श्रीराम लागू म्हणायचे, देवाला रिटायर करा! हे मत क्रिकेटच्या देवाला मात्र काही लागू पडत नाही. असंख्य पाठीराख्यांच्या मनात आजही सचिनचं स्थान अढळ आहे. त्यापैकीच एक म्हणजे बिहारचा सुधीर गौतम चौधरी. एक निष्काम क्रिकेटयोगी! सचिन आणि सुधीरच्या मैत्रीचं अनोखं नातं, ज्याला सुधीरच्या पराकोटीच्या क्रिकेटभक्तीची किनार आहे…
संपूर्ण शरीर नखशिखांत तिरंग्याच्या रंगात रंगवलेलं, छातीवर सफेद रंगात तेंडुलकर 10 आणि हातात तिरंगा ध्वज… क्रिकेट आणि सचिनप्रति ओतप्रोत निष्ठा व्यक्त करणारी ही व्यक्ती तुम्ही क्रिकेटच्या स्टेडियमवर किंवा टीव्हीवर नक्कीच पाहिली असेल. ही व्यक्ती म्हणजे बिहारचा सुधीर गौतम चौधरी. त्याच्यासाठी सचिन देव आहे, तर तो भक्त.
सचिन ज्या वेळी रिटायर झाला, त्या वेळी सुधीर ढसाढसा रडला. त्याच्या निवृत्ती सोहळ्यात सुधीर पुन्हा त्याच वेशभूषेत आला, तोच हातात तिरंगा, अंगभर तिरंग्याने रंगलेला आणि छातीवर सफेद अक्षरात मिस यू तेंडुलकर 10. पण चेहऱ्यावर तो पूर्वीचा जोश नव्हता.
श्रीराम लागू म्हणायचे, देवाला रिटायर करा. लागू काहीही म्हणोत, पण ते मत क्रिकेटच्या देवाला काही लागू पडलं नाही. सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला; पण सुधीरच्या मनातून नाही… सचिन आणि सुधीरच्या मैत्रीचा हा धागा आजही घट्ट आहे. अर्थात, त्याला सुधीरच्या पराकोटीच्या भक्तीची किनार आहे.
सुधीर मूळचा बिहारचा. मुझफ्फरपूरमधील दामोदरपूर या छोट्याशा गावातला रहिवासी. घरची परिस्थिती हलाखीची. नोकरी नाही. मात्र, क्रिकेटप्रेमापोटी स्वतःला स्थिरस्थावर करण्याचा त्याने कधी विचारच केला नाही.
“क्रिकेटही मेरा लाइफ पार्टनर है। मै कभी शादी नहीं करुंगा। जब तक है जान तब तक तिरंगा लहराता रहुंगा. जिस दिन विकेट गिरी तब अलविदा कहुंगा…”
भारताच्या प्रत्येक सामन्यासाठी तो हजर असतो. मग तो सामना भारतात असो वा विदेशात. घरापासून महिनोन् महिने लांब राहिल्यानंतरही त्याला घराची ओढ कधी लागलीच नाही.
अगदी बहिणीच्याही लग्नाला तो गेला नाही. त्याला ‘सचिनेरिया’ आणि ‘क्रिकेटेरिया’ झाल्यापासून त्याने घराच्या सर्व जबाबदाऱ्या केव्हाच झुगारल्या होत्या.
जगभरात क्रिकेटचे अनेक फॅन तुम्ही पाहिले असतील… मग तो श्रीलंकेचा पर्सी असेल किंवा पाकिस्तानचे बशीरचाचा असतील, वेस्ट इंडीजचा ग्रेवी असेल किंवा आयर्लंडचा लॅरी. या सगळ्यांमध्ये सुधीरचं क्रिकेटप्रेम कमालीचे हटके आहे.
सुधीरची क्रिकेटभक्ती
सर्वसंगपरित्याग करणाऱ्या एखाद्या साधूचीही तपश्चर्या भंग पावेल, पण सुधीरची क्रिकेटभक्ती आजही अभंग आहे. सुधीरच्या क्रिकेटप्रवासाला यंदा 17 वर्षे पूर्ण होतील. मात्र, हा संपूर्ण प्रवास सोपा नव्हता.
