All SportschessSports Review

नाशिकच्या बुद्धिबळातली निष्क्रियता संपणार कधी?

नाशिकमध्ये फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच झाली. नाशिकच्या बुद्धिबळ इतिहासातली ही पहिलीच स्पर्धा होती, जिचा जिल्हा बुद्धिबळ संघटनेशी कोणताही संबंध नाही! नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेला सध्या निष्क्रियता आली आहे हे यातून समोर आलेच आहे, शिवाय अंतर्गत कलहामुळेही ही संघटना बेजार झाली आहे. यात खेळाडूंचे मात्र नुकसान होत आहे हे या संघटनेला कधी कळणार? त्यामुळे सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे- नाशिकच्या बुद्धिबळातली निष्क्रियता संपणार कधी?

नाशिकमध्ये २००५ नंतर तब्बल दहा वर्षांनी राष्ट्रीय स्तरावरील खुल्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा झाली. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे एका क्रीडाप्रेमीने ठरवून घेतलेली ही स्पर्धा आहे. बुद्धिबळ संघटनेतील साठमारी पाहता, आताशा कोणी स्पर्धा घेण्याच्या फंदात पडत नाही. अशा स्थितीत रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटरचे संचालक मिलिंद कुलकर्णी यांनी ही स्पर्धा घेण्याचं धाडस केलं, ते कौतुकास्पद आहे. धाडस यासाठी, की या स्पर्धेला कोणीही प्रायोजक नाही! प्रायोजक असल्याशिवाय स्पर्धाच घ्यायची नाही अशी जी मानसिकता तयार झाली आहे तिलाच छेद देणारं हे कौतुकास्पद धाडस आहे.

यापूर्वी नाशिकमध्ये दोन रेटिंग स्पर्धा झाल्या आहेत. मात्र, त्या ११ व १७ वर्षांखालील वयोगटातील. त्याही राज्यस्तरीय. अर्थात, या स्पर्धांच्या आधी २००५ मध्ये आयबीपी फिडे रेटिंग स्पर्धा झाली होती, ज्यात श्रीलंकेतील खेळाडूंनीही भाग घेतला होता. अर्थात, ही स्पर्धा नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने नाही, तर नाशिक महानगर बुद्धिबळ संघटनेने घेतली होती. म्हणजे संलग्नतेशिवाय जिल्हा संघटनेचा या स्पर्धेशी तसा काही मोठा रोल नव्हताच.

त्यामुळे खुल्या गटात राष्ट्रीय स्तरावर २५ जुलैला झालेली दहा वर्षांतली ही पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेशी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा सूतराम संबंध नाही हे धक्कादायक आहे. जिल्हा बुद्धिबळ संघटनेने २०१३ मध्ये १७ वर्षांखालील, तर २०१४ मध्ये ११ वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय फिडे रेटिंग स्पर्धा घेतली असली तरी त्यामागे जी खेळाडूंसाठी कळकळ हवी होती ती नव्हती. प्रत्येक जिल्ह्याला शिखर संघटनेकडून स्पर्धा घेण्यास सांगितले जाते. त्यामुळे हे एकमेव कारण या स्पर्धांमागे होते. गेल्या आठवड्यात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमागे असं काहीही कारण नव्हतं. केवळ नाशिकच्या खेळाडूंना दर्जेदार स्पर्धेचा अनुभव मिळावा म्हणूनच ही स्पर्धा घेण्यात आली. दुर्दैव हेच, की नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना एवढ्या मोठ्या दिमाखदार स्पर्धेला मुकली. जे पदाधिकारी या संघटनेवर होते, त्यापैकी अनेक जणांनी स्पर्धेकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो, की नाशिकच्या बुद्धिबळातली निष्क्रियता संपणार कधी?

स्पर्धांचं सातत्य नाही

एकेकाळी नाशिकमध्ये अतिशय मानाची गोदावरी बुद्धिबळ स्पर्धा नाशिक जिमखान्यात व्हायची. त्याला आता सुमारे २५ वर्षांचा काळ लोटला असेल. आता ती अनेकांच्या विस्मरणातही गेली असेल. सातत्य नसल्याने बुद्धिबळाचं स्पर्धात्मक वातावरण लयास गेलं आहे. गोदावरी बुद्धिबळ स्पर्धेचं जे नाव होतं ते विस्मरणात जाण्यामागे हेच कारण आहे. नाशिकमध्ये जिल्हा स्तरावरील आणखी एक बुद्धिबळ स्पर्धा लक्षात राहण्यासारखी होती. ती म्हणजे गुलालवाडी व्यायामशाळेची. गणेशोत्सवाच्या ऐन धामधुमीत ही स्पर्धा दहा दिवस सुरू राहायची. रोज एकच फेरी व्हायची. हेही एक वैशिष्ट्य होतं या स्पर्धेचं. निरंजन गोखले, जयदीप शालिग्राम, जिगर ठक्कर, रुत्विक महाशब्दे, प्रकाश गोलेचा अशी अनेक खेळाडू अशा स्पर्धांमधूनच पुढे आले होते. अगदीच नाव घ्यायचं तर ‘निवेक’च्या बुद्धिबळ स्पर्धेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गेल्या अनेक वर्षांपासून ही स्पर्धा अखंडितपणे सुरू आहे. या स्पर्धेशीही जिल्हा संघटनेचा काडीचाही संबंध नाही. जळगावातही महावीर क्लासेसतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होत होती. ही स्पर्धा नाशिकच्या विनोद भागवतने सलग तीन वर्षे जिंकली. आता ही स्पर्धा होत नाही. तशा अन्य बुद्धिबळ स्पर्धा खान्देशात खूप होतात; पण बुद्धिबळप्रेमींना खान्देश किंवा जळगाव लक्षात राहील तो या महावीर बुद्धिबळ स्पर्धेमुळेच. स्पर्धेत सातत्य नसेल, तर खेळ खुंटतो. हे स्पर्धात्मक वातावरण जिल्हा संघटनेला वाढवताच आलं नाही. पदांसाठी मात्र कायम स्पर्धा होत राहिली! आता ज्या स्पर्धा होतात त्या चेस अॅकॅडमीपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. मंगेश गंभिरेची ग्रँडमास्टर चेस अॅकॅडमी, तसेच मॉर्फी चेस, त्यापूर्वीही रोशन भुतडा, विक्रम माळवणकर यांची फिशर चेस अॅकॅडमी होती. नंतर ती बुद्धिबळपटलावरूनच नाहीशी झाली. आनंद यशवंते यांनीही अधूनमधून स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोणत्याही स्पर्धा घ्यायच्या म्हणजे संघटनेचा सपोर्ट महत्त्वाचा असतो. आता तोच राहिला नाही हे नाशिकचं दुर्दैव. नाशिकच्या बुद्धिबळातली ही निष्क्रियता संपणार कधी, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

