All SportsSports Review

दहीहंडीचा आनंद हिरावणार?

द्वापार युगातली दहीहंडी कलियुगात कधी साहसी झाली ते कळलंच नाही. आता त्याचे नियम, अटी, सुरक्षा साधने आणि गोविंदाच्या वयावरून सध्या खल सुरू आहे. मुळात सण-उत्सवांतल्या खेळांना नियमांच्या चौकटीत आणून आपण त्यातला निखळ आनंद तर हिरावून घेत नाही ना? दहीहंडीचा आनंद हिरावणार की द्विगुणित होणार, यावर मतभेद असले तरी नियमांच्या चौकटीत दहीहंडी सुरक्षित राहावी ही प्रामाणिक इच्छा नागरिकांची आहे.

ण, उत्सवांना मराठी संस्कृतीत अपार महत्त्व. या सण-उत्सवांतील काही खेळ कालौघात लोप पावले, तर काही खेळ आजही मोठ्या उत्साहात खेळले जातात. त्यातलाच एक खेळ म्हणजे दहीहंडी. पुराणकथांमध्ये दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्तीचा उल्लेख आहे, जे आता सर्वसामान्य झाले आहेत. त्यांचा आद्यपुरस्कर्ता श्रीकृष्णच, अशी श्रद्धा आहे. द्वापार युगात श्रीकृष्णाने अर्थातच गोविंदाने दही, दूध, लोणी चोरताना गोकुळवासीयांची मने चोरली नाहीत, तर जिंकली! लहानपणापासून आपण श्रीकृष्णाच्या लीला वाचत आलोय. दहीहंडी म्हणजे एकीचे, एकोप्याचे, आनंदाचे थर… द्वापारयुग ते कलियुग केवढा मोठा प्रवास हा या दहीहंडीचा!

दहीहंडीचा आनंद हिरावणार का, या प्रश्नाभोवती सध्या ऊहापोह सुरू आहे. दहीहंडीसारखे अनेक खेळ आहेत, ज्यातून शारीरिक कौशल्याची चुणूक पाहायला मिळते. अशा मनोरंजनात्मक खेळांनाही खेळाचा दर्जा दिला तर त्यातला आनंद टिकून राहणार आहे का? सण, उत्सवांमध्ये रंगपंचमी, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झोका खेळणे, मकरसंक्रांतीला पतंग खेळणे हे सर्व खेळ निखळ आनंद देणारे आहेत. पावसाळ्यात विटी-दांडू खेळण्यातला आनंद अवर्णनीयच. हे खेळांचे नियमही कधी आनंदाला बाधा आणू शकले नाहीत. त्याला कधी पंच नव्हता. या उत्सवी खेळांचा अतिरेक झाला, की त्याला नियम येणारच. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याऐवजी तो उत्सवातला आनंदी खेळ म्हणून केवळ काही नियम, अटी केल्या तर गैर नाही. मात्र, त्याला साहसी खेळ म्हणून मान्यता देऊन सरकारला काय अपेक्षित आहे, हेच कळत नाही. या खेळातल्या आनंदाला धक्का न पोचवता नियम लागू केले तर कोणालाही त्यात आश्चर्य वाटले नसते. मात्र, साहसी खेळाचा दर्जा दिल्याने उत्सवांतल्या खेळांच्या रांगेत मग रंगपंचमी, पतंगांसारख्या खेळांचाही कोणी तरी प्रस्ताव घेऊन उभे राहिल्यास नवल वाटायला नको.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचं वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी, होळीचं वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी, मकरसंक्रांती म्हणजे पतंगांचा उत्सव. सण-उत्सवांची ओळखच मुळी हे खेळ आहेत, जे केवळ निखळ आनंद देणारे आहेत. या खेळांना दर्जा देऊन ते हिरावण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दहीहंडी एवढी ग्लॅमरस झालीय, की हा आनंदी, उत्सवी खेळ इव्हेंट झालाय. या इव्हेंटमध्ये गेल्या वर्षी दोनशेवर गोविंदा जखमी झाले. त्यामुळे हा थरांचा खेळ नाही तर थरथराटाचा खेळ झालाय. त्यामुळेच हायकोर्टाने १८ वर्षांखालील गोविंदांच्या दहीहंडीतल्या सहभागावर बंदी घातली. वीस फुटांपेक्षा जास्त उंचीच्या हंड्या बांधू नयेत, असे आदेश दिले.

