सुंदर ते ध्यान उभे मनपावरी। कर गोदातीरी लावुनिया।
शोभतसी कापडे शभ्र भरजरी। आवडे निरंतरी तें चि रूप।।
खर्च झाला अपार। निर्णय धारदार फोकारुनि अंगणवाड्या।
तुका म्हणे, तेचि बोले कायदा। कितीही करोनिया थाळीनाद।।
समचरणदृष्टी स्मार्टसिटीवरी साजिरी। तेथे अभियंत्यावरी कृपा राहो।
आणीक न लगे लाभाची पदे। आहे तेथेचि सुखी ठेवो।।
आवडीची पदे दु:खाचे कारण। घोंगावती अकारण बदलीचे वावटळ।
तुका म्हणे, लोका कुचराई कळे । भोगतील फळे नाठाळ कर्माची।।
थराथरा कापती अभियंताराया। असे रूप लोचनी साठोनिया।
शिस्तीचा बडगा उगारोनी । अभियंता घाबरोनी परागंदा ।।
कारवाईचा बडगा नसे कळवळा। संचरोनि भीतीगोळा पोटामाजी।
तुका म्हणे, होईल स्मार्ट सिटी । हाणून काठी रटाळांच्या माथी।।
मजसवे पंगा घेऊ नका कोणी। सासुरवासिनी नगरसेवकांनो।
न कळे तुम्हाला जनांचा त्रास। बोलती वाईट वोखटे ते।।
मीच अधिकारी, मीच विचारी। धाक सरकारदरबारी आहे माझा।
तुका म्हणे, नाही उदास। होईल त्रास नाकारूनी करबोजा।।
पैक्याविना नसे स्मार्ट सिटी । लागे करासाठी इंच इंच भूमी।
कळते स्थायीची मखलाशी। खेळले ते कायद्याशी उगाचच।।
मीच कर्ताकरविता नाशिककरांचा । निर्णय आयुक्तांचा कोण रोखे।
तुका म्हणे, राहुनी गोदातटी। हाणुनिया माथी कर-काठी।।
– महेश पठाडे
मनपाच्या ‘क्रीडा’, खेळाडूंना पिडा!
Follow on Twitter @kheliyad