चेहरा असूनही खेळ मागे

नाशिक बुद्धिबळाला ग्रँडमास्टर विदित गुजराथीमुळे एक चेहरा लाभला, जसा भारतीय बुद्धिबळाला माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदमुळे लाभला आहे. आनंदनंतर भारतीय बुद्धिबळाने कमालीची प्रगती केली. नाशिकमध्ये विदितनंतर जे बुद्धिबळ वाढायला हवं ते वाढलं नाही. सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतमुळे नाशिकचं नाव धावपटूंचं शहर म्हणून चमकू लागलं, तसं बुद्धिबळाचं झालं नाही. यामागची कारणं पाहिली तर स्पर्धा न होणे आणि त्या न होण्याचं कारण म्हणजे संघटनेची निष्क्रियता. लहान वयोगटातील खेळाडूंमध्ये पुढे जाण्याची क्षमता आहे. मात्र, खुल्या गटात अजूनही तुल्यबळ आव्हान तयार झालेलं नाही. बुद्धिबळातलं राजकारण जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत नाशिकचं बुद्धि‘बळ’ दिसणार नाही. पण नाशिकच्या बुद्धिबळातली निष्क्रियता संपणार कधी? सध्याची स्थिती पाहिली तर फिडे रेटिंग मिळविणाऱ्या खेळाडूंची संख्या केवळ ४० आहे. त्यातही सक्रिय खेळाडू ३०-३२ असतील. विशेष म्हणजे मोठ्या गटातील मुले खेळ सोडून देत असल्याचं वास्तव आहे. त्याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये खुल्या गटातील स्पर्धाच होत नाहीत.

राज्याची संलग्नता का गेली?

भारतीय बुद्धिबळ महासंघाने महाराष्ट्रातले सहा विभाग बंद करून सर्व जिल्ह्यांना स्वतंत्र संलग्नत्व देण्याचे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने मराठवाडा, सेंट्रल महाराष्ट्र चेस असोसिएशन (सीएमसीए), विदर्भ, मुंबई शहर, ठाणे आदी विभाग बंद केले आणि सर्व जिल्ह्यांना एमसीएचे संलग्नता घेण्यास सांगितले. मात्र, संलग्नता घेण्यापूर्वी एमसीएला तीन वर्षांचा ऑडिट रिपोर्ट, संलग्नता फी, चेंज रिपोर्ट सादर करण्याचे आवाहन केले. ही पूर्तता केव‍‍ळ १८ जिल्ह्यांनी केली. नाशिक आणि धुळ्याला ती पूर्तता करता आलेली नाही. काही दिवसांनी नाशिकने सचिवपदात बदल केला. त्यात मंडलेचा यांच्याऐवजी तुषार गोसावी यांचं नाव पुढे केलं. पण हा बदल करायचा असेल तर चेंज रिपोर्ट सादर करण्यास सांगितले. तो सादर न केल्याने एमसीएने नाशिक जिल्हा संघटनेला आठवडाभराची मुदत दिली. त्यानंतर दोन महिने झाले. अद्याप पूर्तता न केल्याने एमसीएने नाशिकला संलग्नता दिलेली नाही. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनीच ही माहिती दिली. जर ही माहिती सादर न केल्यास नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेवर अॅडहॉक कमिटी बसविण्याचा इशाराही एमसीएने दिला आहे. नेमकी या घोळातच रेषा मल्टिअॅक्टिव्हिटी सेंटरचा फिडे रेटिंगचा प्रस्ताव आल्याने एमसीएला थेट परवानगी द्यावी लागली. ग्रँडमास्टर विदित गुजराथीचा अभिमान बाळगणाऱ्या नाशिकला ही निष्क्रियता, मरगळ झटकावी लागेल; अन्यथा हे असंच सुरू राहिलं तर नाशिकचं बुद्धिवैभव एका ओळीत संपेल…. विदितपासून विदितपर्यंत!

नाशिकला बुद्धिबळाच्या विकासासाठी कोणी पुढे येत नाही. विदित गुजराथीला प्रायोजकत्वही देऊ शकत नाही. जळगावची जैन स्पोर्टस अॅकॅडमी त्याला मदत करीत आहे. नाशिकमधून मात्र कोणीही पुढे आलेले नाही. खेळासाठी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेने लवकर पाऊले उचलली नाही तर अॅडहॉक कमिटी बसवावी लागेल.
फारूक शेख, समन्वयक, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना

(Maharashtra Times, Nashik, 3 Aug 2015)

[jnews_block_27 first_title=”Read more at:” header_text_color=”#dd3333″ header_line_color=”#dd3333″ include_category=”75″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!