मुलाने कर्ताधर्ता व्हावं, घर सावरावं ही प्रत्येक पालकाची मुलाकडून अपेक्षा असते. सुधीरच्या पालकांची हीच अपेक्षा होती; पण सुधीर त्यांची एकही अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्यांच्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं.
क्रिकेट आणि सचिन या पलीकडे त्याचं दुसरं विश्व नव्हतंच. सचिनचा खेळ तर त्याला कमालीचा आवडायचा. केवळ टीव्हीसमोर बसून सचिनला पाहण्यापेक्षा आपण त्याला एकदा तरी भेटायला हवं, असा विचार त्याच्या मनात आला; पण त्याला भेटायचं कसं? खिशात पैसे नाहीत. त्याने सायकल काढली नि थेट मुंबईकडे कूच केलं. हे वर्ष होतं २००३ चं.
सचिनशी पहिली भेट
सचिन मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार्टीत सहभागी होण्यासाठी पत्नीसोबत आला होता. सचिनच्या आगमनाबरोबर त्याच्या नावाचा एकच गलका सुरू झाला. सचिन आल्याचं कळताच सुधीरने हातातली सायकल सोडली आणि धावत धावत सचिनच्या पायावर लोळण घेतलं. सुधीरची सचिनशी झालेली ही पहिली भेट.
सचिनने त्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. सुधीर हा पहिला फॅन होता, ज्याला सचिनने घरी बोलावलं होतं. हा प्रसंग सांगताना सुधीर खूपच भावूक झाला होता. का नाही होणार, साक्षात त्याच्या देवानेच त्याला बोलावलं होतं..!
भारतभर सायकलने प्रवास
या घटनेनंतर पुढच्याच महिन्यात भारताचा मुंबईत सामना होता. जखमी असल्याने या सामन्यात सचिन खेळू शकला नाही. सुधीरने तो सामना पाहिला. इथूनच त्याला एक आत्मविश्वास मिळाला. तो खरं तर सायकलनेच दिला.
त्याने ठरवूनच टाकलं, की आता सामना पाहायला जायचं तर सायकलनेच. याच सायकलवर सुधीरने पुढे पाकिस्तान, बांग्लादेश दौरे केले. हे ऐकलं की थक्क होतं. अर्थात, या घडामोडींत आतापर्यंत त्याच्या दोन सायकली चोरीस गेल्या आहेत. पहिली गीअरची होती. नंतर मात्र त्याने साध्याच सायकली घेतल्या.
तीन नोकऱ्याही सोडल्या…
सचिन आणि क्रिकेटप्रेमाने सुधीरला अक्षरशः वेड लावलं होतं. सचिनला एकदा भेटल्यानंतर सुधीर स्वतःलाच विसरून गेला. सचिन त्याला म्हणाला, की आता ग्रॅज्युएशनची परीक्षा देऊन परत ये. त्या वेळी भारताचा पुढचा सामना कटकमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणार होता.
सुधीर इतका अधीर झाला होता, की त्याने परीक्षेला दांडी मारत कटक गाठले. हे कमी की काय, सुधीरने क्रिकेटसाठी तीन नोकऱ्यांवरही पाणी सोडले. सुरुवातीला तो बिहारमधील सुधा डेअरीमध्ये काम करायचा. या नोकरीतून जे पैसे कमावले, त्यात त्याने पासपोर्ट बनवला. यातून सुधीरचा परदेशातील सामन्यांचा मार्ग सुकर झाला.
यानंतर एकदाही सुधीरने फुल टाइम नोकरी केली नाही. नंतर सुधीरने शिक्षामित्रमध्ये काम केलं. हा त्याचा पार्ट टाइम जॉब. त्यामुळे त्याला भारताची प्रत्येक मॅच पाहणे शक्य व्हायचं. या जॉबशीच संबंधित एक प्रशिक्षण होतं. मात्र, त्या प्रशिक्षणाला न जाता तो भारताची मॅच पाहण्यासाठी सायकलवर पाकिस्तानला गेला.
२००५ मध्ये त्याला चांगल्या नोकरीची संधी चालून आली. ती होती तिकीट कलेक्टरची. यात तो फिजिकल टेस्ट आणि पूर्वपरीक्षाही उत्तीर्ण झाला. त्याची पहिली पोस्टिंग होती हैदराबादमधील लालगोंडाला. पण जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ आली, तेव्हा दिल्लीत भारत-पाकिस्तान सामना होता. या इंटरव्ह्यूमुळे हा सामना हुकेल म्हणून त्याने इंटरव्ह्यूचे लेटर फाडून दिल्लीकडे कूच केलं!
