाद रस्ते अपघातातील वन्यप्राण्यांचे मृत्यू रोखण्याच्या उपक्रमातही होईल, अशी ‘इकोएको’ला आशा आहे.

सुखदा जेव्हापासून इकोएको ग्रुपशी जोडली गेली, तेव्हापासून तिने स्वतःचं आयुष्य या वन्यप्राणी, पक्ष्यांनाच अर्पण केलं असं म्हंटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण केव्हा फोन येईल याला निश्चित असा काळ नसतो. रात्रीही फोन आला तरी सुखदा प्राणी, पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी बाहेर पडते. वडिलांनाही आता ते नवीन राहिलेलं नाही. त्यांनाही माहीत आहे, की सुखदा हे काम किती कळकळीने करते. सुखदाने नोकरी केली असती तर कदाचित ती या सर्व गोष्टींसाठी वेळ देऊ शकली असती का, याबाबत तिलाच शंका आहे. सुखदाचं यात सातत्याने व्यस्त राहणं कधी कधी आईवडिलांच्या रोषाचं कारणही ठरतं. तरीही त्यांचा तिला पाठिंबा असतोच, किंबहुना तो देण्याशिवाय कदाचित त्यांना गत्यंतरही नाही. कारण सुखदा इतकं मन लावून त्या प्राणी-पक्ष्यांची काळजी घेत असते, की ते पाहून तिला त्यापासून रोखण्याचं धाडस त्यांना होत नाही. कारण कितीही म्हंटलं तरी त्यांच्याही मनाचा एक कोपरा प्राण्यांविषयीच्या तळमळीने भिजलेला आहे. त्यामुळे कितीही मनातून विरोध असला तरी तो भिजलेला कोपरा तिला रोखण्यास धजावत नाही.

सुखदाला आठवड्यातून किमान दोन-तीन रेस्क्यू | Bird rescue | असतातच. ते केव्हाही येऊ शकतात हे इथं खूप महत्त्वाचं आहे. एकूण ग्रुपचा विचार केला तर महिन्याला दहा-बारा रेस्क्यू होतातच. या ग्रुपचं रेस्क्यू ऑपरेशनही | Rescue Operation | शिस्तबद्ध आहे. त्यांनी एरिया वाटले आहेत. काहींना गंगापूरचा भाग दिला जातो, तर काही द्वारका परिसर, तर काहींना इतर विभाग. सुखदा ज्या परिसरात राहते, तो द्वारका परिसर तिच्याकडे आहे. सुखदाकडे जे चार-पाच पिंजरे पाहायला मिळतात, तसे प्रत्येक सदस्याकडे आहेत. सगळेच सुखदासारखे झपाटून काम करणारे आहेत. त्यामुळे कोणीही एखादा पक्षी सोडवून आणला आणि त्याला ठेवण्यासाठी जागा नसेल तर तो दुसऱ्या सदस्याकडे हस्तांतरित केला जातो. खरं तर या पक्षी, प्राण्यांवर एकाच ठिकाणी उपचार व्हायला हवेत. त्यासाठी गंमत-जंमत हॉटेलजवळ एका नर्सरीत असं ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर | Transit Treatment Center | सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या पक्ष्यांची व्यवस्था या ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरवर’च होऊ शकेल.

सुखदाला साप पकडता येत नाही. कधी कधी बिनविषारी साप पकडण्याचा प्रयत्नही करते; पण कोणी तरी तिचं नाव एका वृत्तपत्रात सर्पमित्र म्हणून दिलं होतं. त्यामुळे तिला साप पकडण्यासाठीही फोन येतात. तिला सांगावं लागतं, की मी सर्पमित्र नाही, तर पक्षिमित्र आहे! तिला आता हे कळतंय, की कोणता विषारी आहे नि कोणता बिनविषारी. त्यामुळे बिनविषारी साप पकडण्याचं तंत्र एव्हाना तिला बऱ्यापैकी अवगत झालं आहे. पोरगी साप पकडते म्हणून तिची आई काळजीतच पडली. आई तिला म्हणाली, “बाई, तू तरस, बिबट्या पकड; पण साप काही पकडू नको.” मग आता साप पकडायचा असेल तर ती आईला घेऊन जाते. सुखदाला साप विषारी की बिनविषारी कळतं; पण माणसांना ती ओळखू शकत नाही हे ती प्रांजळपणे कबूल करते. ती प्राणी, पक्ष्यांमध्ये इतकी रमलीय, की मानवप्राण्याचा विचार करायला तिला वेळच नाही. ती म्हणतेही, “प्राणी, पक्ष्यांचं सतत निरीक्षण करून आपल्याला त्यांची भाषा कळू लागते; पण ज्या माणसांमध्ये आपण लहानाचे मोठे होतो, त्यांची भाषा मात्र कोणीही समजू शकलेलं नाही.”