राज्य सरकारने या थराथराटाच्या खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, स्किइंग, स्नो बोर्डिंग, पॅरासेलिंग, हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग, जलक्रीडा अशा साहसी खेळांमध्ये आता दहीहंडीही समाविष्ट झाली. ती नियमांच्या चौकटीत आली तरी राज्य सरकार आणि गोविंदा मंडळांमध्ये अद्याप काही नियमांच्या बाबतीत एकमत झालेले नाही. प्रश्न नियमांचा नाही, तर आनंदाचा आहे.

का आहे साहसी खेळ?

दहीहंडीत सात-आठ थर रचले जातात. सरकारच्या मते, अनेक देशांमध्ये मानवी मनोरे (पिरॅमिड्स) रचण्याचा खेळ खेळला जातो. आपल्याकडे दहीहंडीचा खेळ त्याच प्रकारात मोडतो. म्हणूनच दहीहंडीला साहसी क्रीडाप्रकारात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे. खेळ सुरक्षित व्हावे, नियम असावेत, पण त्यातला आनंद हरवू नये. कारण खेळाचा दर्जा आला, की संघटना आल्या. इतर ठिकाणी होणाऱ्या खेळांवर या संघटनांचं वर्चस्व आलं. त्यामुळे सामान्यांपर्यंत रुजलेले खेळ हळूहळू संघटनांपुरते मर्यादित राहतात. ही भीती व्यक्त करण्याचे कारण म्हणजे, नुकत्याच झालेल्या बैठकीत जी दहीहंडी मंडळे धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर असतील तेवढ्याच मंडळांना दहीहंडी खेळण्यासाठी मान्यता दिली जावी, असा काही सदस्यांचा आग्रह होता.

दहीहंडी की गोविंदा?

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने आता या खेळाचे नावही बदलण्यात आले आहे. कारण दहीहंडी हा उत्सव आहे. त्यामुळे या खेळाचं नावही बदलावं म्हणून या खेळासाठी नेमल्या गेलेल्या समितीच्या बैठकीत या खेळाचे नामकरणही करण्यात आले आहे. या खेळाला ‘गोविंदा’ असे म्हटले जाणार आहे. तूर्तास तरी हे नाव निश्चित झाले आहे.

दहीहंडीचा आनंद हिरावणार

प्रश्न हा आहे, की दहिहंडीचा आनंद हिरावणार का? दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळाल्याने सुरक्षा साधनांबाबत नियम बंधनकारक होतील. म्हणजे आज जी दहीहंडी गावोगाव खेळली जाते, त्या दहीहंडीला नियमांचा फटका बसणार. सेफ्टी बेल्ट, हेल्मेट पुरविणे, हंडी बांधताना मनोरे ज्या ठिकाणी रचण्यात येतील त्या ठिकाणी रबरी मॅटची सोय करणे, उत्सवाच्या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, दोन कार्डियाक अॅम्ब्युलन्स असाव्यात अशा काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. मुंबईतली दहीहंडी व्यावसायिक होतेय. तेथे या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातीलही. मात्र, गावागावांतल्या दहीहंडीत हे सगळं उपलब्ध करता येईल का? आणि मुंबईव्यतिरिक्त सहा ते सात थरांची दहीहंडी अन्य शहरांमध्ये फारशी आढळत नाही. लहान लहान गावांना सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व उपाययोजना करणे तर अजिबात शक्य होणार नाही. त्यामुळे ही सुरक्षा साधने विशिष्ट थरांपुरती आहे की सरसकट सर्वांनाच आहे याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र, ते सर्वांनाच लागू होईल हे नक्की. त्यामुळे पुढील काळात उत्सवांतला आनंद हिरावणाऱ्या अटी-नियमांत अन्य खेळही सापडू नये एवढीच माफक अपेक्षा.

(Published in Maharashtra Times, Nashik. 13 July 2015)

[jnews_hero_8 include_category=”60″]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!