याला काय म्हणावं? जणू काही देव नोकऱ्यांचे आमिष दाखवत त्याच्या क्रिकेटप्रेमाची परीक्षा पाहत होता आणि सुधीर या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होत होता… क्रिकेटची परमभक्ती त्याने उगाच नाही गाठली.
भारताच्या सामन्यासाठी एकुलत्या बहिणीच्या लग्नालाही दांडी
सुधीरला कधीही फोन करा, तो हमखास उचलणार. कुणाचा फोन कॉल मिस होऊ नये म्हणून तो सोबत पॉवरबँक ठेवतो; पण बहिणीचा फोन असेल तर तो उचलत नाही. एकुलती बहीण असूनही तिच्या लग्नालाही तो गेला नाही.
कारण त्या दिवशीच भारताची मॅच होती. तो तिच्याकडे कधी रक्षाबंधनालाही गेला नाही. नुकताच तो एशिया कप स्पर्धेसाठी दुबईला गेला होता. अद्याप तो घरी परतलेला नाही.
आता तो हैदराबादला आहे. सुधीर जर तिकीट कलेक्टर झाला असता तर ती ओळख ठराविक क्षेत्रापुरती सीमित राहिली असती. मात्र, क्रिकेटवेडामुळे तो आज जगभर लोकप्रिय आहे.
सचिनच्या एका भेटीनंतर सुधीरचं जीवनच बदलून गेलं. तो नखशिखांत क्रिकेटमय झाला. सचिन एकदा त्याला म्हणाला, “सुधीर, तू अजून क्रिकेटच्या जवळ ये…” केवळ या वाक्याने सुधीरने सर्व ऐहिक सुखांवर पाणी सोडले.
सचिनवरील टीका सुधीरला कधीच सहन व्हायची नाही. टीकाकारांवर तो संतापायचा. आता तो काहीही बोलत नाही. चिवर परिधान केलेल्या बुद्धासारखा तो आता स्थितप्रज्ञ राहतो. सुधीरचे दौरे भारतीय क्रिकेट संघाइतकेच व्यस्त झाले आहे.
कधी श्रीलंकेत, तर कधी दुबईत, तर कधी ऑस्ट्रेलियात. मात्र, प्रत्येक मॅचचे तिकीट सचिनकडून असते. मात्र, जाण्या-येण्याचा खर्च तो स्वत:च करतो. खरं तर लोकांचं प्रेम सुधीरला जगायला भाग पाडतं. सुधीरची स्थिती हलाखीची आहे.
घरची स्थिती हलाखीची
त्याचं घर अतिशय साधं. पावसाळ्यात गळतं. अशा परिस्थितीत त्याला सगळाच खर्च परवडणारा नाही. रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून त्याला कार्यक्रम मिळतात. त्या बदल्यात त्याच्या प्रवासाचा खर्च ते उचलतात. अर्थात, हे नेहमीच घडते असे नाही. मात्र, राहण्याचा खर्च सुधीर स्वतःच करतो.
तो म्हणतो, मला राहण्याची अजिबात चिंता नाही. प्रत्येक ठिकाणी मला ओळखणारे आहेत. त्यांच्याकडे जाऊन मी राहतो. पाकिस्तानमध्ये त्याचा मुक्काम बशीरचाचांकडे असतो. हेच बशीरचाचा जे पाकिस्तानचे जबरदस्त पाठीराखे म्हणून ओळखले जातात.
पाकच्या बशीर चाच्यांशी घट्ट मैत्री
असे असले तरी सुधीर आणि बशीर चाचांची मैत्री घट्ट आहे. १३ फेब्रुवारी २००६ ची गोष्ट आहे. पाकिस्तानात गद्दाफी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होता. त्या वेळी सुधीरही या सामन्यासाठी आला होता. मात्र, सुरक्षेच्या नावाखाली सुरक्षा रक्षकांनी सुधीरच्या हातातील तिरंग्याचा दांडा काढून फेकून दिला.