वडील सुखदाच्या या कामाचं कौतुकही करतात आणि कधी कधी त्रागाही करतात. ती तिच्या या कामात बापच आहे; पण तिच्या वडिलांना एक काळजीयुक्त प्रश्न पडतो, तो म्हणजे सगळाच समाज हे स्वीकारेल का? तिची आई स्मिता गायधनी तर सुखदाला ‘पक्ष्यांची बाबा आमटे’च म्हणते. जसं समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी बाबा आमटेंनी जे काम केलं आहे, तसंच ती माणसाच्या विकृतीमुळे जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी करतेय!

तिचे वडील म्हणतात, “सुखदा जे काही काम करतेय, त्याचा आम्हाला काहीही त्रास नाही. सुरुवातीला झाला. कारण तिने करिअरकडे दुर्लक्ष केलं. (अर्थातच हे फक्त वडिलांच्या दृष्टीने.) एक पिता म्हणून मुलीप्रति माझीही काही जबाबदारी आहे. सुखदाचा भावी जोडीदारही हे सगळं स्वीकारणारा हवा.”

सुखदाची काळजी करणारे वडील आपण समजू शकतो. कारण सुखदाने सुरुवातीला डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये औषधशास्त्र विभागात प्रवेश घेतला; पण त्यात तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता. ते तिने सोडलं आणि आपल्या आवडीच्या विषयात पर्यावरणशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. ते करता करताच तिने पक्षिविज्ञान अभ्यासक्रम पूर्ण केला. ते पूर्ण केल्यानंतर सुखदाने आईसोबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतून जैवविविधता | Biodiversity | अभ्यासक्रम केला. मग ती नाशिकमध्ये परतली. इथं आल्यावर काय करायचं, हा प्रश्नच होता. मग तिने तिच्याच वडिलांच्या कर्मयोग इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड या फॅक्टरीत काम सुरू केले. तिच्या शिक्षणाचा आणि फॅक्टरीतल्या कामाचा दुरान्वयेही संबंध नसताना ते काम सुखदा सध्या करीत आहे. ती आता फॅक्टरीतही छान रमली आहे.

सुखदाच्या भावी जोडीदाराविषयी वडिलांना जे वाटतंय त्याचा ती फारसा विचार करीत नाही. कदाचित तिला माहिती असावं, की आपण प्राणी, पक्ष्यांना आपलंसं केलं, भावी जोडीदाराला का नाही करू शकणार? तिच्या या प्राणी, पक्षिप्रेमाची प्रचीती तिच्या घरच्यांना अनेकदा आली आहे. एकदा तिच्या बहिणीचा साखरपुडा सुरू असताना दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास तिच्याच फॅक्टरीतून फोन आला, की “मशीनजवळ साप निघाला. सुखदा आहे का तिथं?” त्या वेळी नुकतीच जेवणावळी सुरू होती. सुखदाला साप तर पकडता येत नव्हता. मग तिने तिच्या मित्राला फोन केला. त्याने फॅक्टरीत जाऊन साप पकडला. त्या वेळी समारंभ सोडून सुखदाही फॅक्टरीत पोहोचली.

सुखदा आतापर्यंत जिथं रेस्क्यू करायला गेली तिथं लोकं त्यांना आस्थेवाईकपणे अजिबातच विचारत नाही. जणू काही ही त्यांची ड्यूटीच आहे, अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. एकदा एका घुबडाला वाचविण्यासाठी ते एका ग्रेफाइट इंडिया नावाच्या कंपनीत गेले होते. तिथं गेल्यावर त्या कंपनीने त्यांना चहा दिला. घुबडाला वाचवलं म्हणून त्या कंपनीने त्यांना एक प्रमाणपत्रही दिलं. तिला या एकूणच प्रकाराचं कमालीचं कुतूहल वाटलं. ती घरी आल्यावर आईला म्हणाली, “आई, मला त्यांनी चहा दिला!”