स्टेडियममध्ये हानी पोहोचवणारी कोणतीही वस्तू नेण्यास परवानगी नव्हती. त्याच वेळी तिथे बशीरचाचा आले. त्यांनी सुधीरला मदत केली आणि तिरंग्याच्या दांड्यासह सुधीरला स्टेडियममध्ये प्रवेश मिळाला. दोघेही सोबत राहूनच आपापल्या देशांना प्रोत्साहन देत होते. यात पाकिस्तानचा संघ हरला; पण त्याचा परिणाम मैत्रीवर कधीच झाला नाही. सामना संपल्यावर सुधीरला बशीरचाचाने घरी नेले.
सुधीरचा हा प्रवास वरवर साधासोपा वाटत असला तरी प्रचंड यातनामय आहे. यात जेवणाची परवड आहे, प्रवासातील आव्हाने आहेत, त्यानंतर स्टेडियममध्ये प्रतिस्पर्धी पाठीराख्यांकडून त्याला मारहाणही झाली आहे.
या सगळ्याच गोष्टी तो फारसा शेअर करीत नाही. त्या यातना त्याने दडवून ठेवल्या आहेत. आपल्याला दिसतो तो रंगरंगोटी केलेला सुधीर. त्या रंगरंगोटीच्या आतही सुधीर आहे. तो मात्र कधीच समोर येत नाही.
सचिन आणि क्रिकेटभक्तीने त्याच्या यातनांवर फुंकर घातली आहे. त्यामुळे सुधीरने आपलं भविष्य झिडकारलं आहे. भूतकाळ केव्हाच पुसला आहे. जे आहे ते वर्तमान. म्हणूनच सुधीरने लग्नाचा विचार कधीच केला नाही.
“क्रिकेटही मेरा लाइफ पार्टनर है। मै कभी शादी नहीं करुंगा। जब तक है जान तब तक तिरंगा लहराता रहुंगा. जिस दिन विकेट गिरी तब अलविदा कहुंगा…” सुधीरचं हे वाक्य शरीराला कंप आणतं.
काय हे आयुष्य, जे संपूर्ण क्रिकेटसाठी वाहिलं… ज्यात स्वत:साठी काहीच नाही. जे काही दुसऱ्यांसाठीच. कोणतीही आसक्ती नाही. फक्त वाहत राहणं… अगदी निष्काम कर्मयोग्यासारखं.
आठवणीतला २०११ चा वर्ल्डकप
२०११ च्या वर्ल्डकपमधील आठवणीतून सुधीर अजूनही बाहेर पडलेला नाही. हा वर्ल्डकप त्याच्यासाठी खास आहे. त्याला कारणही तसंच आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना पाहण्यासाठी सुधीर सायकलने आला होता.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. सुधीरही कमालीचा उत्साही दिसत होता. त्या वेळी सचिनने सुधीरला ड्रेसिंग रूममध्ये बोलावून त्याच्या हातात वर्ल्डकप दिला.
सुधीरला विश्वासच बसेना. वर्ल्डकपला आपण कधी स्पर्शही करू हे त्याने स्वप्नातही पाहिलं नव्हतं. मात्र, सचिनमुळे तो वर्ल्डकपला स्पर्श करू शकला. हा प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही, असं सांगताना सुधीरचे हुंदके दाटले होते.
सचिनच्या निवृत्तीने सुधीर हळवा
१६ नोव्हेंबर २०१३ रोजी सचिनचा निवृत्तीसोहळा संपूर्ण भारताने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. त्या वेळी प्रत्येक भारतीयाचे डोळे पाणावले होते. एरव्ही चैतन्य पसरवणारा सुधीर या वेळी कमालीचा सद्गदित झालेला दिसत होता.
सुधीरला याबाबत भावना विचारल्या, तर तो म्हणाला, ‘वो क्रिकेट से रिटायर हुए है, दिल से नहीं..’ सुधीरला फोन केला, की सचिनचे ते निवृत्ती सोहळ्यातील भाषण आजही कानी पडतं.
सुधीरची डायलर ट्यूनच सचिनचे शब्द आहेत. क्रिकेटच्या देवाचा मैदानावरील प्रवास संपला होता, तर सुधीरच्या भक्तीचा दीप अजूनही तेवत आहे…
सुधीरने पाहिलेले सामने
३०७ वनडे
६५ कसोटी
७२ टी-20
६८ आयपीएल
०३ रणजी ट्रॉफी
०१ आयपीएल चॅम्पियन्स लीग
(२००१ पासून ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंत)
Follow us
Comments 1