सुखदा म्हणते, आपल्याकडे कावळा, चिमणीपलीकडे पक्ष्यांची माहितीच नाही. याव्यतिरिक्तही अनेक पक्षी आहेत, त्याची ओळख जाणून घेण्यात कोणालाही रस नाही. हे सांगताना अंगणातील झाडांवर बसलेल्या पक्ष्यांची माहिती सुखदा पटापट देत होती. तो बघा, सनबर्ड नर-मादीची जोडी. तो जो दिसतोय ना पर्पल, तो नर आहे आणि ती यलो रंगातली दिसतेय ना, ती मादी आहे. आपल्याकडे बोनेलीज ईगल | Bonelli’s Eagle | हा पक्षी आढळतो. अनेकांना माहितीच नाही, की असा पक्षी आपल्या नाशिक परिसरात आहे. पंचरंगी पोपट काही वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आढळायचा. मात्र, आता त्याचं अस्तित्वच धोक्यात आल्याने तो नाशिक शहरातूनच हद्दपार झाला आहे. ते आता शहराच्या बाहेर आढळतात. हुप्पू, पॅराडाइज फ्लायकॅचर | Paradise Flycatcher | हे पक्षी नाशिकमध्ये आढळायचे; पण वाढत्या नागरीकरणामुळे तेही आता दिसेनासे झाले आहेत. सुखदाने अंगणात अशीच झाडं लावली, जिथं पक्षी येतील. त्यामुळे तिच्या अंगणात सकाळी आणि सायंकाळी पक्ष्यांची शाळा भरते. तिने गुलाबाची झाडंही अंगणात ठेवली नाहीत. ज्या झाडांवर पक्षी येत नाहीत, ती झाडं तिने उपटून फेकली. अर्थात, हा अधिकार फक्त सुखदाच गाजवते. घरातील इतरांना झाडाचं पानही तोडण्याचा अधिकार नाही. एकूणच तिच्या आईवडिलांना झाडाची फांदी तोडण्याचीही चोरी. तिचं म्हणणं आहे, की पक्ष्यांच्या अशा काही जागा असतात, जिथं पक्षी नियमित येतात. त्या फांद्याच जर तुम्ही तोडून फेकल्या तर ते पुन्हा येणार नाहीत.

पक्ष्यांसाठी हा सगळा खटाटोप पाहिला की कौतुक वाटतं. पक्ष्यांची आत्मीयतेने शुश्रूषा करणारी सुखदा तिच्या आईला कधी बाबा आमटे वाटते, तर वडिलांना ती पक्ष्यांची परिचारिका वाटते. कुणाला ती पक्षिमैत्रीण वाटेल, तर कुणाला खगराज्ञी. कुणाला हीच सुखदा गायधनी पक्ष्यांची देवदूत वाटते. मुळात ज्या पक्ष्यांसाठी ती हे करते त्यांना ना वेदना सांगता येतात, ना मदत मागता येते. तडफडून मरणासन्न अवस्थेतील अशा पक्ष्यांना समजून घेणं, त्यांच्या मदतीला काळवेळ न पाहता धावून जाणं हे देवाचं काम नाही तर काय…? पक्ष्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी तिला देवदूतच म्हंटलं असतं. सगळ्यांच्या मदतीसाठी एकटा देव कुठे कुठे धावून जाईल? म्हणूनच त्याने काही माणसं या पृथ्वीतलावर पाठवली आहेत. सुखदा गायधनी त्यापैकीच एक पक्ष्यांची देवदूत..!

सुखदा पक्ष्यांची कशी काळजी घेते यासाठी हा व्हिडीओ पाहा…

[jnews_block_37 first_title=”Read more at:” header_text_color=”#59d600″ header_line_color=”#59d600″ include_category=”1632″]

Related Articles

7 Comments

  1. कृपया सुखदा यांचा मोबाईल नं द्यावा म्हणजे काही मदत लागली तर बोलता येइल. एकदा भारद्वाज पक्षी जखमी आवारात मिळाला. एका पक्षीमित्राला फोन केला तो आलाच नाही. मी त्याचा पत्ता घेवुन त्याचेकडे गेलो. त्याने काहीच दाखवले नाही. दोन दिवसानी फोन केल्यावर भारव्दाज गेल्याचे सांगितले. फार वाईट वाटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!